चालू घडामोडी - १३ नोव्हेंबर २०१८

Updated On : Nov 13, 2018 | Category : Current Affairs'सरकारी कार्यालयांमध्येही भरणार संघाच्या शाखा' :
 • भोपाळ: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापू लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांवरुन भाजपा आणि काँग्रेसआमनेसामने आले आहेत. सत्तेत आल्यास सरकारी ठिकाणी शाखांवर बंदी घालू, असं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं आहे. यावरुन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयातही भरतील, असं सिंह यांनी म्हटलंय. 

 • मध्यप्रदेशात सत्तांतर झाल्यास सरकारी जागांवर भरणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालू, असं आश्वासन काँग्रेसकडून जनतेला देण्यात आलंय. यावरुन शिवराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. संघाच्या शाखा सरकारी कार्यालयांमध्येही भरतील आणि सरकारी कर्मचारीदेखील शाखांमध्ये सहभागी होतील. यावर कोणीही बंदी आणू शकत नाही, असं सिंह यांनी म्हटलं आहे. ते खरगोनमध्ये बोलत होते. 

 • खरगोन जिल्ह्यातील एका प्रचारसभेत शिवराज सिंह यांनी सोमवारी भाषण केलं. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल आणि त्यातील शाखांवरील बंदीच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला.

 • यावेळी सरकारी कार्यालयांमध्येही शाखा भरतील, असं उत्तर त्यांनी दिलं. 'फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर प्रत्येक देशभक्त शाखेत जाऊ शकतो. कारण संघ ही देशभक्तांची संघटना आहे,' असं सिंह यांनी म्हटलं.  

स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन :
 • न्यूयॉर्क :  स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपरहिरोंचे जनक स्टॅन ली यांचं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचे चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली यांनी सोमवारी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक वर्षांपासून त्यांना विविध आजारांनी ग्रासलं होतं.

 • 28 डिसेंबर 1922 रोजी मॅनहॅटनमध्ये जन्मलेल्या स्टॅन ली यांनी 1961 मध्ये 'द फॅन्टॅस्टिक फोर'सह 'मार्वल कॉमिक्स'ची सुरुवात केली होती. यानंतर त्यात स्पायडर मॅन, एक्स मेन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्ट्रेंज आणि कॅप्टन अमिरेका यांसारख्या सुपरहिरोंचा समावेश करण्यात आला.

 • या व्यक्तिरेखांवर नंतर चित्रपटही बनले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. मार्वलच्या आतापर्यंतच्या जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये स्टॅन ली यांनी कॅमियो केला होता. कॉमिक्ससह ली यांनी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. स्टॅन ली यांच्या कॉमिक्सचे चाहते जगभरात आहेत.

 • भारतीय सुपरहीरो फिल्म 'चक्र' - स्टॅन ली यांनी 2013 मध्ये त्यांचा पहिला सुपरहिरो चित्रपट 'चक्र' बनवला होता. कार्टून नेटवर्क, ग्राफिक इंडिया आणि पाओ इंटरनॅशनल यांनी बनवलेला 'चक्र : द इन्विजिबल' सिनेमा कार्टून नेटवर्कवर लॉन्च केला होता. हा चित्रपट राजू राय नावाच्या एका भारतीय तरुणाची कहाणी आहे, जो मुंबईत राहतो. राजू आणि त्याचे मार्गदर्शक डॉ. सिंह एक असा तांत्रिक पोशाख विकसित करतात, जो परिधान केल्यावर शरीरातील रहस्यमय चक्र सक्रिय होतात.

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या पहिल्या हिंदू अध्यक्षा ठरणार :
 • मुंबई : यूएसए अर्थात अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

 • लॉस एंजलेसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्ताधारी रिपब्लिकन पक्षातील भारतीय वंशाचे नेते संपत शिवांगी यांनी तुलसी गबार्ड यांची ओळख करुन देताना वापरलेले शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

 • तुलसी गबार्ड 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षा असू शकतात, असं संपत म्हणताच उपस्थित प्रेक्षक आदराने उभे राहिले. गबार्ड समर्थक आता भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांशी पहिल्या फेरीत संपर्क साधत असल्याची माहिती आहे.

 • हवाई मतदारसंघातून चारवेळा सातत्याने निवडून आलेल्या तुलसी गबार्ड यांना डेमोक्रॅटिक पक्षातही मानाचे स्थान आहे. गेल्याच आठवड्यात त्या अमेरिकन प्रतिनिधीसभेत चौथ्यांदा निवडून गेल्या.

 • डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली तर त्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या पहिल्या हिंदू उमेदवार असतील. तसंच निवडून गेल्या तर पहिल्या महिला आणि सर्वात तरुण अध्यक्षाही असतील.

विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉ.माधवराव गायकवाड यांचे निधन :
 • मनमाड: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी राज्य सचिव आणि विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते व  माजी आमदार कॉ.माधवराव गायकवाड यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. त्यांनी नमाडला राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

 • कॉ.गायकवाड हे राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे नेते होते. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. 1960 ते 1962 दोन वर्षे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 1974 साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात कॉ. माधवराव गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.

 • 1974 ते 1981 पर्यंत ते नगराध्यक्ष होते. 1985 साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 1985 ते 1990 पर्यंत त्यांनी आमदारकी भूषवली.

 • त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यातील जनतेत शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत.

राजर्षिंना भारतरत्न देण्यासाठी देशातील सर्व खासदारांना 'शाहू ग्रंथ' दिवाळी भेट :
 • कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न म्हणून सन्मानित करण्यात यावं, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना इंग्रजी भाषेतील 'शाहू ग्रंथ' दिवाळीची भेट म्हणून पाठविला आहे. हा 'शाहू ग्रंथ' खासदारांनी वाचून महाराजांचं कार्य समजून घ्यावं आणि या मागणीला पाठिंबा द्यावा यासाठी हे ग्रंथ पाठवले आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

 • राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आग्रही मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेचे लक्ष वेधले होते. या मागणीचा पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे.

 • देशातील सर्वच खासदारांनी राजर्षि शाहू महाराजांचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

 • ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला 'शाहू ग्रंथ' खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना पाठवला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर देशभरातील सर्व खासदार, राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून आपली मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

१४ नोव्हेंबरपासून सुरु होणार रामायण एक्स्प्रेस :
 • सध्या देशात राम मंदिर, रामाचा पुतळा, प्रभू रामचंद्र हे सगळेच विषय सुरु आहेत. मंदिर कधी बांधले जाणार? हा प्रश्नही विचारला जातो आहे. अशात भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. रामायण एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार आहे.

 • यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. तसेच ही एकूण १६ दिवसांची सहल असणार आहे असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. १६ दिवसांची ही पॅकेज टूर असणार आहे. एक टूर जाऊन आली की मग दुसरी जाणार आहे. दिल्लीहून या एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला जाईल.

 • एकीकडे देशात प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जाणार, पुतळा उभारला जाणार असे म्हटले जाते आहे. योगी आदित्यनाथ यांनीही शरयू नदीच्या किनारी रामाच्या पुतळ्याची घोषणा केली आहे. तर राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा असे म्हटले जाते आहे.

 • अशात आता भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. या पॅकेज टूरचे शुल्क किती असेल? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा कोण दाखवणार? हेदेखील ठरलेले नाही. मात्र या एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

दिनविशेष :
 • जागतिक दयाळूपणा दिन

महत्वाच्या घटना 

 • १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.

 • १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.

 • १९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.

 • १९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.

 • १९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.

 • १९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.

 • १९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.

 • १९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

 • २०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.

जन्म 

 • १७८०: शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ जून १८३९)

 • १८५०: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)

 • १८५५: आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९१६)

 • १८७३: कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १९५९)

 • १८९८: पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९६९)

 • १९१७: महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९८९)

 • १९१७: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)

 • १९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.

 • १९६७: अभिनेत्री जूही चावला यांचा जन्म.

मृत्यू 

 • १७४०: प्राचीन मराठी कवी कृष्णदयार्णव यांचे निधन.

 • १९५६: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल)

 • २००१: ज्येष्ठ लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)

 • २००२: नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते ऋषिकेश साहा यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)