चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ मे २०१९

Date : 13 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय :
  • हैदराबाद : आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

  • शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सामना संपायला दोन चेंडू असताना वॉटसन धावचीत झाला आणि सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर केवळ दोन धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाने त्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून, मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादमधल्या या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रोहित शर्माने मुंबईला पाच षटकांत 45 धावांची सलामी दिली होती. शार्दूल ठाकूरने डी कॉकला माघारी धाडून ही जोडी फोडली आणि मुंबईच्या डावाला घरघर सुरु झाली. मुंबईची एक बाद ४५ धावांवरून १५ षटकांत पाच बाद 102 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत कायरन पोलार्डने 25 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला आकार दिला.

सहाव्या टप्प्यात देशभरात ६३.३ टक्के मतदान, प. बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१६ टक्के मतदान :
  • नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. या टप्प्यात देशभरात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान झाले असून उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 54.29 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

  • सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान झाले.

  • या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून अधिक मतदारांना त्यांचा मताधिकार बजावण्याची संधी होती. त्यापैकी 6 कोटी 43 लाख 12 हजार मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. एकूण 979 उमेदवारांचे भविष्य मतदारांनी ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले आहे.

  • मध्य प्रदेशमधली भोपाळ, नवी दिल्ली आणि आझमगडच्या जागांवर दिग्गजांची अग्निपरीक्षा आहे. भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधात काँग्रेसचे दिग्विजय मैदानात आहेत. साध्वी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भोपाळची निवडणूक ही चर्चेत राहिली. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंहला टक्कर देण्यासाठी प्रचारादरम्यान सॉफ्ट हिंदुत्वाचा वापर केला.

अमेरिका देणार भारताला ‘थाड’ संरक्षण व्यवस्था; एस-४०० ची किंमत तीन अब्ज अमेरिकन डॉलर :
  • वॉशिंग्टन : रशियाच्या एस-४०० ला पर्याय म्हणून अमेरिकेने भारताला टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स (टीएचएएडी) आणि पॅट्रियट अ‍ॅडव्हान्स कॅपॅबिलिटी (पीएसी-३) क्षेपणास्त्र संरक्षण व्यवस्था देण्याची तयारी दाखवली आहे. अनेक वर्षांपासून रशियाशी सुरू असलेल्या वाटाघाटींनंतर ही व्यवस्था मिळवण्याच्या जवळ आम्ही असल्याचे भारताने म्हटले.

  • डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने काही आठवड्यांपूर्वी ही यंत्रणा देण्याची तयारी दाखवली होती, असे समजते. २०१६ मध्ये अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने केलेल्या कथित हस्तक्षेपाबद्दल त्याला शिक्षा करण्यासाठी म्हणून भारताने त्याच्याकडून वरील व्यवस्था विकत घेतल्यास त्याच्यावर निर्बंध लादले जाणार नाहीत हे आश्वासन अमेरिकेने मागे घेतले.

  • गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत भारत आणि अमेरिकेचे संरक्षण व परराष्ट्रमंत्री यांच्यात समोरासमोर झालेल्या चर्चेत अमेरिकेने रशियाच्या एस-४०० व्यवस्थेसाठी निर्बंध माफ करण्याची तयारी दाखवली, असे समजते; परंतु गेल्या काही आठवड्यांत काही आश्वासने मागे घेण्यात आल्याचे दिसते. नाटोचा सदस्य टर्कीने स्वत:च एस-४०० विकत घेऊ नयेत म्हणून ट्रम्प प्रशासन प्रयत्न करीत असताना हे घडले आहे.

‘केम’चा १०३ कोटींचा विक्रमी खर्च :
  • शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांत कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या कन्वरजन्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर इनेशेटीव्ह इन महाराष्ट्र (केम) अर्थात सहाय्यित कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पात अवघ्या सात महिन्यांमध्ये १०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

  • ज्या प्रकल्पात नऊ वर्षांमध्ये १४३ कोटी रुपये खर्च झाले, त्या प्रकल्पातील हा खर्चाचा विक्रम आश्चर्यकारक ठरला आहे. एकीकडे, जलयुक्त शिवारच्या कामांसाठी शासनाने वेगळा निधी उपलब्ध करून दिला असताना ‘केम’मधूनही अशाच प्रकारच्या कामांसाठी निधीची उधळण करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

  • केमच्या माध्यमातून पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम आणि वर्धा या सहा जिल्ह्यातील निवडक १,६०६ गावांमध्ये विविध  योजना राबवल्या जात आहेत. घटलेले कृषी उत्पन्न वाढवणे, उत्पन्नांच्या साधनांद्वारे विकास करणे, उत्पादन किंवा बाजारपेठेतील जोखमीमुळे नैराश्येत सापडलेल्या कुटुंबांची सुस्थितीत पुनस्र्थापना करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यातून कमी खर्चाची शेती, शेतीपूरक व्यवसाय, महिला सक्षमीकरणासाठी योजना राबवणे अभिप्रेत आहे. पण, प्रकल्पातून गेल्या सात महिन्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर अधिक ‘भर’ देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

उद्योग क्षेत्रातील अग्रणी देवेश्वर यांचे निधन :
  • देशाच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी आणि ‘आयटीसी’ या बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीचे अध्यक्ष वाय. सी. देवेश्वर (वय ७२) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

  • देवेश्वर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देवेश्वर २०१७ मध्ये इंडियन टोबॅको कंपनीच्या (आयटीसी) कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पदमुक्त झाले होते. परंतु ते कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षपदावर होते. गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • देवेश्वर यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाल्याची भावना ‘आयटीसी’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी व्यक्त केली. देवेश्वर यांनी शाश्वत आणि समावेशक उद्योगवाढीचा दृष्टिकोन ठेवला. व्यापक सामाजिक मूल्यनिर्मितीत उद्योगही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यातूनच ‘आयटीसी’ने साठ लाख लोकांच्या उपजीविकेला आधार देणारी उद्योग प्रारूपे अमलात आणली, असे पुरी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

  • देवेश्वर १९६८मध्ये ‘आयटीसी’मध्ये रुजू झाले. नंतर ते ११ एप्रिल १९८४ रोजी ‘आयटीसी’चे संचालक झाले. १ जानेवारी १९९६ रोजी ते पहिले कार्यकारी प्रमुख आणि अध्यक्ष बनले. ‘आयटीसी’ ही केवळ एक सिगारेट कंपनी होती, पण तिचा विस्तार इतर अनेक उद्योगक्षेत्रांत झाला. देवेश्वर यांनी १९९०च्या मध्यावधीत कंपनीची सूत्रे हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. कंपनीचा महसूल ५२०० कोटी रुपये होता आणि नफा ४५२ कोटी रुपये होता. २०१७-१८ मध्ये कंपनीचा महसूल ४४३२९ कोटी ७७ लाख रुपये होता, तर नफा ११२२३ कोटी २५ लाख रुपये होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८०: थॉमस अल्वा एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली.

  • १९३९: अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडियो स्टेशन सुरु झाले.

  • १९५०: फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशीपची पहिला रेस सिल्व्हरस्टोन येथे झाली.

  • १९५२: भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले.

  • १९६२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतरत्‍न.

  • १९६७: डॉ. झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.

  • १९७०: नृत्यदिग्दर्शिका सितारादेवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग ११ तास ४५ मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

  • १९९५: ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी एलिसन हरग्रिव्हज ही पहिली महिला बनली.

  • १९९६: ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल ३३२ आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.

  • १९९६: लघुपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

  • १९९८: भारताने दोन परमाणु शास्त्रांची तपासणी पोखरण येथे केली.

  • २०००: उत्तर प्रदेश, बिहार व मध्यप्रदेश या राज्यांची फेररचना करुन अनुक्रमे उत्तराँचल, झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

  • २०००: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने विश्वसुंदरी (Miss Universe) हा किताब पटकावला.

जन्म 

  • १८५७: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९३२ – लंडन, यू. के.)

  • १९०५: भारताचे ५वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९७७)

  • १९१६: भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत  यांचा जन्म.

  • १९१८: भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८४)

  • १९२५: दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००४)

  • १९५१: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म.

  • १९५६: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६२६: अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचे निधन.

  • १९०३: फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलिनेरियो माबिनी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८६४)

  • १९०४: प्रसिद्ध उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, देशभक्त जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन.

  • १९५०: प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७५)

  • २००१: लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर. के. नारायण यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१९०६)

  • २०१०: कवी आणि बालकुमार-साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१७ – मणेराजूरी, सांगली)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.