चालू घडामोडी - १५ फेब्रुवारी २०१८

Updated On : Feb 15, 2018 | Category : Current Affairsशहिदांकडे धर्माच्या चष्म्यातून पाहू नका, भारतीय सैन्याचं ओवेसींना उत्तर :
 • नवी दिल्ली : सध्या भारत-पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. पाक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जवान शहीद झाले आहेत. पण दुसरीकडे यावरुन देशात राजकारणही सुरु झालं आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शहिदांच्या बलिदानाला थेट धर्माशी जोडलं आहे. त्यावर नॉर्थ कमांडचे कमांडर देवराज यांनी चोख उत्तर दिलं आहे.

 • "शहिदांना धर्माच्या चष्म्यातून पाहू नका," असं उत्तर लष्कराच्या नॉर्थ कमांडचे कमांडर देवराज यांनी दिलं आहे. तसेच ज्या व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्यं करत आहेत, त्यांना लष्कराबद्दल माहिती नसल्याचा टोला त्यांनी ओवेसींचं नाव न घेता लगावला.

 • शिवाय, “जे हातात शस्त्र घेतायत ते केवळ दहशतवादीच आहेत, आणि त्यांचा मुकाबला करण्यास लष्कराचे जवान समर्थ आहेत,” असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

 • दरम्यान, काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांच्या थैमानात शहीद झालेल्यांमध्ये पाचजण मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा.’ असं उपरोधिक आवाहन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं होतं.

 • शिवाय, ‘काश्मीरमध्ये सत्ताधारी भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष नौटंकी करत असून, फक्त मलई खाण्याचे उद्योग सुरु आहेत.’ असा आरोपही ओवेसी यांनी केला होता.

भारतीय रेल्वेमध्ये महाभरती :
 • रेल्वेतील नोकरी म्हणजे सुरक्षित आणि चांगली असा समज असतो. याचा फायदा घेण्याची संधी नुकतीच चालून आली आहे.

 • भारतीय रेल्वेने आपल्याकडील नोकऱ्यांची माहिती जाहीर केली असून तरुणांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

 • भारतीय रेल्वेमध्ये 90 हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेने नुकतीच दिली आहे.

 • याबाबतची विस्तृत माहितीही रेल्वेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यामध्ये 62,907 नोकऱ्या केवळ 10वी पास झालेल्यांसाठी उपलब्ध आहेत.

 • ट्रॅक मेंटेनर, गेटमन, पॉईंटसमन, पोर्टर, हेल्पर यांसारख्या पदांसाठी या जागा आहेत. यासाठी वयाची अट 18 ते 31 वर्षे असून इतर मागासवर्गियांसाठी 3 वर्षांची अधिक तर अनुसूचित जातीच्या अर्जदारांसाठी ही सूट 5 वर्षापर्यंत आहे. यासाठी अर्जदाराने 10वी किंवा आयटीआय किंवा एनसीटीव्हीचा कोर्स करणे आवश्यक आहे.

 • लोको पायलट आणि टेक्निशियन पदासाठी 26 हजार जागा भरायच्या आहेत. indianrailways.gov.in या वेबसाईटवर याबद्दलची विस्तृत माहिती मिळेल.

कोल्हापूर जिल्हा परिषद यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार :
 • जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार यंदा उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) या ग्रामपंचायतींना विभागून प्रथम क्रमांक जाहीर झाला. गेल्यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीला जाहीर झाला.

 • पुरस्कार वितरण 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12ला मार्केट यार्ड येथील शाहु सांस्कृतिक मंदिरात होणार आहे. ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांनी दिली.

 • तसेच गेल्यावर्षीचे आणि या वर्षीचे यशवंत ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवकांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे.

देशात हृदयरोगावरील उपचार स्वस्त होणार :
 • आजारपण आणि त्यासाठी येणारा खर्च ऐकला की सामान्यांच्या तोंडचे पाणीच पळते. हृदयरोग ही आता अतिशय सामान्य समस्या झाली आहे.

 • हृदयरोग झाल्यावर हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किंमती आवाक्याबाहेरच्या असल्याने अनेकांपुढे यक्षप्रश्न उभा राहतो. पण आता या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

 • हृदयात घालण्यात येणाऱ्या स्टेंटची किंमत कमी करण्यात आली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे.

 • मागील वर्षी वाढविण्यात आलेल्या या स्टेंटच्या किंमतीत कपात करण्यात आल्याने देशातील नागरिकांचा आरोग्यसेवेवरील खर्च काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे.

 • केंद्र सरकारकडून ही किंमत कमी करण्यात आली असून त्याबाबतचा अधिकृत नियम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णयही घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

 • महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2013 अंतर्गत एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंबंधीच्या धोरणामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

 • एकात्मिक औद्योगिक क्षेत्रात सवलती देण्यात येणार.

 • अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी 11 ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन होणार.

 • मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा निर्णय.

 • महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपटाची नामांकित निर्मिती संस्थेकडून निर्मिती करण्याचा निर्णय.

 • राज्यातील मंजूर योजनांच्या क्षेत्रात एकात्मिकृत नगरवसाहत प्रकल्प विकसित करण्यासाठी मंजूर विनियमामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

 • महर्षी वेदोध्दारक फाऊंडेशन आणि महर्षी वेदिक हेल्थ प्रा.लि. यांच्या एकात्मिक अतिविशाल प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता.

 • महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम-2015 मध्ये सुधारणा.

 • रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मान्यता.

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले :
 • मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.

 • हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं.

 • 280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.

 • पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊट्सद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच रितसर तक्रार केली.

सूर्यग्रहणावेळी 'या' गोष्टी चुकूनही करू नका :
 • नवी दिल्ली- ग्रहणासंदर्भात भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. ग्रहण लागले म्हणजे सूतक सुरू होते, अशीही काहींची धारणा आहे. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण या नैसर्गिक प्रक्रिया असून, त्या सृष्टीच्या नियमानुसारच घडत असतात.

 • 2018 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 15 फेब्रुवारीला लागणार असून, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. परंतु हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे आणि ब्राझील सारख्या देशांत दिसणार आहे. इतकंच नव्हे, तर ज्योतिषशास्त्रानुसार 11 ऑगस्ट 2018लाही सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही.

 • सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्यालाच सूर्यग्रहण असे संबोधले जाते. ग्रहणाला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार असून, ते 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4.18 वाजेपर्यंत राहणार आहे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रमाणित केलेल्या टेलिस्टकोपचा वापर केला पाहिजे. सूर्यग्रहण पाहण्यासाठी टेलिस्टकोपसारख्या चष्म्याचा वापर करावा, ज्यात अल्ट्रावॉयलेट किरणं रोखण्याची शक्ती आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

 • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.

 • १९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

 • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.

जन्म

 • १५६४: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)

 • १७१०: फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १७७४)

 • १८२४: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै १८९१)

 • १९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.

 • १९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)

 • १९५६: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.

मृत्यू

 • १९७९: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हामिश मार्शल यांचा जन्म.

 • १८६९: ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १७९७)

 • १९४८: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)

 • १९५३: किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.

 • १९८०: कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.

 • १९८०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉंम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन.

 • १९८८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१८)

टिप्पणी करा (Comment Below)