चालू घडामोडी - १३ मार्च २०१८

Date : 13 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जया बच्चन ठरणार सर्वात श्रीमंत खासदार, जाणून घ्या त्यांच्याकडील संपत्ती :
  • समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या सर्वात श्रीमंत खासदार ठरणार आहेत. जया बच्चन यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. जया बच्चन यांची संपत्ती तब्बल एक हजार कोटींच्या घरात असून यापूर्वी भाजपाचे राज्यसभेतील खासदार रविंद्र किशोर सिन्हा हे सर्वात श्रीमंत खासदार म्हणून ओळखले जायचे. त्यांची संपत्ती आठशे कोटी रुपयांच्या घरात होती.

  • जया बच्चन यांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीची माहिती दिली. विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती ४९३ कोटी रुपये इतकी होती. मात्र, आता यात वाढ झाली आहे.

  • प्रतिज्ञापत्रानुसार जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे ४६० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याकडे सोने, चांदी, हिरे जडजवारे असे ६२ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यात जया बच्चन यांच्याकडील २६ कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे.

  • तर बच्चन दाम्पत्याकडे १२ गाड्या असून याची किंमत १३ कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये मर्सिडिज, पॉर्शे आणि टाटा नॅनो अशा कारचा समावेश आहे. फ्रान्समध्येही बच्चन दाम्पत्याची संपत्ती असून याशिवाय नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदनगर आणि गांधीनगर या शहरांमध्येही त्यांची जागा आहे.

उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे लोकार्पण :
  • उत्तर प्रदेशातील सर्वात मोठय़ा सौरप्रकल्पाचे उद्घाटन व  लोकार्पण मिर्झापूर जिल्ह्यात छानवे गटात पंतप्रधान नरेंद्र मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले. पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन व त्यांच्या पत्नी ब्रिगेट यांचे येथे स्वागत केले.

  • पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन यांनी एक कळ दाबून सौरप्रकल्पाचे उद्घाटन केले. ७५ मेगावॉटचा हा प्रकल्प आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पात ५०० कोटी रुपये खर्च झाले असून फ्रान्सच्या एन्जी या कंपनीने तो उभारला आहे. विंध्य पर्वतराजीत दादर कलान खेडय़ातील उंचावरील भागात हा प्रकल्प असून त्याला ११८६०० सौर पट्टय़ा आहेत. एकूण ३८० एकर भागात तो पसरलेला आहे.

  • यातील वीज उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये असलेल्या जिगना उपकेंद्रात सोडली जाईल. वार्षिक १५.६ कोटी युनिट विजेची निर्मिती त्यात होणार असून महिन्याला १.३० कोटी युनिट वीज निर्मिती होईल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे आयएसएच्या परिषदेत काल मोदी यांनी असे सांगितले होते की, सौर प्रकल्पांना सवलतीच्या दरात आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे एकूण ऊर्जेत सौरऊर्जेचा वाटा वाढले. आयएसएची संकल्पना मोदी यांची असून त्यासाठी १२१ देश एकत्र आले आहेत. भारत त्यात २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट वीज निर्मिती करणार आहे.

  • सध्याच्या शाश्वत वीजनिर्मिती क्षमतेच्या हे प्रमाण  दुप्पट असणार आहे. त्यामुळे भारत युरोपीय समुदायाला मागे टाकील. भारताला २०१८ ते २०२२ दरम्यान ८३ अब्ज डॉलर्सचा निधी  १७५ गिगावॅट च्या वीज निर्मितीसाठी लागणार आहे. सध्या भारताची शाश्वत ऊर्जा क्षमता ६३ गिगावॅट  आहे. सौर व पवन ऊर्जेचे दर युनिटला २.४४ रुपये व ३.४६ रुपये इतके कमी आहेत,

  • जगात हे दर सर्वात नीचांकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयएसए म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. पॅरिस जाहीरनाम्यानंतर त्याची स्थापना करण्यात आली होती.

संरक्षणमंत्री सीतारामन पुढील महिन्यात चीनला :
  • संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या पुढील महिन्यात चीनला भेट देणार आहेत. डोकलामच्या तिढय़ानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत आलेल्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर ही भेट महत्त्वाची राहणार आहे.

  • एप्रिल महिनाअखेर आपण चीनला जाण्याची शक्यता असल्याचे सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले, मात्र तेथील बैठकीचा विषय काय राहील याचा तपशील त्यांनी दिला नाही.

  • भारत व चीनच्या सैन्यात डोकलाम येथे उद्भवलेला ७३ दिवसांचा तिढा संपवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घेतला होता. या भांडणामुळे दोन्ही देशांचे संबंध बरेच तणावाचे झाले आहेत. दोन्ही सैन्यांनी या ठिकाणाहून माघार घेतली असती, तरी या मुद्दय़ाचा दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम झाला आहे.

सोनिया गांधींची ‘डिनर डिप्लोमसी’, १७ पक्ष होणार सहभागी :
  • काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात एकत्र येण्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या स्नेहभोजनात १७ पक्ष सहभागी होणार आहेत.

  • मात्र बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चारही नेते या स्नेहभोजनात सहभागी होणार नसल्याचे समजते आहे. असे असले तरीही हे चारही नेते आपले प्रतिनिधी या स्नेह भोजनासाठी पाठवणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या विरोधकांना आपल्या सोबत आणण्यासाठी सोनिया गांधी प्रयत्न करणार आहेत. त्या अनुषंगाने त्या आज सगळ्या विरोधकांशी चर्चा करतील अशी माहिती समोर आली आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सोबत सगळे पक्ष आले तरच भाजपाला टक्कर देता येईल हे सोनिया गांधी यांना अधोरेखित करायचे आहे त्याचमुळे ही डिनर डिप्लोमसीची खेळी त्या खेळत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • असे असले तरीही या स्नेहभोजनासाठी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी न येणे हा सोनिया गांधी यांच्यासाठी काहीसा अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कोणतीही तिसरी किंवा चौथी आघाडी उभी राहण्यापेक्षा सगळ्या विरोधकांनी एकवटले पाहिजे तर त्यांना टक्कर देता येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दिली आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद चांदेकर यांचे निधन :
  • पुणे:  'हसरी उठाठेव' या विनोदी नाट्यातून रसिकांचे दीर्घकाळ मनोरंजन करणारे एकपात्री क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी  सदानंद चांदेकर यांचे डोंबिवलीत निधन झाले. आपल्या एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवले.

  • 'आम्ही दिवटे' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. पुण्यातील राहत्या घरी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले आहे.  त्यानंतर सकाळी 9 वाजता नाट्य परिषदेच्या आवारात अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे.

  • गेल्या काही दिवसांपूर्वी ते डोंबिवलीमध्ये मुलाच्या घरी राहत होते. यावेळी ते घरात पडले. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील आल्याचे समजते. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 68 वर्षांचे होते.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना 

  • १७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

  • १८९७: सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

  • १९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.

  • १९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

  • १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

  • १९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

  • २००३: मुंबई शहरातील लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले.

  • २००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

जन्म

  • १७३३: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)

  • १८९३: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल१९८५)

  • १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)

  • १९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)

  • १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन. (जन्म: २७ जून १८७५)

  • १९०१: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १८३३)

  • १९५५: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९०६)

  • १९६७: वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू सर फँक वॉरेल यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२४)

  • १९६९: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

  • १९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.

  • १९९६: अभिनेते आणि नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५)

  • १९९७: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.

  • २००४: सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)

  • २००६: चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.