चालू घडामोडी - १३ जानेवारी २०१८

Date : 13 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता पासपोर्ट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही :
  • नवी दिल्ली- परराष्ट्र मंत्रालय लवकरच पासपोर्टच्या शेवटचं पानं वगळण्याची शक्यता आहे. पासपोर्टच्या शेवटच्या पानावरच धारकाचं नाव आणि पत्ता असतो. त्यामुळे येत्या काळात पासपोर्ट तुम्हाला रहिवासाचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही.

  • पासपोर्टची नवी सीरिज लवकरच येणार असून, नव्या सीरिजनुसार शेवटचे पान कोरं ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्टवर आता तुमचा पत्ता पाहायला मिळणार नाही.

  • सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ब-याचदा पासपोर्टचा रहिवासाचा पुरावा म्हणून वापर केला जातो. सद्यस्थितीत पासपोर्टच्या अंतिम पानावर संबंधित पासपोर्टधारकाचा पत्ता छापला जातो. परंतु या नव्या सीरिजमध्ये शेवटचे पान खाली ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या पानावर काहीही छापलं जाणार नाही.

  • पासपोर्टच्या नव्या सीरिजमध्ये लवकरच बदल होणार आहे. नव्या सीरिजनुसार लवकरच तुम्हाला पासपोर्ट मिळणार आहे. पान कोरं ठेवण्याबरोबरच पासपोर्टच्या रंगामध्येही बदल केला जाणार आहे.

  • सध्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर पासपोर्टधारकाच्या छायाचित्रासह काही आवश्यक माहिती दिली जाते. त्यानंतर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधिताचा पत्ता छापला जातो. पासपोर्टच्या शेवटच्या पानावर बारकोड देण्यात येणार असून, बारकोडला स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सगळी माहिती मिळणार आहे.

अमेझॉनचा सीईओ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती तब्बल... :
  • न्यूयॉर्क : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सनं जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बेजोसला पहिलं स्थान दिलं आहे.

  • ब्लूमबर्गच्या मते, बुधवारपर्यंत बेजोसची संपत्ती 106 अब्ज डॉलर एवढी होती. तर फोर्ब्सनुसार त्याची संपत्ती 105 अब्ज डॉलर एवढी आहे.

  • याआधी हा विक्रम मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. 1999 साली त्याची संपत्ती 100 अब्ज डॉलर एवढी होती. पण आता बेजोसनं त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. 2017 मध्ये त्याचे शेअर जवळजवळ 57 टक्क्यांपर्यंत पोहचले होते.

  • दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर आहे.

मोदींचा जगभरात दबदबा, रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर! :
  • नवी दिल्ली: जागतिक नेत्यांच्या रांगेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वरचष्मा बघायला मिळतोय. कारण जागतिक रँकिंगमध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं. यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल  पहिल्या क्रमांकावर आहेत, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • विशेष म्हणजे मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते. (source : abpmajha)

सरन्यायाधीशांविरुद्ध बंड! सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांचे उघड शरसंधान, प्रथमच माध्यमांसमोर :
  • नवी दिल्ली : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ‘न भूतो...’ अशा घटनेने शुक्रवारी न्यायसंस्थेसह देश हादरून गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ ज्येष्ठतम न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन, सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांनी गेल्या काही दिवसांत दिलेल्या निर्णयांवर गंभीर आक्षेप घेतले.

  • ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही, तर न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य आणि पर्यायाने लोकशाही धोक्यात येईल, असा गंभीर इशारा देत, या न्यायाधीशांनी यासंबंधी काय करावे, याचा निर्णय जनतेच्या न्यायालयाकडे सोपविला.

  • सकाळी माध्यम प्रतिनिधींना ४, तुघलक रोड येथील न्या. जस्ती चेलमेश्वर यांच्या निवासस्थानी तातडीने येण्याचे निरोप गेले. पुढील अर्ध्या तासात तेथे जे घडले, ते अभूतपूर्व होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमध्ये आपसात बरेच काही खदखदत आहे, याची कुणकुण बरेच दिवस होती.

  • न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ या सरन्यायाधीशांनंतरच्या ४ ज्येष्ठ न्यायाधीशांनी ही खदखद जाहीरपणे चव्हाट्यावर मांडली. मात्र, त्यांनी कोणत्याही ठरावीक प्रकरणांचा तपशील दिला नाही. नंतर त्यांनी सरन्यायाधीश न्या. मिस्रा यांना लिहिलेले सात पानी पत्र माध्यमांना उपलब्ध करून दिले. यावरून या न्यायाधीशांची तक्रार सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यांनी दिलेल्या काही निर्णयांविषयी आहे, हे स्पष्ट झाले.

गोव्यात मंगळवारपासून विज्ञान चित्रपट महोत्सव :
  • पणजी : विज्ञान परिषद-गोवातर्फे येत्या १६ ते १९ या काळात तिस-या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉलिवूडचे विज्ञानावर आधारित सात व भारतीय एक मिळून आठ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील. गोव्यासह शेजारी सिंधुदुर्गमधील मिळून १0 हजारांहून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेतील.

  • पत्रकार परिषदेत विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे व मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तालक यांनी ही माहिती दिली. मनोरंजन संस्था, राज्य सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, गोवा विज्ञान केंद्र, नॅशनल सेंटर फॉर अ‍ॅटार्क्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १00 विद्यालयांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांशी या चित्रपट महोत्सवाबद्दल संवाद साधलेला आहे.

  • यंदा या चित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाधारित चित्रपट निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालक म्हणाले की, २0१६ साली हा चित्रपट महोत्सव सुरू झाला तेव्हा ६९ विद्यालयांमधून ५ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. संशोधक व निर्माते यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी चांगले व्यासपीठ महोत्सवानिमित्त उपलब्ध झाले आहे.

  • या शिवाय रोबोटिक स्पर्धा, फॅबलॅब शो हे खास आकर्षण असेल. महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणारे सात विज्ञानाधारित चित्रपट अमेरिकेचे तर एक तामिळी आहे. अ‍ॅड्रोमेडा स्ट्रेन ( थ्रिलर), आइस एज : कोलिजन कोर्स (अ‍ॅनिमेशन, अ‍ॅडव्हेंचर), २0१0 (अ‍ॅडव्हेंचर), लाइफ (थ्रिलर, हॉरर), अ‍ॅरायव्हल (ड्रामा), कोअर (अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर), अ‍ॅबिस (१९८९) (अ‍ॅडव्हेंचर) हे अमेरिकेचे तर २४ हा भारतीय तामीळ चित्रपटही प्रदर्शित केला जाणार आहे. आयनॉक्स १ व आयनॉक्स २ या स्क्रीनवर हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. 

सीपीआय खासदार डी. राजांची न्यायमूर्ती चेलमेश्वरांशी भेट :
  • नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन न्यायपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता या पत्रकार परिषदेनंतर सीपीआय नेते डी. राजा यांनी न्यायमूर्ती चेलमेश्वरांची भेट घेतल्याने, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

  • सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोर्टाच्या कामकाजात ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचं सांगितलं. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच ही पत्रकार परिषद न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या घराबाहेर घेण्यात आली.

  • “पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. 

  • आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये, म्हणून आम्ही ही परिस्थिती सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.” असंही न्यायमूर्तींनी यावेळी सांगितलं.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा, 75 तालुक्यांची निवड :
  • मुंबई : पाणी फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिर खान, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, सत्यजित भटकळ, अमिरच्या पत्नी किरण राव आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

  • वॉटरकप स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या स्पर्धेचं कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेने गाव एकसंघ झालेलं पाहायला मिळाल्याचं म्हटलं. तर यंदा या स्पर्धेत तब्बल 75 तालुके सहभागी होणार असल्याचं सांगितलं.

  • यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2018 आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. अशा रीतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास 10 कोटी रुपये असेल. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे.

  • सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पाया हा ज्ञान आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थीना 'पानी फाऊंडेशन’ पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतात. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.

​​​​​​​दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

  • १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

  • १९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

  • १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

  • १९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

  • १९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

  • १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

  • १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

  • १९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

  • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म

  • १९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

  • १९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल२००९)

  • १९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

  • १९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

  • १९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

  • १९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

  • १९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

मृत्यू

  • १८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर१७५५)

  • १९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

  • १९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

  • १९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल१९१२)

  • १९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

  • २००१: संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

  • २०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

  • २०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.