चालू घडामोडी - १३ सप्टेंबर २०१८

Updated On : Sep 13, 2018 | Category : Current Affairsभारत आणि चीनला बुलेट ट्रेनने जोडण्याचा विचार :
 • चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा आमचा विचार आहे अशी माहिती कोलकातामध्ये चीनचे महावाणिज्य दूत मा झान्वू यांनी दिली. बुधवारी कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना मा झान्वू यांनी ही माहिती दिली.

 • दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी कोलकाता आणि कुनमिंग शहरांदरम्यान हायस्पीड रेल्वे मार्ग सुरू होऊ शकतो, असं झान्वू म्हणाले. जर हा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात उतरला तर कुनमिंग व कोलकाता शहरांमधील अंतर अवघ्या काही तासांवर येईल असंही ते पुढे म्हणाले.

 • या रेल्वेमार्गाचा म्यानमार आणि बांगलादेशलाही फायदा होईल, कारण हा मार्ग म्यानमार व बांगलादेशमधून जाईल या २८०० कि.मी.च्या मार्गावर औद्योगिक प्रकल्पांचे जाळेही विणले जाऊ शकते. त्याचा प्रकल्पात सहभागी सर्वच देशांना फायदा होईल. यापूर्वी 2015 मध्ये ग्रेटर मेकांग सब्रेगियन (जीएमएस) च्या कुनमिंगमध्ये झालेल्या बैठकीतही या प्रस्तावाचा उल्लेख करण्यात आला होता, असंही झान्वू म्हणाले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत पास :
 • मुंबई : एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना सहा महिने मोफत प्रवासी पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यामुळे वर्षातील सहा महिने सेवानिवृत्त कर्मचाºयांना सपत्नीक राज्यात कुठेही मोफत प्रवास करणे शक्य होईल.

 • एसटी महामंडळात सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी महामंडळातून सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. नुकतेच राज्यातील सुमारे २५ हजार निवृत्त कर्मचाºयांनी यात्रा व उत्सव काळात प्रवासी पास देण्याची मागणी केली होती. यानुसार काही रक्कम भरण्याची तयारीही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी दर्शवली होती.

 • यानुसार एसटीसाठी आपले आयुष्य वेचलेल्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना पत्नींसह वर्षातील सहा महिने कुठेही जाण्यासाठी मोफत प्रवासी पास देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून सुमारे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाºयांना याचा लाभ घेता घेता येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

 • शिवशाहीबाबत संभ्रम महामंडळाच्या अत्याधुनिक आणि वातानुकूलित शिवशाहीत सेवानिवृत्त कर्मचाºयांचा मोफत प्रवासी पास वैध ठरेल का? याबाबत साशंकता आहे.

एड्सग्रस्ताविरुद्ध भेदभाव प्रतिबंधक कायदा लागू :
 • मुंबई : केंद्र सरकारने एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा २०१७ देशभर लागू केला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने एप्रिल २०१७ मध्ये संसदेने मंजूर केलेला हा कायदा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर लागू केला आहे.

 • या कायद्याप्रमाणे एड्सग्रस्त व्यक्तीसोबत नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घर विक्री किंवा भाड्याने देणे, विमा इत्यादीमध्ये भेदभाव करता येणार नाही. या कारणावरून नोकरीतून शैक्षणिक संस्थेतून, भाड्याने दिलेल्या घरातून काढून टाकता येणार नाही किंवा वैद्यकीय सेवा नाकारता येणार नाही. कोणतीही नोकरी, शैक्षणिक सुविधा किंवा आरोग्यसेवा मिळविण्यासाठी एचआयव्ही तपासणीची अट घालता येणार नाही.

 • याशिवाय एखाद्या व्यक्तीस एड्स असल्याची माहिती त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा न्यायालयाच्या परवानगीशिवाय उघड करता येणार नाही. या कायद्यान्वये एचआयव्ही असलेली व्यक्ती आणि तिच्यासोबत राहणारी व्यक्ती संरक्षित व्यक्ती असेल आणि अशा संरक्षित व्यक्तीबद्दल लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल, असे कृत्य केल्यास २ वर्षांपर्यंत शिक्षेची व १ लक्ष रुपये दंडाची तरतूद करण्यास आली आहे. हा गुन्हा दखलपात्र असेल.

 • एड्सग्रस्त व्यक्ती ज्या प्रकरणात तक्रारदार आहे अशा प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी घेण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. न्यायालयाने असे खटले प्राधान्याने निकाली काढले पाहिजेत. तसेच एड्सग्रस्त व्यक्तींना शिक्षा देताना त्यांना जेथे आरोग्य सुविधा मिळू शकतील तेथे ठेवण्याचा विचार केला पाहिजे.

 • या कायद्यांतर्गत तक्रारी स्वीकारण्यासाठी व त्यावर चौकशी करून आवश्यक निर्देश देण्यासाठी सर्व राज्यांना विशेष प्राधिकरण नियुक्त करावे लागतील. हे प्राधिकरण एड्सग्रस्तांसोबत भेदभावाची चौकशी करून आवश्यक ते आदेश देईल. त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल.

बेकायदा वैद्यकीय प्रवेश वैध करणारा कायदा रद्द :
 • नवी दिल्ली : दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी गेल्या शैक्षणिक वर्षात दिलेले तद्दन बेकायदा प्रवेश प्रत्येकी तीन लाख रुपये दंड आकारून नियमित करण्यासाठी केरळ सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. यामुळे प्रवेशासाठी वारेमाप पैसा खर्च केलेल्या १८० विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे.

 • कन्नूर मेडिकल कॉलेज आणि करुणा मेडिकल कॉलेज या दोन वैद्यकीय महाविद्यालयांनी अनुक्रमे १५० व ३० विद्यार्थ्यांना सर्व नियम धाब्यावर बसवून पदवी अभ्यासक्रमांना दिलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २२ मार्च रोजी रद्द केले होते. कोणीही बैकायदेशीरपणाचा फायदा घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करून प्रवेश दिलेल्या कोणाही विद्यार्थ्यास वर्गात बसता येणार नाही व अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही, असे बजाविण्यात आले होते.

 • केरळ सरकारने या आदेशाचे पालन न करता या दोन महाविद्यालयांमधील प्रवेश दंड आकारून नियमित करण्याचा वटहुकूम २० आॅक्टोबर रोजी काढला. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिका प्रलंबित असतानाच केरळ विधानसभेने त्याच वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक ४ एप्रिल रोजी एकमताने मंजूर केले.

 • न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा कायदा रद्द केला. परिणामी, दोन्ही महाविद्यालयांनी दिलेले सर्व बेकायदा प्रवेश पुन्हा रद्द झाले. विधिमंडळास कायदे करण्याचे अधिकार असले तरी न्यायालयाने दिलेला बंधनकारक निकाल अशा प्रकारे कायदा करून केराच्या टोपलीत टाकता येऊ शकत नाही. विधिमंडळाने केलेले हे अधिकारांचे उल्लंघन आहे.

सॅरिडॉन, डी कोल्डसह ३२८ औषधांवर बंदी :
 • नवी दिल्ली: केंद्र सरकारने सॅरिडॉन, डी कोल्ड, विक्स अॅक्शन 500 यासारख्या तातडीने आराम देणाऱ्या  328 औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी तत्काळ हा निर्णय लागू केला आहे.

 • ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत. म्हणजेच कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करुन तयार केली जातात, औषध घेण्याची मात्रा (डोस) ठरलेली असते, अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटलं जातं.

 • FDC औषधं आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. अनेक देशांमध्ये या औषधांना बंदी आहे. त्यात आता भारताचा समावेश झाला आहे.

 • याव्यतिरिक्त सरकारने काही अटींवर 6 एफडीसीच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. या बंदीमुळे 1.18 लाख कोटी औषध उद्योगाला जवळपास 1500 कोटीचा फटका बसला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

 • १८९८: हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.

 • १९२२: लिबियातील अझिजिया येथे ५७.२° सेल्सियस ही जगातील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.

 • १९४८: ऑपरेशन पोलो – विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली.

 • १९८५: सुपर मारियो गेम जपान मध्ये प्रकाशित झाला.

 • १९८९: आर्च बिशप डेस्मंड टुटू यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण अाफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.

 • १९९६: श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती इंदुमती पारिख यांना दिला.

 • २००३: ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

 • २००३: मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

जन्म

 • १८५२: नामाकिंत शिक्षक, संस्कृत पंडित गणेश जनार्दन आगाशे यांचा जन्म.

 • १८५७: द हर्शे चॉकलेट कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९४५)

 • १८६५: भारतीय-इंग्रजी फील्ड मार्शल विल्यम बर्डवुड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १९५१)

 • १८८६: नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉइड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७५)

 • १८९०: मोनाको ग्रांप्री चे संस्थापक अँटोनी नोगेस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९७८)

 • १९३२: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.

मृत्यू

 • १८९३: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८३८)

 • १९२८: सुप्रिसद्ध हिंदी कवी श्रीधर पाठक यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८५८)

 • १९२९: क्रांतिकारक जतीनद्र दास यांचे तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात ६३ व्या दिवशी निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९०४)

 • १९७१: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८८९ – अडिवरे, रत्‍नागिरी, महाराष्ट्र)

 • १९९५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४), आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष  डॉ. महेश्वर नियोग यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१५ – कमरफादिया, शिवसागर, आसाम)

 • २०१२: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९२६)

टिप्पणी करा (Comment Below)