चालू घडामोडी - १४ डिसेंबर २०१८

Date : 14 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एस्सारच्या रिफायनरीला इराणचे तेल वापरण्यास भारताने केली मनाई :
  • दुबई : अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियातील एका रिफायनरीला इराणमधील आयात केलेले कच्चे तेल वापरण्यास भारताने मनाई केली आहे, अशी माहिती इराणचे तेलमंत्री बिजन जंगनेह यांनी दिली. इराणवर निर्बंध असल्याने तेथील कच्चे तेल वापरू नका, असे भारताने एस्सार कंपनीच्या रशियातील रिफायनरीला सांगितले, अशी इराणची तक्रार आहे.

  • इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखती जंगनेह यांनी हे वक्तव्य केले. इराणने विदेशात रिफायनरीज का खरेदी केल्या नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर जंगनेह यांनी म्हटले की, त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते, तसेच विदेशातील रिफायनरीज त्या देशाच्या नियंत्रणात असतात. तुम्ही एखादी रिफायनरी विदेशात खरेदी केली तरीही तिच्यावर तुमचे नियंत्रण नसते. ती ज्या देशात आहे तेथील सरकारचे तिच्यावर नियंत्रण असते.

  • इराणी तेलमंत्र्यांच्या वक्तव्यावर भारतीय अधिकाऱ्याची प्रतिक्रिया तात्काळ मिळू शकलेली नाही. रशियाच्या रॉसनेफ्ट कंपनीने

  • एस्सार आॅईलची रिफायनरी आणि ३,५०० इंधन पंप खरेदी केले आहेत. काही पायाभूत सुविधाही रॉसनेफ्टला मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी झालेला हा सौदा १२.९ अब्ज डॉलरचा होता. 

भारताला मोठा झटका; रोहित, अश्विन, पृथ्वी पर्थ कसोटीतून बाहेर :
  • पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा संघातून बाहेर झाले आहेत. दुसरा कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात येणार आहे.

  • भारतासाठी हा दुसरा झटका आहे. कारण घोट्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर पृथ्वी शॉ आधीच संघाबाहेर आहे. आता आर अश्विन आणि रोहित शर्मा यांनीही दुखापतीमुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

  • अश्विन, रोहित आणि पृथ्वी यांच्याऐवजी अष्टपैलू हनुमा विहारी, जलदगती गोलंदाज उमेश यादव आणि रवींद्र जाडेजा यांचा 13 सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे.

  • अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माची कंबर दुखावली असून अश्विनला ओटीपोटाच्या दुखण्याचा त्रास झाला आहे. तर अॅडलेड कसोटीआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापतीमुळे या तिघांनाही भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

  • भारतीय संघाने अॅडलेड कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली होती. पुजारा वगळता जवळपास सगळे फलंदाज अपयशी ठरले, पण गोलंदाजांनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयाचा शिल्पकार ठरलेला अश्विन आता पर्थ कसोटीत खेळणार नाही. आता त्याच्या जागी सामील झालेला जाडेजाची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष आहे.

कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री :
  • भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत कमलनाथ यांच्या नावाची घोषणा केली. कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदासाठीचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.

  • मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपासून मध्य प्रदेश मुख्यमंत्रीपदाचा संघर्ष अखेर आता निवळला आहे. कमलनाथ यांचं नाव अखेर निश्चित करण्यात आलं आहे. येत्या 15 डिसेंबरला कमलनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलणी झाल्यानंतर शेवटी ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील हायकमांडच्या निर्णयानंतर हे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

  • निकालानंतर कमलनाथ गट आणि ज्योतिरादित्य शिंदे गट निर्माण झाले होते. ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना ज्योतिरादित्य मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आक्रमक झाले होते. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अखेर मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

FTII च्या अध्यक्षपदी 'सीआयडी'चे दिग्दर्शक बी.पी. सिंग :
  • पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदी बिजेंद्र पाल सिंग यांची निवड करण्यात आली आहे. बी. पी. सिंग हे प्रसिद्ध टीव्ही मालिका सीआयडीचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

  • बिजेंद्र पाल सिंग हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी (1970-73) असून त्यांनी छायाचित्रणात विशेष कौशल्य प्राप्त केलं होतं. तसेच सध्या ते एफटीआयआयच्या शासकीय परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवत होते. मार्च 2020 पर्यंत बी. पी. सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ असेल.

  • विक्रमवीर दिग्दर्शक - बी. पी. सिंग यांनी मनोरंजन विश्वाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ (21 वर्ष) चाललेल्या सीआयडी या विक्रमी टीव्ही मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. 2004 मध्ये बी. पी. सिंग यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. 111 मिनिटांचा सलग शॉट (कुठेही कट किंवा रिटेक न घेता) चित्रित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.

  • ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

  • अनुपम खेर अध्यक्ष म्हणून फक्त तीन वेळा एफटीआयआयमध्ये आले होते, असं त्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्याशी पत्र व्यवहार केल्यास उत्तरं मिळायची नाहीत. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे चेअरमन हे एफटीआयआयला भरपूर वेळ देणारे असावेत, अशी इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.

महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव :
  • मुंबई : आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव केला जाणार आहे.

  • मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवार, 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे,सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण व भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे.

  • महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळवली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे.

  • शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपुत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन असल्याचे बडोले यांनी सांगितले आहे.

२०२२ ची निवडणूक न लढविण्याची मे यांची घोषणा :
  • ब्रेग्झिट समझोत्यावरून अडचणीत आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे त्यांना किमान वर्षभर दिलासा मिळाला आहे. हुजूर पक्षाच्या खासदारांनीच थेरेसा मे यांच्याविरोधामध्ये अविश्वासाचा ठराव मांडला होता. पुढील सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये होणार असून त्या वेळी आपण पक्षाचे नेतृत्व करणार नाही असे मान्य करून थेरेसा मे यांनी बंडखोर लोकप्रतिनिधींना शांत केले.

  • ब्रेग्झिट करारावरून मांडण्यात आलेला अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी थेरेसा मे यांना पक्षाच्या ३१५ पैकी १५८ खासदारांची मते मिळणे आवश्यक होते. गुप्त मतदानात हुजूर पक्षाच्या ३१७ मतांपैकी २०० मते मे यांच्या बाजूने पडली तर ११७ मते त्यांच्या विरोधात गेली. टक्केवारीत सांगायचे तर मे यांना स्वपक्षीय ६३ टक्के खासदारांचा पाठिंबा आहे.

  • या ठरावावरील चर्चेच्या सुरुवातीला मे म्हणाल्या की, ‘‘ब्रेग्झिटची प्रक्रिया योग्य रित्या मार्गी लागलेली पाहूनच मी पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे.’’ त्यामुळे त्या आता २०२२ची निवडणूक लढवणार नाहीत, असे त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

  • मे यांनी विजयानंतरच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘मला पाठिंबा देणाऱ्यांची मी ऋणी आहे, मात्र लक्षणीय संख्येने माझ्या विरोधातही माझ्या सहकाऱ्यांनी मते दिली आहेत. त्यांची बाजूही मी ऐकून घेतली आहे. आता आम्हा सर्वाना ब्रेग्झिटनंतरच्या ब्रिटनच्या नवउभारणीकडे वळले पाहिजे.’’ अविश्वास ठरावातील विजय थेरेसा मे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात होता. त्यांचा पराभव झाला असता तर पुन्हा निवडणुका आणि नवा पंतप्रधान येण्याची शक्यता होती.

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन :
  • मुंबई- राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते. बोंगीरवार हे 1966 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आयएएस अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • तसेच त्यांनी महाराष्ट्रातील 25 वे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. बोंगीरवार यांच्यामागे मुलगी दीप्ती, गार्गी आणि मुलगा पीयूष असं कुटुंब आहे. बोंगीरवार हे मूळचे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातले असून, त्यांनी उस्मानाबाद आणि नागपूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी  पदावरही काम केलं होतं. तसेच ते औरंगाबाद, पुणे आणि कोकणचे विभागीय आयुक्त होते.

  • महसूल खात्यामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी बोंगीरवार कमिटीचे नेतृत्वही केले होते. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या दोन मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तसेच पुण्याचे महापालिका आयुक्तपद भूषवण्याचीही त्यांना संधी मिळाली होती. 1999मध्ये त्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

नेपाळमध्येही नोटाबंदी, भारतातून येणाऱ्या २००, ५०० अन् २००० रुपयांच्या नव्या नोटांवर घातली बंदी :
  • काठमांडू- भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळनंहीनोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. आता त्याच पावलावर पाऊल ठेवत नेपाळनं 100 रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला असून, त्यांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.

  • नेपाळी वृत्तपत्र काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, नेपाळ सरकारनं लोकांना आवाहन केलं आहे की, 100 रुपयांहून अधिक मूल्याचे म्हणजेच 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोट बाळगू नका. नेपाळमध्ये आता फक्त 100 रुपयांच्या नोटच चलनात आहेत. भारतात जेव्हा नोटाबंदी झाली, त्यावेळी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या जुन्या नोटा अडकून पडल्या होत्या. त्या नोटांचा नेपाळ सरकारला काहीही उपयोग करता आला नाही.

  • या समस्येमुळेच नेपाळनं भारतातून येणाऱ्या 200, 500 अन् 2000 रुपयांच्या नव्या नोटांवरच बंदी घातली आहे. भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं. नोटाबंदीमुळे नेपाळमधल्या अनेक बँकांमध्ये करोडोच्या नोटा तशाच पडून होत्या. ज्या परत चलनात आल्याच नाहीत. 8 नोव्हेंबर 2016ला भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ज्यात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

  • १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

  • १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

  • १९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

  • १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

जन्म 

  • १५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

  • १५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

  • १८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

  • १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

  • १९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

  • १९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

  • १९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

मृत्यू 

  • १७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

  • १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

  • १९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

  • १९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

  • २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

  • २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.