चालू घडामोडी - १५ जानेवारी २०१९

Updated On : Jan 15, 2019 | Category : Current Affairsपंतप्रधान नरेंद्र मोदींना फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्कार प्रदान :
 • नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. देशाचे उत्तम नेतृत्व केल्याबद्दल तसेच मोदींनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन त्यांना  हा सन्मान देण्यात आला आहे. देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निस्र्वार्थीपणे केलेली देशसेवा, संपूर्ण उर्जेनिशी आपल्या कर्तव्यांचे केलेले पालन आणि भारताला तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रगती साधून दिली आहे, अशा शब्दात मोदींच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान करताना व्यक्ती, लाभ आणि पृथ्वी हे तीन घटक विचारात घेतले जातात. 

 •  प्रसिद्ध मार्केटिंग गुरू फिलीप कोटलर हे आधीपासूनच मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झालेले आहेत. त्यांनी मोदींच्या मेक इन इंडिया योजनेचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा सुधारली आहे. येणारा काळ हा भारतीय उत्पादनांचा असेल. तसेच चांगल्या मार्केटिंगमुळे भारताची प्रतिमा उजळणार आहे, असे कोटलर यांनी म्हटले आहे.  

'भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेते की'... न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी भारतीय महिला :
 • नवी दिल्ली - मूळच्या अहमदाबाद येथील उशीर पंडित दुरांत यांची न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उशीर या 11 वर्षाच्या असताना त्यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत स्थलांतर केले. त्यामुळे उशीर यांचे वकिली शिक्षणही अमेरिकेतच झाले. कधी काळी इंग्रजीचा गंधही नसलेल्या उशीर यांच्या या नियुक्तीनंतर त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 • न्यूयॉर्क लॉ स्कूलमधून उशीर यांनी कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, उशीर यांनी तेथील क्वीन्स जिल्ह्यात सरकारी वकिल म्हणून नोकरीला सुरुवात केली. वकिली क्षेत्रात 15 वर्षे सेवा केल्यानंतर क्वीन्स जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून 2015 साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, केवळ चारच वर्षात उशीर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर शपथ घेताना उशीर यांनी भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. मी भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेते की.... असे म्हणत उशीर यांनी आपला कार्यभार स्वीकारला. 

 • दरम्यान, अमेरिकेत गेल्यानंतर सुरुवातीला इंग्रजी शिकण्यासाठी उशीर यांना खूप मेहनत घ्यावी लागली. मात्र, त्यांनी प्रत्येक बाब बारकाईने शिकत इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. तेव्हापासून उशीर यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे, आता पुढील 14 वर्षे उशीर पंडित या न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

गुजरात ठरले आर्थिक मागासांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :
 • घटनादुरुस्तीद्वारे सवर्णांमधील गरीबांना १० टक्के आरक्षण देणारा कायदा संमत झाल्यानंतर हे आरक्षण पहिल्यांदा गुजरात सरकारने लागू केले आहे. मुख्यमंत्रमी विजय रुपानी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्रातही हे आरक्षण लवकरच लागू होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात रविवारी पहिल्यांदा या आरक्षणाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे खुल्या वर्गातून गरीबांना उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण १४ जानेवारीपासून लागू होणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले. या नव्या आरक्षणाच्या अंमलबजावणीमुळे राज्यात १० टक्के आरक्षणाबरोबर ७ टक्के एससी, १५ टक्के एसटी आणि २७ टक्के ओबीसींसाठी आरक्षण लागू होणार असल्याचे रुपानी यांनी सांगितले.

 • २०१६मध्ये गुजरातमध्ये पाटीदार समाजाने ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सरकारविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर येथील भाजपा सरकारने खुल्या प्रवर्गातून १० टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. हा अध्यादेश गुजरात हायकोर्टाने रद्द केला होता. त्यासाठी घटनेनुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू करता येत नाही असे कोर्टाने म्हटले होते.

 • केंद्राने नुकताच आणलेला ऐतिहासिक सवर्ण आरक्षण कायदा हा गुजरातमधील अध्यादेशावरच लागू करण्यात आला आहे. याद्वारे भाजपाने निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याची पूर्तता केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पाटीदार समाजाने केलेल्या आंदोलनाचा मोठा फटका राज्यात भाजपाला बसला होता. यामध्ये गुजरातमधील २०१५च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला फटका बसला होता.

नापास विद्यार्थीही पुढील वर्गात जाणार :
 • मुंबई : केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यात बदल करून पाचवी आणि आठवीच्या स्तरावर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना नापास करण्याची मुभा दिली असली तरी  त्यात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवायचे की पुढील वर्गात ढकलायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्याला दिले आहेत. या विधेयकावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्राने मात्र अशा विद्यार्थ्यांना नापास करण्याच्या बाजूने कौल न दिल्याने नापास विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात जाण्याची मुभा मिळेल, अशीच चिन्हे आहेत.

 • आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याबाबतच्या चर्चावर पडदा टाकत अखेर केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार विद्यार्थ्यांची पाचवी आणि आठवीच्या स्तरावर परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा तयारी करून घेऊन त्यानंतर त्यांची फेरपरीक्षा घेणे या सुधारित कायद्याने बंधनकारक केले आहे.

 • मात्र त्यापुढील टप्पा म्हणजेच फेरपरीक्षेनंतरही समाधानकारक प्रगती नसणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसवावे की पुढील वर्गात ढकलावे याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारने निर्णय घेतल्यास नापास विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे पाचवी किंवा आठवीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य राज्यांच्या हाती आहे.

 • दरम्यान यापूर्वी या विधेयकवर चर्चा सुरू असताना, केंद्राने राज्यांची मते मागितली होती. त्यावेळी २३ राज्यांनी परीक्षा घेणे, नापास करणे आणि विद्यार्थ्यांला आहे त्याच वर्गात बसवणे यासाठी संमती दर्शवली होती. मात्र महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगण, आंध ्रप्रदेश या राज्यांनी नापास करून आहे त्याच वर्गात बसवण्याच्या धोरणाला विरोध दर्शवला होता. शालेय शिक्षण विभागाचे यापूर्वीचे सचिव नंदकुमार यांच्या कार्यकाळात याबाबतची भूमिका राज्याने केंद्राकडे मांडली होती. या पाश्र्वभूमीवर आता कायद्यात बदल झाल्यानंतर राज्याचा शिक्षण विभाग याबाबत काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीव्ही पाहणं होणार स्वस्त, १०० चॅनेल्ससाठी मोजा १५३ रुपये :
 • नवी दिल्ली : टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) आदेशामुळे आता प्रेक्षकांना 100 पेड चॅनल्स प्रतिमहिना 153 रुपयांमध्ये पाहता येणार आहेत.

 • ट्रायने ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितले होते. त्यामुळे ही नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याबाबत माहितीदेखील दिली जात आहे.

 • ट्रायने जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. ट्रायच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एका एचडी चॅनेलची किंमत दोन एसडी चॅनेल्सइतकी आहे.

 • जर ग्राहकांना 100 हून जास्त चॅनेल्स हवे असतील तर, 25 चॅनेल्ससाठी 20 रुपये अधिक द्यावे लागतील. ट्रायचे नवे नियम 29 डिसेंबर 2018 पासून लागू होणार होते परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आले असून 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे. ट्रायच्या या नव्या नियमांमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत नाही, असा दावा ट्रायने केला आहे.

दिनविशेष :
 • भारतीय लष्कर दिन

महत्वाच्या घटना 

 • १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.

 • १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.

 • १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

 • १९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.

 • १९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.

 • १९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.

 • १९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म 

 • १९२०: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)

 • १९२१: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)

 • १९२६: भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)

 • १९२९: गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)

मृत्यू 

 • १९९४: गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

 • १९९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८९८)

 • २००२: राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन.

 • २०१३: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)

 • २०१४: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

टिप्पणी करा (Comment Below)