चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ एप्रिल २०१९

Date : 14 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकाच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी नातं स्पष्ट करणारे कोणते पुरावे गरजेचे असतात :
  • उत्तर- नात्यांशी संबंधित नॉन इमिग्रंट व्हिसा मिळवण्यासाठी अवलंबून असलेल्या व्यक्तींना (पती/पत्नी आणि 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना) त्यांचे अर्जदार किंवा व्हिसाधारकाशी असलेले नातेसंबंध स्पष्ट करणारी कागदपत्रं द्यावी लागतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी, तात्पुरते कामगार आणि एक्सचेंज व्हिजिटर्स यांचं ते ज्या व्यक्तीवर अवलंबून आहेत, त्या व्यक्तीशी खरंच नातं असावं आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला या नातेसंबंधाची खात्री पटलेली असावी.

  • नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त असल्यानं यासाठी होणाऱ्या मुलाखतींना कमी वेळ लागतो. अनेकदा त्या 5 मिनिटांहून कमी वेळात आटोपतात. यावेळी तुम्ही विचारण्यात आलेल्या प्रश्नांना खरी आणि थेट उत्तरं द्यायला हवीत. यासोबतच तुमच्या नात्याचे योग्य पुरावे देणं गरजेचं आहे. मुलाखत घेणारा अधिकारी तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून आणि कागदपत्रांवरून तुमचं नातं खरं आहे का याचा निर्णय घेतो.

  • विवाह दाखला, जन्म दाखला यासारखी तुमचं नातं स्पष्ट करणारी कायदेशीर कागदपत्रं तुम्ही आणणं आवश्यक आहे. अशा कागदपत्रांच्या इंग्रजीत भाषांतर केलेल्या साक्षांकित प्रती आणल्यास ते फायदेशीर ठरेल. याशिवाय काही अतिरिक्त कागदपत्रंही उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराकडे जर H1B तात्पुरता कामगार व्हिसा असेल, तर तुम्ही त्याच्या पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत आणू शकता. याशिवाय त्याने भरलेल्या कराची कागदपत्रंदेखील आणू शकता. त्यामधून तुमचा जोडीदार अमेरिकेत कायदेशीरपणे काम करतो, हे स्पष्ट होतं.

  • व्हिसासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत खरी आणि पूर्ण खरी उत्तरं द्या. तुम्ही इतर अर्जदारांना विचारण्यात आलेले प्रश्न ऑनलाईन वाचून त्या अनुषंगाने"योग्य" उत्तरांची तयारी करू शकता. पण प्रत्येक मुलाखत वेगळी असते आणि मुलाखत घेणारा अधिकारी निर्णय घेताना अर्जदाराच्या परिस्थितीचा विचार करतो. काऊन्सिलर ऑफिसर प्रत्येक अर्जात व्यक्तीशः लक्ष घालतात आणि व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक मुद्द्यांचा विचार करतात.

मुफ्ती, अब्दुल्लांना देशाचे तुकडे करू देणार नाही :
  • कठुआ : जम्मू-काश्मीरमधील तीन पिढ्या बरबाद करणाऱ्या अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांना या देशाचे तुकडे करू देणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला आहे.

  • जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र पंतप्रधान हवा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरचे भले करायचे असेल तर अब्दुल्ला व मुफ्ती कुटुंबीयांचा पराभव केला पाहिजे. या कुटुंबीयांनी माझ्यावर हवी तेवढी टीका करावी पण त्यांचे कोणतेही कारस्थान मी यशस्वी होऊ देणार नाही.

  • पंतप्रधान कार्यालय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सभा घेतली.

  • ते म्हणाले की, संरक्षण दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (अफस्पा) काश्मीरमधून रद्द करू असे आश्वासन काँग्रेस पक्षाने त्याच्या जाहीरनाम्यात दिले आहे. स्वत:ला देशभक्त म्हणविणारा पक्ष अशी भाषा कशी काय करू शकतो? काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास त्यामुळे संरक्षण दलांचे खच्चीकरण होईल.

  • जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजिलेल्या समारंभात उपराष्ट्रपतींना शहिदांना अभिवादन केले. मात्र या समारंभाला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंह उपस्थित नव्हते. त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल मी कधीच शंका उपस्थित केलेली नाही. पण कॅ. अमरिंदरसिंह हे एका परिवाराच्या आरत्या ओवाळण्यात व्यग्र असल्याने ते या कार्यक्रमाला आले नसावेत. काश्मीरी पंडितांचे त्या राज्याच्या खोºयात पुनर्वसन करण्याबाबत भाजप कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू झाले आहेत असा दावाही मोदी यांनी केला.

'या' कारणामुळे राहुल द्रविड मतदान करु शकणार नाही :
  • बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही. राहुलचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही. राहुल द्रविड सध्या कर्नाटक निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. निवडणूक आयोगाजा ब्रॅण्ड अॅम्बेसिडरच मतदान करु शकणार नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

  • राहुलने त्याचा पत्ता बदलल्यानंतर जुन्या मतदार यादीतून स्वतःचे नाव हटवण्यासाठी अर्ज क्रमांक 7 भरला होता. त्यानंतर मतदार यादीतून त्याचे नाव हटवण्यात आले. नव्या पत्त्यावरील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी राहुलला अर्ज क्रमांक 6 भरणे आवश्यक होते. परंतु राहुलने अद्याप अर्ज क्रमांक 6 भरलेला नाही. त्यामुळेच मतदार यादीत त्याने नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही.

  • दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही दोनवेळा द्रविडच्या घरी गेलो होतो. परंतु आमची द्रविडसोबत भेट झाली नाही. द्रविडकडे 16 मार्चपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी होती. परंतु आता ती संधी त्याने गमावलेली आहे. राहुल द्रविड ज्या भागात राहतो. तिथल्या मतदार संघात 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

  • मतदार यादीतून नाव हटवण्यासाठी प्रत्येक मतदाराला अर्ज क्रमांक 7 भरावा लागतो. त्यानंतर पुन्हा एकदा मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज क्रमांक 6 भरणे आवश्यक असते.

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढणार :
  • लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदार संघात महाआघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी असून त्या सध्या या भागात काँग्रेसचा जोरदार प्रचार करत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी या वाराणसीत नरेंद्र मोदींविरोधात योग्य उमेदवार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

  • मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून एका तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. वाराणसी हा मतदार संघ पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. दरम्यान, प्रियांका यांनी पूर्वांचल भागात 'गंगा यात्रा' काढून प्रचाराची सुरुवात केली होती. या यात्रेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता. तसेच मोदींच्या मतदार संघातही प्रियांका यांनी सभा घेऊन काँग्रेसची ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे वाराणसीतून प्रियांका गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.

  • काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांनी वाराणसीतीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी "मी वाराणसीतून निवडणूक लढवू का?" असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला, त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एका सुरात होकार दिला होता.

मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष, ६६९ कोटींचा बँक बॅलेन्स :
  • बँक बॅलेन्सच्या बाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) इतर सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकलं आहे. बीएसपीने निवडणूक आयोगाकडे २५ फेब्रुवारी रोजी आपल्या एकूण खर्चाची माहिती दिली असून यानुसार राजधानी दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ६६९ कोटी रुपये डिपॉजिट आहेत.

  • २०१४ लोकसभा निवडणुकीत आपलं खातंही खोलू न शकलेल्या बीएसपीने आपल्या हातात सध्या ९५.९४ लाख इतकी रोख रक्कम असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान दुसऱ्या स्थानावर समाजवादी पक्ष असून पक्षाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ४७१ कोटी रुपये आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा कॅश डिपॉझिट ११ कोटींनी कमी झाला.

  • काँग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसकडे १९६ कोटींचा बँक बॅलेन्स आहे. मात्र ही माहिती गतवर्षी २ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीच्या आधार देण्यात आली आहे, काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आपल्या बँक बॅलेन्सची माहिती अपडेट केलेली नाही.

  • भाजपा मात्र या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे पडली आहे. भाजपा टीडीपीनंतर पाचव्या स्थानावर आहे. भाजपाकडे ८२ कोटींचा बँक बॅलेन्स आहे तर टीडीपीजवळ १०७ कोटींचा आहे. भाजपाचा दावा आहे की, २०१७-१८ मध्ये मिळालेल्या १०२७ कोटींपैकी ७५८ कोटी खर्च करण्यात आले. कोणत्याही पक्षाकडून खर्च करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे.

जगातल्या काही भागात फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन :
  • फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम युझर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगातील काही भागांमध्ये फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. व्हॉट्स अॅप हे मेसेंजिगमध्ये लोकप्रिय असलेले अॅप आहे.

  • या तिन्ही सोशल माध्यमांच्या डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करताना अडचणी येत असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे तर मोबाइल अॅप वापरताना कोणतीही समस्या जाणवत नसल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

  • #FacebookDown हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. ९ हजारपेक्षा जास्त लोकांनी फेसबुककडे तक्रार केली. फेसबुकच्या तुलनेत व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामवर युझर्सना तितक्य समस्या जाणवल्या नाहीत. युरोप आणि आशियामध्ये मुख्यत्वे ही समस्या जाणवली. युझर्सनी टि्वटरवरुन आपला राग व्यक्त केला.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर :
  • मुंबईत सोमवारी होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. असे असतानाच तिकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या संघाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी घोषणा केली.

  • इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने निवड केलेल्या संघामधून पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि जोश हेझलवूडला डच्चू देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  • विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा ऑस्ट्रेलियन संघ खालीलप्रमाणे - अॅरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कॉल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.

दिनविशेष :
  • जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन

महत्वाच्या घटना 

  • १६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

  • १८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

  • १९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

  • १९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

जन्म 

  • १४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १५१९)

  • १४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)

  • १७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)

  • १७४१: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)

  • १८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)

  • १८९४: सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)

  • १९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.

  • १९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १९९७)

  • १९१२: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९९४)

  • १९२२: गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)

  • १९३२: कवी सुरेश भट यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च २००३)

मृत्यू 

  • १७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.

  • १८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १८५०)

  • १९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून१९०५)

  • १९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.

  • १९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)

  • २०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.