चालू घडामोडी - १४ नोव्हेंबर २०१८

Updated On : Nov 14, 2018 | Category : Current Affairsराज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबत आज अहवाल :
 • संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज (बुधवार) सरकारला सादर करणार आहे. सर्वांच्या नजरा आता अहवालातील शिफारशीकडे लागल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. सुमारे दोन लाख निवेदने, ४५ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. हा अहवाल आज राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

 • मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे आश्वासन राज्य मागासवर्ग आयोगाने सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाचा अहवाल आज, बुधवारी सरकारला सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आयोगाकडून मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस होण्याची शक्यता आहे. आयोगाची दि. ११ आणि १२ असे दोन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्या.

 • मराठा समाजाची महाराष्ट्रात नेमकी संख्या किती, कुणबी आणि मराठा एकच का, या प्रश्नांचीही उत्तरेही या अहवालातून मिळणार आहेत. मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे, याचा अभ्यास करायचा होता.

 • राज्यभरातून आलेली निवेदने, मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, इतिहास, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी, इरावती कर्वे यासारख्या लेखिकेच्या मानववंशशास्त्राचा अभ्यासही आयोगाने केला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेचा वाद, शाहू राजांच्या काळातील वेदोक्त वाद अशाही बाबी यातून समोर आल्या.

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची घेणार भेट :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त सिंगापूरमध्ये पोहोचले आहेत. येथं ते आसियान समिटमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय व्यापक आर्थिक सहकार्य या संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.

 • दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांची बुधवारी येथे भेट होणार आहे. यावेळी दोघांमध्ये महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शकता आहे. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये दिवपक्षीय सुरक्षा सहकार्य आणि स्वतंत्र व खुल्या हिंदी महासागरात प्रवेशाबाबत धोरणे आखण्यावर चर्चा होऊ शकते.

 • व्हाईट हाऊसकडून मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या माहिनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसर दुपारी साडेबारा वाजता भेट होईल. पेंस या दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावतीने हजर राहणार आहेत. या समिटमध्ये मोदी आपल्या अॅक्ट इस्ट पॉलिसीवरही चर्चा करणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

 • दरम्यान, पहाटे सिंगापूरमध्ये दाखल झाल्यानंतर ते थांबलेल्या फुलट्रॉन हॉटेलमध्ये भारतीय वंशाच्या चाहत्यांनी मोदींची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.

राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिलासा, सेवा समाप्तीचे वय आता ६५ वर्ष :
 • मुंबई :  राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.

 • अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेवेळी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आला आहे.

 • मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-2018 च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कार्यरत असलेल्या सेविकांचे सेवा समाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहास देण्यात आले होते. त्यानुसार आजचा निर्णय घेण्यात आला.

 • एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर केंद्र शासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पाहता त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे 60 वर्षानंतर कोणत्याही व्यक्तीस सक्षमपणे काम करण्यास वैद्यकीय कारणास्तव अडचणी येतात. त्यामुळे वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते.

मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या मल्टीमॉडेल टर्मिनलचं उद्घाटन :
 • लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत देशातील पहिल्या मल्टीमॉडेल टर्मिनलचं उद्घाटन केलं. गंगा नदीतील मालवाहतुकीमुळे नेपाळ, बांगलादेशसोबतचा जलव्यापार अधिक सुकर होणार आहे.

 • नरेंद्र मोदींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात मल्टीमॉडेल टर्मिनलचं उद्घाटन केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पैसे, वेळ, इंधन, वाहतूक कोंडी यांची बचत होईल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 • गंगा नदीमार्गे देशांतर्गत मालवाहतूक जहाज सेवा सुरु करण्यात आली आहे. गंगा-भागीरथ-हुबळी हा सागरी मार्ग राष्ट्रीय जलमार्ग 1 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे.

 • कोलकात्यातून आलेल्या एम. व्ही. रविंद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून 16 कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च तब्बल पाच हजार 369 कोटी रुपये आहे.

बिन्नी बन्सल यांचा फ्लिपकार्टच्या सीईओ पदाचा राजीनामा :
 • नवी दिल्ली :  फ्लिपकार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे वॉलमार्टकडून सांगण्यात आले आहे. कल्याण कृष्णमूर्ति आता फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून कार्यभार सांभाळतील.

 • बिन्नी यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्यांची वॉलमार्ट आणि कंपनीकडून स्वतंत्र चौकशीही सुरू होती. या सर्व प्रकरणामुळेच बिन्नी यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.

 • बिन्नी बन्सल यांनी सचिन बन्सल यांच्यासोबत फ्लिपकार्टची स्थापना केली होती. सचिन यांनी फ्लिपकार्टच्या विक्रीवेळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर सहा महिन्यांनीच बिन्नी यांनी राजीनामा दिला आहे. बिन्नी बन्सल यांच्यावर वैयक्तिक गैरवर्तनाचा आरोप असून या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती. त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप का करण्यात आले होते, याची नेमकी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. परंतु, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांच्यावरील या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरु असल्याचे वॉलमार्टने सांगितले.

 • गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून झालेल्या स्वतंत्र चौकशीनंतर बिन्नी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,  बिन्नी यांनी आपल्‍यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अतिरिक्त प्रशासन प्रक्रीया म्हणजे काय :
 • प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु?

 • उत्तर- अधिनियम 221 (जी) अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्वासंबंधात आहे. इमिग्रंटस आणि नॉन इमिग्रंटसच्या व्हीसा निर्णयप्रक्रीये संदर्भात तो आहे. ज्यावेळेस वाणिज्यदुतावास अधिकाऱ्यांना व्हीसा अर्जावर अधिक माहितीची व कागदपत्रांची गरज आवश्यक वाटते तेव्हा त्यांना अधिनियम 221 (जी)  अर्ज नाकारण्याचा अधिकार असतो. त्यानंतर त्यांना नक्की कोणती माहिती आणि कागदपत्रे हवी आहेत याची माहिती तसेच ती कशी सादर करायची याची माहिती ते अधिकारी देतील.

 • सांगितल्याप्रमाणे आणि ठरवून दिलेल्या वेळेत तुम्ही ती कागदपत्रे व माहिती सादर करावी. तसेच दिलेली कागदपत्रे परत केली जात नसल्यामुळे मूळ कागदपत्रे सादर करू नयेत. जर व्हीसा फी भरल्यानंतर 12 महिन्यांच्या आत तुम्ही कागदपत्रे व माहिती सादर केली नाहीत तर पुन्हा नव्याने व्हीसा फी व व्हीसा अर्ज भरावा लागेल. 221 (जी) अंतर्गत एका वर्षांनी अर्ज 203 (इ) अंतर्गत नाकारला जातो.

 • काही विभागांना तुमच्याकडून अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याअंतर्गत माहितीची गरज नसेल मात्र अमेरिकेतील इतर विभागांकडून व्हीसा अर्जासंदर्भातील माहिती ते मागवू शकतात. तुमच्या अर्जासंदर्भातील कायदेशीर माहितीची पूर्तता ते या सरकारी विभागांकडून करु शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाखतीच्यावेळेस कोणत्याप्रकारच्या माहितीची आवश्यकता घेण्याची गरज आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याची पूर्तता होईपर्य़ंत थांबण्याची सूचना देणारे पत्र पाठवले जाईल. 

आयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी १५ मिनिटे जास्त मिळणार :
 • नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना योग्य सोयीसुविधा मिळाव्या यासाठी  इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.

 • आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर याआधी रात्री 11.30 वाजेपर्यंत तिकीट बुकिंगची सोय होती. त्यानंतर 11.30 ते 12 पर्यंत हे तिकीट बुकींग बंद करण्यात येत असे. जुन्या व्यवस्थेनुसार आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर मुख्य सर्व्हर आधी एक तास बंद असायचा; पण आता हा सर्व्हर केवळ 45 मिनिटे बंद असणार आहे.  म्हणजेच 11.45 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे. 

 • ई तिकीटिंग व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतेच आयआरसीटीसीने सिंगापूरहून पाच नवीन सर्व्हर मागवले आहेत. याआधी आयआरसीटीसी वेबसाईटवर तिकीट बुक करण्याची क्षमता आधीपेक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिवसाला साधारण सहा लाख तिकीट बुक केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार असल्याने सोयीचे होणार आहे. 

दिनविशेष :
 • जागतिक मधुमेह दिन / राष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना 

 • १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

 • १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

 • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

 • १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

 • १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

 • १९७५: स्पेनने पश्चिम सहारा सोडून दिले.

 • १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 • २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

जन्म 

 • १७६५: वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

 • १८६३: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

 • १८८९: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

 • १८९१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)

 • १९१८: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९७६)

 • १९१९: स्वातंत्र्यसैनिक, लेखक अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९९१)

 • १९२२: संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

 • १९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)

मृत्यू 

 • १९१५: अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८५६)

 • १९६७: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९५)

 • १९७१: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)

 • १९७७: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १८९६)

 • १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९२०)

 • २०००: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)

 • २०१३: भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक सुधीर भट यांचे निधन.

 • २०१३: भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३८)

 • २०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)