चालू घडामोडी - १४ जानेवारी २०१९

Updated On : Jan 14, 2019 | Category : Current Affairsसेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सज्ज :
 • मुंबई : ऑस्ट्रेलियन ओपनच्या यंदाच्या मोसमातल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होतेय. या स्पर्धेत क्रीडा रसिकांच्या नजरा असणार आहेत त्या प्रामुख्यानं अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सवर. कारण सेरेना मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदाचा विक्रमापासून अवघं एक विजेतेपद दूर आहे.

 • 37 वर्ष वय आणि एका मुलीची आई असलेली सेरेना यंदा विक्रमी 24 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या निर्धारानच ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न पार्कवर दाखल झाली आहे.

 • 2017 साली सेरेनानं शेवटची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती तेव्हा ती दोन आठवड्यांची गरोदर होती. त्यानंतर गरोदरपणा, बाळंतपण आणि खालावलेल्या फिटनेसमुळे सेरेनाचा खेळ मंदावला. पण मुलीच्या जन्मानंतर वर्षभरातच अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठून सेरेनानं आपल्या महानतेची झलक पुन्हा दाखवून दिली होती.

 • सेरेनानं आजवरच्या कारकिर्दीत महिला एकेरीची 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आपल्या नावावर केली आहेत. त्यात विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनची सात, अमेरिकन ओपनची सहा आणि फ्रेंच ओपनच्या तीन विजेतेपदांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक विजेतेपदांच्या विक्रमापासून सेरेना केवळ एक विजेतेपद दूर आहे.

 • दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सेरेनासाठी यंदाचा ड्रॉ मात्र खडतर आहे. सेरेनाच्या गटात जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असलेली सिमोना हालेप आणि कॅरोलिन प्लिस्कोवाचा समावेश आहे. त्यामुळे सेरेना यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विक्रमी कामगिरी करते का? याकडे क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

खुल्या प्रवर्गात आर्थिक आरक्षण देणारं गुजरात पहिलंच राज्य :
 • अहमदाबाद : गुजरात हे खुल्या प्रवर्गात आर्थिक आरक्षण देणारं देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचं रुपांतर कायद्यात झालं आहे. महाराष्ट्रातही लवकरच आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

 • गुजरातमध्ये आजपासून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये दहा आरक्षण देणारा कायदा लागू होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी याबाबत घोषणा केली. यासोबतच खुल्या प्रवर्गात आरक्षण देणारं गुजरात हे पहिलंच राज्य ठरणार आहे.

 • विधेयक ते कायद्याचा प्रवास - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटनादुरुस्ती विधेयक सरकारने  8 जानेवारीला लोकसभेत सहजरित्या मंजूर झालं. लोकसभेत उपस्थित 326 खासदारांपैकी 323 जणांनी समर्थनार्थ मत दिलं, तर तीन खासदारांनी विरोधात मतदान केलं.

 • विधेयक लोकसभेत संमत केल्यानंतर 9 जानेवारीला उशिरापर्यंत यावर राज्यसभेत आरोप प्रत्यारोप झाले. मात्र 165 मते विधेयकाच्या बाजूने मिळाली तर 7 मते विरोधात पडली. राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नसल्याने विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपची कसोटी लागणार होती. मात्र तिथेही विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षण विधेयकाचं रुपांतर कायद्यात झालं आहे.

पोस्टमनच्या देशातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण :
 • बेळगाव : आज बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या पोस्टमनच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कर्नाटकचे वनमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पुतळा उभारण्यात आलेल्या चौकाचे 'पोस्टमन सर्कल' असे नामकरणही करण्यात आले.

 • पोस्ट खात्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पोस्टाच्या मुख्य कार्यालयापासून पुतळा बसविलेल्या चौकापर्यंत मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या अग्रभागी धनगरी ढोल पथक होते. मिरवणुकीत पूर्वीच्या काळातील फेटा घातलेले आणि खाकी गणवेश परिधान केलेले पोस्टाचे कर्मचारी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते होते.

 • पोस्टमनचा पुतळा आठ फूट उंचीचा असून त्याचे वजन साडे तीनशे किलो इतके आहे. पुतळ्याचे अनावरण केल्यावर आकाशात फुगे सोडून पोस्टखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

 • अत्यंत प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडी, वाऱ्यात सेवा बजावणाऱ्या पोस्टमनच्या सेवेची पोचपावती देण्यासाठी बेळगाव विभागाच्या पोस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टमनचा पुतळा उभारण्याची कल्पना मांडली होती. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पुतळ्यासाठी वर्गणी काढून निधी जमा केला. कॅन्टोन्मेंट बोर्डानेदेखील त्यास पाठिंबा दिला आणि आज पोस्टमनचा पुतळा उभा राहिला.

शिक्षण हक्क कायद्यात बदल, नापासांची दोन महिन्यात फेरपरीक्षा :
 • मुंबई : केंद्र सरकारकडून शिक्षण हक्क कायदा-2009 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार देशात प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा अधिकार आहे. या अधिकारामध्ये केंद्र सरकारकडून आता इयत्ता पाचवी आणि आठवी साठी जे विद्यार्थी नापास होतील त्यांची फेरपरीक्षा घेणेबाबतची नवी तरतूद करण्यात आली आहे.

 • जो विद्यार्थी इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये नापास होईल त्यांची दोन महिन्यात फेरपरीक्षा घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात पुढील शिक्षणासाठी सामील केलं जाणार आहे.

 • याआधी इयत्ता पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथी मध्ये विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गासाठी त्याचा अभ्यास करुन त्याला तयार केलं जाणार आहे. तर पाचवी आणि आठवी इयत्तेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. 

प्रयागराज येथे मंगळवारी पहिले शाहीस्नान, लाखो भाविक दाखल :
 • प्रयागराज - कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले असून मकर संक्रांतीच्या दिनी 15 जानेवारी रोजी पहिले शाही स्नान होणार आहे त्यासाठी अलाहाबाद नगरी सज्ज झाली आहे.

 • प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे 45 एकर क्षेत्रामध्ये साधुग्राम म्हणून अस्थायी शहर वसविण्यात आले असून त्यात विविध आखाडे व त्यांच्या महंत तसेच महामंडलेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. साधुग्राममध्ये जाण्यासाठी नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लोखंडी ड्रमसवर 24 तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. सर्वच आखाड्यांमध्ये भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अहोरात्र भंडाराही सुरू आहे, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे हभप रामकृष्ण लहवीतकर महाराज व त्यांचे अनुयायीही शाही स्नानात सहभागी होणार आहेत.  

 • कुंभमेळ्यासाठी अवघी प्रयागराज नगरी सजली असून जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारतींवर तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही गेल्या दीड वर्षात केलेल्या कामगिरीचे फलक जागोजागी लावले आहेत. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.

 • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.

 • १९४८: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.

 • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

 • १९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर.

 • २०००: ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म 

 • १८८३: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)

 • १८९६: भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२)

 • १९०५: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)

 • १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.

 • १९१९: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००२)

 • १९२६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १७४२: धुमकेतू साठी प्रसिद्ध असलेले ब्रिटीश अंतरीक्षशास्त्रज्ञ एडमंड हॅले यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)

 • १७६१: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)

 • १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)

 • १९९१: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)

टिप्पणी करा (Comment Below)