चालू घडामोडी - १५ फेब्रुवारी २०१९

Date : 15 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - नरेंद्र मोदी :
  • नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीवर भ्याड हल्ला केला. जवानांच्या गाडीला विस्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिली. त्यामुळे झालेल्या स्फोटात 40 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही."

  • दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर सर्व भारतीयांनी या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना व्यक्त केली आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सर्व राजकीय नेत्यांनीदेखील घटनेचा निषेध केला, परंतु घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र व्यक्त झाले नव्हते. खूप उशीरा मोदींनी ट्वीट करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

  • नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी याचा निषेध करतो, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत"

सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त :
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी(दि. 14) कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाची घोषणा केली आणि या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ते 1980 बॅचच्या भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) अधिकारी आहेत.

  • माजी निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणुक आयुक्त सुनील अरोरा हे मुख्य निवडणुक आयुक्त बनले होते. त्यानंतर आयोगामध्ये निवडणुक आयुक्ताचे पद खाली होते. निवडणुक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्त आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात. आता सुशील चंद्रा यांच्या व्यतिरिक्त अशोक लवासा हे एक निवडणूक आयुक्त आहेत. शुक्रवारी अर्थात आजपासून चंद्रा त्यांच्या कामकाजाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

  • टी.एस. कृष्णमूर्ति यांची 2004 मध्ये निवडणूक आय़ुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ते देखील आयआरएस अधिकारी होते. कृष्णमूर्ति यांच्यानंतर निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले चंद्रा हे दुसरेच आयआरएस अधिकारी ठरले आहेत.

  • सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणून यावर्षी 16 मे रोजी चंद्रा याचा कार्यकाळ संपणार होता. तसंच 2016 मध्ये दोन वेळेस त्यांचा कार्यकाळ वाढवण्यातही आला होता.

पुलवामा हल्ला हा ‘गंभीर चिंतेचा विषय’, पाकिस्तानने नोंदवला निषेध :
  • जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला पाकिस्तानकडून मोकळे रान मिळाले असल्याचा आरोप भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. मात्र, पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेले आरोप नाकारले असून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

  • गुरूवारी रात्री उशीरा पाकिस्तान सरकारकडून निवेदनाद्वारे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसंच, पुलवामा हल्ला म्हणजे गंभीर चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानने निवेदनात म्हटलं. याशिवाय जगात कोठेही हिंसा झाली तरी पाकिस्तान त्याचा निषेधच करतो असंही नमूद करण्यात आलं आहे. भारतीय मीडिया आणि भारत सरकारमधील काही तत्व कोणत्याही तपासाशिवाय या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.

  • ‘हा हल्ला पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटाने हा हल्ला केला. अझरला त्याचं अतिरेकी कारवायांचं जाळं मजबूत करण्यासाठी आणि भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे’ , असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला होता. पण पाकिस्तानने त्यांचे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.

गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला :
  • पुलवामा : पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अ‍ॅलर्ट दिला होता. ज्या ताफ्यातील वाहनाला टार्गेट केले गेले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते. या ताफ्याच्या मार्गावर जागोजागी सुरक्षा तैनात होती. तरीही हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. एरवी अशा ताफ्यातून एकावेळी सर्वसाधारणपणे एक हजार जवानांची ने-आण केली जाते. परंतु तुफानी बर्फवृष्टी व दुरुस्तीच्या कामांमुळे गेले चार दिवस हा राजमार्ग बंद राहिल्याने तो सुरु झाल्यावर नेहमीहून जास्त वाहने व जवान पाठविण्यात आले.

  • सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी सांगिनले की ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यात ७८ वाहने होतीे. त्यात २,५४७ जवान होते. यापैकी बहुतांश जवान रजेवरून येऊन ड्युटीवर तैनात होण्यासाठी निघाले होते. ज्या वाहनावर हल्ला झाला ते सीआरपीएफच्या ७८ व्या बटालियनचे होते व त्यात ३९ जवान होते.

  • ताफा दुपारी ३.३० वाजता चिलखती गाड्यांच्या बंदोबस्तात जम्मूहून रवाना झाला व दिवस मावळेपर्यंत तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. पण वाटेतच अवंतीपोराजवळील लाटूमोड गावाजवळ हा हल्ला झाला. आयईडी स्फोटकांनी भरलेल्या कारने जवानांच्या बसचा पाठलाग केला. नंतर कारने बसला धडक दिली आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला.

  • कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया व अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.

महागाई कमी करणे ही 15 लाख रुपये देण्यामागची भूमिका - केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह :
  • पुणे : माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सिंह यांना मोदी सरकारच्या 15 लाख रुपये देण्याच्या आश्वासनाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना सिंह म्हणाले की, "15 लाख रुपये सर्वांच्या खात्यात जमा करणार या आश्वासनामागील भूमिका लोकांनी समवजावून घेणे गरजेचे आहे. महागाई कमी झाली, डाळ, तांदूळ, गहू स्वस्त झाले, गरजेच्या वस्तूंची टंचाई भासत नाही. याचा अर्थ काय?"

  • सिंह म्हणाले की, "राफेल व्यवहाराबाबत होत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. माध्यमांमधून अर्धवट तसेच चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. राफेलवरून केवळ राजकारण सुरु आहे. राहुल गांधींच्या डोक्यात जे भरून दिले जाते तेच बाहेर येतं. काँग्रेसच्या काळात बोफोर्स घोटाळा झाला होता. तीच बाब डोक्यात ठेवून राफेलचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. राफेल हा दोन देशांमधील करार आहे. त्यामध्ये कोणताही दलाल नाही."

  • काश्मीरप्रश्नी बोलताना सिंह म्हणाले की, "आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून पाकिस्तानसोबत चर्चेला तयार आहोत. मात्र दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी घडू शकत नाही. चर्चेसाठी आम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकणार नाही. आज काश्मीरमधील परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली आहे. केवळ राजकारणासाठी आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जातात."

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन :
  • गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा (64) यांचे गुरुवारी निधन झाले. डिसोझा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. शनिवारी डिसोझा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

  • गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्सिस डिसोझा कर्करोगाने आजारी होते. अमेरिकेतील इस्पितळातही तीन महिने उपचार घेऊन ते आले होते. तत्पूर्वी त्यांच्यावर किडनी रोपणाचीही शस्त्रक्रिया झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना जुने गोवे येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. गेले आठ दिवस ते व्हँटीलेटरवर होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • डिसोझा गेली 39 वर्षे राजकारणात होते आणि सुमारे 21 वर्षे ते आमदार होते. नगरसेवकपदापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात ते नगराध्यक्ष, पीडीए अध्यक्ष, मंत्री व उपमुख्यमंत्री अशा पदांवर पोहोचले. डिसोझा यांच्या निधनामुळे गोवा विधानसभेची सदस्य संख्या आणखी एका आमदाराने कमी झाली. एकूण चाळीस सदस्यीय विधानसभा आता 37 सदस्यांची राहिली असून दोघांनी पूर्वीच आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

  • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

  • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.

जन्म 

  • १५६४: इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)

  • १८२४: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै १८९१)

  • १९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.

  • १९४९: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)

मृत्यू

  • १९४८: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)

  • १९८०: कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.

  • १९८०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉंम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन.

  • १९८८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.