चालू घडामोडी - १४ ऑक्टोबर २०१८

Date : 14 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
परदेशातील शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती :
  • पुणे : खुल्या प्रवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी विविध शाखानिहाय २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, आभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी शाखांमधील पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. यापार्श्वभुमीवर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याबाबतचे निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क शासनाकडून भरण्याची राजर्षी शाहू शिक्षणशुल्क फी प्रतिपुर्ती योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.  

  •  गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, म्हणून शासनाकडून ही शिष्यवृत्ती दिली जात आहे. योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य शासनाने यापूर्वीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली आहे. त्याच धर्तीवर आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात येत आहे. 

  • खुल्या प्रवगार्तून लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व प्रकारचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट घालण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचा कमाल कालावधी पीएचडीसाठी चार वर्षे, पदव्युत्तर पदवीसाठी दोन वर्षे आणि पदव्युत्तर पदविकेसाठी एक वर्ष इतका आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

जीएसटीनंतर आणखी एक मोठा निर्णय; लवकरच देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाणार :
  • नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर आता व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. यामुळे समभाग, कर्जरोखांच्या हस्तांतरणासाठी देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाईल. याबद्दलचं विधेयक सरकारकडून हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

  • जीएसटीनंतर व्यवसाय सुलभीकरणासाठी मोदी सरकार देशात लवकरच नवा कायदा लागू करू शकतं. त्यामुळे देशभरात समान मुद्रांक शुल्क आकारलं जाईल. यासाठी सरकारला नऊ वर्ष जुन्या कायदात बदल करावा लागेल.

  • त्यासाठी सरकारनं प्रस्ताव तयार केला असून तो हिवाळी अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. नव्या कायद्याचा प्रस्ताव तयार असून त्याला सर्व राज्यांनी मान्यता दिल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. यामुळे राज्यांना मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होणार नाही, असा दावादेखील अधिकाऱ्यानं केला. 

  • जमीन खरेदीशी संबंधित व्यवहारांवर आणि कागदपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारण्यात येतं. मात्र हे शुल्क जीएसटीबाहेर ठेवण्यात आलं आहे. बिल्स ऑफ एक्स्चेंज, लेटर्स ऑफ क्रेडिट, विमा पॉलिसी, शेअर ट्रान्सफर यावर मुद्रांक शुल्क आकारलं जातं. देशभरात विविध राज्यांमध्ये वेगवेगळा मुद्रांक कर आकारला जातो. त्यामुळे अनेकजण कमी मुद्रांक शुल्क आकारणाऱ्या राज्यातून व्यवहार करण्यास प्राधान्य देतात. 

कल्याणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अस्तित्वची बाजी :
  • कल्याण: कल्याणात झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये दिशा थिएटर्स, मुंबईची अस्तित्व या एकांकिकेने बाजी मारली. अस्तित्वने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह आणखी पाच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. 

  • एकांकिका स्पर्धेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 'कल्पना एक अविष्कार अनेक 2018' या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आली. विशेष म्हणजे या एकांकिकेच्या गेल्या 30 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईबाहेर स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यामध्ये उन्नती आर्ट्स, मुंबई यांची भूत मनातलं की, रंगभूमी कलाकार, मुंबई यांची कपाळमोक्ष, दिशा थिएटर्स, मुंबई यांची अस्तित्व, एपिटोम थिएटर्स यांची टाहो या चार एकांकिकांनी धडक मारली होती. 

  • अस्तित्व या एकांकिकेने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह सर्वात्कृष्ट दिग्दर्शक पृथ्वीराज फडके, सर्वोत्कृष्ट लेखन दिपाली घागे, सर्वोत्कृष्ट अभिनय प्रसाद दाणी-राजश्री परूळेकर म्हात्रे आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक असे पाच इतर पुरस्कार ही पटकावले आहेत.

  • भूत मनातलं की ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट अभिनय आश्लेषा गाडे आणि टाहो एकांकिकेने सर्वोत्कृष्ट अभिनायासाठी अनिकेत चव्हाण, अक्षय राणे यांनी प्रत्येकी दोन पुरस्कार पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षण विद्याधर पाठारे, विजू माने, किरण खांडगे, मकरंद-मुकुंद यांनी केले आहे.

गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी :
  • पणजी : गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री दिला जावा तसेच भाजपाप्रणीत आघाडीने गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी काँग्रेसचे केंद्रीय नेते पवन खेरा आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भाजपाने बहुमत नसताना सरकार स्थापन करून प्रथम लोकशाहीचा खून केला व आता गोव्याच्या प्रशासनाचा गळा आवळला जात आहे, अशी टीका खेरा यांनी केली.

  • मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेले नऊ महिने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी कामाचा आणखी बोजा टाकू नये. त्यांना आजारातून पूर्ण बरे होऊन पुन्हा येऊ द्यावे, असे पवन खेरा म्हणाले. गोवा राज्य सध्या मोठ्या संकटातून जात आहे. घटनात्मक पेचप्रसंग आहे.

  • गोव्यातील मंत्र्यांची बैठक मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील रुग्णालयात घ्यावी लागते. गोव्यात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. सरकारला पूर्ण वेळ मुख्यमंत्री नसल्याने सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली जेव्हा आजारी होते व रुग्णालयात उपचार घेत होते, तेव्हा त्यांच्या खात्याची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. संसदीय परंपरा अशीच आहे. पण रुग्णालयात असलेले मुख्यमंत्री पर्रिकर यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले गेले आहे, असे खेरा व चोडणकर म्हणाले. 

१ डिसेंबरपर्यंत मोबाईल नंबर रजिस्टर करा, नाहीतर SBI बंद करेल ‘ही’ सुविधा :
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आपल्या खातेदारांपैकी जे खातेदार इंटरनेट बँकींग सुविधा वापरतात त्यांनी लवकरात लवकर आपला मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करावा असे आवाहन बँकेने केले आहे. यासाठी बँकेने १ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. असे न केल्यास बँक प्रशासनाकडून ग्राहकांची नेट बँकींग सुविधा बंद केली जाईल असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. बँकेने ‘ऑनलाइनसेबी’ या आपल्या संकेसस्थळावर ग्राहकांना ही माहिती दिली आहे.

  • आपल्या ग्राहकांना एसएमएसेस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या ग्राहकांना ही सूचना दिली आहे. सध्या व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून ग्राहकांकडून नेटबँकींगचा मोठ्या प्रमाणात वापर होते. ऑनलाईन व्यवहार करताना कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बँकेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी ग्राहकांनी आपले खाते असलेल्या शाखेशी संपर्क करणे आवश्यक असल्याचेही बँकेने म्हटले आहे.

आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे की नाही असे तपासा :

  • www.onlinesbi.com वर जाऊन लॉगइन करा

  • My Account and Profile वर जा

  • यातील Profile वर जा

  • यात Personal Details मध्ये मोबाईल या पर्यायावर क्लिक करा.

  • तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड मागितला जाईल. हा लॉगइन पासवर्डपेक्षा वेगळा असेल.

  • योग्य पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दिसेल.

दिनविशेष :
  • जागतिक मानक दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८२: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.

  • १९२०: ऑक्सफर्ड विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमास स्त्रियांना प्रवेश दिला.

  • २६: ए. ए. मिल्ने यांचे विनी-द-पूह हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले.

  • १९४७: चार्ल यॅगर या वैमानिकाने X-१ या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.

  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

  • १९८१: उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.

  • १९८२: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९९८: विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १६४३: मुघल सम्राट बहादूरशहा जफर (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १७१२)

  • १७८४: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १८३३)

  • १८८२: आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष इमॉन डी व्हॅलेरा यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७५)

  • १८९०: अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९६९)

  • १९२४: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९७)

  • १९२७: जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म.

  • १९३१: मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९८६)

  • १९३६: लेखक सुभाष भेंडे यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

मृत्यू 

  • १९१९: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८५५)

  • १९४७: साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८७२)

  • १९५३: संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र. धों. कर्वे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८२)

  • १९९३: वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोशी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९०४)

  • १९९४: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१०)

  • १९९७: अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २१ मे १९१६)

  • २०१३  केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९२५)

  • २०१५: भारतीय नौसेनाधिपती राधाकृष्ण हरिराम तहिलियानी यांचे निधन. (जन्म: १२ मे १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.