चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ सप्टेंबर २०१९

Updated On : Sep 14, 2019 | Category : Current Affairsटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपुढे उष्माघाताचे संकट :
 • टोक्यो : जपानमधील प्रखर उन्हाळ्याच्या मोसमात टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना तसेच चाहत्यांना उष्माघाताच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जपानमधील एका नामांकित डॉक्टरने दिला आहे.

 • जपान मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य किमियुकी नानाशिमा यांनी म्हटले की, ‘‘उन्हाळ्याच्या मोसमात जपानमधील जनता बाहेर पडण्यास घाबरते, अशा वेळेला ऑलिम्पिक स्पर्धा होत असल्यामुळे जपानमधील डॉक्टरांवर खूप ताण येणार आहे. जगभरातील चाहते या स्पर्धेला हजेरी लावणार असल्यामुळे लोकांना अनेक आजारांचाही सामना करावा लागणार आहे. सुलभ वातावरणात खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात, असे माझे म्हणणे आहे. पण जपानमधील प्रखर उन्हाळ्यात मोकळ्या मैदानावरील स्पर्धा या चाहत्यांबरोबरच खेळाडूंसाठीही त्रासदायक ठरू शकतात.’’

 • ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळवताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट हा कालावधी ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक खेळांसाठी योग्य असून यादरम्यान वातावरण क्रीडा स्पर्धासाठी पोषक असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ९३ हजार लोकांना उष्माघातामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी १५९ जणांचा मृत्यू झाला होता. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी १९६४ची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात आली होती.

राजीवकुमार यांना अटकेपासून संरक्षण देणारा आदेश रद्द :
 • कोलकाता : पश्चिम बंगालमधील  शारदा चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेले संरक्षण कलकत्ता उच्च न्यायालयाने काढून घेतले आहे.

 • याबाबत आधी अटकेपासून संरक्षण देणारा जो आदेश देण्यात आला होता तो मागे घेतानाच न्यायालयाने राजीव कुमार यांनी सीबीआयची नोटीस रद्द करण्याची केलेली  मागणीही फेटाळली आहे. राजीव कुमार यांनी चौकशीसाठी हजर व्हावे यासाठी सीबीआयने त्यांना नोटीस जारी केली आहे. 

 • कुमार हे सध्या पश्चिम बंगालमध्ये सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक असून राज्य सरकारने शारदा चिट फंड घोटाळ्यात नेमलेल्या चौकशी पथकात ते सहभागी होते. नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी २०१४ मध्ये केंद्रीय अन्वेषण खात्याकडे दिली होती.  राजीव कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करताना पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.

नवजात कृष्ण विवरातील गुरुत्वीय लहरी शोधण्यात यश :
 • बोस्टन : नवजात कृष्णविवरातून बाहेर पडलेल्या गुरुत्वीय लहरी शोधण्यात संशोधकांना प्रथमच यश आले असून त्यातील चक्राकार प्रारूपामुळे कृष्णविवराचे वस्तुमान व त्याची फिरण्याची पद्धत व दिशा यावर माहिती मिळाली आहे. आइस्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरील पुराव्यात त्यामुळे मोलाची भरही पडण्याची शक्यता आहे.

 • फिजिकल रिव्ह्य़ू लेटर्स या नियतकालिकात म्हटले आहे, की कृष्णविवराचे वस्तुमान, फि रण्याची पद्धत व गती, विद्युत भार हे प्रमुख निरीक्षणक्षम घटक असतात हे यातून दिसून  आले आहे.

 • आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतात म्हटल्यानुसार ठरावीक वस्तुमान व गती असलेल्या कृष्णविवराचा क्षय हा विशिष्ट पद्धतीने होत असतो. मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी  या अमेरिकी संस्थेतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांनी या कृष्णविवराची चक्राकार गती, वस्तुमान याबाबत अंदाज मांडला आहे. त्यात अल्बर्ट आइनस्टाइन यांनी माडलेल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा आधार घेण्यात आला होता. आताची ही गणने यापूर्वी कृष्णविवराची जी मापने करण्यात आली होती त्याच्याशी जुळणारी आहेत.

 • सापेक्षतावादाचा सिद्धांत बरोबर आहे पण या मार्गाने त्याची निश्चिती कधीच झाली नव्हती, असे प्रमुख संशोधक मॅक्सिमिलानो इसी यांनी म्हटले आहे. याआधी दोन कृष्णविवरे एकमेकात विलीन होत असतानाच्या घटनेतील गुरुत्वीय लहरींचा शोध लावण्यात यश आले होते. यात दोन कृष्णविवारांची टक्कर झाली होती. आघातानंतर निर्माण झालेल्या नवजात कृष्णविवरातील गुरुत्वीय लहरी काहीशा वेगळ्या असतात.यात शेवटच्या काही मिलीसेकंदातील गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्यात आला. स्पंदनात्मक कंप्रतेशी यातील प्रत्येक लहरीच्या कंप्रतेचा संबंध असतो.

अखेर उदयनराजे यांचा भाजपामध्ये प्रवेश :
 • उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.

 • “छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

 • लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. “2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. 2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठं यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

दिनविशेष :
 • हिंदी दिन.

महत्वाच्या घटना 

 • १८९३: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

 • १९१७: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.

 • १९४८: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.

 • १९४९: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

 • १९५९: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.

 • १९६०: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.

 • १९७८: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.

 • १९९५: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

 • १९९७: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.

 • १९९९: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

 • २०००: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.

 • २००३: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म 

 • १७१३: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)

 • १८६७: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग  यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)

 • १७७४: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)

 • १८९७: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)

 • १९०१: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.

 • १९२१: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)

 • १९२३: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.

 • १९३२: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)

 • १९४८: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.

 • १९५७: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.

 • १९६३: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९०१: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)

 • १९७९: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९१७)

 • १९८९: भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)

 • १९९८: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

 • २०११: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: ५ जून १९५०)

 • २०१५: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)