चालू घडामोडी - १४ ऑगस्ट २०१८

Date : 14 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशातील हवेचा दर्जा सुधारल्यास चार वर्षांनी वाढेल भारतीयांचं वय :
  • जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घालून दिलेल्या निकषांनुसार हवेचा दर्जा साध्य करण्यात भारताला यश आले, तर भारतीयांचे जीवनमान सरासरी चार वर्षांनी वाढेल. शिकागो विद्यापीठ आणि हार्वर्ड केनेडी स्कूल यांच्या ‘रोडमॅप टुवर्ड्स क्लीनिंग इंडियाज एअर’ या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

  • या अहवालात भारतातील हवेच्या प्रदूषणाची गंभीर स्थिती मांडण्यात आली असून केवळ हवेच्या प्रदूषणामुळे भारताचे ०.५ लाख कोटींहूनही अधिक आर्थिक नुकसान होत असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. तर खराब हवेमुळे देशातील हजारो-लाखो लोकांना अल्पायुष्य आणि आयुष्यभर आजारपणाचा सामना करावा लागत आहे.

  • यामध्ये हवेचा दर्जा सुधारण्यासाठी काही शिफारशीही करण्यात आलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या दर्जासाठी पीएम२.५ या प्रदूषकाचे प्रमाण घनमीटरमागे वार्षिक सरासरी १० ग्रॅम तर २४ तासांसाठी सरासरी २५ ग्रॅम असे निश्चित केले आहे.

  • पीएम१० या प्रदूषकाबाबत हे प्रमाण अनुक्रमे २० ग्रॅम व ५० ग्रॅम आहे. देशातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ६६ कोटी भारतीय पीएम२ या प्रदूषकाचे प्रमाण निकषाहून अधिक असलेल्या भागात राहत असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.

प्लास्टिकचे झेंडे वापरू नका, गृहमंत्रालयाचं नागरिकांना आवाहन :
  • स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी प्लास्टिकचे झेंडे वापरु नयेत असं आवाहन गृहमंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या झेंड्यांवर अधिकृत बंदी घालण्यात आलेली नसली तरी त्याऐवजी कागदी ध्वज वापरावे असा सल्ला गृहमंत्रालयाने दिला आहे.

  • याबाबत एक पत्र पाठवून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्य सचिव, सर्व शासकीय खात्यांचे व्यवस्थापक, मंत्रालयांचे सचिव, भारत सरकारचे विभाग यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे.

  • गेल्या वर्षीही स्वातंत्र्यदिनानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पुढील वर्षीपासून प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याचे आवाहन केले होते. कार्यक्रम झाल्यानंतर हेच झेंडे रस्त्यावर, गटारीसह इतस्तत: फेकले जातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. देशाच्या राष्ट्रधवज नष्ट करण्यासाठी एक नियमावली आहे. मात्र, अशाप्रकारे राष्ट्रध्वज रस्त्यावर फेकल्याने तो लोकांच्या पायाखाली येतो.

  • प्लास्टिकच्या ध्वजांची योग्य विल्हेवाट लावणे कठीण काम असते. याचबरोबर प्लास्टिक हे पर्यावरणालाही घातक आहे. या प्लास्टिकमुळे प्राण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे कागदी किंवा प्लास्टिकचे झेंडे वापरण्याचे आवाहन मंत्रालयाने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केले होते.

अ‍ॅस्पिरिनमुळे एचआयव्ही संसर्ग रोखण्यास मदत :
  • टोरांटो : अ‍ॅस्पिरिन हे वेदनाशामक औषध कमी प्रमाणात घेतल्यास त्याचा एचआयव्ही संसर्ग रोखण्यास फायदा होऊ शकतो, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण भारतातही अधिक आहे. शिवाय आफ्रिकेतील तरुण महिलांमध्ये त्याचे प्रमाण फार जास्त आहे.

  • कॅनडातील मानिटोबा विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, अ‍ॅसेटिलसॅलिसिलिक अ‍ॅसिड म्हणजे अ‍ॅस्पिरिन हे औषध व इतर वेदनाशामक औषधेही एचआयव्हीग्रस्त पेशींना लक्ष्य करतात. केनियातील महिलांवर करण्यात आलेल्या प्रयोगात अ‍ॅस्पिरिनचा हा परिणाम दिसून आला आहे.

  • इंटरनॅशनल एड्स सोसायटीच्या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. एचआयव्हीला बळी पडणाऱ्या पेशी शरीरात असतात. त्यांच्यावर हा विषाणू हल्ला करतो. जर प्रतिकारशक्ती प्रणालीतील काही पेशी कार्यान्वित झाल्या तर त्या संसर्गाला लवकर बळी पडतात.

  • अ‍ॅस्पिरिनमुळे एचआयव्हीबाधित होण्याची शक्यता असलेल्या पेशींचे प्रमाण कमी होते. महिलांच्या लैंगिक अवयवात तर ते ३५ टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे महिलांना एचआयव्हीची बाधा होण्याची शक्यता दुरावते. यात आणखी संशोधन आवश्यक असून यातून कुठल्या पातळीवर हे औषध दिले असता त्याचा फायदा होतो हे शोधणे गरजेचे आहे, असे संशोधक कीथ फॉक यांनी म्हटले आहे. या अभ्यासात रुग्णांना हृदयविकार रोखण्यासाठी जेवढे अ‍ॅस्पिरिन दिले जाते तेवढय़ाच प्रमाणात देण्यात आले असता त्यामुळे एचआयव्ही बाधेची शक्यता कमी झाली.

नासाने घेतली सूर्याकडे झेप! ताशी ७ लाख किमी वेगाने करणार प्रवास :
  • केप कॅनेव्हेरल (अमेरिका) : सूर्याच्या ‘कॉरोना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतितप्त व अत्यंत अस्थिर अशा बाह्य वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘पार्कर सोलर प्रोब’ या मानवरहीत यानाचे रविवारी केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण केले.

  • युनायटेड लॉन्च अ‍ॅलायन्स या खासगी कंपनीने तयार केलेल्या ‘डेल्टा-४’ या अतिशक्तिशाली रॉकेटने या ‘सोलर प्रोब’ला कवेत घेऊन ठरल्या वेळी अचूक उड्डाण केले. शनिवारी ऐेन वेळी काही त्रुटी लक्षात आल्याने उड्डाण लांबणीवर टाकले होते. ताशी सुमारे सात लाख किमी अशा वेगाने प्रवास करत हे रॉकेट ‘पार्कर सोलर प्रोब’ला सूर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी अंतरावर वातावरणात नेऊन सोडेल. आजवर माणसाने पाठविलेली कोणताही वस्तू सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

  • हे ‘सोलर प्रोब’ सूर्याच्या बाह्य वातावरणात पोहोचल्यावर पुढील सात वर्षे तेथे राहील. या काळात ते सूर्याच्या अधिकाधिक जवळ जात या ताºयाच्या सात प्रदक्षिणा करेल. अशी पहिली चक्कर येत्या नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. या संपूर्ण मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. ‘नासा’च्या ‘लिव्हिंग विथ ए स्टार’ कार्यक्रमातील ही पहिलीच मोठी मोहीम.

मोदींनी मंत्र्यांकडे मागितले प्रगतिपुस्तक :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रगतीबाबत सर्व मंत्रालयांकडून माहिती मागितली आहे. स्वातंत्र्यदिनी मोदी लाल किल्ल्यावरून करणाऱ्या भाषणात यावेळी वेगवेगळ््या केंद्रीय योजनांवरील प्रगतीपुस्तक सादर करू शकतील, असे समजते. विशेषत: जनधन, स्वच्छता, उघड्यावरील शौचापासून मुक्ती, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, डिजीटल इंडियाबद्दल मोदी त्यांच्याकडील माहिती देशाला देऊ शकतात.

  • मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले होते त्यावेळी त्यांनी त्यावेळी म्हटले होते की मी वारंवार माझे प्रगतीपुस्तक देणार नाही तर मी जेव्हा पाच वर्षांनी येथे येईल त्यावेळी माझ्या सरकारने ज्या ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यांचा अहवाल सादर करीन.

  • मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या चार वर्षांत जवळपास शंभरपेक्षा जास्त छोट्या-मोठ्या योजनांची घोषणा झाली. त्यात जनधन, डिजीटल इंडिया, उघड्यावरील शौचापासून मुक्ती, बुलेट ट्रेन, मुद्रा कर्ज, मेक इन इंडिया, आयुष्यमान भारत या त्यांच्या आवडत्या योजनांचा समावेश आहे.

  • एका अधिकाºयाने सांगितले की, सर्व मंत्रालयांना सोमवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याशी संबंधित योजनांचे प्रगतीपुस्तक सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • काही मंत्रालयांसाठी ही कालमर्यादा मागील शुक्रवार होती. याचा मुख्य उद्देश हा होता की, वेळेवर ही आकडेवारी पीएमओकडे सादर व्हावी. जेणेकरुन अधिकारी पंतप्रधानांकडे एक विस्तृत अहवाल सादर करु शकतील.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाककडून ३० भारतीय कैद्यांची सुटका :
  • इस्लामाबाद पाकिस्तानने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 27 मच्छिमारांसह 3 भारतीय कैद्यांची तुरुंगातून मुक्तता केली आहे. मानवतेच्या मुद्द्यांचं राजकारण न करण्याच्या पाकिस्तानच्या धोरणांनुसार कैद्यांची मुक्तता करण्यात आली असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.

  • ज्या 30 कैद्यांची सुटका करण्यात आली, त्यामध्ये 27 मच्छिमारांचा समावेश आहे. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असतो. या दिवसाला मानवी भावनेची जोड आहे. आम्हाला आशा आहे की, भारताकडूनही असेच पाऊल पडेल, असे पाकिस्तानच्या प्रवक्त्यांनी म्हटले.

  • आजच्या घडीला 418 मच्छिमारांसह 470 भारतीय पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत. त्यातील 27 मच्छिमार आज लाहोरमध्ये पोहोचले. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.

  • कराचीच्या मालिर जेलचे वरिष्ठ जेल अधीक्षक गुलाम बक्श यांनी सांगितले की, “काल भारतीय मच्छिमारांची सुटका केली आणि गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर त्यांना ट्रेनच्या माध्यमातून लाहोरला पाठवलं. मानवी सद्भवानेच्या मुद्द्यावर मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे.”

  • अरबी समुद्रात दोन्ही देशांच्या सीमांचे सीमांकन स्पष्ट नसल्याने पाकिस्तानातील मच्छिमार भारतात आणि भारतातील पाकिस्तानात येत-जात असतात. त्यामुळे दोन्हीकडून पलिकडील देशांच्या मच्छिमारांना अटक केली जाते.

भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ऑस्ट्रेलियात जल्लोष :
  • मेलबर्न : स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची उत्सुकता जितकी देशातील भारतीयांना असते तितकीच ती परदेशातील भारतीयांनादेखील असते. देशभरात 15 ऑगस्टची तयारीची लगबग सुरु असताना, तिकडे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये नुकताच ध्वजारोहण सोहळा पार पडला.

  • मेलबर्नमध्ये अनेक कार्यक्रम आठवड्याच्या शेवटी पार पडतात. त्यामुळे मेलबर्नमध्येही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमांसाठीची सुरुवात शहरातल्या फेडरेशन स्क्वेअरवर ध्वजारोहण करुन झाली.

  • अभिनेत्री राणी मुखर्जीच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि यानंतर मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हला सुरुवात झाली. मराठमोळ्या ढोल ताशांच्या गजरात मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर दुमदुमून गेला होता.

दिनविशेष :
  • संस्कृत दिन

महत्वाच्या घटना

  • १८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.

  • १९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

  • १९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

  • १९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • २०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमधे घेण्यात आल्या.

जन्म

  • १९०७: महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)

  • १९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

  • १९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)

  • १९५७: विनोदी अभिनेतते जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

  • १९६२: पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)

  • १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)

  • १९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)

  • २०११: हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)

  • २०१२: महाराष्ट्राचे १४वे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.