चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ मे २०१९

Date : 15 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तेलआयातीचा निर्णय नव्या सरकारकडून :
  • इराणकडून तेल आयात करण्याबाबतचा मुद्दा निवडणुकीनंतरचे सरकार हाताळील, असे भारताच्या वतीने मंगळवारी इराणला सांगण्यात आले. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने नुकतीच इराणकडून होणारी तेलआयात पूर्णपणे थांबवली आहे.

  • अर्थात तेलआयातीचा हा निर्णय व्यावसायिक आणि आर्थिक हित लक्षात घेऊनच होईल, असेही भारताने स्पष्ट केले आहे. मात्र नव्या सरकारवर या पद्धतीने प्रथमच जबाबदारी टाकली जात आहे.

  • इराणचे परराष्ट्रमंत्री महम्मद जवाद ज़्‍ारीफ यांच्याशी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी चर्चा केली. त्या चर्चेत हा सावध पवित्रा घेतला गेला. ज़्‍ारीफ यांनी रशिया, चीन, तुर्कमेनिस्तान आणि इराकलाही भेट देऊन चर्चा केली आहे. अमेरिका आणि इराणमधील विकोपाला गेलेले संबंध आणि अमेरिकेच्या दबावामुळे भारतासह अन्य आठ देशांनी थांबवलेली तेलआयात या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा सुरू आहे.

  • इराणकडून तेल घेणारा भारत हा चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी ८५ टक्के तेल आणि ३४ टक्के नैसर्गिक वायू इंधन आयात केले जाते. मात्र अमेरिकेच्या दबावानंतर भारताला गेल्या काही महिन्यांत इराणकडून होणारी तेल आयात कमी करावी लागली होती.

  • स्वराज यांनी उभयपक्षी चर्चेत सांगितले की, इराण आणि अमेरिकेतील पेच हा संवादाच्या मार्गाने सुटावा, अशी आमची इच्छा आहे. अफगाणिस्तान प्रश्नावरही उभय नेत्यांमध्ये बोलणी झाली. ही बोलणी सकारात्मक आणि उत्साहवर्धक होती, असे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण, विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती :
  • मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात बाजू मांडण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे. तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • सरकारी वकील म्हणून आम्हाला उज्ज्वल निकम नको तर प्रदीप घरत यांची नियुक्ती करावी अशी मागणी बिद्रे कुटुंबीयांनी केली होती. 19 नोव्हेंबर 2018 रोजी बिद्रे कुटुंबियांना शासनाकडे आणि कोर्टाकडे ही मागणी केली होती

  • प्रदीप घरत यांच्या कारकिर्दीतील महत्वाचे खटले - अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणात सरकारच्या वतीनं प्रदीप घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर पत्रकार जे डे हत्याकांडातील आरोपी छोटा राजनला प्रदेशातून आणून शिक्षा लावली आहे.

  • बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या खटल्याला गती देण्याची विनंती केली होती. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर प्रकरणाचा खटला एका वर्षात निकाली काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

१९९८ मधील मे सर्वाधिक ‘हॉट’; यंदाचा ‘एप्रिल हीट’ २० वर्षांतील सर्वोच्च :
  • अमरावती : यंदाचा एप्रिल महिना २० वर्षांतील सर्वाधिक हॉट राहिला. यापूर्वी १९९८ मध्ये २० ते २८ मे दरम्यान ४६ ते ४७.५ अंश सेल्सिअस तापमान हे आजवरचे सर्वाधिक राहिले आहे. यावर्षीदेखील १५ मे नंतर उष्णतेची लाट राहण्याची शक्यात असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली

  • मे महिन्यातील तापमानाचा विचार करता, १९९८, २००९ आणि २०१३ या तीन वर्षांमध्ये कमाल तापमानाची ४७ अंशाच्या वर नोंद झाली. आतापर्यत १९९९, २००१, २००२, २००५, २००९, २०१०, २०१५ व २०१८ अशा सात वेळा मे महिन्यात कमाल तापमान ४६ अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले आहे, तर २०००, २००४, २००७, २००८ व २०१८ या चार वर्षांमध्ये तुलनात्मकरीत्या कमी तापमान होते. २००४, २००७, २००८ व २०११ या चार वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ३८ ते ४२ अंशापर्यत तापमान राहिले आहे.

  • मागील २० वर्षांचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, साधारणत: मे महिन्याच्या पंधरवड्यात दुसऱ्या उष्णतेची लाट असते. आणि कमाल तापमान ४५ ते ४६ अंशापर्यंत राहिले आहे. काही वेळा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ४७ अंशापर्यंत गेलेले आहे.

  • यावर्षीसुद्धा १५ ते ३१ मे दरम्यान एखादी तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज असल्याचे बंड यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल ३०० रणगाडे तैनात :
  • भारतीय हवाई दलाने चढवलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, पाकिस्तान आजही सावध असून एकीकडे तणाव कमी करण्याचे सोंग रचत महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केलेले आहेत. 

  • 14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते. नुकतेच तणाव कमी करण्यासाठी हे दल मागे घेतले असले तरीही पाकिस्तानने सीमेवर अद्याप तीन ब्रिगेड ठेवलेली आहेत. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, 125 बख्तरबंद ब्रिगेड आणि 8-15 डिव्हिजन तैनात केलेल्या आहेत. 

  • टाइम्स नाऊमधील रिपोर्टअनुसार पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्याला एक स्वतंत्र बख्तरबंद ब्रिगेड साथ देत आहे. या अहवालामध्ये सरकारी सुत्रांचा हवाला देण्यात आला आहे. हे सैन्य आक्रमक हल्ल्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर या सैन्याची तैनाती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

  • जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जम्मू-श्रीनगर राज्यमार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पाकिस्तानने आक्रमक दल 1 आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नव्हते. यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाडे चिंतेचा विषय बनले आहेत. 

#MeToo नंतर आता #SexStrike : जाचक कायद्याविरोधात 'सोशल' मोहीम :
  • जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या 'मी टू' प्रकरणानंतर आता हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गर्भपातासंबंधी कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे. एलिसाने यासाठी जगभरातील महिलांना 'सेक्स स्ट्राइक' करण्याचे आवाहन केले आहे.

  • त्यामुळे पुन्हा एकदा एलिना मिलानो आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे. एलिनाच्या या अभियानाला काही लोकांचं समर्थन मिळत आहे तर काही लोक यावर जोरदार टिका करत आहेत. 

  • ...तोपर्यंत शारीरिक संबंध टाळा एलिसाने #MeToo या अभियानाला सुरूवात केली होती, त्यानंतर जगभरातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना जगासमोर मांडले होते. आता तिने गर्भपातासंबंधी वेगवेगळ्या आणि कठोर कायद्यांना विरोध करण्यास सांगितले असून या विरोधात एकत्र येण्याचे तिने महिलांना आवाहन केले आहे.

  • कारण या कायद्यांमुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली की, जोपर्यंत आपल्याला आपल्या शरीरावर पूर्णपणे अधिकार मिळत नाही, तोपर्यंत जोडादारासोबत शारीरिक संबंध ठेवू नका.

उत्तम दर्जाच्या दारूगोळ्याचा पुरवठा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हस्तक्षेप करावा :
  • ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डकडून (ओएफबी) लष्कराला पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या दारूगोळ्यामुळे तोफखाना, रणगाडे यांच्या अपघातांचे प्रमाण वाढत असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

  • संरक्षण उत्पादन सचिव अजयकुमार यांच्यासमोरही सदर  प्रश्न उपस्थित करण्यात आला असून निकृष्ट दर्जाच्या दारूगोळ्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाच्या शस्त्रांचे नुकसान झाले आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

  • लष्कराने विनंती केल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने या प्रश्नामध्ये लक्ष घातले असता ओएफबी दारूगोळ्याच्या दर्जामध्ये सुधारणा करण्याबाबत सक्रिय नसल्याचे आढळले, असे सूत्रांनी सांगितले. देशामध्ये ४१ ऑर्डिनन्स कारखाने असून त्यांचा कारभार संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाखाली चालतो.

  • तथापि, दारूगोळ्याची तपासणी करून पूर्ण खात्री केल्याविना आम्ही तो जवानांच्या हातात देतच नाही, अशी भूमिका ओएफबीने घेतली आहे. प्रयोगशाळेमध्ये सर्व साहित्याची चाचणी घेण्यात येते आणि जवानांना त्याचा पुरवठा करण्यापूर्वीही विशिष्ट चाचण्या केल्या जातात, असेही ओएफबीचे म्हणणे आहे.

  • टी-७२ आणि टी-९० बंदुका, १०५ एमएम इंडियन फील्ड गन्स, १०५ एमएम लाइट फील्ड गन्स, १३० एमएम एमए१ मध्यम बंदुका आणि ४० एमएम एल-७० यांचे निकृष्ट दारूगोळ्यामुळे अपघात झाल्याचा अहवाल लष्कराने मंत्रालयास सादर केला आहे. निकृष्ट दारूगोळ्यामुळे लष्करातील अनेक जवान जखमी झाल्याची उदाहरणेही अहवालामध्ये देण्यात आली आहे.

दिनविशेष :
  • भारतीय वृक्ष दिन

महत्वाच्या घटना 

  • १७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

  • १७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

  • १८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

  • १९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

  • १९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

  • १९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे मॅक्डोनाल्डस (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.

  • १९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.

  • १९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

जन्म 

  • १८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)

  • १८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

  • १९०३: साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)

  • १९०७: क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

  • १९६७: अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३५०: संत जनाबाई यांचे निधन.

  • १७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

  • १९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी१८९९)

  • १९९४: जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचे निधन.

  • १९९४: चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.

  • २००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.