चालू घडामोडी - १४ मार्च २०१९

Updated On : Mar 14, 2019 | Category : Current Affairsएक साधा डिप्लोमा होल्डर भारतातला आघाडीचा रोबोटमेकर कसा बनला :
 • रोबोट, रोबोटिक्स हे काय असतं हेच मला माहिती नव्हतं. मुळात मी असं काहीतरी काम करतोय ज्याला रोबोटिक्स म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. मी जे काम करायचो ते मुख्यतर्‍ मेकॅनिकल होतं, मशिन्स आवडायचे आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करत त्या मशिन्सवर कण्ट्रोल कसा मिळवता येईल एवढाच विचार माझ्या मनात होता. त्याला थोडीबहुत इलेक्ट्रॉनिक्सची जोड देत मी माझे प्रयोग करत होतो.

 • मी फार जुना काळ सांगतोय. (म्हणजे आजच्या तरुण मुलामुलींसाठी तर फारच जुना !) 1992-93च्या आसपासचे हे दिवस. त्याकाळी रोबोटिक्स असा शब्दच आपल्या आसपास नव्हता. भारतात तर काहीच घडत नव्हतं, विदेशांत असेलही मात्र फार प्राथमिक अवस्थेत होतं. आणि जगही तेव्हा आजच्या इतकं ‘कनेक्टेड’ नव्हतं. कुठं काय चाललंय हे काही बसल्याजागी चटकन  कळत नसे. कॅसेट रेकॉर्डर आणि व्हीसीआरचा तो काळ. त्यामुळे आपण काही मेकॅनिकल जॉब्ज करतोय आणि ते करताना मशिन्स आपण म्हणू तसे वागू शकतात असं काहीसं माझ्या डोक्यात धूसर होतं.

 • धूसर असण्याचंच ते वय होतं कारण मी साधं डिप्लोमा इंजिनिअरिंग करत होतो. ते झालं मग जॉब मिळाला बंगळुरूला. तिकडे गेलो. जाताना माझ्या खांद्यावर माझी सगळी प्रयोगशाळाच होती. म्हणजे मी जे काही प्रयोग करत असे त्याचं सारं साहित्य घेऊनच मी फिरायचो. वेळ मिळाला की माझे प्रयोग करत बसायचो. जॉब लागला, सगळं सुरू होतं. दोन-तीन वर्षे नोकरी केली. आणि 1996 साली मी कोचीला परत आलो.

 • मला कळत नव्हतं मी डिप्लोमा इंजिनिअर आहे की टेक्निशियन? मी नक्की कोण आहे. माझंच मला कळत नव्हतं. मग मी ठरवलं की, पुढचं काहीतरी शिकायचं. बीटेक करायचं ठरवलं. प्रवेश परीक्षा दिली आणि 1998 साली मी बी.टेकला अ‍ॅडमिशन घेतली. तोर्पयत मी एक उपकरण तयार केलं होतं, त्याला माझा पहिला रोबोट म्हणता येईल. एक असं उपकरण जे ऐकण्याची क्षमता, शरीरातल्या संवेदना मोजायचं. पण त्यात रोबोटिक काही नव्हतं सगळं मेकॅनिकल होतं आणि थोडंबहुत इलेक्ट्रॉनिक. बी.टेक करायला गेलो आणि मला पहिल्यांदा इंटरनेट वापरता आलं. तेव्हा मला कळलं की रोबोटिक्सनावाची एक स्वतंत्र शाखा असते आणि यंत्रमानवाला माणसासारखं काम करायला लावता यावं म्हणून जगभर प्रयोग सुरू आहेत.

०१ एप्रिलपासून रेल्वे तिकिटाच्या PNRमध्ये मोठा बदल, असा होणार फायदा :
 • नवी दिल्लीः भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून प्रवाशांना नवी सुविधा देणार आहे. विमान कंपन्यांसारखीच  रेल्वेही  आता एकामागाहून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर नेम रेकॉर्ड(PNR) जारी करणार आहे. या नियमानुसार पहिल्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे पुढची ट्रेनही सुटण्यास वेळ लागल्यास कोणतंही शुल्क न आकारता प्रवास रद्द करण्याचा प्रवाशाला अधिकार मिळणार आहे. हा नियम रेल्वेच्या सर्वच वर्गांसाठी लागू आहे. 

 • दुसऱ्या ट्रेनचं रिफंड मिळणार - जेव्हा आपण ट्रेनचं तिकीट बुक करता, त्यावेळी एक पीएनआर नंबर मिळतो. हा PNR एक युनिक कोड असतो, ज्यामुळे आपल्याला ट्रेन आणि त्या संबंधीची सर्व माहिती मिळते. जर तुम्ही दोन ट्रेनच्या तिकीट बुक केल्या असल्यास दोन पीएनआर नंबर जनरेट होतात. भारतीय रेल्वेनं नियमांत बदल करून 2 पीएनआरला लिंक करण्यास सहजसोपं केलं आहे. मग आपण तिकीट ऑनलाइन किंवा काऊंटरवरून बुक करा. कोणत्याही पद्धतीत तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशाला सहज रिफंड मिळणार आहे.

रिफंडचे नवे नियम -

 • जर कोणत्याही स्टेशनवर रिफंड न मिळाल्यास आपण भरलेला टीडीआर 3 दिवसांपर्यंत मान्य राहील. आपल्या रिफंडचे पूर्ण पैसे आपल्याला सीसीएम किंवा रिफंड ऑफिसमधून मिळतील. 

 • जर आपण काऊंटरवरून रिझर्व्हेशनचं तिकीट घेतलं असेल, तर पहिली ट्रेन येण्यापूर्वीच्या 3 तासांमध्ये आपण दुसऱ्या ट्रेनचं तिकीट रद्द करू शकतो. रिफंडचे पैसे काऊंटरवरच मिळतील. 

 • जर तिकीट ऑनलाइन बुक केली असेल, तर ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्याच स्टेशनवर टीडीआर भरावा लागणार आहे. 

 • पहिली ट्रेन उशिरानं असल्यास कारण देत दुसऱ्या ट्रेनला सुटण्यास वेळ लागत असल्याचं कारण दिल्यासच आपल्याला रिफंड मिळणार आहे. 

अझीम प्रेमजींनी धर्मादाय निधीत दिले ५२ हजार कोटी :
 • बंगळुरू : आयटी क्षेत्रातील विप्रो लिमिटेड या प्रख्यात कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे त्यांच्या मालकीचे आणखी तब्बल ५२ हजार ७५० कोटी रुपयांचे शेअर धर्मादाय कामासाठी दान करण्याचे ठरविले आहे.

 • प्रेमजी यांच्या दानातून धर्मादाय कामे करणाऱ्या अझीम प्रेमजी फाउंडेशनने बुधवारी ही माहिती देताना निवेदनात म्हटले, की अझीम प्रेमजी यांच्या या नव्या दानामुळे फाउंडेशनच्या गंगाजळीत त्यांचे एकूण योगदान आता १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशा प्रकारे प्रेमजी यांनी विप्रो कंपनीची त्यांच्याकडे असलेली ७३ टक्के मालकी धर्मादाय कामांकडे वळविली आहे.

 • अझीम प्रेमजी फाउंडेशन बहुवार्षिक अनुदान देऊन शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणी ते उपलब्ध करण्याचे व असलेल्या सोयी अधिक सुधारण्याचे काम करते. सध्या देशाच्या १० राज्यांमध्ये फाउंडेशनचे हे काम सुरू आहे. या नव्या निधीमुळे बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाचा अधिक विस्तार करून पाच हजार अधिक विद्यार्थी व ४०० नव्या अध्यापकांची तेथे सोय करता येईल. याखेरीज समाजातील शोषित वर्गांसाठी काम करणाऱ्या सुमारे १५० स्वयंसेवी संस्थांनाही हे फाउंडेशन मदत करते.

महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षण देणार; राहुल गांधींची घोषणा :
 • नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, मंदावलेला आर्थिक विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषिक्षेत्रातील घसरण यासह जनतेला भेडसावणाºया प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून, भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या राष्टÑवादाच्या चर्चेला मागे टाकण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास महिलांना सरकारी नोकऱ्यांत ३३ टक्के आरक्षणाची घोषणा केलीच आहे.

 • राहुल गांधी यांना निवडणुकीची समीकरणेच बदलायची आहेत. राष्ट्रप्रेमाच्या नावावर पुलवामा व बालाकोटवर भाजपा लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करेल, पण जनतेला भेडसावणाºया प्रश्नांवर आपण भर द्यायचा आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यात बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आदी मुद्दे असावेत. याशिवाय राफेल, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आदी मुद्देही उपस्थित केले जातील.

 • देशाचा आर्थिक विकासाचा दर पाच वर्षांतील नीचांकावर आहे. कृषिक्षेत्राच्या उत्पन्नचा दरही घसरला असून, खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही खालावली आहे. सीएमआयनुसार बेरोजगारीचा दर ७.२ टक्क्यांवर असून, एनएसएसओनुसार हा आकडा ६.१ टक्के आहे, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.

 • दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचा वायदा मोदी सरकारने पाळला नाही, उलट नोकºयाच हिरावून घेतल्या. नोटाबंदीमुळे दीड कोटी नोकºया गेल्या, जीएसटीने लघू व मध्यम उद्योग बंद पडून, अनेकांचे रोजगारही केले. मुद्राकर्ज योजनेबाबत सरकारचा दावा खोटा असल्याचेही प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.

इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मसूद अजहरला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज :
 • केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार असं पुन्हा एकदा खडसावून सांगितलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र जाऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोऱण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 • भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये वारंवार अडथळा आणणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मत यावेळी सुषमा स्वराज यांनी व्यक्त केलं. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला दहशतवादावर चर्चा नको आहे, तर कारवाई हवी आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही’.

 • यावेळी सुषमा स्वराज यांनी भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने दिलेल्या प्रतिक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे ? तुम्ही जैश-ए-मोहम्मदला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवता. जेव्हा पीडित देश याचं उत्तर देतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वतीने हल्ला करता’, अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे.

बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान अखेर अमेरिकेतही जमिनीवर :
 • अमेरिकेनेही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमान सेवेतून माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असून यापूर्वी भारतासह फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांना उड्डाणबंदी केली होती.

 • इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्याने बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोमवारी चीनने सर्वप्रथम या बोईंग विमानांना व्यावसायिक सेवेतून काढून घेतले. यानंतर मंगळवारी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे, भारत या देशांनीही बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला.

 • बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनीस म्युलेनबर्द यांनी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना ही विमाने सुरक्षित असल्याचा दावा केला होता. या विमानात आम्हाला कुठलाही दोष दिसून आलेला नाही त्यामुळे ती विमाने सेवेतून माघारी घेण्याचा प्रश्न येत नाही, असे अमेरिकेतील हवाई वाहतूक प्रशासनाचे प्रमुख डॅनियल एलवेल यांनी सांगितले होते.

 • मात्र, बोईंग संदर्भातील धोरणावरुन ट्रम्प प्रशासनावर टीका सुरु झाली आणि अखेर ट्रम्प यांनी गुरुवारी तातडीने या विमानांना उड्डाणबंदी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेनेही उड्डाणबंदी केल्यानंतर आता 13 पेक्षा जास्त देशांमध्ये बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांचा वापर बंद करण्यात आला आहे. यामुळे बोईंग कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू सापडेना :
 • गेल्या चार महिन्यांपासून पालघर जिल्ह्य़ातील डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने बसत असले तरी अद्याप या भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपप्रवण क्षेत्रात नऊ ठिकाणी भूकंपमापन यंत्रे बसवण्यात आली आहे, त्याशिवाय एनजीआरआय विभागाचे दोन शास्त्रज्ञ कार्यरत असले तरी भूकंपाचे केंद्रबिंदू नेमक्या कोणत्याही ठिकाणी आहे या निष्कर्षांवर ते अद्याप पोहोचलेले नाहीत.

 • ४ नोव्हेंबर २०१८ पासून डहाणू व तलासरी भागांत भूकंपाचे धक्के बसण्यास सुरुवात झाली. गेल्या चार महिन्यांत या परिसरात ६००हून अधिक लहान व सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढली असून ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होत असताना दिसून येत आहे.

 • भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर दर्शवण्यात येणाऱ्या भूकंपाच्या नोंदीमध्ये सविस्तर तपशील नसल्याने या संकेतस्थळावर प्रदर्शित माहितीनुसार भूकंप हा एकाच ठिकाणी होत असल्याचा आभास निर्माण होतो. मात्र गुजरात राज्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सेस्मोलॉजिकल रिसर्च (आयएसआर) तसेच नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार प्रत्येक भूकंपाचा केंद्रबिंदू ३० ते ५० किलोमीटरच्या परिघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होत असल्याचे दिसून आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

 • १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

 • २०००: कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

 • २००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

 • २०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

जन्म 

 • १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल१९५५)

 • १८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९२)

 • १९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७९)

 • १९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी २०११)

 • १९३३: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

 • १९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

 • १९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

 • १९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

 • १९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

 • १९७४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८८३: जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते कार्ल मार्क्स यांचे निधन. (जन्म: ५ मे १८१८)

 • १९३२: अमेरिकन संशोधक आणि इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८५४)

 • १९९८: अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९३२)

 • २०१०: ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १९१८)

टिप्पणी करा (Comment Below)