चालू घडामोडी - १४ डिसेंबर २०१७

Date : 14 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आज स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ पाणबुडीचा होणार नौदलात समावेश :
  • मुंबई : माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत ‘कलवरी’ नौदल ताफ्यातील समावेशाचा सोहळा पार पडणार आहे.

  • फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीत सुरू आहे. फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता. या करारानुसार २०१३ साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणे अपेक्षित होते.

  • मात्र, त्यासाठी तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर पहिली पाणबुडी नौदलात दाखल झाली. त्यापैकी कलवरी आणि खंदेरी या दोन पाणबुड्या नौदलाकडे या वर्षी सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता तब्बल १२० दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे, तर खंदेरीच्या सागरी चाचण्या सुरू आहेत.

  • कलवरी पाणबुड्याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. २०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.

दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी :
  • दुबई : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. गुरुवारी सिंधूपुढे जपानच्या सयाका सातो हिचे कडवे आव्हान असेल. त्याच वेळी, पुरुष गटात मात्र भारताची सुरुवात निराशाजनक झाली.

  • स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन विरुद्ध सरळ दोन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पदकाची दावेदार असलेल्या सिंधूने अपेक्षित सुरुवात करताना ही बिंगजियाओचे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८ असे परतावले.

  • जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या सिंधूला या विजयासाठी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंगजियाओविरुद्ध झुंजावे लागले. पहिला गेममध्ये सहजपणे बाजी मारल्यानंतर बिंगजियाओने शानदार पुनरागमन करताना दुसरा गेम जिंकत सामना निर्णायक तिसºया गेममध्ये नेला.

  • या वेळी, सिंधूवर काहीसे दडपण आले. तिसºया गेममध्ये सकारात्मक सुरुवात करताना तिने आघाडी घेतली; मात्र अखेरच्या काही क्षणामध्ये बिंगजियाओने झुंजार खेळ केला. तिने सलग दोन मॅच पॉइंट वाचवताना सिंधूवर कमालीचे दडपण आणले. मात्र, सिंधूने तिसºया प्रयत्नात नेटजवळ जबरदस्त नियंत्रित खेळ करताना बिंगजियाओला चूक करण्यास भाग पाडले आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.

कोण जिंकणार गुजरात ? मतदानाच्या फायनल राऊंडला झाली सुरुवात :
  • अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील  93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात असून दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये मतदान होत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने भाजपा आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रचार केला आहे. 

  • 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 66 टक्ते मतदान झाले होते. 2012 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात चार ते पाच टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे दुस-या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल.

  • दुस-या टप्प्यात शहरी मतदारसंघ जास्त असून शहरी भागात भाजपाचे ब-यापैकी वर्चस्व आहे. अहमदाबादच्या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. 

दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन :
  • ‘खिलाडी ४२०’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर ‘विरासत’, ‘रंगीला’, ‘मन’ या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • गुजरातमधील भूज येथे १९६३ मध्ये नीरज व्होरा यांचा जन्म झाला. नीरज व्होरा यांना कलेची ‘विरासत’ वडील पंडित विनायक राय व्होरा यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील हे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार होते. नीरज व्होरा यांच्या मातोश्री प्रमिला बेन यांना चित्रपटांची आवड होती.

  • लहानपणी आईसोबत नीरज व्होरा हे देखील चित्रपट पाहायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी गुजराती नाटकांसाठी लेखक म्हणून काम केले. केतन मेहता यांच्या ‘होली’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली आणि विनोदाची अचूक टायमिंग साधून प्रेक्षकांना हसवणारा आणखी एक कलाकार हिंदी सिनेसृष्टीला गवसला.

  • विनोदी भूमिकांसह त्यांनी विरासत, कंपनी या सारख्या सिनेमांमध्येही काम केले. हॅलो ब्रदर, रंगीला, मन, पुकार, बादशहा, सत्या, मस्त, अकेले हम अकेले तूम, दौड या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं :
  • मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा लग्नसोहळा इटलीत पार पडला. इटलीतील मिलानपासून 34 किलोमीटर दूर सिएनामधील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये त्यांच्या लग्नाचे विधी पार पडले. मात्र दोघांना भारतातील गजबजाटापासून दूर लग्न करण्याचा सल्ला कोणी दिला, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • बॉलिवूडची प्रथितयश अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा या सेलिब्रेटी कपलने विरानुष्काला हा सल्ला दिल्याची माहिती आहे. 'एशियन एज'मधील रिपोर्टनुसार आदित्य चोप्राने अनुष्काला इटलीतील हे स्थळ सुचवलं.

  • एप्रिल 2014 मध्ये आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीही अशाचप्रकारे इटलीतील रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नाची कुणकुणही फार कमी जणांना लागली होती. बॉलिवूडमधील करण जोहर सारखे मोजके सेलिब्रेटी वगळता राणीच्या लग्नाला फार कोणी उपस्थित नव्हतं. 22 एप्रिल 2014 रोजी तिने एका स्टेटमेंटमधून लग्नाची घोषणा केली.

  • 'देशात लग्न केलं तर त्याचा तमाशा होईल. पापाराझ्झी म्हणजेच फोटोग्राफर्सचा ससेमिरा चुकवता-चुकवता तुमच्या नाकी नऊ येतील' असं आदित्य चोप्रांनी अनुष्काला सांगितलं. अनुष्काने 2008 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, त्यानंतर 'बँड, बाजा, बारात' 'जब तक है जान' सारख्या चित्रपटातही ती झळकली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

  • १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

  • १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

  • १९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

  • १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

जन्म

  • १५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

  • १५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

  • १८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

  • १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

  • १९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

  • १९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

  • १९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

  • १९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

  • १९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

  • १९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

  • १९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

मृत्य

  • १७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

  • १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

  • १९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

  • १९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

  • २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै१९२३)

  • २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.