चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ मे २०१९

Date : 14 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नोव्हाक जोकोव्हिचचे दुसरे जेतेपद :
  • जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने आपल्याला विश्वातील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून का ओळखले जाते, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. रविवारी रात्री झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रीकच्या स्टीफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवून जोकोव्हिचने वर्षांतील दुसऱ्या, तर कारकीर्दीतील तिसऱ्या माद्रिद विजेतेपदाला गवसणी घातली.

  • जवळपास एक तास व ४० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-३, ६-४ अशी सहज धूळ चारली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत लांबलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत राफेल नदालला पराभूत केल्यानंतर २४ तासांच्या अंतरातच अंतिम सामना खेळावा लागलेल्या त्सित्सिपासच्या थकव्याचा जोकोव्हिचने फायदा उचलला.

  • जोकोव्हिचने वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते. त्याशिवाय जोकोव्हिचने राफेल नदालच्या ३३ मास्टर्स विजेतेपदांशी बरोबरी केली असून २६ मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत या दोघांपैकी कोण बाजी मारतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच गतवर्षी विम्बल्डन, अमेरिकन आणि यंदाचे ऑस्ट्रेलियन अशा सलग तीन ग्रँडस्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणाऱ्या जोकोव्हिचला यंदा चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचीही संधी आहे.

  • ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर माझी कामगिरी काहीशी ढासळली होती. त्यामुळे हे विजेतेपद मला फ्रेंच स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी फार लाभदायक ठरेल.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं मोदींना पत्र :
  • ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून फॅनी वादळाच्या तडाख्यानंतर केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले आहे. तसेच, पटनायक यांनी पत्रात ओदिशात झालेल्या नुकसानीची माहिती देत, पुनर्वसनासाठी मदत देखील मागितली आहे.

  • पटनायक यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रिय पंतप्रधान महोदय सर्वप्रथम मी केंद्र सरकारला फॅनीच्या वादळाच्या तडाख्यानंतर ओदिशा सरकारला केलेल्या मदतीसाठी धन्यवाद देऊ इच्छितो. अद्यापही नुकसाग्रस्त भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचा निवारा हिरावल्या गेला आहे.

  • राज्य सरकार नुकसानीचा अंदाज काढत आहे, जे की लवकरच पुर्ण होण्याची शक्यता आहे. या वादळात उद्धवस्त झालेल्या घरांची अचूक संख्या व त्याच्याशी निगडीत सर्व माहिती, पाहणी पूर्ण झाल्यावरच मिळू शकेल. तसे पाहता सुरूवातीच्या अंदाजावरून सर्वाधिक जास्त नुकसान झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ५ लाख घरे एकतर पुर्णपणे नष्ट झाली आहेत, नाहीतर त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान पूरी जिल्ह्यात झाले आहे.

  • जेव्हा आपण ६ मे रोजी दैा-यावर आला होता, तेव्हा नुकसानीची आपण स्वतः पाहणी केलेली आहे. राज्य शासनाने देखील त्यावेळी आपणास नुकसानीबाबतची सर्व माहिती दिली. तसेच, त्यावेळी झालेल्या बैठकीत या मुद्यावर देखील जोर देण्यात आला होता की, ओदिशाच्या किनारी भागात अशाप्रकारच्या नैसर्गिक संकटाचा सामना करू शकतील, अशी घरे तयार केली जावी.

पात्रता परीक्षेसाठी कोणतेही आरक्षण लागू नाही :
  • आरक्षण प्रवेशांसाठी दिले जाते. त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सोमवारी स्पष्ट केले. २०१९च्या केंद्रीय शिक्षण पात्रता चाचणीसाठी (सीटीईटी) आर्थिकदृष्टय़ा दुर्बलांसाठी असलेले १० टक्के लागू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हे स्पष्ट केले.

  • आरक्षण हे पात्रता परीक्षेसाठीही लागू आहे हा पूर्ण चुकीचा समज आहे. किंबहुना, ही केवळ पात्रता परीक्षा आहे आणि आरक्षण हे प्रवेशांमध्ये दिले जाते. त्यामुळे पात्रता परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले. आपले म्हणणे पटवून देताना ७ जुलै रोजी होणाऱ्या ‘सीटीईटी’ परीक्षेबाबतच्या अधिसूचनेचा दाखला याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला दिला. मात्र या अधिसूचनेत अनुसूचित जाती-जमातींनाही आरक्षण देण्यात आलेले नाही, असा टोला लगावत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. परंतु या मुद्दय़ाचा विचार करावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी १६ मे रोजी सुनावणी ठेवली आहे.

  • ‘सीबीएसई’ने २३ जानेवारी रोजी ‘सीटीईटी’ परीक्षेबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु या परीक्षेसाठी १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात आल्याचे नमूद केले नव्हते. त्यामुळे या वर्गातील ‘सीटीईटी’ परीक्षा देण्यास उत्सुक उमेदवारांनी याचिका करत या परीक्षेसाठीही १० टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. या परीक्षांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गासाठी लाभ देण्यात येत असतील, तर आम्हालाही आरक्षणाचा लाभ देण्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘सीबीएसई’ने या परीक्षेसाठी आपल्याला आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवून घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

लोकसभा निकालावरच विधानसभा निवडणुकीची समीकरणे :
  • लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच विधानसभा निवडणुकीची सारी समीकरणे ठरणार असून, युती किंवा आघाडीचे भवितव्यही यावरच अवलंबून असेल. प्रत्येक राजकीय पक्ष, नेतेमंडळी वा विद्यमान आमदारांनी आपापल्या परीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

  • १७ जूनपासून विधिमंडळाचे तीन आठवडय़ांचे अधिवेशन असून ते पार पडल्यावर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे बिगूल वाजेल. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबरला झाली होती. त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. तोपर्यंत जास्तीत जास्त कामे करण्यावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न असेल.

  • लोकसभेचा निकाल काय लागतो यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपला चांगले यश मिळाल्यास भाजपचा वारू उधळू शकतो. पण केंद्रातील सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षांची गरज भासल्यास शिवसेना पाठिंब्याची पुरेपूर किंमत वसूल करेल. अखेपर्यंत भाजपच्या विरोधात भूमिका घेतलेल्या आणि ऐनवेळी युती केलेल्या शिवसेनेचे किती खासदार निवडून येतात यावरही अवलंबून आहे. शिवसेनेचे संख्याबळ घटल्यास शिवसेनेला निमूटपणे सहन करावे लागेल.

  • लोकसभेच्या वेळी युती करताना विधानसभेकरिता मित्र पक्षांच्या जागा वगळता भाजप आणि शिवसेना समसमान जागा लढविणार असल्याचे युतीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. हे आश्वासन पाळणे भाजपसाठी अवघड आहे. कारण १२२ आमदार निवडून आलेल्या भाजपला बराच समझोता करावा लागेल. केंद्रात आणि राज्यातही खासदारांचे चांगले संख्याबळ असल्यास भाजपला शिवसेनेसाठी जास्त जागा सोडणे क्रमप्राप्त ठरणार नाही. अशा वेळी भाजपच्या कलाने शिवसेनेला घ्यावे लागेल. भाजपला आवश्यकता नसल्यास युती होणेही कठीण मानले जाते. हे सारे लोकसभेच्या निकालावरच अवलंबून असेल.

मुलाखतीतील प्रश्न आधीच ठरले होते, व्हायरल व्हिडिओद्वारे मोदींवर पुन्हा गंभीर आरोप :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा आणि ईमेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आले, असा गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे.

  • काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओद्वारे मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय स्पंदना यांनी, ‘आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत’ असा टोलाही लगावला आहे.

  • व्हायरल व्हिडिओत मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे, तसंच ‘सवाल संख्या 27’ असंही लिहिलेलं दिसतंय. कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतायेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते अशी टीका मोदींवर केली जात आहे.

९३८ हंगामी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना मिळणार कायम पदांप्रमाणे पगार, उच्च न्यायालयाचा निकाल :
  • मुंबई : हंगामी वा रोजंदारी पद्धतीने व तुटपुंज्या पगारावर नोकरीत ठेवून, गेली अनेक वर्षे पिळवणूक करण्यात येत असलेल्या मुंबई विद्यापीठातील ९३८ कामगार व कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दिलासा दिला. त्यानुसार, या कर्मचा-यांना तेच काम करत असलेल्या नियमित कर्मचा-यांएवढा पगार मिळेल. एवढेच नव्हे, तर सध्या रिक्त असलेल्या व यापुढे रिक्त होणा-या पदांच्या भरतीत या कर्मचा-यांना अग्रहक्क मिळेल.

  • न्या. ए. के. मेनन यांनी दिलेल्या या निकालामुळे या कर्मचा-यांनी व्यक्तिश: व मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने संघटितपणे दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. न्या. मेनन यांनी दिलेल्या या निकालानुसार, विद्यापीठाने या कर्मचा-यांना नियमित कर्मचा-यांप्रमाणे पगार व भत्ते सन २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचे आहेत. तसा पगार त्यांना यापुढे दर महिन्याच्या सात तारखेला दिवा लागेल. पगार व भत्त्यांमधील फरकाची थकबाकी विद्यापीठाने पुढील सहा महिन्यांत चुकती करायची आहे.

  • विद्यापीठात सध्या १७७ मंजूर पदे रिक्त आहेत. ही पदे भरताना जे कोणी हंगामी कर्मचारी अद्यापही सेवेत असतील, त्यांना अग्रकम दिला जावा व जोपर्यंत नियमित पदावर नियुक्ती होत नाही, तोपर्यंत त्यांना नोकरीतून कमी केले जाऊ नये, असाही आदेश न्यायालयाने दिला.

  • विद्यापीठ हंगामी व रोजंदार कर्मचारी नेमून त्यांच्याकडून नियमित कर्मचाºयांचे काम तुटपुंज्या पगारावर करून घेऊन अनुचित कामगार प्रथेचा अवलंब करत आहे, शिवाय मंजूर पदांवरील नेमणुका व पगार याबाबतीतही या कर्मचाºयांना पक्षपाती वागणूक देत आहे, अशा फिर्यादी अनेक कर्मचा-यांनी व्यक्तिश:, तसेच मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने प्रातिनिधिक स्वरूपात औद्योगिक न्यायालयात सन २०१४मध्ये केल्या होत्या.

  • अनुचित कामगारप्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये केल्या गेलेल्या या फिर्यादींवर औद्योगिक न्यायालयाने जानेवारी, २०१५ मध्ये अंशत: कर्मचा-यांच्या बाजूने आदेश दिला होता. त्याविरुद्ध कर्मचारी, संघटना व विद्यापीठाने एकूण १८ रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या. त्या एकत्रितपणे निकाली काढताना न्या. मेनन यांनी वरीलप्रमाणे निकाल दिला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७९६: इंग्लंडच्या ग्लूस्टर परगण्यातील बर्कले येथील जेम्स फिलीप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.

  • १९५५: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा वीस वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंडमधील वॉर्सा येथे झाला.

  • १९६०: एअर इंडिया ची मुंबई - न्यूयॉर्क विमानसेवा सुरू झाली.

  • १९६५  चीनने सकाळी साडे सात वाजता (भारतीय वेळ) आपल्या दुसर्‍या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.

  • १९९७: देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय मिहिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे.

जन्म 

  • १६५७: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १६८९)

  • १९०९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९९९)

  • १९२६: आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी१९९९)

  • १९८१: भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री यांचा जन्म.

  • १९९०: फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्ग यांचा जन्म.

  • १९९८: रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे २०१२)

मृत्यू 

  • १६४३: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १६०१)

  • १९२३: कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८५५ - होन्नावर, उत्तर कन्नडा, कर्नाटक)

  • १९६३: भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार डॉ. रघू वीरा यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: ३० डिसेंबर १९०२)

  • १९७८: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१७)

  • १९९८: हॉलिवूड मधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९१५)

  • २०१२: रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार तरुणी सचदेव यांचे निधन. (जन्म: १४ मे १९९८)

  • २०१३: भारतीय लेखक असगर अली इंजिनिअर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.