चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जून २०१९

Date : 15 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फोर्ब्सच्या यादीत ५७ भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स ७१ व्या क्रमांकावर :
  • जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.

  • फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.

  • पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या यादीत टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एल अँड टी, भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसीला पहिल्या 500 कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे.

  • तर 2000 कंपन्यांच्या यादीत टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक महिंद्रा बँक, भारत पेट्रोलियम, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पावर ग्रिड, हिंदाल्को, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, गेल, पंजाब नेशनल बँक, ग्रासिम, बँक ऑफ बडोदा, पावर फायनॅन्स आणि कॅनरा बँकेचा समावेश आहे.

बिहार सरकारची वृद्धांसाठी नवी पेन्शन योजना :
  • बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील पेन्शन दिले जाणार आहे.

  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. १ एप्रिल २०१९ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत ६० वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक ४०० रूपये पेन्शन तर ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्याना ५०० रूपये प्रति महिना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • या योजनेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, या योजनेसाठी राज्य सरकारने १८ हजार कोटी रूपयांचा विशेष निधी तयार केला आहे. आम्ही गरीब वृद्धांचा आदर व सन्मान करणार आहोत. आतापर्यंत जवळपास दोन लाख जणांनी या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, तर ३५ ते ३६ लाखांपर्यंत अर्जाचा आकडा जाईल अशी सरकारला अपेक्षा आहे.

मोदींकडून पाकिस्तान लक्ष्य :
  • दहशतवादाला खतपाणी घालून त्यासाठी  आर्थिक मदत करणाऱ्या देशांना दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरवले गेले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ)  या संघटनेच्या शिखर बैठकीत मोदी यांनी शुक्रवारी या संघटनेची उद्दिष्टे व आदर्श यांवर भर देताना दहशतवादाचा मुकाबला करण्यात सहकार्य वाढवण्याच्या मुद्दय़ाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

  • दहशतवादमुक्त समाजाचे भारत समर्थन करतो, असे सांगून मोदी म्हणाले,की गेल्या आठवडय़ात आपण श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला झालेल्या सेंट अँटनी चर्चला भेट दिली. तेथे दहशतवादाचा उग्र चेहरा सामोरा आला. जगात सगळीकडेच निरपराध लोक दहशतवादास बळी पडत आहेत.

  • दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी विविध देशांनी त्यांच्या संकुचित मनोवृत्तीतून बाहेर पडून काम केले पाहिजे, असा टोला त्यांनी तेथे उपस्थित असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना अप्रत्यक्षपणे लगावला. जे देश दहशतवादाला खतपाणी घालून निधी पुरवतात त्यांना उत्तरदायी ठरवले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

  • ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या सदस्य देशांतील स्थिरता व सुरक्षेसाठी अफगाणिस्तानची सुरक्षितता व भरभराट महत्त्वाची आहे, असे मोदी यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील लोक व तेथील सरकार यांना भारताचा खंबीर पाठिंबा आहे.

  • शांघाय सहकार्य परिषदेनेही अफगाणिस्तान संपर्क गटाच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. या संघटनेच्या सर्वच कामांमध्ये भारताने सकारात्मक भूमिका पार पाडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी यांचे गुरूवारी किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आगमन झाले.

आयआयटी जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला :
  • मुंबई : देशपातळीवर अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयआयटी जेईई परीक्षेचा निकाल लागला आहे. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने 100 पर्सेंटाईल गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

  • यंदा जेईईमध्ये पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. 27 मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. यात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ताने 100 पर्सेंटाईल गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कार्तिकेय हा मूळचा चंद्रपूरचा असून मुंबईत तो जेईईची तयारी करत होता.

  • दोन वर्ष मी स्मार्ट फोनपासून दूर राहून नियमित अभ्यास केला आणि त्यामुळेच हे यश मिळाल असल्याचा कार्तिकेयने सांगितलं आहे. आयआयटी मुंबईत कॉम्प्यूटर सायन्सला कार्तिकेयला प्रवेश घ्यायचा आहे.

  • त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. तर  शबनम सहाय ही मुलींमध्ये प्रथम आली असून तिला 372 पैकी 308 गुण मिळाले आहेत.

  • या परीक्षेत पहिला आणि दुसरा पेपर देणाऱ्या एकूण 1,61,319 विद्यार्थ्यांपैकी 38,705 परीक्षार्थी पास झाले आहेत. यामध्ये 5,356 विद्यार्थीनींचा समावेश आहे.

आखातातील हल्ल्यांनंतर तेलाच्या दरात वाढ :
  • ओमानच्या आखातात तेल टँकरवर हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला असून जगात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेलाच्या किमती ४.५ टक्के वाढल्याने तेल कंपन्यांच्या शेअरचे भावही वधारले. अमेरिकेने दिलेले व्याज दरात कपातीचे संकेतही याला कारणीभूत आहेत.

  • ओमानचे आखात हे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दुसऱ्या टोकाला असून तेल वाहतुकीचा तो एक प्रमुख मार्ग आहे. रोज १५ दशलक्ष पिंप तेलाची वाहतूक या मार्गाने होत असते. त्याशिवाय इतर पदार्थाचीही आयात होते.

  • पश्चिम टेक्सासमध्ये तेलाचे भाव २.२ टक्के वाढले आहेत. तर, तेल टँकरवरील  हल्ल्यांमुळे तेलाच्या किमती वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे असे ब्रिटनच्या अल्फा एनर्जीचे अध्यक्ष जॉन हॉल यांनी सांगितले. युरेशिया समूहाने म्हटले आहे, की आखातातील तेल वाहतूक धोक्यात आणण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. वॉल स्ट्रीट येथे पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले आहेत.

  • दरम्यान, ओमानच्या आखातात दोन तेल टँकर पेटवून दिल्याच्या घटनेत इराण सामील असल्याचा अमेरिकेचा आरोप निराधार आहे, असे इराणने म्हटले आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय हवा दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथमच जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले.

  • १८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

  • १८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

  • १९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

  • १९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

  • १९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.

  • १९९४: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

  • २००१: ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.

  • २००८: लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्म 

  • १८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)

  • १८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट१९८६)

  • १९०७: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)

  • १९१७: संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)

  • १९२३: साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.

  • १९२७: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)

  • १९२८: साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म.

  • १९२९: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

  • १९३२: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१३)

  • १९३३: लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)

  • १९३७: लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म.

  • १९४७: साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५३४: योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)

  • १९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.

  • १९७९: कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९२६)

  • १९८३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.