चालू घडामोडी - १३ मार्च २०१९

Updated On : Mar 13, 2019 | Category : Current Affairsभारतातील मतसंग्राम ठरणार जगातील सर्वात महागडी निवडणूक :
 • जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात पुढील दोन महिने सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या (सीएमएस) अहवालानुसार भारतातील ही निवडणूक प्रक्रिया जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे. भारतातील निवडणुकीवर यंदा तब्बल 50, 000 कोटी रुपये (सात अब्ज डॉलर) इतका खर्च होण्याची शक्यता असून अमेरिकेतील निवडणुकीवर 2016 साली 6.5 अब्ज डॉलर खर्च झाले होते. तर भारतात 2014 साली निवडणुकीवर 5 अब्ज डॉलर खर्च झाले होते.

 • सेंटर फॉर मीडिया स्टडीजने निवडणुकीतील खर्चासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारावर 8 डॉलर खर्च होणार आहे. भारतातील 60 टक्के जनतेचे दिवसाचे उत्पन्न तीन डॉलर असून त्यातुलनेत निवडणुकीत प्रत्येक मतदारावर होणारा खर्च जास्त आहे. सीएमएसचे प्रमुख एन भास्कर राव यांनी सांगितले की, निवडणुकीतील जास्तीत जास्त खर्च हा सोशल मीडिया, प्रवास आणि जाहिरात यावर खर्च होणार आहे.

 • सोशल मीडियावरील खर्च यंदा जास्त असेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. 2014 मध्ये सोशल मीडियावर 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यावेळी हा आकडा  5 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मुलाखती, सरकारी आकडेवारी आणि अन्य माध्यमांमधून ही माहिती गोळा करण्यात आली आहे. यंदा उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी हेलिकॉप्टर, बस आणि प्रवासाच्या अन्य माध्यमांवरील खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे.

 • भारतातील निवडणुकीवर लक्ष ठेवणारे कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यपक सायमन शोशार्ड यांच्या मते, खर्चाची नेमकी आकडेवारी समोर येणे कठीणच आहे. मात्र, निवडणुकीतील खर्च वाढणार हे स्पष्ट आहे. कारण, मतदार संघ वाढत असतानाच उमेदवारही वाढत आहेत. 543 जागांसाठी आठ हजारहून अधिक उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याने स्पर्धा रंगतदार होणार आहे. गुप्त मतदान असल्याने लाच स्वीकारल्यानंतरही मतदार त्याच उमेदवाराला मतदान करणार, याची खात्री नसते. उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूवरुन मतदार उमेदवार किती प्रभावशाली आहे, हे ठरवतात, असे शोशार्ड यांचे म्हणणे आहे.

महासागरात सात हजार सूक्ष्म जीवांच्या प्रजातींचा शोध :
 • प्रशांत, अ‍ॅटलांटिक व हिंदी महासागरात सूक्ष्म जीवांच्या एकूण सात हजार नवीन प्रजाती सापडल्या असून त्यामुळे जैवविविधतेचे आपले ज्ञान अधिक विस्तारणार आहे.

 • हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी या सूक्ष्म जीवांचा शोध घेतला असून त्यात अ‍ॅसिडोबॅक्टेरिया या नैसर्गिक सूक्ष्म जीवाचा समावेश आहे. हा सूक्ष्म जीव  सागरी असून त्यात पहिल्यांदा क्रिस्पर ही जनुक संपादन प्रणाली नैसर्गिक पातळीवर दिसून आली होती. गेल्या आठ वर्षांतील संशोधनाचे हे फलित असून वैज्ञानिकांनी यात विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन त्यात जैवपटले तयार करणाऱ्या सूक्ष्म जीवांच्या प्रजाती शोधल्या. यात दहा नवीन जीवाणूंचा समावेश आहे.

 • जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून जगात केवळ ३५००० सूक्ष्म सागरी जीव ८०  सागरी जीवाणू असल्याचा दावा खोटा ठरला आहे. प्रत्यक्षात खूप अधिक प्रजाती त्यात आहेत  यातून महासागरातील जैवविविधतेचे आपले ज्ञान वाढणार असून त्यातून नवीन औषधे तयार करता येणार आहेत.

 • अ‍ॅसिडोबॅक्टेरिया हा नवीन प्रकारच सागरी सूक्ष्म  जीव असून तो फायला या प्रवर्गात मोडणार आहे. तो मातीतही असतो त्याचा उपयोग प्रतिजैविके व कर्करोगविरोधी औषधे तयार करण्यासाठी वापरतात कारण त्यात विशिष्ट प्रकारची जनुके असतात. या प्रजातींमुळे रोगांवर नवीन उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार असून सागरी प्रजातीत नैसर्गिक जनुक संपादन प्रक्रिया म्हणजे क्रिस्परचा अवलंब होत असतो.

१० देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’ :
 • इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानामधील त्रुटी दूर करुन त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही, असे डीजीसीएने म्हटले आहे.

 • इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. रविवारी झालेल्या अपघातात १५७ जण ठार झाले आहेत. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स 8 या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. चीनने सर्वप्रथम या बोईंग विमानांना व्यावसायिक सेवेतून काढून घेतले. यानंतर मंगळवारी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला.

 • अखेर भारताने या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी हवाई वाहतुकमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर डीजीसीएने बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

थेरेसा मे यांना पुन्हा धक्का, ब्रेग्झिट करारावरील मतदानात दुसऱ्यांदा पराभव :
 • युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट समझोत्यावर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात मंगळवारी मतदान झाले. हा करार प्रतिनिधी गृहाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. ब्रेग्झिट करारावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा दुसऱ्यांदा हादरा बसला असून 391 विरुद्ध 242 मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

 • ब्रिटनच्या जनतेने 2016 मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिल्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा यांनी दोन वर्षे युरोपीय महासंघाशी वाटाघी केल्या. त्यासंदर्भातील ब्रेग्झिट करारावर मंगळवारी ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मतदान झाले. 391 विरुद्ध 242 मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

 • यंदा थेरेसा मे यांना 149 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. मे यांच्या हुजूर पक्षाच्या 75 खासदारांनी ब्रेग्झिटविरोधात मतदान केले.  जानेवारी महिन्याच्या तुलनेत यावेळी थेरेसा मे यांना कमी मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. जानेवारीमध्ये झालेल्या मतदानात थेरेसा मे यांना 432 विरुद्ध 202 म्हणजे तब्बल 230 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

 • ब्रेग्झिटचा तिढा २३ जून २०१६ रोजी झालेल्या सार्वमतात ब्रिटनच्या नागरिकांनी ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के अशा बहुमताने २८ देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला. यामुळे युरोपीय महासंघात कायम राहण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केलेल्या आणि सार्वमत पुकारलेल्या हुजूर पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला.

लैंगिक गैरवर्तनातील अधिकाऱ्यास गुगलने दिली मोठी रक्कम :
 • गुगलने माजी अधिकारी अमित सिंघल यांनी २०१६ मध्ये लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली राजीनामा दिल्यानंतर त्यांना ४५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 • सिंघल हे गुगल सर्च ऑपरेशनचे काम करीत होते व ते त्या वेळी उपाध्यक्षपदी काम करीत होते. त्यांना किती रक्कम देण्यात आली हे सोमवारी भागधारकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत जाहीर करण्यात आले असून लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यास एवढी मोठी रक्कम देऊन अल्फाबेट या गुगलच्या मातृ कंपनीने जबाबदारी टाळली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. दी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने याचे वृत्त दिले आहे.

 • गुगलने लैंगिक छळवणुकीची प्रकरणे योग्य प्रकारे हाताळली नसल्याच्या वादातून भागधारकांनी जानेवारीत कॅलिफोर्निया न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात संचालक मंडळाच्या बैठकीतील चर्चेचा काही भाग वगळण्यात आला होता पण सोमवारी दाखल केलेल्या नव्या याचिकेत कुठलाही भाग न वगळता याचिका दाखल केली आहे. गुगलने सिंघल यांना दोन वर्षांकरिता १५ दशलक्ष डॉलर्स व तिसऱ्या वर्षी ५ ते १५ दशलक्ष डॉलर्स देण्याचे  मान्य केले होते. स्पर्धक कंपनीत त्यांनी जाऊ नये यासाठी त्यांना ही तडजोड रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले नंतर त्यांनी उबर कंपनीत नोकरी स्वीकारली होती.

 • भागधारकांचे वकील फ्रँक बोटिनी यांनी सांगितले, की संचालक मंडळाने लैंगिक छळवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला पैसे देऊन जबाबदारी टाळली आहे.

भाजपा आमदाराला दणका, फेसबुकवरील अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश :
 • केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भाजपा नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले दोन पोस्टर हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.

 • निवडणूक प्रचार आणि वातावरण निर्मितीत समाजमाध्यमांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने समाजमाध्यमांसाठी काही निकष निश्चित केले आहेत.समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींच्या संबंधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याचीही (ग्रिव्हन्स ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत निवडणूक आयोगाने पहिली कारवाई भाजपा आमदाराच्या पोस्टवर केली आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी 1 मार्च फेसबुकवर दोन पोस्टर शेअर केले होते. यात विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे छायाचित्र होते.

 • यातील एका पोस्टरवर म्हटले होते की, मोदींनी इतक्या कमी वेळात अभिनंदन यांना भारतात परत आणणे, हे भारताचा मोठा विजय आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर पाकिस्तानची शरणागती, देशाचा वीर जवान मायदेशी परतला, असे म्हटले होते. या दोन्ही पोस्टरसंदर्भात निवडणूक आयोगाकडे ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपद्वारे तक्रार आली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७८१: विल्यम हर्षेल यांनी युरेनसचा शोध लावला.

 • १९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

 • १९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

 • १९९७: मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.

 • १९९९: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले.

जन्म 

 • १८९६: प्राच्यविद्या संशोधक महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८५)

 • १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)

 • १९३८: ४९वे योकोझुना जपानी सुमो तोचीनौमी तेरुयोशी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८००: पेशवे दरबारातील एक मंत्री नानासाहेब फडणवीस यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ – सातारा)

 • १९०१: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २० ऑगस्ट १८३३)

 • १९६९: गणितशास्रज्ञ रँग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.

 • १९९४: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिटू या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.

 • १९९७: राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू शीला इराणी यांचे निधन.

 • २००४: सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२८)

 • २००६: चिकन नुग्गेत चे निर्माते रॉबर्ट सी बेकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १९२१)

टिप्पणी करा (Comment Below)