चालू घडामोडी - १५ मे २०१८

Date : 15 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतात भरपूर गुंतवणूक करा, चीनचे आवाहन :
  • बीजिंग : सुवर्ण भरारी घेण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत भरपूर गुंतवणूक करा, असे आवाहन चीनी नागरिकांना चीनच्या सरकारी मालकीची बँक द इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायनाने केले आहे. हे आवाहन करताना बँकेने चीनचा पहिला फक्त भारतासाठी सार्वजनिक गुंतवणुकीचा निधी (फंड) सुरू केला आहे.

  • अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची वुहान येथे अनौपचारिक भेट झाली होती. भेटीत उभय नेत्यांनी आपापल्या आर्थिक क्षमतांना नव्या दिशा देण्यासाठी द्विपक्षीय संबंधांचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता.

  • त्यानंतर भारतात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वरील लक्षणीय पुढाकार घेतला गेला, असे निरीक्षकांचे मत आहे. या गुंतवणूक निधीचे नाव इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक क्रेडिट सुस्सी इंडिया मार्केट फंड असे आहे.

  • युरोप व अमेरिकेत नोंदणीकृत व भारतीय बाजारपेठेवर आधारित असलेल्या २० पेक्षा जास्त एक्स्चेंजेसमध्ये बँक गुंतवणूक करील. भारतात गुंतवणुकीसाठी चीनचा हा पहिलाच जाहीर झालेला फंड आहे, असे ग्लोबल टाइम्स दैनिकाने म्हटले. ही गुंतवणूक प्राधान्याने आर्थिक उद्योगात, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, आवश्यक वस्तू, कच्चा माल, औषधी, हेल्थ केअर व इतर उद्योगांत केली जाईल. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०१८ Live: जेडीएस किंगमेकर ठरणार :
  • कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live Update: कर्नाटक विधानसभेवर कुणाचा झेंडा हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.  कर्नाटकच्या 224 सदस्य असलेल्या विधानसभेच्या 222 जागांसाठी 12 मे रोजी 72.13 टक्के मतदान झालं.

  • आर आर नगर मतदारसंघात मतदानाचा गोंधळ झाल्यामुळे मतदान स्थगित झालं, तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचं निधन झाल्यामुळे इथे मतदानच झालं नाही. त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघाचा निकाल येणार नाही.

  • उर्वरित 222 जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकत? कर्नाटक विधानसभेची सत्ता कोण काबिज करतं हे आज स्पष्ट होईल.

  • एबीपी माझावर या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून पाहू शकता. यामध्ये सुपरफास्ट निकालासोबत तज्ज्ञांचं विश्लेषणही असणार आहे.

कर्नाटक जिंकल्यास २१ राज्यांवर एनडीएचा झेंडा :
  • बंगळुरु : कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात होत असलेली विधानसभा निवडणूक 2019 च्या लोकसभा निवडणुकीची क्वार्टर फायनल मानली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात सहा दिवसात 21 सभा घेतल्या, तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या 27 सभा आणि रॅली झाल्या.

  • पंतप्रधान मोदी आणि भाजपसाठी दक्षिण भारतातील ही निवडणूक मोठी परीक्षा आहे. कर्नाटकात भाजप 2008 ते 2013 या काळात सत्तेत होती. दक्षिण भारतात पहिल्यांदाच कमळ फुलवणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनीही मैदानात उतरत जोरदार प्रचार केला.

  • भाजपने कर्नाटकात विजय मिळवल्यास 2019 चा मार्ग सुकर होईल. शिवाय या विजयासोबतच 21 राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएचं सरकार असेल. भाजप जिंकल्यास पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब होईल, की मोदी लाट कायम आहे.

  • कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी सहा दिवसात 21 रॅली आणि सभा घेतल्या, तर पाच वेळा नमो अॅपवरुन कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या अॅपच्या माध्यमातून 25 लाख लोकांसोबत संवाद साधला, असा भाजपचा दावा आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी मोदींनी सहा दिवस दिले असले, तरी अमित शाह गेल्या सहा महिन्यांपासून कर्नाकटवर लक्ष ठेवून आहेत.

ICSE, ISC २०१८ निकाल : मुंबई-पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी :
  • मुंबई : आयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. बारावीत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती आणि तानसा शाह देशात पहिला आले, तर दहावीच्या परीक्षेत नवी मुंबईच्या स्वयम दासने बाजी मारली.

  • आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुंबई-नवी मुंबई आणि पुण्याच्या विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. बारावीमध्ये मुंबईतील लीलावतीबाई पोदार हायस्कूलचा विद्यार्थी अभिज्ञान चक्रवर्ती आणि मुंबईच्याच कॅथेड्रल अँड जॉन कॅनन शाळेची विद्यार्थिनी तानसा शाह देशात पहिले आले.

  • पोदार हायस्कूलच्या प्रिया खजांची आणि रक्षिता देशमुख आणि पुण्याच्या बिशप्स स्कूलची रितीशा गुप्ता देशात दुसऱ्या आल्या.

  • दहावीत नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या सेंट मेरी स्कूलमधील स्वयम दास 99.4 टक्के गुण मिळवून देशात पहिला आला. नरसी मोनजी स्कूलची अनोखी मेहता देशात दुसऱ्या क्रमांकावर आली.

  • cisce.org किंवा examresults.net या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.

  • आयसीएसई बोर्डाअंतर्गत बारावीच्या परीक्षेला 10.88 लाख विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 96.21 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 98.5 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

२ कोटी शालेय विद्यार्थ्यांना विमा संरक्षण, तावडेंची घोषणा :
  • कोल्हापूर: राज्यातल्या दोन कोटी विद्यार्थांचा विमा उतरवून विद्यार्थी आणि पालकांना संरक्षण देणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

  • या विम्याद्वारे आई वडीलांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षण थांबवावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा संरक्षणामुळे अशा विद्यार्थ्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

  • नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

  • इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापणार : तावडे सतत परीक्षेत अपयश येणार्‍यांच्या माथी नापासाचा शिक्‍का लागू नये, म्हणून त्या विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिक्षण देण्याचा विचार सुरु आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात केवळ पुस्तकी आणि कालबाह्य शिक्षणाऐवजी मुलांना जीवन उपयोगी शिक्षण दिले जाईल, असं तावडे यांनी सांगितलं.

पीयूष गोयल हंगामी अर्थमंत्री; स्मृती इराणींची पुन्हा उचलबांगडी, राज्यवर्धन राठोड नवे माहिती व प्रसारण मंत्री :
  • नवी दिल्ली: मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सोमवारी संध्याकाळी मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलांमध्ये स्मृती इराणींना मोठा झटका बसला असून पीयूष गोयल यांना केंद्रीय अर्थमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. स्मृती इराणी यांच्याकडून माहिती व प्रसारण खात्याची सूत्रे काढून ती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे देण्यात आली आहेत.

  • त्यामुळे आता स्मृती इराणींकडे आता केवळ वस्त्रोद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते उरले आहे. तर दुसरीकडे अरूण जेटली यांच्यावर किडनीरोपण शस्त्रक्रिया झाल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या अशा अर्थखात्याचा कारभार पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या पीयषू गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. या नव्या जबाबदारीमुळे गोयल यांचे संघटनेतील राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे.

  • याशिवाय, केंद्रीय जल व स्वच्छता मंत्री एस.एस. अहुवालिया यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

  • मंत्रिमंडळातले फेरबदल हा स्मृती इराणींसाठी मोठा झटका आहे. कारण याआधीही त्यांच्याकडे असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयही काढून घेण्यात आले. आता त्यांच्याकडे माहिती प्रसारण खाते काढूनही इराणी या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

दिनविशेष :
  • भारतीय वृक्ष दिन

महत्वाच्या घटना

  • १७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

  • १७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

  • १९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.

  • १९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.

  • १९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

जन्म

  • १८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)

  • १८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

  • १९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)

  • १९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

  • १९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.

मृत्यू

  • १३५०: संत जनाबाई यांचे निधन.

  • १९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी१८९९)

  • १९९४: जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.

  • १९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.

  • २००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.