चालू घडामोडी - १३ ऑक्टोबर २०१८

Date : 13 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध :
  • नास आयर्स : नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

  • मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात ताजिकिस्तानच्या बेहजान फायेजुलाएवसह रौप्य जिंकले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात जर्मनीच्या वानेसा सीगर व बल्गेरियाच्या किरिल किरोव यांच्याकडून मनू - बेहजान यांचा ३-१० असा पराभव झाला. भारताने २ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह नेमबाजी स्पर्धेची सांगता केली.

  • पुरुष हॉकीमध्ये भारताने उपांत्यपूर्व फेरीत पोलंडला ४-२ असे नमवले. शिवम आनंदने पहिल्या व आठव्या मिनिटाला गोल केल्यानंतर मनिंदर सिंग व संजय यांनी १७व्या मिनिटाला गोल केला. बॅडमिंटनमध्ये संभाव्य विजेता असलेल्या लक्ष्य सेनने जपानच्या केदाई नाराओका याचा १४-२१, २१-१५, २४-२२ असा पराभव केला. याआधी युय्वा आॅलिम्पिकमध्ये एकेरीत भारताला एकही सुवर्ण मिळवता आलेले नाही.

इंटरनेट बंद होणार नाही, भारताने केल्या उपाययोजना :
  • नवी दिल्ली : पुढील २४ तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

  • मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे व प्रसंगी त्यात दुरुस्तीचे तसच ते अपडेट करण्याचे काम इंटरनेट कॉपोर्रेशन आॅफ असाइन्ड नेम्स अ‍ॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) या कंपनीमार्फत केले जाणार आहे. जगभर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या या सर्व्हर्समध्ये काही अत्यावश्यक तांत्रिक बदल करण्यात येणार असल्याचे रशिया टुडेने म्हटले आहे.

  • कीमध्ये म्हणजेच जगभरातील वेबसाइट्सचे डोमेन नेम्स (विविध वेबसाइट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात. त्या क्रिटोग्राफिक कीमध्ये या काळात काही बदल करण्यात येतील. जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने हे बदल करण्यात येणार आहेत, असे आयसीएएनएन या कंपनीने नमूद केले आहे. परंतु, यामुळे भारतात इंटरनेट बंद होणार नाही. यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे देशाच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा विभागाचे समन्वयक गुलशन राय यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत भारताचा विजय :
  • नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत भारताने अखेर स्थान पटकावले आहे. 188 मतांनी विजय होत, भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत आगामी तीन वर्षांसाठी आपलं स्थान निश्चित केले आहे. पुढील वर्षापासून म्हणजे 2019 च्या जानेवारीपासून भारताचा कार्यकाळ सुरु होईल.

  • विशेष म्हणजे, मानवाधिकार परिषदेच्या निवडणुकीत इतर देशांच्या तुलनेत भारताला सर्वाधिक मतं मिळाली. गुप्त पद्धतीने मतदान करण्यात आले. एकूण 18 सदस्य पूर्ण बहुमताने या निवडणुकीत जिंकले. मानवाधिकार परिषदेत स्थान मिळवण्यासाठी किमान 97 मतांची आवश्यकता असते.

  • संयुक्त राष्ट्रांच्या 193 सदस्यांच्या महासभेत भारताकडे पुढील तीन वर्षे परिषदेचं सदस्यपद राहणार आहे. आशिया प्रशांत श्रेणीसाठी एकूण पाच जागा होत्या. यात भारताबरोबर बहरीन, बांगलादेश, फिजी आणि फिलीपाईन्स यांनी देखील अर्ज केला होता. मात्र, भारताचे इतर देशांशी असलेले संबंध पाहता, भारताचा विजय निश्चित मानला जात होता.

  • या निवडणुकीनंतर संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे राजदूत अकबरूद्दीन यांनी भारताच्या बाजूने मतदान करणाऱ्यांचे आभार मानले.

चंदिगढमध्ये शीख महिलांना हेल्मेटसक्तीतून केंद्राची सूट :
  • चंदिगढ : चंदिगढमध्ये शीख धर्मीय महिलांना यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. दिल्ली सरकारने जारी केलेली अधिसूचना पाळण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं आहे.

  • पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी गुरुवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर शीख महिलांना स्कूटर चालवताना हेल्मेट घालण्यापासून सूट देण्यात आली.

  • पगडीधारी शीख महिला वगळता सर्व महिलांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असल्याचं चंदिगढ प्रशासनाने 6 जुलै रोजी अधिसूचना काढून सांगितलं होतं. मात्र धार्मिक कारणास्तव शीख धर्मीयांनी याला विरोध केला होता.

  • आता फक्त पगडीधारीच नाही, तर पगडी परिधान न करणाऱ्या शीख महिलांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची सक्ती नसेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चंदिगढ मोटर वाहन नियमात बदल करण्यात आले.

UN मानवाधिकार समितीवर भारताची निवड, १८८ मतांनी दणदणीत विजय :
  • संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा सामावेश झाला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक १८८ मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली.

  • १ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षांसाठी भारताची या समितीवर निवड करण्यात आली आहे. गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असले्लया १९३ देशांनी मानवाधिकार समितीतील नव्या देशांच्या सदस्यात्वासाठी मतदान केले. यापैकी १८८ देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले.

  • दरम्यान, आशिया-पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही दावेदारी सांगितली होती. मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होतं. यापूर्वी भारत २०११-१४ आणि २०१४-१७ असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे.

अमेरिकेचे इराणविषयक दूत भारत, युरोपच्या दौऱ्यावर :
  • अमेरिकेने इराणवर लादलेल्या र्निबधांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक हे भारत आणि युरोपीय देशांचा दौरा करत आहेत. १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान ते भारतासह लक्झेंबर्ग, फ्रान्स, बेलिजयमचा दौरा करतील.

  • इराण अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी केलेल्या अणुकरारातून माघार घेतली आणि त्या देशावर र्निबध लादले. इतकेच नव्हे तर इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवरही अमेरिका र्निबध लादेल असे जाहीर केले. त्यामुळे भारताचा इराणशी असलेला खनिज तेल व्यापार धोक्यात आला आहे. इराक आणि सोदी अरेबियापाठोपाठ इराण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा तेलपुरवठादार देश आहे. अमेरिकेने इराणकडून तेल आयात बंद करण्यासाठी ४ नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

  • मात्र भारताने या मुदतीनंतरही इराणकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात इराणकडून तेल आयात करण्याची मागणी नोंदवली असल्याचे तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सांगितले. इराणचे अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न रोखण्यासाठी त्या देशाकडून तेल घेणे बंद करण्याची गरज आहे, हे ब्रायन हुक अमेरिकेच्या मित्रदेशांना पटवून देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याबरोबर ऊर्जा स्रोतविषयक उप-परराष्ट्रमंत्री फ्रान्सिस फॅनॉन हेदेखिल येत आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.

  • १९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.

  • १९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.

  • १९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.

  • १९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.

  • २०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.

जन्म 

  • १८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)

  • १९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)

  • १९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)

  • १९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)

  • १९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)

मृत्यू 

  • १२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.

  • १९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)

  • १९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)

  • १९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)

  • १९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ – किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)

  • २००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.

  • २००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.