चालू घडामोडी - १४ फेब्रुवारी २०१८

Date : 14 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'ही' होणार पाकिस्तानातील पहिली हिंदू महिला खासदार :
  • कराची: पुढील महिन्यात सिनेटसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानात नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान पिपल्स पार्टीतर्फे हिंदू महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून प्रथमच हिंदू महिलेस संसदेत जाता येणार आहे. सिंध प्रांतामधून कृष्णा कुमारी यांना ही संधी मिळत असून पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी ३ मार्च रोजी निवडणुका होत आहेत. कृष्णा कुमारी यांना विजयी करण्यासाठी 'पीपीपी'ने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. 

  • कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थर विभागातील असून त्या नगरपारकर जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्या रुपलू कोल्ही या स्वातंत्र्यसैनिकाच्या वंशज आहेत. १८५७ साली सिंध प्रांतावर ब्रिटीश फौजांनी हल्ला केला होता तेव्हा रुपलू यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता. सामाजिक कार्य करणाऱ्या कृष्णा यांनी पीपीपी पक्षाद्वारे राजकारणात प्रवेश केला.

  • त्यांचे बंधूही याच पक्षात असून ते बेरानो शहराचे नगरप्रमुख होते. कृष्णा कुमारी यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. सोळा वर्षांच्या असताना लालचंद यांच्याशी त्यांचा विवाह झाला.  विवाहानंतरही त्यांनी शिक्षण सुरुच ठेवले. सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. 

  • कृष्णा यांनी सिंध प्रांतात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले आहे. पक्षाने ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी 'पीपीपी'च्या सदस्या बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधानपद भुषवले होते. तर हिना रब्बानी खार यांनी परराष्ट्रमंत्री आणि फेहमिदा मिर्झा यांनी पहिल्या महिला सभापती होण्याचा मान मिळवला होता.

२० दिवस अख्खा देश पोसू शकतील मुकेश अंबानी- सर्व्हे :
  • नवी दिल्ली- जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे. या यादीत 49 देशांचा समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीचाही हवाला देण्यात आला आहे.

  • यादीनुसार भारतात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी 4.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 20 दिवस सरकार चालवू शकतात. विशेष म्हणजे देश चालवण्याच्या बाबतीत भारत हा अमेरिका आणि चीनच्या पुढे राहू शकतो, असंही या यादीतून स्पष्ट झालं आहे.

  • दुसरीकडे चीनमधील सर्वाधिक श्रीमंत असलेले जॅक मांच्या संपत्तीवर चीनचा जेमतेम चार दिवस कारभार हाकू शकतो. तर अमेरिकेतील सर्वात धनाढ्य व्यक्ती जेफ बेजॉस यांच्या संपत्तीवर अमेरिकेचा 5 दिवस देश चालवू शकतो. या यादीत अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली आणि नेदरलँड्समधल्या चार महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

  • यादीमध्ये सायप्रससारख्या लहान देशाचंही नाव आहे. सायप्रसमधील श्रीमंत व्यक्ती जॉन फ्रेड्रिक्सन हे 10 अब्ज डॉलरच्या संपत्तीतून जवळपास वर्षभर देशाचा कार्यभार हाकू शकतात. रॉबिनहुड इंडेक्सच्या यादीमध्ये जवळपास 49 देशांना समाविष्ट करण्यात आले असून, देशांचा कारभार हाकण्यासाठी लागणारा दररोजचा खर्च आणि त्या देशातील धनाढ्य व्यक्तीची एकूण संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

आठवणींतला रेडिओ! रेडिओ दिन जगभरात केला जातो साजरा :
  • 13 फेब्रुवारी हा जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. तो कसा साजरा करतात, कोणास ठाऊ क, पण त्या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील अनेक आठवणी मात्र जाग्या होतात. त्या काळात टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच. नाही म्हणायला भारतात टीव्ही आला १९५९ साली. पण तो कोणाकडे नसायचा आणि त्यावर काही कार्यक्रमही नसायचे. लोकांच्या दृष्टीने माहिती मिळवण्याचं, करमणुकीचं एकमेव साधन होतं, ते म्हणजे रेडिओ.

  • आकाशवाणीची केंद्रंही फारशी नव्हती. त्यामुळे दिल्ली मुंबई व पुणे केंद्रावरल्या बातम्या ऐकल्या जायच्या. कुसुम रानडे, ललिता नेने, शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, अनुराधा देशमुख, प्रकाश पायगुडे, माधुरी लिमये असे काही जण बातम्या वाचायचे.

  • आपली आवड, कामगार सभा, प्रपंच, गंमत जंमत, युववाणी, वनिता मंडळ, आपले माजघर, माझं गाव-माझं शिवार, शेतीचे बाजारभाव हे कार्यक्रम ऐकले जायचे. कोकणीतून विश्वंभर उजगांवकर बातम्या सांगायचे. त्यानंतर आकाबायल्या चौकेर कार्यक्रम असायचा. हिंदीत हवा महल, फौजी भाईयों के लिये, संगीत सरिता, भुले बिसरे गीत या कार्यक्रमांमुळे देशातल्या लोकांना झुमरीतलय्या या गावाचं नाव माहीत झालं.

  • गाण्यांची सर्वाधिक फर्माइश तेथूनच यायची. फिल्मी मुकद्दमा, गीत गुंजन, क्रिकेट वुइथ बिजय मर्चंट तसंच क्रिकेटच्या सामन्यांचं धावतं वर्णन कार्यक्रम हमखास ऐकले जायचे. कमर्शिअल ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रायोजित कार्यक्रम व जाहिराती हे आॅल इंडिया रेडिओवर खूप उशिरा सुरू झालं. अगरबत्ती व एका साबणाच्या जाहिराती हिंदीत सुरुवातीला आल्या.

आता मुंबई-पुणे बुलेट ट्रेन; देशातील ७ शहरांमध्ये ४ हजार १०० किमीचे जाळे उभारणार :
  • मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या घोषणेनंतर देशात बुलेट ट्रेनच्या हालचालींना वेग आला आहे. ७ शहरांमध्येदेखील बुलेट कॉरिडोर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबई-पुणे बुलेट ट्रेनचाही समावेश आहे. वेगवान प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या बुलेट ट्रेनचे, देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे जाळे उभारण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने घेतल्याची माहिती कॉर्पोरेशनच्या (एनएचसीएल) सूत्रांनी दिली.

  • रस्ते मार्गाने २ ते ३ तासांचा कालावधी लागणाºया शहरांचा विचार बुलेट ट्रेनसाठी करण्यात आला आहे. त्यासाठी देशभरात ७ छोटे कॉरिडोर उभारण्यात येणार आहेत. यात मुंबई-पुणे बुलेट कॉरिडोरचा समावेश आहे. बुलेट ट्रेनचे तिकीट दर विमानापेक्षा कमी असतील. रोडने मुंबई-पुणे मार्गासाठी ३ ते ४ तास लागतात.

  • बुलेट ट्रेनने हे अंतर ७५ मिनिटांच्या आत पूर्ण करता येईल, असा दावा एनएचसीएलच्या सूत्रांनी केला आहे. देशभरात ४ हजार १०० किमी लांबीचे बुलेट ट्रेनचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. यात छोटे कॉरिडोर ५ वर्षांत उभे करण्याचे लक्ष्य आहे. याची अंदाजे किंमत निश्चित केलेली नाही. दिल्ली-पटणा, हावडा-कोलकाता, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बंगळुरू-तिरुवनंतपुरम व दिल्ली-जयपूर-जोधपूर या बुलेट ट्रेन प्रकल्पांचा यात समावेश आहे.

  • स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी एनएचसीएलच्या शिष्टमंडळाने १२ फेबु्रवारी रोजी डहाणू-पालघर परिसराला भेट दिली. या वेळी बुलेट ट्रेनबाबत गैरसमज पसरविले जात असल्याचे वास्तव, एनएचसीएलच्या शिष्टमंडळासमोर उघडकीस आले. या परिसरात अनेक प्रकल्प सुरू असल्याने, स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रत्येक प्रकल्पाच्या नियमांनुसार जमिनीचा वेगवेगळा मोबदला देण्यात येतो. यामुळे स्थानिकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होते.

संरक्षण मंत्रालयाकडून ७.४ लाख रायफल्स खरेदीचा निर्णय :
  • नवी दिल्ली : जम्मू काश्मिरच्या सुंजवाँ भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं सात लाख 40 हजार नव्या रायफल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दलातील जवानांना असॉल्ट रायफल्ससह 5 हजार 719 स्निपर रायफल्स आणि लाईट मशिन गन्स मिळणार आहेत.

  • एकूण 15 हजार 935 कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रं भारतीय सैन्याला मिळणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलातील जवानांना 12 हजार 280 कोटी रुपये किमतीच्या सात लाख 40 हजार नव्या रायफल्स देण्यात येतील.

  • 'बाय अँड मेक इंडियन' वर्गवारी अंतर्गत या रायफल्स सैनिकांना दिल्या जातील. म्हणजेच कुठलीही भारतीय कंपनी काही बंदुका एखाद्या परदेशी कंपनीकडून थेट विकत घेऊन भारतात उर्वरित बंदुका तयार करु शकेल. या रायफल्स 7.62 एमएमच्या असतील.

  • गेल्या दहा वर्षांपासून सैन्यासाठी असॉल्ट रायफल्स खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र कुठल्या न कुठल्या कारणामुळे ती दरवेळी रद्द करण्यात येत होती. गेल्या वर्षीही सरकारने या रायफल्सची खरेदी प्रक्रिया रद्द केली होती.

  • असॉल्ट रायफल्स फ्रंटलाईन सैनिकांना देण्यात येतील, असं लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितलं. सोबतच 1819 रुपये किमतीच्या लाईट मशीन गन (एलएमजी) खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या बंदुका सीमेवरील जवानांना देण्यात येतील.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष पदत्यागास तयार? आफ्रिकेतील दुसरा देश अनिश्चिततेच्या गर्तेत :

  • जोहान्सबर्ग : अनेक घोटाळ्यांनी कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने (एएनसी) घेतला आहे. मात्र झुमा यांनी पायउतार होण्यास कोणतीही ठराविक कालमर्यादा नसल्याने आफ्रिका खंडातील हा सर्वात प्रगत देश आणखी अनिश्चिततेच्या गर्तेत गेला आहे.

  • प्रिटोरियाबाहेरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सलग १३ तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मंगळवारी पहाटे झुमा यांना पदावरून दूर करण्यावर पक्षात एकमत झाले. या निर्णयाचे स्वरूप राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षाने दिलेला उमेदवार परत बोलावणे (रिकॉल) असे आहे. पक्ष घटनेत अशी तरतूद आहे. परंतु हा फक्त पक्ष पातळीवरील निर्णय असून तो पाळण्याचे झुमा यांच्यावर देशाच्या राज्यघटनेनुसार कोणतेही बंधन नाही.

  • ‘एनसी’चे सरचिटणीस एस मगाशुले यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास झुमा तत्त्वत: तयार झाले असून त्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा वेळ देण्याचा त्यांनी प्रस्ताव केला आहे. झुमा यांच्या पदत्यागासाठी कोणतीही तारीख ठरलेली नाही. तरी पक्ष आणि झुमा यांच्यातील संवाद सुरु राहील, असे सागून मुगाशुले म्हणाले की, झुमा बहुधा बुधवारी पक्षाला आपला निर्णय कळवतील.

  • झुमा यांचे सध्याचे उपाध्यक्ष सिरिल रामफोसा हेच त्यांचे उत्तराधिकारी होतील असे मानले जाते. खरे तर झुमा आपली पत्नी एककोसाझाना द्लामिनी यांना आपला उत्तराधिकारी म्हणून तयार करत होते. त्यासाठी त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये ‘एनसी’च्या अध्यक्षपदाच्या शर्य तीत त्यांना उतरविले होते. परंतु रामफोसा यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून झुमा यांची पक्षावरील पकड ढिली झाली व त्यांच्यात आणि रामफोसा यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला.

दिनविशेष :
  • व्हॅलेंटाईन दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.

  • १८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना.

  • १८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.

  • १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.

  • १९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.

  • १९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

  • १९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.

  • १९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले.

  • १९८९: ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.

  • २०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.

  • २००३: नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड

जन्म

  • १४८३: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १५३०)

  • १९१६: कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०००)

  • १९२५: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर २०१३)

  • १९३३: अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ – मुंबई)

मृत्यू

  • १४०५: मंगोलियाचा राजा तैमूरलंग यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १३३६)

  • १९७४: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९००)

  • १९७५: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १८८१)

  • १९७५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ ज्यूलियन हक्सले यांचे निधन. (जन्म: २२ जून १८८७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.