चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१८

Date : 14 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सरन्यायाधीश विरुद्ध चार न्यायमूर्ती : ‘सर्वोच्च’ वाद आज सुटणार :
  • नवी दिल्ली देशातील सर्वोच्च वादाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र आज हा वाद सुटण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे चारही न्यायमूर्तींशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

  • खरंतर शनिवारीच चारही मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र न्या. कुरियन जोसेफ, न्या. मदन लोकूर आणि न्या. रंजन गोगोई हे दिल्लीबाहेर होते. आज संध्याकाळपर्यंत तिघेही दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे संध्याकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रांशी त्यांची चर्चा होऊ शकते.

  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या चारपैकी दोन न्यायमूर्तींनी काल मौन सोडलं आणि वाद सुटण्याचे संकेत दिले.

  • केरळमध्ये न्या. कुरियन जोसेफ यांनी म्हटले, “आम्ही एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उपाय नक्की सापडेल. कुठलाही असा मुद्दा नाही, ज्यासाठी बाहेरील मध्यस्थाची गरज भासेल. न्यायव्यवस्थेचं हे अंतर्गत प्रकरण आहे आणि ते सुटेलही. न्यायसंस्थेत सुधारणांची गरज आहे. न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढायला हवा. त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले होते. आम्हाला आशा आहे की, सुप्रीम कोर्ट प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल.”

  • केंद्र सरकारही जरी हे न्यायव्यवस्थेचं अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत असलं, तरी काल पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव नृपेद्र मिश्र अचानक सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी पोहोचले. मात्र दीपक मिश्रा यांची भेट झाली नाही. त्यामुळे ते तसेच परतले. काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले.(source :abpmajha)

‘विमानतळावर तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर हवा’ - सीजीएसआय :
  • मुंबई : विमान प्रवासादरम्यान अथवा विमानतळावर येणा-या अडचणींसाठी प्रवाशांना कोणाकडेही दाद मागता येत नाही. नियमाकडे बोट दाखवून प्रवाशांना डावलले जाण्याचा अनुभव अनेकांना आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विमानतळावर एक हेल्पलाइन नंबर आणि हेल्प डेस्क असावा, अशी मागणी कन्झ्युमर गायडन्स सोसायटी आॅफ इंडियाने (सीजीएसआय) केली आहे.

  • विमान प्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीने अनेक नियमांचे पालन प्रवाशांना करणे बंधनकारक आहे, पण हेच नियम अनेकदा प्रवाशांना जाचक ठरतात. यामुळे अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत. नुकत्याच संसदीय समितीने सादर केलेल्या अहवालातही विमान प्रवासातील अडचणी अधोरेखित झाल्याचे ‘सीजीएसआय’चे सचिव डॉ. मनोहर कामत यांनी सांगितले.

  • विमानाच्या तिकिटांचे दर ही प्रवाशांसमोरची सर्वात मोठी समस्या आहे. कारण, हे दर विमान कंपन्या ठरवतात आणि सातत्याने ते वाढतात. तिकीट रद्द केल्यास त्याच्यासाठीही शुल्क आकारले जाते.

  • यातही सुसूत्रता नसते. या प्रवाशांना कुठेही दाद मागता येत नाही. त्यामुळे प्रवाशांसाठी हेल्प डेस्क आणि हेल्पलाइन क्रमांक असावा, अशी मागणी डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल अ‍ॅव्हिएशन (डीजीसीए) यांच्याकडे करण्यात आली आहे.(source :lokmat)

इंडिया गेटवर संगीत कारंजे, लाइट शो; लवकरच पडणार पर्यटकांच्या आकर्षणात भर :
  • नवी दिल्ली : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण व भारताची शान असलेल्या इंडिया गेटजवळ लवकरच दररोज संगीत कारंजे व लाइट शोचा नजराणा पाहायला मिळणार आहे. येथे दरवर्षी लाखोंनी भेट देणा-या पर्यटकांच्या आकर्षणात आता ही नवी भर पडणार आहे.

  • नागरी व्यवहार व गृहनिर्माण मंत्रालयाने ४५ कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे. विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंत व पुढे नॅशनल स्टेडियमपर्यंतचा परिसर सुशोभित करणार आहे. इंडिया गेट, बोट क्लब व सेंट्रल व्हिस्टा परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी तीन रंगीत-संगीत कारंजे व १२ रंगीत कारंजे बसवण्यात येणार आहेत.

  • दररोज सायंकाळी युद्धस्मारक व इंडिया गेटच्या हिरवळीवर भेट देणाºयांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगीत कारंजे व लाइट शोचे आयोजन करण्यात येणार आहे. पुनर्विकासाचे हे काम येत्या एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहकार्य घेतले जात आहे.

  • पर्यटक आवर्जून भेट देतात - नवी दिल्लीत देश-विदेशातील हजारो पर्यटक भेट देतात. त्यातील प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र वेगवेगळे असले तरी पुढील ठिकाणी ते आवर्जून भेट देतात. लाल किल्ला, संसद भवन, राष्टÑपती भवन, इंडिया गेट, कुतुबमीनार, जामा मशीद, चांदनी चौक, अक्षरधाम मंदिर, राष्टÑीय प्राणिसंग्रहालय, लोटस टेम्पल, दिवंगत राष्टÑपुरुषांची समाधी आदी ठिकाणी पर्यटक आवर्जून जातात.(source :lokmat)

सरकारचा हस्तक्षेप नको, स्वत:च प्रश्न मार्गी लावा - माजी सरन्यायाधीश :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांनी आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगतानाच यात सरकारने हस्तक्षेप करू नये. सरन्यायाधीशांनीच मुत्सद्देगिरीने हा प्रश्न मार्गी लावावा, असे मत माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी व्यक्त केले आहे.

  • आर. एम. लोढा म्हणाले की, झाल्या प्रकाराने मी अतिशय व्यथित झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीसाठी हा प्रकार दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. दुर्दैवाने जे पत्र सार्वजनिक केले गेले, त्यावरून दिसते की, या वरिष्ठ न्यायाधीशांनी दोन महिन्यांपूर्वीच या तक्रारी उपस्थित केल्या होत्या. आता तरी यावर विचारविनिमयाची होणे गरजेचे आहे. मात्र, हे प्रकरण न्यायव्यवस्थेच्या अंतर्गतचे आहे आणि न्यायपालिकेच्या आतच ते सोडवायला हवे.

  • महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संस्था ही व्यक्तीपेक्षा कायम मोठी असते. तिचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जावी. उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांचे सरन्यायाधीशांनी निरसन करायला व्हावे.

  • न्यारपालिकेची पारदर्शकता जपता आली पाहिजे. उपस्थित करण्यात आलेले विशिष्ट मुद्दे चर्चेने सोडविता येऊ शकतात. हे मुद्दे दोन महिन्यांपर्यंत प्रलंबित ठेवायला नको होते. त्यांवर त्यांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी होती.(source :lokmat)

विजय माल्याचं प्रत्यार्पण लांबणीवर, २ एप्रिलपर्यंत वाढवला जामीन
  • लंडन  -  भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय माल्याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे.  गुरुवारी याप्रकरणी लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर झालेली सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यानं माल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोर्टाने माल्याला दिलासा दिला असून त्याच्या जामीन 2 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. 

  • भारत सरकारने माल्याविरोधात सादर केलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेत युक्तीवाद करण्याची मागणी त्याच्या वकिलांनी वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष माल्यादेखील कोर्टात हजर होता. मात्र, यावेळी बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही.

  •  त्यांनी भारत सरकारची याचिका रद्द करण्याची मागणी कोर्टात केली. ही सुनावणी या प्रकरणातील अंतिम सुनावणींपैकी एक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ती पूर्ण होऊ न शकल्याने आता आणखी वाट पहावी लागणार आहे.

  • कोर्टात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिटनची क्राऊन प्रॉसिक्यूशन सर्विस (सीपीएस) ने माल्याविरोधात पुरावे सादर करीत आपला युक्तीवाद सुरु केला. भारत सरकारकडे माल्याविरोधात खटला उभा करण्यासाठीच्या प्राथमिक पुराव्यांची कमतरता असल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता.

  • हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न कोर्टात सीपीएसने भारताच्यावतीने केला. दरम्यान, कोर्टात इतरही खटले सुरु असल्याने तसेच माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात पुढील सुनावणीची तारीखदेखील निश्चित होऊ शकली नाही.(source :lokmat)

अणुकरारातील बदलास इराणचा नकार :
  • जागतिक समुदायातील विविध देशांशी सुचवलेल्या अणुकराराबाबत सुधारणा इराणने फेटाळून लावल्या आहेत. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार लागू ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. इराण अणुकरारात कुठल्याही सुधारणा आता व पुढेही स्वीकारणार नाही. दुसरे कुठलेही प्रश्न किंवा अटी या अणुकराराशी जोडल्या तर ते मान्य केले जाणार नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

  • ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवरचे निर्बंध शुक्रवारी वाढवले आहेत. पण युरोपीय देशांनी अमेरिकेबरोबर काम करून इराणबरोबरच्या अणुकरारातील घातक तरतुदी काढून टाकण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जर घातक तरतुदी काढल्या गेल्या नाहीत, तर अणुकरार अमेरिका रद्द करेल, असे त्यांनी सांगितले. नवीन करारात इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम वगळला जाईल, इराणच्या अणु प्रकल्पांवर निर्बंध लादले जातील, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

  • पण इराणचे परराष्ट्र मंत्री महंमद जावद झरीफ यांनी सांगितले की, २०१५ च्या अणुकरारावर फेरवाटाघाटी होणार नाहीत. अमेरिकेने शुक्रवारी निर्बंध लादले असून त्यात अमेरिकी अर्थ मंत्रालयाने १४ इराणी व्यक्तींवर लादलेले निर्बंध, इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावरचे निर्बंध यांचा समावेश आहे.

  • इराणचे मुख्य न्यायाधीश अयातोल्ला सदेघ लारिजानी यांना निर्बंध यादीत टाकून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या वाईट वर्तनातील सीमारेषा ओलांडली आहे असे इराणचे म्हणणे आहे. इराणने असा युक्तिवाद केला की, मानवी हक्क व क्षेपणास्त्र चाचणी या क्षेत्रातील निर्बधांमुळे इराणला अणुकरारातील आर्थिक फायद्यांपासून वंचित ठेवण्यात येत आहे.(source :loksatta)

दिनविशेष

जागतिक दिवस

  • भूगोलदिन / अयनदिन / संक्रमणदिन.

महत्वाच्या घटना

  • १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

  • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

  • १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

  • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

  • १९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.

  • २०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८८२: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणावर काम करणारे कृतीशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३)

  • १८८३: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर१९७०)

  • १८९२: भारतीय क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)

  • १८९६: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२)

  • १९०५: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)

  • १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

  • १९१९: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००२)

  • १९२३: अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९)

  • १९२६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.

  • १९३१: ऊर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)

  • १९७७: भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन यांचा जन्म.

मृत्यू

  • १७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)

  • १७६१: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट१७३०)

  • १७६१: पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचे निधन. (जन्म: २ मार्च १७४२)

  • १८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.

  • १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)

  • १९९१: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)

  • २००१: माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.