चालू घडामोडी - १४ मे २०१८

Date : 14 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींचा विक्रम, चार वर्षांत ३८ योजना सुरू :
  • नवी दिल्ली : ४८ महिन्यांत ३८ योजना सुरू करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ३८ योजना सुरू करण्यात आल्याचे आता जाहीर झालेले आहे.

  • काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी नुकताच टिष्ट्वटरवर असा दावा केला की, मोदी सरकारच्या २३ नव्या योजना/प्रकल्पांना केवळ नवी नावे दिली गेली आहेत. कारण या योजना/प्रकल्प संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) कार्यकाळातच सुरू केले गेले होते. थरूर यांचा हा दावा भाजपने धुडकावून लावताना या योजना/ प्रकल्प पूर्णपणे नवे असून त्यांची परिश्रमांनी अमलबजावणी केली आहे, असे म्हटले. परंतु, नेमक्या किती योजना आहेत याची कल्पना कोणालाही नाही. तथापि, हे गूढ संसदेत अहवाल मांडला गेल्यावर उकलले. त्यात ३८ योजना सुरू करण्यात आल्याचे म्हटले.

  • नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राव इंदरजित सिंग यांनी भाजपचे खासदार सत्यनारायण जातिया यांना माहिती देताना सांगितले की, नीती आयोगाने फेब्रुवारी २०१५ मध्ये केलेल्या शिफारशींनुसार काही योजना या सुधारून घेण्यात आल्या आहेत.

  • २०३० पर्यंत म्हणजे दीर्घकाळ नजरेसमोर ठेवून मोदी सरकारने या योजना राबवण्याचे ठरवले आहे. २०१७-२०१८ ते २०२३-२०१४ हा सात वर्षांचा कालावधी (पहिला टप्पा) राष्ट्रीय विकास कार्यक्रम साध्य करण्यासाठी असून २४ आॅगस्ट, २०१७ रोजी तीन वर्षांचा कृती कार्यक्रम सुरू केला गेला आहे व उर्वरीत कार्यक्रम पाच वर्षांत राबवला जाईल.

IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारला बलात्कारावर प्रश्न, निवड झालेल्या तरुणाने दिलं हे उत्तर :
  • भारतीय प्रशासकीय सेवा ( IAS) परीक्षेच्या मुलाखतीदरम्यान जगभरातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन प्रश्न विचारले जातात. यावेळी एका तरुणाला बलात्काराबाबत प्रश्न विचारण्यात आला. बलात्कार करणाऱ्याला फाशी देणं योग्य आहे का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. या प्रश्नाला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. अशाचप्रकारे अनेक प्रश्नांची सरबत्ती युवकावर करण्यात आली पण सर्व प्रश्नांची समंजसपणे उत्तर देत तो पास झाला. आयएएसमध्ये निवड झाल्यानंतर त्याने मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांबाबत चर्चा केली.

  • २०१७ मध्ये झालेल्या युपीएससी परीक्षेचे निकाल ११ तारखेला जाहीर झाले. यामध्ये झांसीचा रहिवासी आरिफ खान हा युवक पास झाला. युपीएससी परीक्षेत आरिफने ८५० वा रॅंक मिळवला.ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होत असते. पहिल्या दोन परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जातं. चौथ्या प्रयत्नानंतर आरिफ ही परीक्षा पास झाला आणि त्याला मुलाखतीदरम्यान बोलावण्यात आलं.

  • आरीफला मुलाखतीदरम्यान बलात्काराबाबत प्रश्न विचारण्यात आला. वाढत्या बलात्काराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी बलात्कार करणाऱ्याला फाशी देणं योग्य आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ”फाशी देण्याने बलात्कारावर आळा बसणार नाही. जर असं केलं तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी पीडितेला जीवंत ठेवणार नाहीत. 

  • बलात्कार करणारे आरोपी देखील समाजातूनच जन्माला येतात. त्यामुळे फाशीची शिक्षा देण्यापेक्षा समाज सुधारण्यावर आपण जोर द्यायला हवा” असं उत्तर आरिफ यांनी दिलं. आरिफ हे सध्या नागपूरमध्ये जीएसटी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यास देणार कवचकुंडले :
  • नवी दिल्ली : दलित आणि आदिवासींचे आपणच खरे कैवारी आहोत आणि त्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा पक्का संदेश ठाम कृतीतून देण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या फिर्यादीची शहानिशा केल्याखेरीज गुन्हा नोंदविण्यास व अटक करण्यास मज्जाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्याखेरीज हा कायदा कोर्टाच्या कक्षेबाहेर ठेवण्यासाठी त्याला घटनात्मक कवचकुंडले चढविण्याचाही सरकारचा विचार आहे.

  • मार्चमधील निकालाच्या फेरविचारासाठी सरकारने याचिका केली आहे. त्याचा निर्णय होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, ही दोन वेळा केलेली विनंती न्यायालयाने अमान्य केली. आता १६ मेच्या सुनावणीत काय होते यावर सरकारची पुढील पावले अवलंबून असतील.

  • सूत्रांनी सांगितले की, न्यायालयाने फेरविचारास नकार दिला तर वटहुकूम काढून अ‍ॅट्रॉसिटी कायदा पूर्वी होता तसा केला जाईल. हे पहिले पाऊल असेल. त्यानंतर हा कायदा राज्यघटनेच्या नवव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी सरकार करीत आहे. तसे केले की या कायद्यास न्यायालयात आव्हान देता येणार नाही.

  • काय आहे ९वे परिशिष्ट?या परिशिष्टात नव्या कायद्याचा समावेश करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यावे लागेल. सरकारचे बहुमत तर आहेच. शिवाय विरोधकही उघडपणे दलितविरोधी भूमिका घेणार नाहीत, या खात्रीने हे विधेयक मंजूर होण्याची सरकारला खात्री वाटते.ठरावीक कायदे न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवून न्यायालयांनी अवैध ठरविले तरी त्यांची वैधता अबाधित ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१-बी अन्वये सरकारला आहे.

आशियाई महिला हॉकीत भारतासमोर जपानचे आव्हान :
  • डोंघई सिटी (चीन) : माजी विजेत्या भारतीय महिला हॉकी संघाला आज, रविवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी चषक स्पर्धेत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

  • अनुभवी खेळाडू सुनीता लाकडाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज जागतिक क्रमवारीतील १२ व्या क्रमांकावर असलेल्या जपानशी दोन हात करणार आहे. जपानने यापूर्वीही भारतासमोर आव्हान उभे केले होते. जपानच्या अभेद्य बचावफळीसमोर भारताच्या आघाडीपटूंचे कौशल्य पणास लागणार आहे.

  • आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत २०१३ मध्ये जपानने भारताला पराभूत करीत विजेतेपद पटकावले होते. २०१६ मध्ये भारताने पेनल्टी शूटआऊटवर चीनला पराभूत करीत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले होते. लीग सामन्यात जपानने भारताला २-२ असे बरोबरीत रोखले होते. तसेच मागील वर्षी जागतिक हॉकी लीग स्पर्धेत जपानने भारताला २-० असे पराभूत केले होते.

  • भारतीय कर्णधार लाकडा म्हणाली, ‘जपानने नेहमीच आमच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांचा बचाव भेदण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.’ 

नेपाळ-भारत संबंधांमध्ये क्रिकेटची भूमिका महत्त्वाची :
  • काठमांडू : भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा वापर करण्यावर भर देण्याचे संकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. इंडियन प्रीमिअर लीगच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.

  • नेपाळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आयपीएलमध्ये नेपाळचा खेळाडू खेळत आहे.’ दिल्लीकडून संदीप लामिछाने हा नेपाळचा क्रिकेटपटू खेळत आहे.

  • याचाच उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. फिरकीपटू लामिछाने हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चमकला होता. मोदी म्हणाले, ‘क्रिकेटच्या माध्यमातून लोकांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर अन्य खेळांच्या माध्यमातूनही या दोन देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.’

२००, २००० रुपयांच्या खराब नोटा असतील तर व्हा सावध :
  • मुंबई - नोटांबदी लागू झाल्यानंतर २०० रुपये व २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येऊन दीड वर्ष झाली. व्यवहारात आलेल्या या नवीन नोटांबाबतची समस्या सुटता सुटत नाहीय. कारण, कोणत्याही कारणामुळे जर या नोटा खराब झाल्या असतील किंवा फाटल्या असतील तर त्या नोटा बदलून मिळणार नाहीत. शिवाय, बँकांमध्ये जमादेखील करता येणार नाहीयेत.  

  • चलनातील नोटांच्या देवाणघेवाणांसंबधीच्या नियमावलीत या नवीन नोटांचा समावेश न केल्यानं खराब झालेल्या, फाटलेल्या २०० व २००० रुपयांचा नोटा बदलून मिळणार नाहीयेत. फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा बदलणं, जमा करण्याचा प्रकार आरबीआय नियमांतर्गंत येतात. हा नियम आरबीआय कायद्याच्या कलम २८ चा भाग आहे.

  • या कायद्यामध्ये ५, १०, ५०, १००,५०० रुपयांच्या नोटांचा उल्लेख करण्यात आला आहे, मात्र २०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा यात समावेश नाही. याचे कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयनं या नोटांच्या आदान-प्रदान लागू असलेल्या तरतुदींबाबत बदल केलेले नाहीत. यामुळे २०० किंवा २००० नोटा फाटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील तर त्या बँकांमध्ये जमा करता येणार नाहीयेत शिवाय बदलूनदेखील मिळणार नाहीयेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

  • १९६०: एअर इंडिया ची मुंबई – न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

  • १९६५  चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

  • १९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

जन्म

  • १६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १६८९)

  • १९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)

  • १९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी१९९९)

  • १९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

  • १९९०: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.

  • १९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

मृत्यू

  • १९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ – होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

  • १९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर १९०२)

  • १९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)

  • २०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.