चालू घडामोडी - १३ मे २०१८

Date : 13 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुक्तिनाथ मंदिराला भेट देणारे मोदी पहिले परदेशी नेते :
  • नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा व प्रार्थना केली. हे मंदिर बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्र आहे. या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत. मोदी यांनी बागमती नदीच्या तीरावरील पशुपतिनाथ मंदिरातही प्रार्थना केली.

  • पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात जुने शिवमंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मोदी यांनी अभ्यागतपुस्तिकेत स्वाक्षरी केली. या वेळी त्यांना मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली. सकाळी मोदी हे मुस्तांग जिल्हय़ात गेले. तेथे त्यांनी मुक्तिनाथ मंदिरात पूजाअर्चा केली.

  • मुक्तिनाथ मंदिर हे १२१७२ फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती असून तेथे मोदी यांनी प्रार्थना केली, असे  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.

  • या मंदिराला भेट देणारे मोदी हे पहिलेच परदेशी पाहुणे असल्याचे पंतप्रधान के.पी.एस. ओली यांनी सांगितले. मुश्तांग येथे मोदी यांच्या भेटीनिमित्ताने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुक्तिनाथ मंदिर हे हिंदू व बौद्ध यांचे पवित्र क्षेत्र असून, ते मुक्तिनाथ खोऱ्यात आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा ३०, ३१ मे रोजी संप :
  • नवी दिल्ली : नव्या वेतन कराराच्या वाटाघाटी प्रामाणिकपणे न करण्याच्या व्यवस्थापनांच्या कथित आडमुठ्या धोरणाच्या निषेधार्थ सरकारी आणि खासगी बँकांमधील १० लाखांहून अधिक कर्मचारी ३० व ३१ मे रोजी देशव्यापी संप करणार आहेत.

  • बँक कर्मचाºयांच्या सात देशव्यापी संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या ‘युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियन’ने ही संपाची हाक दिली आहे. आधीचा वेतन करार गेल्या वर्षी संपला. मुंबईत झालेल्या वाटाघाटींमध्ये ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने मार्च २०१७च्या तुलनेत दोन टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव दिला. तसेच या वेतन करारात फक्त स्केल-३पर्यंतच्या अधिकाºयांनाच सामावून घेण्याची भूमिका व्यवस्थापनाने घेतली.

  • या दोन्ही बाबी अमान्य असल्याने आणि केंद्र सरकारही हस्तक्षेप करीत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक घोषित :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात द्वैवार्षिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे. नाशिक विभाग, मुंबई शिक्षक विभाग, तसेच मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रतिनिधीची मुदत ७ जुलै रोजी संपत असल्याने या मतदारसंघांत ८ जून २०१८ रोजी द्वैवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. याची मतमोजणी १२ जून रोजी होणार आहे.

  • डॉ. अपूर्व प्रशांत हिरे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), कपिल पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ), डॉ. दीपक सावंत (मुंबई पदवीधर मतदारसंघ) आणि निरंजन डावखरे (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ) यांची मुदत ७ जुुलै रोजी संपत आहे.

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ मे असून २३ मे रोजी अर्जाची छाननी होईल. ८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि ३ शिक्षक मतदारसंघांतही निवडणूक घेतली जाणार आहे.

28 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार; स्कायमेटचा अंदाज :
  • नवी दिल्ली: मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे. 

  • मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिली. मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असंही त्यांनी सांगितलं. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचेल, अशी शक्यता स्कायमेटनं वर्तवली. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटनं व्यक्त केला होता. 

  • भारतीय हवामान विभागानं पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

  • १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

  • १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न.

  • १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.

  • १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

  • १९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

  • १९९६: लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

  • २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

  • २०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

जन्म

  • १९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत  यांचा जन्म.

  • १९५१: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.

  • १९५६: आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा जन्म.

  • १९५६: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)

  • १९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

  • २००१: लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१९०६)

  • २०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)

  • २०१३: भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.