चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जून २०१९

Date : 14 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत इतिहास घडवणार! अंतराळात स्वतःचं स्पेस स्टेशन बनवण्याच्या तयारीत :
  • नवी दिल्ली : भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन (Space Station) बनवण्याच्या तयारीत आहे. भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प असणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख के. सिवन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारताने हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • जवळपास 20 टन इतके वजन असलेल्या या स्पेस स्टेशनमध्ये भारत मायक्रोग्रॅव्हिटीशी संबंधित प्रयोग करु शकणार आहे. या स्पेस स्टेशनमुळे भारतातील अंतराळ प्रवासी 15 ते 20 दिवस अंतराळात राहू शकतात. मिशन गगनयाननंतर या स्पेस स्टेशनबाबतची अधिक माहिती देण्यात येईल असेही इस्रोने आज स्पष्ट केले.

  • दरम्यान, इस्रोकडून सांगण्यात आले आहे की, "हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत इतर कोणत्याही देशाची मदत घेणार नाही. सध्याच्या घडीला केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे स्वतःचे स्पेस स्टेशन आहे. जगभरातील उर्वरीत सर्व देश अंतराळातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राचा वापर करतात. भारताचे स्पेस स्टेशन हा मिशन गगनयानचाच एक भाग आहे."

  • के. सिवन यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सिवन यांनी सांगितले की, "ह्यूमन स्पेस मिशन लॉन्च केल्यानंतर आम्ही गगनयान प्रकल्प हाती घेणार आहोत. त्यासोबतच भारत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार आहे."

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतात... "मोदी है तो मुमकीन हैं" :
  • वॉशिंग्टन : भाजपने लोकसभा निवडणुकीत वापरलेली टॅग लाईन 'मोदी है तो मुमकीन है' पुन्हा चर्चेत आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी ही टॅग लाईन बोलून दाखवली आहे. माईक पॉम्पियो जून महिन्याअखेर भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यावर येण्यासाठी उत्सुक असलेल्या माईक यांनी 'मोदी है तो मुमकीन है'चे नारे दिले.

  • माईक हे बुधवारी यूएस-इंडिया बिझनेस काऊंसिलच्या इंडिया आयडियाज संमेलनात बोलत होते. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी है तो मुमकीन है असे नारे दिले होते. तर मोदी मेक्स इट पॉसिबल", असं माईक यांनी म्हटलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी घट्ट होत असल्याचं दिसत आहे, असं माईक यांनी सांगितलं.

  • माईक पॉम्पियो जून महिन्याच्या अखेरिस नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे, असं माईक यांनी सांगितलं. माईक पॉम्पियो 24 ते 30 जूनपर्यंत भारत, श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटणार आहेत.

  • माईक पॉम्पियो यांच्या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील नातेसंबंध आणि घट्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तब्बल १०० वर्षांनी उडाले भारतातील राजाचे विमान; महालामध्ये सडले होते :
  • नवी दिल्ली : तब्बल 100 वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धामध्ये वापरलेले बॉम्बवर्षाव करणारे विमान Airco DH9 पुन्हा उड्डाण भरणार आहे. आश्चर्य वाटले ना, पण हो. बिकानेरच्या राज्याच्या महालामध्ये हे विमान सडलेल्या अवस्थेत होते. या विमानाच्या पुनरुज्जीवित करण्याची गोष्टही फार रंजक आहे. 

  •  Airco DH9 हे विमान राजाचे हत्ती बांधण्याच्या जागेवर ठेवण्यात आले होते. दोन दशकांपूर्वी इंग्लंडहून एक प्रेमी जोडपे भारतभ्रमंतीवर आले होते. त्यावेळी ते बिकानेरचा राजवाडा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी या युगुलाला या विमानाचे भग्न अवशेष दिसले. या विमानाला पुन्हा नवीन आयुष्य देण्याचे त्यांनी ठरविले. तेथील राजाच्या वंशजांशी त्यांनी बोलणी केली. त्यांनी हे विमान देण्यासाठी मंजुरीही दिली. या जोडप्याने हे अवशेष अनेक भागांमध्ये इंग्लंडला नेले आणि त्यानंतर या विमानाची पुर्नबांधणी सुरु झाली. 

  • 20 वर्षांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर विमान पुन्हा नव्याने तयार झाले, मात्र विमानाला आजच्या युगातील यंत्रे लावण्यात आली आहेत. यानंतर हे विमान उडविण्याचे दिव्य सुरु झाले. कारण हे विमान उडविण्यासाठी त्या सारखी जुनी विमाने उडविण्याचा अनुभव असलेला पायलट लागणार होता. कारण पहिल्या विश्वयुद्धात वापरलेल्या विमानांमध्ये आणि गेल्या 40 वर्षांतील विमानांमध्ये मोठे बदल झाले होते. यामुळे त्या काळातील विमान उडविणारा कोणी असेल का याचा शोध सुरु झाला. 

  • डॉज बेली नावाचे सेवानिवृत्त पायलट यांना अशी विमाने उडविण्याचा अनुभव होता. कारण ते प्रदर्शनांमध्ये जुनी विमाने उडवत असत. त्यांनी स्वेच्छेने हे विमान 30 मिनिटे उडविले. 

भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक :
  • भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

  • किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच  रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या स्वतंत्र भेटीगाठी झाल्या. त्या वेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आल्याचे समजते.

  • दहशतवादाच्या मुद्दय़ावर आणि विशेषत्वाने मसूद अझरप्रकरणी रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. चीनने मात्र आतापर्यंत नकाराधिकाराचा वापर करून भारताची कोंडी केली होती. या वेळी प्रथमच रशियाने चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी केलेली नाही.

  • सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकत आहे. भारताच्याही अनेक र्निबधांबद्दल अमेरिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे. आता त्रिपक्षीय बैठकीत दहशतवादविरोधी लढा तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने चर्चा होण्याची शक्यता आहे.

रक्तदानात देशात महाराष्ट्र सलग दहा वर्षे अव्वल :
  • रक्तसंकलनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने स्वत:चेच सर्व विक्रम मोडीत काढत रक्तदानाच्या क्षेत्रात देशातील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र रक्तसंकलनात देशात प्रथम क्रमांकावर असून गेल्या वर्षभरात महाराष्ट्राने तब्बल १६ लाख ५६ हजार ५४२ रक्ताच्या पिशव्या जमा केल्या. विशेष म्हणजे ऐच्छिक रक्तदानात देशातील एकही राज्य महाराष्ट्राच्या आसपासही नसून जमा केलेल्या एकूण रक्तापैकी तब्बल ९८.८८ टक्के रक्त हे एैच्छिक रक्तदानाद्वारे गोळा करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्राच्या रक्तदानातील कामगिरीची दखल राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेनेही घेतली असून परिषदेने एका पत्राद्वारे महाराष्ट्रातील ऐच्छिक रक्तदानाचा अभ्यास करून अन्य राज्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यास सांगितले आहे. जवळपास गेले दशकभर महाराष्ट्र रक्तदानात देशात सर्वप्रथम आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्तसंकलन हे पुणे परिक्षेत्रात होत असून येथे गेल्या वर्षभरात तीन लाख ८२ हजार ६११ एवढे रक्तसंकलन करण्यात आले.

  • त्यापाठोपाठ मुंबईत दोन लाख ९८ हजार ३८५ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. नाशिकमध्ये दोन लाख नऊ हजार, नागपुरात एक लाख ७९ हजार, ठाणे येथे एक लाख ४६ हजार ९४० तर कोल्हापुरात एक लाख ३३ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. राज्याच्या सर्व परिमंडळात सरासरी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त रक्तसंकलन ऐच्छिक रक्तदानाद्वारे करण्यात आले.

  • राज्यात २०१७ मध्ये १६ लाख दोन हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्या वर्षी २७,१९३ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २०१८ मध्ये हेच प्रमाण वाढून तब्बल १६ लाख ५६ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले असून रक्तदान शिबीरांमध्येही वाढ झाली आहे.

महान बॅडमिंटनपटू ली च्योंग वेईची निवृत्तीची घोषणा :
  • कर्करोगामुळे आजारी असणारा महान बॅडमिंटनपटू ली च्योंग वेईने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली, त्या वेळी त्याचे डोळे पाणावले. लीने अनेक पारितोषिके जिंकली आहेत, परंतु जागतिक किंवा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकू शकला नाही.

  • जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर ली एकूण ३४८ आठवडे विराजमान होता. परंतु सहा जागतिक आणि तीन ऑलिम्पिक स्पर्धाच्या अंतिम फेरीत पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कर्करोगाचे निदान झाल्यावर महिन्याभरातच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

  • ‘‘बॅटमिंटन खेळावर मी निस्सीम प्रेम करीत असल्यामुळे हा निर्णय घेणे माझ्यासाठी अत्यंत जड गेले. मला गेली १९ वर्षे दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी सर्व मलेशियन नागरिकांचे आभार मानतो,’’ असे ३६ वर्षीय लीने सांगितले.

  • दोन मुलांचा पिता असलेल्या ली याला कर्करोग झाल्याचे गतवर्षी प्राथमिक अवस्थेतच स्पष्ट झाले. त्यावर तैवानमध्ये विशेष उपचार करण्यात आल्यामुळे त्याला पुनरागमनाची आशा होती. परंतु एप्रिलपासून त्याला सरावाला हजेरी लावणेसुद्धा कठीण जात होते. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे आव्हानात्मक ठरणार होते.

दिनविशेष :
  • जागतिक रक्त दाता दिन

महत्वाच्या घटना 

  • ११५८: इसार नदीच्या काठावर म्यूनिच शहर स्थापन केले.

  • १७०४: मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

  • १७७७: अमेरिकेने स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला.

  • १७८९: मक्यापासुन पहिल्यांदाच व्हिस्की तयार करण्यात आली. तिला बोर्बोन असे नाव देण्यात आले.

  • १८९६: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.

  • १९०७: नॉर्वेत स्त्रियांना मतदानाचा अधिकार.

  • १९४५: भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर.

  • १९५२: अमेरिकेने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.

  • १९६२: पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली – नंतर युरोपियन स्पेस एजंसी बनली.

  • १९६७: मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.

  • १९६७: चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्ब ची चाचणी केली.

  • १९७२: डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.

  • १९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

  • २००१: ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.

जन्म 

  • १४४४: भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निळकंथा सोमायाजी यांचा जन्म.

  • १७३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)

  • १८६४: जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)

  • १८६८: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लॅन्ड्स्टायनर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९४३)

  • १९६९: प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ यांचा जन्म.

  • १९२२: हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक के. आसिफ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२५: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)

  • १९१६: मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक गोविंद बल्लाळ देवल यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)

  • १९२०: जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १८६४)

  • १९४६: ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक जॉन लोगी बेअर्ड यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)

  • १९८९: मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचे निधन

  • २००७: संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १९१८)

  • २०१०: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९१३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.