चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जून २०१९

Date : 13 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर :
  • यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली.

  • १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार (२६ जून) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

  • यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजीक क्षेत्रातील अमुल्य कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशांसाठी नवे सूत्र अन्यायकारक :
  • राज्य मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली म्हणून आयत्या वेळी अकरावीची प्रवेश प्रक्रिया बदलण्याचा घाट घातला जात आहे. जर निकालात फारसा फरक पडला नसता तर हा बदल केला असता का, असा प्रश्न उपस्थित करत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्याचे नवे सूत्र अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थी, पालकांनी व्यक्त केली.

  • शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्याबाबतचा मुद्दा मांडला. या दोन्ही मंडळाचे विद्यार्थी आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना एका पातळीवर आणण्यासाठी काही मुख्याध्यापक आणि पालकांच्या सूचनेनंतर तावडे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पाश्र्वभूमीवर आता सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी आहे.

  • सीबीएसई आणि आयसीएसईचा अभ्यासक्रम कठीण आहे. काही शाळा विद्यार्थ्यांना जास्त गुण देतही असतील, पण राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल कमी लागला म्हणून अचानक प्रवेश प्रक्रियाच कशी काय बदलू शकते? गेल्या वर्षी हा मुद्दा का उपस्थित झाला नाही? राज्य सरकारची ही दुटप्पी भूमिका नाही का? असा मुद्दा काही पालकांनी उपस्थित केला. सीबीएसई, आयसीएसई या मंडळांच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यास केला आहे, मेहनत केली आहे.

  • मग अचानक अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर नियम बदलणे या विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या सर्वच विद्यार्थ्यांना ९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांना ७० टक्क्य़ांहून कमी गुण आहेत. त्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरल्यास ते आणखी कमी होऊन प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियात धावणार ‘मेक इन इंडिया’ मेट्रो :
  • भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ योजनेची सुरूवात केली होती. ‘मेक इन इंडिया’ योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.

  • गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच ‘मेक इन इंडिया’ या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.

  • सिडनीत पहिल्यांदाच चालक विरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये 6 कोचेस देण्यात आले असून 22 अॅल्सटॉम ट्रेनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. तल्लावांग मेट्रो स्टेशन ते वेस्टवूड स्थानकादरम्यान ही मेट्रो सेवा चालवण्यात येईल.

  • तल्लावांग ते वेस्टवूडदरम्यान एकूण 13 मेट्रो स्थानके असतील. सिडनी मेट्रोसाठी ‘अॅल्सटॉम एसए’ या कंपनीने 22 मेट्रो ट्रेन तयार केल्या आहेत. या ट्रेन आंध्र प्रदेशात असेंबल करण्यात आल्या असून त्या पूर्णत: स्वयंचलित आहे. यामध्ये एलईडी लाइट, आपात्कालिन इंटरकॉम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच ‘एल्सटॉम एसए’ने सिग्नलिंग सिस्टम आणि मेट्रो चालवण्यासाठी सिडनी मेट्रोसोबत 15 वर्षांचा करार केला आहे.

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू – काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.

  • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९’ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.

  • केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीलआ आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर कॅबिनेटची ही पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारच्या नजीकच्या व दुरगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.

‘सकाळी 9.30 पर्यंत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका’; मोदींचे मंत्र्यांना आदेश :
  • दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले. जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो त्यावेळी अधिकाऱ्यांबरोबर वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी आपल्या मंत्र्यांना निवडून आलेल्या खासदारांच्या भेटी घेण्यासही सांगितले. तसेच पुढील पाच वर्षांचा अजेंडा तयार करून कामाची सुरूवात करावी आणि याचा प्रभाव पुढील 100 दिवसांमध्ये दिसला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

  • या बैठकीत मार्च 2019 च्या उच्च शिक्षण संस्थांच्या आरक्षण ऑर्डिनंसला रिप्लेस करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. याद्वारे आता 7 हजार शिक्षकांची भरती करण्यात येऊ शकते. तसेच शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावरही अधिक भर देण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. यामुळे शिक्षकांच्या केडरमध्ये 200 पॉइंट रोस्टरसह थेट भर्ती करून 7 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती करणे तसेच एससी, एसटी, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाच्या जुन्या मागण्या पूर्ण होणार आहेत. तसेच यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठीही 10 टक्के आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

केंद्रात उपसचिव, संचालक पदे भरणार खासगी क्षेत्रातून :
  • नवी दिल्ली : नोकरशाहीच्या रचनेत (ब्युरोक्रॅटिक हायरार्की) निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. सामान्यत: ही पदे सरकारी नोकरांतून म्हणजे भारतीय प्रशासन सेवेसारख्या (आयएएस) गट-अ मधून, तसेच केंद्रीय सचिवालय सेवेत बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांतून भरली जातात.

  • कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (डीओपीटी) सचिव सी. चंद्रमौली यांनी संबंधित अधिकाºयांना उपसचिव आणि संचालक या पातळीवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी औपचारिक प्रस्ताव तयार करा, असे सांगितले आहे, असे हा अधिकारी म्हणला.

  • प्रारंभी असे एकूण ४० अधिकारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या नीती आयोगाने व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना ठराविक मुदतीसाठी सामावून घेणे गरजेचे आहे यावर आपल्या अहवालात भर दिला होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर उपसचिव ते संयुक्त सचिव या पदांवर नीती आयोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचाही विचार करीत आहे. सल्लागारांची सेवा घेतली जात आहे; परंतु हे तज्ज्ञ सामावून घेण्यात आले तर त्यांचा दर्जा सरकारी सेवेतून त्या पदावर येणाºयांचा जो असतो तोच असेल, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, याबाबत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचे अर्ज मागवणारी जाहिरात लवकरच दिली जाईल.

१५ जुलै रोजीभारताची चंद्रावरील दुसरी स्वारी :
  • बंगळुरु : चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या ‘चांद्रयान-२’ या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी सात आठवड्यांच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची माहिती दिली. चांद्रयान-२साठी ‘जीएसएलव्ही-५ मार्क ३’ हा अग्निबाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ तळावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केला जाईल.

  • मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात वैज्ञानिक संशोधनासाठीची साधने व उपकरणे असलेले ‘विक्रम’ हे लॅण्डर व ‘प्रग्यान’ ही गाडी (रोव्हर) ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविली जाईल. दहा वर्षांपूर्वी भारताने ‘चांद्रयान-१’ मोहीम पूर्ण केली होती. आताची मोहीम प्रगत व तंत्रसिद्धतेने अधिक आव्हानात्मक असेल.

  • ‘चांद्रयान-१’मध्ये चंद्रावर न उतरता ११ वैज्ञनिक उपकरणांनी चंद्राचा दुरुनच अभ्यास केला होता. आता ‘प्रग्यान’ला कुशीत घेऊन ‘विक्रम’ चंद्रावर उतरेल. नंतर ‘प्रग्यान’ चंद्रावरील दगड-मातीचे नमुने गोळा करेल. दूरवरून अभ्यास करूनही चंद्रावरील पाण्याचा शोध लावणे हा ‘चांद्रयान-१’चा यशाचा तुरा ठरला होता. आता त्याच गृहितकास बळकटी मिळण्याखेरीज चंद्राची नवी गुपितेही उघड होतील.

  • शिवन म्हणाले की, चंद्राभोवती ‘ऑर्बिटर’ने घिरट्या घालण्यापर्यंतचा टप्पा ‘चांद्रयान-१’ प्रमाणे असेल. तेथपर्यंतचे ‘मिशन’ याआधी यशस्वी झाले होतेच. आताच्या ‘मिशन’मधील लॅण्डर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा शेवटचा १५ मिनिटांचा टप्पा पूर्णपणे नवा असल्याने काहीशी धास्ती निर्माण करणारा असेल. पण ‘इस्रो’चे कुशल वैज्ञानिक ही नवखेपणाची बाजीही फत्ते करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत १४ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे यानासोबत पाठविली जातील. ती ‘ऑर्बिटर’, ‘विक्रम’ हा लॅण्डर व ‘प्रग्यान’ हा रोव्हर या तिन्हीवर विखुरलेली असतील व ती एकाच वेळी निरनिराळे प्रयोग-चाचण्या करत राहतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.

  • १८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

  • १९३४: व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.

  • १९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

  • १९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

  • १९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

  • १९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे १०० जण जखमी झाले.

  • २०००: स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

जन्म 

  • १८२२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)

  • १८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)

  • १८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)

  • १९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)

  • १९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च१९९८)

  • १९२३: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)

  • १९३७: द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.

  • १९६५: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९६७: भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)

  • १९६९: विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)

  • २०१२: पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९२७)

  • २०१३: ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.