चालू घडामोडी - १५ डिसेंबर २०१८

Date : 15 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींच्या विदेश दौऱ्यांवर २८० दशलक्ष डॉलर खर्च :
  • नवी दिल्ली : मागील साडेचार वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८४ देशांचे दौरे केले. त्यावर करदात्यांचे २८० दशलक्ष डॉलर खर्च झाले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने संसदेत ही माहिती देण्यात आली.

  • खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दौºयाचा खर्च संसदेत सादर केला आहे. त्यात पंतप्रधानांच्या सेवेतील ‘एअर इंडिया वन’चा देखभाल खर्च आणि हॉटलाईन उभारण्याचा खर्चही समाविष्ट आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सातत्याने विविध देशांना भेटी दिल्या आहेत.

  • या दौºयांत त्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानी पंतप्रधान सिंजो आबे यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढविणे आणि भारताचे रणनीतिक हित सुरक्षित करणे या उद्देशाने मोदींनी हे दौरे केल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. चीनमधील वुहान शहरात मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शिखर चर्चा केली. ही चर्चा मुत्सद्देगिरीच्या पातळीवर कमालीची यशस्वी झाल्याचे मानण्यात येते. दोन्ही देशांच्या सीमांवरील तणाव निवळण्यास त्यामुळे मदत झाली.

  • मोदी यांच्या काही परराष्ट्र दौºयांमुळे वाद निर्माण झाला होता. २०१६ मध्ये मोदी यांनी नोटाबंदी लागू केल्यानंतर लगेचच जपानचा दौरा केला. सामान्य लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे करून मोदी जगाचा प्रवास करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी यावर केला होता.

श्रीलंकेचे पंतप्रधान आज राजीनामा देणार :
  • कोलंबो : श्रीलंकेचे वादग्रस्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे या देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

  • त्यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्या आदेशात बदल करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीने घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता.

अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार :
  • नवी दिल्ली : इंग्रजीमधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला आहे. देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11 लाख रुपये, वाग्देवीची प्रतिमा आणि प्रशस्ती पत्र दिले जाणार आहे. ज्ञानपीठ समितीच्या आज झालेल्या बैठकीत 54 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांचे नाव निश्चित करण्यात आले.

  • ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत तीन वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत.

  • अमिताव घोष यांचा अल्प परिचय अमिताव घोष यांचा जन्म 1956 साली पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. घोष यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दी सर्कल ऑफ रिजन, दी शॅडो लाइन, दी कलकत्ता क्रोमोसोम, दी ग्लास पॅलेस, दी हंगरी टाइड, रिव्हर ऑफ स्मोक, फ्लड ऑफ फायर या घोष यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गेहलोत :
  • नवी दिल्ली : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सोडवण्यात अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यश आलं आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे नेते आणि आमदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. काँग्रेसने दिल्लीच्या मुख्यालयातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

  • वसुंधरा राजे यांचं संस्थान खालसा करत काँग्रेसने राजस्थानात सत्ता स्थापन केली. राजस्थान विधानसभेत 99 जागा मिळवत काँग्रेस सर्वात पक्ष ठरला, तर भाजपच्या वाट्याला 73 जागा आल्या. राजस्थानमध्ये काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाचं श्रेय युवा नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोघांनाही दिलं गेलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाणार, याचा सस्पेन्स गेले काही दिवस कायम होता.

  • अशोक गहलोत यांचा परिचय - 68 वर्षांचे अशोक गहलोत यांनी यापूर्वी दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. पहिल्यांदा 1998 ते 2003 आणि दुसऱ्यांदा 2008 ते 2013 या कालावधीत त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत.

  • राजस्थानातल्या जोधपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. विज्ञान आणि कायदा अशा दोन्ही विषयांची पदवी घेतल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन अगदी तरुण वयातच ते राजकीय क्षेत्रात आले.

‘या’ देशात भारतीय नोटांवर बंदी :
  • नेपाळ सरकारने शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका नेपाळला जाणारे भारतीय पर्यटक आणि भारतात काम करणारे नेपाळी कामगारांना बसण्याची शक्यता आहे.

  • नेपाळमध्ये भारतीय चलनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, नेपाळ सरकारने शुक्रवारी भारतीय चलनातील शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्य असलेल्या भारतीय नोटांवर बंदी टाकल्याची घोषणा केली. भारतीय नोटा कुणीही बाळगू नये कारण त्याला अजून नेपाळ सरकारने कायदेशीरता दिलेली नाही, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्री गोकुळ प्रसाद बसकोटा यांनी दिली.

  • नेपाळी कामगार भारतात काम करीत असून देशाचे काही पर्यटकही भारतात जातात, त्यामुळे त्यांना सरकारच्या या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत सरकारने दोन हजार, पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा २०१६ मधील नोटाबंदीनंतर जारी केल्या होत्या. या नवीन नोटा लोक नेपाळी बाजारात गेली दोन वर्षे वापरत आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

महत्वाच्या घटना 

  • १८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

  • १९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

  • १९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

  • १९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

  • १९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

  • २००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

जन्म

  • १८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

  • १८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)

  • १८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)

  • १९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

  • १९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

  • १९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

  • १९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

  • १९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

  • १९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

  • १९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

  • १९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७४९: छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन. (जन्म: १८ मे १६८२)

  • १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)

  • १९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

  • १९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.