चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ एप्रिल २०१९

Date : 13 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जालियनवाला हत्याकांडाबाबत ब्रिटिश उच्चायुक्तांकडून खेद :
  • जालियनवाला बाग येथे १०० वर्षांपूर्वी जे घडले त्यातून ब्रिटिशांच्या काळातील एक लांच्छनास्पद कृत्याच्या कटू स्मृती सामोऱ्या येतात. जालियनवाला बाग येथे शंभर वर्षांपूर्वी घडलेली हत्याकांडाची घटना ही खेदजनक होती यात शंका नाही, असे ब्रिटनचे उच्चायुक्त डॉमनिक अ‍ॅसक्विथ यांनी येथील स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर सांगितले. शनिवारी सकाळी त्यांनी १३ एप्रिल १९१९ रोजी हत्याकांड झाले त्या ठिकाणी जाऊन स्मृतिस्थळावर पुष्पचक्र वाहिले.

  • त्यांनी अभ्यागत पुस्तिकेत लिहिले आहे की, जालियनवाला बाग येथे १०० वर्षांपूर्वी जे घडले त्यातून ब्रिटिशांच्या काळातील एक लांच्छनास्पद कृत्याच्या कटू स्मृती सामोऱ्या येतात. त्या वेळी जे घडले व लोकांना ज्या यातना झाल्या असतील त्याबाबत आपण खेद व्यक्त करतो. भारत व ब्रिटन हे दोन्ही देश २१व्या शतकातील भागीदारीसाठी वचनबद्ध आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांनी बुधवारीच ते हत्याकांड म्हणजे ब्रिटिश राजवटीच्या काळातील लांच्छनास्पद डाग आहे असे त्यांनी म्हटले होते. मे यांनी त्या वेळी औपचारिक माफी मागण्याचे टाळले होते.

  • माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी भारत भेटीत जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत, तो लांच्छनास्पद डाग असल्याचेच म्हटले होते, याची आठवण अ‍ॅसक्विथ यांनी करून दिली. ब्रिटिश राजवटीमधील एक वेदनादायी उदाहरण असेच या हत्याकांडाचे वर्णन राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केले आहे, असे सांगून अ‍ॅशक्विथ म्हणाले, आपले पणजोबा एच. एच. अ‍ॅशक्विथ हे १९०८ ते १९१६ या काळात ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनीही ही सर्वात भयानक घटना असल्याचे म्हटले होते.

खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्रात महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून थेट नियुक्ती :
  • मुंबई : खासगी क्षेत्रातल्या 9 तज्ज्ञांची थेट केंद्रातल्या महत्वाच्या खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. मोदी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची  अंमलबजावणी सुरु झाली आहे. सर्वसाधारणपणे सचिव होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. मात्र जलद आणि पारदर्शक कारभार व्हावा, या हेतूनं 9 जणांची मोदी सरकारनं थेट निवड केली आहे.

  • यामध्ये अमर दुबे (नागरी उड्डयन ), अरुण गोयल (वाणिज्य), राजीव सक्सेना (आर्थिक मुद्दे ), सुजीत कुमार बाजपेयी (पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन), सौरभ मिश्रा (वित्तीय सेवा) आणि दिनेश दयानंद जगदाळे (अपारंपरिक ऊर्जा ), सुमन प्रसाद सिंह (रस्ते, परिवहन आणि  राजमार्ग मंत्रालय), भूषण कुमार (जहाजरानी) आणि कोकोली घोष (कृषी आणि शेतकरी कल्याण) यांची संबंधित खात्यांमध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • ८९ जण शॉर्टलिस्ट - यासाठी आलेल्या 6,077 अर्जांपैकी 89 जणांना मुलाखतीसाठी बोलावले होते. यांनतर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी विस्तृत अर्ज भरायला सांगितलं होतं. निश्चित कालावधीसाठी लेटरल इंट्रीच्या माध्यमातून तज्ज्ञांना सिस्टममध्ये सामावून घेणं महत्वाचं असल्याचे नीती आयोगाने आपल्या एका अहवालात म्हटले आहे.

  • केंद्रात संयुक्त सचिवपदी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची तीन वर्षांसाठी निवड करण्याचा निर्णय सरकारने गेल्या वर्षी जाहीर केला होता. त्याबाबत एक अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. UPSCची परीक्षा न देताही आता सरकारी अधिकारी होता येणार असल्याने यावर अनेक मतभेद झाले होते.

राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, विविध कार्यक्रमाचे आयोजन :
  • मुंबई : आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती. या निमित्त मुंबईसह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. जागोजागी जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

  • मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत अभिवादन - मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. दादर येथील चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास गर्दी केली होती. तर दुसरीकडे मुंबईच्या वरळी बीडीडी चाळ परिसरात दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे , काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

  • सोलापुरात जयंतीचा उत्साह - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोलापुरात मोठा उत्साह असतो. रात्री 12 वाजता नागरिकांनी जयभीमघोष केला. यावेळी पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. 

  • विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सोलापुरात रात्री 12 वाजता आंबेडकर चौकात उपस्थिती लावत अभिवादन केले. यावेळी सुजात आंबेडकर, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, बाळासाहेब वाघमरे, दशरथ कसबे यांच्यासह शेकडो भीमसैनिक रात्री अभिवादनसाठी एकत्रित जमा झाले. या निमित्ताने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.  पुढील 7 दिवस सोलापुरात जयंती उत्सव सुरू राहिल. पुढील रविवारी जंगी मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

बंगलोरची पंजाबवर आठ विकेट्सनी मात, बंगलोरचा यंदाच्या मोसमातील पहिला विजय :
  • मोहाली : कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या जबाबदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. बंगलोरचा यंदाच्या आयपीएलमधला सात सामन्यातील हा पहिलाच विजय ठरला.

  • पंजाबनं बंगलोरसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट आणि डिव्हिलियर्सच्या अर्धशतकांमुळे बंगलोरनं हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार पाडलं. विराटनं 53 चेंडूत 68 तर डिव्हिलियर्सनं नाबाद 58 धावांची खेळी उभारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची निर्णायक भागीदारी रचली.

  • त्याआधी ख्रिस गेलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं बंगलोरसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ख्रिस गेलची 64 चेंडूत नाबाद 99 धावांची खेळी हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. गेलच्या या खेळीत दहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

  • गेल वगळता पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. त्यामुळे पंजाबला 20 षटकांत चार बाद 173 धावांचीच मजल मारता आली. बंगलोरकडून यजुवेंद्र चहलनं दोन तर मोईन अली आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

नमो टीव्हीवर देखरेखीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती :
  • नमो टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमातील आशयाची पूर्वतपासणी करून घेतली पाहिजे, असा आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्य निवडणूक  अधिकाऱ्यांनीही तपासल्याशिवाय कुठलेही कार्यक्रम दाखवू नयेत असे म्हटले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नमो टीव्ही बघून त्यावरील कार्यक्रमावर देखरेख करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • गुरूवारी निवडणूक आयोगाने असे म्हटले होते,की नमो टीव्ही हा भाजप प्रायोजित आहे. त्यात सर्व संकलित कार्यक्रम दाखवले जातात, पण ते  दाखवण्यापूर्वी त्यांचे प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. दिल्लीतील माध्यम व देखरेख समितीकडून हा आशय तपासून घ्यावा. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला पत्र पाठवले असून जे कार्यक्रम प्रमाणित केलेले नाहीत ते दाखवण्यात येऊ नयेत.

  • राजकीय पक्ष सर्वसाधारणपणे ध्वनी-चित्र-आशय हा पूर्वतपासणीसाठी पाठवत असतात. त्यात ते कार्यक्रम कुठल्या वाहिनीवर किंवा मंचावर दाखवले जाणार आहेत याचा उल्लेख नसतो. हा आशय एखाद्या प्रचार सभेतही दाखवला जाऊ शकतो किंवा पक्षाच्या संकेतस्थळावरही तो दाखवला जाऊ शकतो.

  • काँग्रेसने नमो टीव्हीमुळे समान संधी राहिलेली नाही अशी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणी अ हवाल देण्यास सांगितले होते. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नमो टीव्हीचे चिन्ह मंजूर केले असून त्यातील पंतप्रधान मोदी यांची जुनी भाषणे प्रमाणित केलेली नाहीत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

  • १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

  • १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.

  • १९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.

  • १९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

जन्म 

  • १६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)

  • १८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

  • १९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)

  • १९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

  • १९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)

  • १९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

  • १९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.

  • १९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

  • १९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)

  • १९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)

  • २०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.