चालू घडामोडी - १५ जून २०१८

Date : 15 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'माझा'च्या न्यूजरुममध्ये जागतिक मल्लखांब दिन साजरा :
  • मुंबई: मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेला मल्लखांब आज दुसरा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करत आहे.

  • मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट्टदादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरांमध्ये पोचला आहे.

  • या खेळाचा आणखी प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून, गेल्या वर्षीपासून १५ जूनला मल्लखांब आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येत आहे. मल्लखांबधुरीणांच्या या प्रयत्नांना यंदा एबीपी माझाचीही साथ लाभली आहे.

  • जागतिक मल्लखांब संघटनेचे महासचिव उदय देशपांडे आणि श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या छोट्या मल्लखांबपटूंच्या साथीनं एबीपी माझाच्या न्यूजरुममध्ये मल्लखांब दिन साजरा होत आहे.

काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचं उल्लंघन - यूएन :
  • जिनिव्हा : भारताकडून काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून त्याच्या चौकशीची गरज असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) गुरुवारी दिला. मात्र हा अहवाल एकतर्फी असल्याचं सांगत भारताने सर्व आरोप फेटाळले आहेत.

  • मानवाधिकार परिषदेच्या पुढच्या आठवड्यात नव्या सत्रामध्ये चौकशी आयोगाची नियुक्ती करण्याबाबत विचार केला जाईल, असं संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त जायद बिन राड अल हुस्सैन यांनी म्हटलं आहे.

  • या आयोगाची नियुक्ती झाल्यास काश्मीरमध्ये मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनाची स्वतंत्र चौकशी केली जाईल. सीरियासारख्या युद्धग्रस्त भागामध्ये अशा प्रकारच्या आयोगांकडून चौकशी केली जाते.

  • काय आहे यूएनचा अहवाल - भारताने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केलं आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक मारले गेले, असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.

  • जुलै 2016 ते एप्रिल 2018 या काळातील परिस्थितीवर हा अहवाल आहे. या काळात तणाव वाढला आणि तेव्हापासूनच हे सुरक्षा बल वाढवण्यात आलं, असं अहवालात म्हटलं आहे.

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तिसऱ्या दिवशीही संपावर, रुग्णसेवेला फटका :
  • मुंबई : राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. बुधवारपासून इंटर्न डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी अशी प्रशिक्षणार्थींची प्रमुख मागणी आहे.

  • राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला आहे. सगळीकडे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पण प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यास अद्याप यश आलेलं नाही. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात खूप कमी विद्यावेतन दिलं जातं. सर्वच राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 15 ते 30 हजारांपर्यंत स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन दिलं जातं. मात्र महाराष्ट्रात सर्वात कमी 6 हजार रुपयेच प्रशिक्षणार्थींना दिले जातात.

  • मंगळवारी अस्मी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे बुधवारपासून त्यांनी संप पुकारला आहे. या संपात बीएमसी हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरही सहभागी असतील.

  • मुंबईत इंटर्न डॉक्टरांनी आपल्या मागण्यासाठी सायन रुग्णालयात काल गुरुवारी 6.30 वाजता कॅन्डल मार्च काढला.

बेळगावच्या स्केटिंगपटूची 'गिनीज बुक'मध्ये नोंद :
  • बेळगाव : बेळगावचा स्केटिंगपटू अभिषेक नवलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अभिषेकने 100 मीटर इनलाईन स्केटिंगमध्ये नोंदवलेल्या विक्रमी वेळेची दखल गिनीज बुकने घेतली.

  • अभिषेकने 100 मीटर इनलाईन स्केटिंगमध्ये 16.92 सेकंदाची वेळ नोंदवली होती. 26 फेब्रुवारी 2018 रोजी अभिषेकने हा विक्रम नोंदवला होता. नुकतंच त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे.

  • अभिषेक नवले आर. एन. शेट्टी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून तो स्केटिंगचं प्रशिक्षण घेत आहे.

  • अभिषेकला आई सुजाता आणि वडील संजय यांनी सुरुवातीपासूनच स्केटिंगसाठी प्रोत्साहन दिलं. त्याला उमेश कलघटगी, प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसणे, योगेश कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मिळालं आहे.

कोर्टापुढे हजर न झाल्याने मुशर्रफ यांना निवडणूकबंदी :
  • इस्लामाबाद - गेली दोन वर्षे दुबईत वास्तव्य करणारे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ कोर्टापुढे हजर न झाल्याने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने संसदेची १२ जुलै रोजी होणारी निवडणूक लढण्यास त्यांना आधी दिलेली मुभा गुरुवारी रद्द केली.

  • उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांना २०१३ मध्ये निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले. त्याविरुद्ध मुशर्रफ यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात आहे. संसदेची निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांच्या वकिलांनी बंदी तात्पुरती उठवून त्यांना निवडणूक लढवू द्यावी, अशी विनंती केली. सरन्यायाधीश मियाँ सादिब निसार यांच्या खंडपीठाने अशी अंतरिम मुभा दिली होती. ते आल्यास त्यांना अटक होणार नाही ही खात्रीही दिली. पण ते आले नाहीत.

  • त्यांनी आणखी वेळ मागितली. पण आदेशानुसार ते न आल्यामुळे निवडणूक लढविण्यास मुभा देणारा अंतरिम आदेश रद्द केला. यामुळे मुशर्रफ यांचा उमेदवारी अर्ज आता बाद होईल.

नेपाळचे पंतप्रधान चालले चीनच्या दौऱ्यावर :
  • बीजिंग- नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली पुढील आठवड्यात चीनच्या भेटीवर जाणार आहेत. यावेळेस ते चीन व नेपाळ विशेष आर्थिक क्षेत्राबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. हा प्रकल्र चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच एक भाग आहे.

  • खड्गप्रसाद ओली चीनमध्ये 19 ते 24 जून या पाच दिवसांसाठी असतील. या भेटीत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व इतर नेत्यांची भेट घेतील असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  • बेल्ट अँड रोड इनिशएटिव्हला भारताने गेल्या आठवड्यात शांघाय येथे झालेल्या एससीओ बैठकीमध्ये विरोध दर्शवला होता. मात्र रशिया, पाकिस्तान व इतर मध्यआशिय़ाई देशांनी त्यास पाठिंबा दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीस उपस्थित होते मात्र भारत या योजनेला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. या योजनेमुळे नेपाळवर भारताऐवजी चीनचा प्रभाव वाढिस लागण्याची शक्यता आहे.

  • नेपाळच्या पंतप्रधानपदी पुनर्निवड झाल्यानंतर ओली यांची ही पहिलीच चीनभेट आहे. या पदावरती पुन्हा आल्यानंतर ओली यांनी पहिली भेट भारताला देऊन भारत व चीन या दोन्ही देशांशीही समान संबंध ठेवू असे संकेत दिले होते. त्यांच्या भेटीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळला भेट दिली. यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध सामंजस्य करार करणे शक्य झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये जनकपूर ते अयोध्या अशा बसचा शुभारंभही केला होता.

कोणत्याही हिंसेला विकास हेच उत्तर- मोदी :
  • रायपूर: कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये केलं. यावेळी त्यांनी राज्यातील नक्षलवादाविषयी चिंता व्यक्त केली. नक्षलवाद हा विकासानंच दूर होऊ शकतो, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून विविध प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येत आहे. 

  • 'कोणत्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच उत्तर असू शकतं, असा विश्वास मला वाटतो. विकासामुळे निर्माण झालेल्या विश्वासामुळे सर्व प्रकारची हिंसा दूर सारली जाऊ शकते,' असं मोदींनी छत्तीसगडमध्ये आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना म्हटलं.

  • छत्तीसगडमध्ये वर्षाच्या अखेरीस निवडणूक होत आहे. छत्तीसगडमधील नक्षली कारवायांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना विकासाचं नक्षलवाद्याला उत्तर असू शकतं, असं मोदी म्हणाले. 

  • भाजपा सरकारमुळे लोकांचा छत्तीसगडकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला, असंही मोदी म्हणाले. 'छत्तीसगड आधी जंगल आणि आदिवासी लोकांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता ते नवीन रायपूरमधील स्मार्ट सिटीसाठी ओळखलं जातं,' असं पंतप्रधानांनी म्हटलं. दुर्गम भागातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारावा आणि आदिवासींच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं यावेळी मोदी म्हणाले. 

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय हवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.

  • १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

  • १९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

  • १९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

  • १९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

  • १९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

जन्म 

  • १८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)

  • १९०७: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)

  • १९२३: साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.

  • १९२७: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)

  • १९२९: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

  • १९३३: लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)

  • १९३७: लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५३४: योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)

  • १९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.

  • १९७९: कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९२६)

  • १९८३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.