चालू घडामोडी - १५ नोव्हेंबर २०१८

Updated On : Nov 15, 2018 | Category : Current Affairsमहिला ट्वेन्टी २० विश्वचषक - वेध उपांत्य फेरीचे :
 • मुंबई : हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील तिसरा साखळी सामना आज आयर्लंडशी होणार आहे. सामन्यात भारतीय महिलांचं पारडं जड मानलं जात आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न राहिल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री साडे आठ वाजता सुरु होईल.

 • ट्वेन्टी ट्वेन्टीच्या दुनियेत भारतीय संघ हा बलाढ्य मानला जात नाही. पण भारतानं विश्वचषकातील गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

 • भारतीय महिलांनी टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 34 धावांनी पराभव करून, टी20 त आपली वाढलेली ताकद दाखवून दिली. या सामन्यात हरमनप्रीतनं अवघ्या 51 चेंडूंत 103 धावांची, तर जेमिमा रॉड्रिग्सनं 45 चेंडूंत 59 धावांची खेळी उभारली.

 • विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. या सामन्यात भारतीय महिला संघाने 7 विकेट्स आणि 6 चेंडू राखत विजय मिळवला. मिताली राजने शानदार 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले.

देशातील पहिली विनाइंजिन टी-१८ रेल्वे तयार :
 • नवी दिल्ली : देशातील पहिली विनाइंजिन टी-18 रेल्वे तयार झाली आहे. दीड महिन्याच्या चाचणी नंतर टी-18 रेल्वे रुळावर धावणार असल्याची माहिती मिळत आहे. शताब्दी ट्रेनला पर्यायी टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असणार आहे ज्यात इंजिन नसेल. या रेल्वेचे कोच हे सेल्फ पॉवर्ड असणार आहेत.

 • टी-18 रेल्वे ही देशातील पहिली रेल्वे असेल जी युरोपियन रेल्वेना टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर आज माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी टी-18 ट्रेन आली होती. या ट्रेनचा बाहेरील लूक माध्यमांना दाखवण्यात आला.

 • भारतीय रेल्वे नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे. तसेच आम्ही युरोपियन दर्जा प्राप्त करु, असे रेल्वे अधिकारी राजेश अग्रवाल म्हणाले. आतापर्यंत रेल्वेचे डब्बे जुन्या तंत्रज्ञानावर आधारित होते. या रेल्वे सेटमध्ये डिस्ट्रीब्यूटर पॉवर असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

तब्बल ३६३ कोटी रुपयांना विकला गेला हा दुर्मीळ हिरा :
 • नवी दिल्ली - स्वीत्झर्लंडमध्ये झालेल्या एका लिलावामध्ये 19 कॅरेटचा दुर्मीळ गुलाबी हिरा तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला. स्वीत्झर्लंडमधी ल जिनेव्हा येथे मंगळवारी या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनने हा लिलाव केला. या लिलावामध्ये प्रसिद्ध जवाहिर हॅरी विन्स्टन यांनी 5 कोटी डॉलर (सुमारे 363 कोटी रुपये) एवढी बोली लावून हा हिरा खरेदी केला. याबरोबरच हा हिरा आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरला आहे. 

 •  गतवर्षी 15 कॅरेटच्या एका गुलाबी हिऱ्याला हाँगकाँगमध्ये झालेल्या लिलावात सुमारे 3 कोटी 25 लाख डॉलर एवढी किंमत मिळाली होती. त्यावेळी या हिऱ्यासाठी 21 लाख 76 हजार डॉलर प्रति कॅरेट एवढी विक्रमी बोली लागली होती. हा हिरा 100 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेमधील एका खाणीमध्ये  सापडला होता.

 •  ब्रिटिश ऑक्शन हाऊस ख्रिस्टियनच्या ज्वेलरी विभागाचे प्रमुख राहुल कदाकिया यांनी हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. सुरुवातीला हा हिरा ओपनहायमर कुटुंबीयांकडे होता. त्यांनी अनेक वर्षांपर्यंत डी. बीयर्स डायमंड मायनिंग कंपनीचे संचालन केले होते. यापूर्वी 19 कॅरेटच्या पिंक हिऱ्याची कधीही विक्री झालेली नाही. आतापर्यंत 10 कॅरेटहून अधिक कॅरेटच्या केवळ चार पिंक हिऱ्यांची विक्री झालेली आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना झटका; पंतप्रधान राजपक्षेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर :
 • कोलंबो: सर्वोच्च न्यायालयानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संसदेनं नवनियुक्त पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर आज मतदान झालं. यामुळे सिरिसेना यांना मोठा झटका बसला आहे. 

 • पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाला संसदेनं मंजुरी दिल्याची घोषणा सभापती कारु जयसूर्या यांनी केली. 'सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. त्यावर आवाजी मतदान घेण्यात आलं. त्यात संसदेनं सरकारविरोधात मतदान केलं. त्यावेळी राजपक्षे समर्थक संसदेबाहेर घोषणाबाजी करत होते. सरकारविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे,' असं जयसूर्या यांनी सांगितलं.  

 • काल राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला होता. संसद भंग करण्याचा सिरिसेना यांच्या आदेशाविरोधात न्यायालयानं निकाल दिला.

 • सिरिसेना यांच्याकडून सुरू असलेल्या निवडणुकीच्या तयारीलादेखील न्यायालयानं ब्रेक लावला. सिरिसेना यांनी 26 ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरुन हटवलं. यानंतर त्यांनी राजपक्षे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.

तामिळनाडूला धडकणार ‘गज’, अतिदक्षतेचा इशारा :
 • बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘गज’ चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ आज तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

 • चेन्नईसह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. त्याधर्तीवर भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गजचे आज तीव्र चक्रीवादळात (सिव्हिअर सायक्लोन) रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. आज दुपारी तामिळनाडूमधील कुड्डलूर आणि पम्बन यांच्यादरम्यान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

 • दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. २ महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता मोठी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 • गज वादळ ताशी १२ ते १५ किमी वेगाने तामिळनाडू व आंध्रकडे सरकत आहे. चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे हवान विभागाच्या अंदाजानुसार, गज या चक्रिवादाळामुळे महाराष्ट्राच्य़ा काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मोदी- पेन्स यांच्यात व्यापक चर्चा :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यात बुधारी संरक्षण आणि व्यापारातील सहकार्यासह व्यापक द्विपक्षीय तसेच परस्पर हिताच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. दहशतवादाचा सामना करण्याचे उपाय आणि भारत- पॅसिफिक क्षेत्र मुक्त व खुले ठेवण्याच्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.

 • येथे झालेल्या पूर्व आशिया परिषदेच्या (ईस्ट एशिया समिट) निमित्ताने दोन्ही नेत्यांची सौहार्दपूर्ण भेट झाली. प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांबाबत वाढत्या सहकार्यावर आधारित महत्त्वपूर्ण भागीदारीच्या सर्व मुद्दय़ांवर दोघांचीही उपयुक्त चर्चा झाली, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

 • मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला २६ नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचा संदर्भ देऊन पेन्स यांनी दहशतवादाला तोंड देण्याबाबत दोन्ही देशांच्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला, असे परराष्ट्र  सचिव विजय गोखले यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.मोदी यांनी पेन्स यांचे आभार मानतानाच, जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे मूळ आणि त्यांचे उगमाचे ठिकाण एकच असल्याची कुठल्याही देशाचे किंवा संघटनेचे नाव न घेता आठवण करून दिली.

 • व्यापाराशी संबंधित द्विपक्षीय मुद्दय़ांवरही दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गेल्या दोन वर्षांत अमेरिकेची भारतातील आयात ५० टक्क्यांनी वाढली आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

 • १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.

 • १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.

 • १९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.

 • १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.

 • १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.

 • २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

जन्म 

 • १७३८: जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)

 • १८७५: झारखंड मधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९००)

 • १८८५: आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)

 • १८९१: जर्मन सेनापती एर्विन रोमेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४४)

 • १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू:  २४ ऑक्टोबर १९७९)

 • १९१७: संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ डी. डी यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)

 • १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)

 • १९२७: आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खाँ यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)

 • १९२९: कवयित्री शिरीष पै यांचा जन्म.

 • १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)

 • १९४८: कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००३)

 • १९८६: लॉन टेनिस खेळाडू सानिया मिर्झा यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६३०: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान केपलर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १५७१)

 • १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)

 • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१०)

 • १९४९: महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी नारायण दत्तात्रय आपटे यांचे निधन.

 • १९८२: भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर१८९५)

 • १९९६: कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माधवराव सूर्याजी पवार यांचे निधन.

 • २०१२: केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कृष्ण चंद्र पंत यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३१)

टिप्पणी करा (Comment Below)