चालू घडामोडी - १४ जुलै २०१८

Date : 14 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदी रघुनाथ माशेलकर :
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून २०१६ मध्ये पुन्हा नियुक्ती करण्यात आली. त्यापाठोपाठ आता जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदीही त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. रिलायन्स फाऊंडेशनने या पदासंदर्भात त्यांना विचारणा केली असल्याची माहिती समोर येते आहे. तर उपकुलगुरू म्हणून दीपक जैन यांची निवड करण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे. दीपक जैन हे ससिन ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटचे माजी संचालक होते. त्यांना उप-कुलगुरुपदासाठी विचारणा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.  रघुनाथ माशेलकर आणि दीपक जैन हे दोघेही सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नियामक मंडळावर आहेत.

  • कर्जत भागातील ८०० एकर जागेवर जिओ इन्स्टिट्युट वसणार आहे. ज्यामध्ये १० शाळा असतील. इंजिनिअरींग, मेडिकल सायन्स, खेळ, कायदा, परफॉर्मिंग आर्ट, शहर व्यवस्थापन हे आणि असे इतर विषयांवर आधारित या शाळा असतील. जगभरातल्या ५०० विद्यापीठातल्या निवडक शिक्षकांची निवड या शाळांमध्ये केली जाणार आहे. तसेच या जिओ इन्स्टिट्युटमध्ये रिसर्च सेंटरही असणार आहे.

  • माशेलकर आणि जैन हे रिलायन्स इंडस्ट्रिजचे बोर्ड मेम्बर्स आहेत..रिलायन्स फाऊंडेशन टीमचा एक भाग असतील जी रिलायन्समधे नेतृत्वक्षमता विकसित करणाऱ्या कोअर ग्रुपचा एक भाग असतील अशी शक्यता आहे. रघुनाथ माशेलकरांनी मात्र अशी काही विचारणा झाली आहे अथवा नाही याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

H-1B व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट मायदेशी :
  • न्यूयॉर्क : अमेरिकेतील नोकरदार भारतीयांना ट्रम्प प्रशासन मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. एच 1बी (H-1B) व्हिसाची मुदत संपल्यावर नूतनीकरण न झाल्यास, व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठवण्याची तरतूद असलेलं धोरण लागू झालं आहे.

  • अमेरिकन प्रशासनाने जारी केलेल्या व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ/नूतनीकरण किंवा 'चेंज ऑफ स्टेटस'साठी केलेला अर्ज फेटाळला गेला, तर त्या व्यक्तीवर डिपोर्टेशनची (देशातून हद्दपार करणे) कारवाई केली जाऊ शकते.

  • व्हिसा नसल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी गमवावी लागेल. भरीस भर म्हणजे त्याचं अमेरिकेतील वास्तव्यही बेकायदेशीर असेल. अशा परिस्थितीत इमिग्रेशन न्यायाधीशांच्या निर्णयापर्यंत त्यांना काही महिने अमेरिकेत ताटकळत राहावं लागू शकतं.

  • एनटीए (नोटीस टू अपिअर) बजावल्यानंतर कोर्टापुढे हजेरी न लावल्यास अमेरिकेत पुनर्प्रवेशासाठी पाच वर्षांची बंदी लागू केली जाऊ शकते. हे धोरण 28 जूनपासून लागू झालं असून त्याबाबतची सूचना गेल्याच आठवड्यात अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आली आहे.

मुकेश अंबानींनी 'अलिबाबां'ना मागे टाकलं, आशियातील सर्वात श्रीमंत :
  • नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानींनी चीनचे व्यावसायिक आणि अलिबाबा कंपनीचे सीईओ जॅक मा यांना मागे टाकलं आहे.

  • ब्लूम्बर्गने जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबानींची संपत्ती 44.3 अब्ज डॉलर म्हणजेच  3.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसंच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही 1.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • दुसरीकडे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत जॅक मा यांची संपत्ती 44 अब्ज डॉलर म्हणजे 3 लाख कोटी इतकी आहे.

  • शुक्रवारी सकाळी रिलायन्सचं बाजार मूल्य 7 लाख कोटींवर पोहोचलं. टीसीएसनंतर हा टप्पा गाठणारी रिलायन्स दुसरी कंपनी ठरली आहे.

  • ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची ट्रेडिंग 1.7 टक्क्यांनी वाढली. तर यंदा अंबानींच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर म्हणजेच 2800 कोटी रुपयांनी वाढ झाली. तर जॅक मा यांच्या अलिबाबा समुहाला 1.4 अब्ज डॉलरचा तोटा झाला.

  • रिलायन्सने पेट्रोकेमिकल्सची क्षमता दुप्पट केल्याने त्याचा फायदा चेअरमन अंबानींच्या संपत्तीत वाढीने झाला.

  • नुकतंच रिलानन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानींनी 2025 पर्यंत रिलायन्स जिओ दुपटीने वाढेल असा विश्वास व्यक्त केला. तर रिलायन्सने आता जिओ गीगा फायबर लाँच केलं आहे.

  • रिलायन्स गीगा फायबर सध्या देशभरातील 1100 शहरात सुरु करणार आहे. त्याद्वारे ग्राहक 1gbps स्पीडसह डाटा वापरु शकेल. 15 ऑगस्टपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरु होईल.

ट्विटरचे ‘स्वच्छता अभियान’, मोदींचे तीन लाख फॉलोअर्स घटले :
  • मुंबई : ट्विटरने सक्रिय नसलेले अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवरील जवळपास तीन लाख फॉलोअर्स कमी झाले, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे 17 हजार ट्विटर फॉलोअर्स कमी झाले.

  • सक्रिय नसलेली अकाऊंट्स बंद केली जातील, अशी घोषणा ट्विटरने मागील आठवड्यात केली. यामुळे भारतासह जगभरातील सेलिब्रेटिंना आपले फॉलोअर्स गमवावे लागले.

  • नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या चार कोटी 34 लाखांहून कमी होऊन आता चार कोटी 31 लाखांवर आली आहे. तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्याही एक लाख 40 हजारांनी कमी झाली आहे.

  • ‘आमच्या या निर्णयामुळे काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण आम्ही पारदर्शितेवर विश्वास ठेवतो, ज्यातून ट्विटर ही अधिक संवादभिमुख सेवा होऊ शकेल,’ असं ट्विटरचे सुरक्षा प्रमुख विजय गडे यांनी म्हटलं आहे.

  • ट्विटरच्या या स्वच्छता अभियनाचा फटका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला आहे. ट्रम्प यांचे एक लाख फॉलोअर्स कमी झाले.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही तब्बल चार लाख फॉलोअर्स घटले आहेत.

Truecaller मध्ये आता यूजर्सना मिळणार ही नवीन सुविधा :
  • नवी दिल्ली : Truecaller या अॅप यूजर्ससाठी एक कंपनीने एक फीचर लॉन्च केलं आहे. Truecaller च्या माध्यमातून तुम्ही आता कॉल रेकॉर्ड करण्याचीही सुविधा मिळणार आहे. कंपनीने या फीचरबाबत सर्व माहिती त्यांच्या सपोर्ट पेजवर दिली आहे. Truecaller सतत आपल्या यूजर्सना वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत.

  • कंपनीने सांगितले की, रेकॉर्ड करण्यात आलेल्या कॉलची रेकॉर्डींग डिव्हाइसमध्ये सेव्ह होईल. हे रेकॉर्डींग Truecaller सर्व्हरवर सेव्ह होणार नाही. कंपनीने हेही सांगितलं की, ते यूजर्सचे कॉल रीड करत नाहीत आणि त्याची प्रोसेसिंगही करत नाही. कारण कंपनीच्या प्रोसेसिंगचा सन्मान करते.  

  • पण हे फीचर सर्वांनाच वापरता येणार नाहीये. कंपनीने सांगितलं की, जे यूजर्स अॅन्ड्रॉइड 5.0 किंवा त्याच्या पुढचं व्हर्जन वापरत असलीत तेच या फीचरचा वापर करू शकतात. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फीचर अॅन्ड्रॉइड .7.1.1 नूगा वर रन होणाऱ्या डिव्हाईसला सपोर्ट करत नाही. या

  • डिव्हाइसेसमध्ये नेक्सस, पिक्सल आणि मोटो 4 जी सारख्या डिव्हाइसचा समावेश आहे. सोबतच कंपनी यूजर्सना या फीचरचं 14 दिवसांचं फ्रि ट्रायल देत आहे. त्यानंतर हे फीचर विकत घ्यावं लागेल. 

घरातील केबल टीव्हीवर चालणार बीएसएनएलची इंटरनेट सेवा :
  • नवी दिल्ली : आपल्या केबल टीव्हीच्या बिलामध्ये लवकरच आपल्याला इंटरनेटही मिळू शकेल. बीएसएनएल केबल आॅपरेटर्सशी याबाबत चर्चा आणि करार करीत आहे. जिओ एफटीटीएच योजनेचा मुकाबल्यासाठी बीएसएनएलच्या या पावलाकडे बघितले जात आहे. बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही टीव्हीधारकांना घरीच केबल टीव्हीवर इंटरनेट देण्याचा विचार करीत आहोत. दक्षिण आणि पश्चिम भारतात याबाबत केबल आॅपरेटर्सशी लवकरच करार करण्यात येणार आहेत.

  • यामुळे इंटरनेटसाठी वेगळी केबल टाकण्याची गरज पडणार नाही. बीएसएनएलचा खर्चही वाचेल व ग्राहकांना केबल टाकण्याचे वेगळे पैसेही द्यावे लागणार नाहीत. ग्राहक टीव्ही स्क्रीनवर इंटरनेट चालवू शकतील. त्यासाठी त्यांना वेगळा की बोर्ड, माउसची गरज पडणार नाही. इंटरनेटमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्यांना बीएसएनएलच्या कार्यालयात फोन करण्याची गरज भासणार नाही.

  • केबल आॅपरेटर्स ते दूर करु शकतील. पहिल्या टप्प्यात आम्ही प्रायोगिक तत्वावर विशेष आॅफर देण्याचा विचार आहोत. यासाठी इंटरनेटचे वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. सध्याच्या केबल बिलात त्यांना इंटरनेटची सुविधा मिळेल. याची गतीही चांगली असेल.

  • अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, १0 कोटींहून अधिक घरांत केबल कनेक्शन आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचू. याशिवाय वेगळी केबल टाकून इंटरनेट कनेक्शन देण्याची योजनाही सुरूच राहील. आमची सेवा सुरू होईल, तेव्हा आमचे उत्पन्न आणि नफाही वाढेल.

सुटलं गिऱ्हण, द्या दळण.... सूर्यग्रहण संपले, 27 जुलैला चंद्रग्रहण :
  • नवी दिल्ली - भारतीय वेळेनुसार आज सकाळी 7.18 वाजता सुरु झालेले सूर्यग्रहण सकाळी 8.13 वाजता संपले आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार याचा मोक्षकाळ 9.43 वाजेपर्यंत होता. आजचे हे सूर्यग्रहण भारतात दिसून आले नाही.

  • न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे हे ग्रहण दिसत होते. यानंतर 27 जुलै रोजी दुसरे चंद्रगहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याचे खगोलशास्त्र विभागाची माहिती आहे. 

  • भारतासह युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका आणि अटलांटिक येथे हे चंद्रगहण दिसणार आहे. आजपर्यंतचे हे सर्वाधिक काळ चालणारे चंदग्रह ठरणार आहे. तर 11 ऑगस्ट रोजी यंदाच्या वर्षातील तिसरे सूर्यग्रहण लागणार आहे.

  • मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण पूर्व युरोप, आशिया नॉर्थ अमेरिका आणि आर्कटिक येथे दिसणार आहे. त्यानंतर 6 जानेवारी 2019 रोजी लागणार असून ते संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. दरम्यान, या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 31  जानेवारी रोजी दिसले होते. भारतासह युरो, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत येथेही हे सूर्यग्रहण दिसले होते. 

कल्पेश याग्निक यांचे निधन :
  • इंदूर : दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे (डी.बी. कॉर्प)समूह संपादक आणि लेखक कल्पेश याग्निक यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता दरम्यान इंदूरच्या कार्यालयात काम करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुमारे साडेतीन तास उपचार सुरू असताना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. रात्री २ वाजता डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. शुक्रवारी इंदूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ नीरज यांनी मुखाग्नी दिला.

  • कल्पेश यांचा जन्म २१ जून १९६३ रोजी झाला होता. १९८८ मध्ये ते दैनिक भास्कर समूहाशी जोडले गेले. ५५ वर्षीय याग्निक रोखठोक वक्ते आणि देशातील प्रसिद्ध पत्रकार होते. समाजातील संवेदनशील मुद्यांवर निर्भीड आणि निष्पक्ष लेखणीबद्दल ते ओळखले जात.

  • दर शनिवारी दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध होणारा त्यांचा ‘असंभव के विरुद्ध’ हा स्तंभ बहुचर्चित होता. त्यांच्यामागे आई प्रतिभा, पत्नी भारती, शेरना, शौर्या या दोन मुली, भाऊ नीरज आणि अनुराग हे आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याग्निक यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सामाजिक विषयांवरील त्यांचे लेखन अंतर्मुख करायचे. त्यांची लेखणी सरकारला आरसा दाखविणारी होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

  • १९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.

  • १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.

  • १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.

  • १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.

  • २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

जन्म 

  • १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

  • १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर१९७०)

  • १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)

  • १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.

  • १९१७: संगीतकार रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)

  • १९२०: महाराष्ट्राचे ५वे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

  • १९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर यांचे निधन.

  • १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)

  • १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

  • १९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)

  • १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.

  • १९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)

  • २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)

  • २००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.