चालू घडामोडी - १५ ऑक्टोबर २०१८

Date : 15 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यूपीतील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार :
  • लखनऊ | उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहराचं नाव आता प्रयागराज होणार आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज नव्या नावाची घोषणा केली आहे. दसऱ्यापूर्वी नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

  • गंगा, यमुना आणि सरस्वती अशा त्रिवेणी संगमावर वसलेल्या या शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. 1553 सालापूर्वी या शहराचं नाव प्रयाग हेच होतं. पण त्यानंतर अकबराने या शहराचं नाव अलाहाबाद ठेवलं. अलाह याचा अर्थ अकबराने सुरु केलेल्या दान-धर्माशी संबंधित आहे. अलाहाबाद म्हणजेच ईश्वराने वसवलेलं गाव.

  • याआधी मायावती सत्तेत असतानाही यूपीतील अनेक शहरांचं नामकरण झालं.  नोएडाचं नामकारण गौतमबुद्ध नगर झालं तर, भदोईचं नामकरण संत रविदास नगर करण्यात आलं. फैजाबाद जिल्ह्याचं विभाजन करुन आंबेडकर नगर जिल्हा तयार झाला. तसंच खलिलाबादचं संत कबीर नगर असं नामांतर झालं होतं.

  • प्रयाग हे महाकुंभ भरणारं पहिलं महत्त्वाचं स्थान आहे. दर 12 वर्षांनी इथे महाकुंभमेळा भरतो.योगींच्या राज्यातही यापूर्वी मुघलसराय शहराचं नामकरण दीनदयाल उपाध्याय नगर असं करण्यात आलं आहे.

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे : एम. जे. अकबर :
  • नवी दिल्ली : देशाचे परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांनी आपल्यावर लागलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोंपावर मौन सोडलं आहे. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. तसेच आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा एमजे अकबर यांनी दिला आहे.

  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप झाले आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने माझ्यावर हे आरोप केल्याचा आरोप अकबर यांनी केला. एमजे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्यावेळी ते नायजेरियाच्या दौऱ्यावर होते. मात्र आरोपांमध्ये अडकल्यानंतर त्यांना सरकारने दौरा आटोपून भारतात परत येण्याचे आदेश दिले होते. आज ते भारतात परतले त्यावेळी त्यांनी आपली बाजू मांडत, सर्व आरोपांचं खंडन केलं.

  • अकबर यांच्यावरील आरोपांची भाजपने दखल घेतली आहे. अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असं कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्षांनीही अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

  • लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांना सरकारने नायजेरिया दौरा आटोपून भारतात परत येण्याचे आदेश दिले होते.

पृथ्वी शॉ ठरला मॅन ऑफ द सीरिज, या 'खास' यादीत समावेश :
  • हैदराबाद : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा दहा विकेट्सने धुव्वा उडवला. या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पृथ्वी शॉ या युवा खेळाडूनं आपल्या फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. पृथ्वी शॉचं लागोपाठ दुसऱ्या कसोटी डावात शतक झळकावण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. पण या मुंबईकर फलंदाजानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.

  • या मालिकेत 'मॅन ऑफ द सीरिज'चा किताब पृथ्वी शॉला बहाल करण्यात आला. पहिल्या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सीरिजचा किताब पटकावणारा पृथ्वी भारताचा चौथा तर जगातील दहावा खेळाडू ठरला आहे.

  • दोन कसोटी सामन्यांमधल्या तीन डावांमध्ये मिळून 118.50च्या सरासरीनं 237 धावांचा रतीब घातला. पृथ्वीनं राजकोट कसोटीत पदार्पणात 134 धावांची खेळी उभारली होती. हैदराबाद कसोटीत त्यानं 70 आणि नाबाद 33 धावांच्या खेळी केल्या.

  • याशिवाय वेस्ट इंडिज विरुद्ध भारतात खेळल्या गेलेल्या मागीत तीन मालिकांमध्ये कसोटीत पदार्पण केलेले खेळाडू मॅन ऑफ सीरिज बनले आहेत. 2011मध्ये आर अश्विन आणि 2013मध्ये रोहित शर्मा आणि आता पृथ्वी शॉ पदार्पणाच्या मालिकेत मॅन ऑफ द सीरिज ठरले.

भारतातील ‘डाटा लोकेशन’ला अमेरिकेचा विरोध :
  • वॉशिंग्टन : भारतातील आर्थिक व्यवहारांचा पेमेंट सिस्टीमशी संबंधित सर्व डाटा भारतातच संग्रहित करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशांची अंमलबजावणी उंबरठ्यावर आलेली असतानाच अमेरिकेने ‘डाटा लोकेशन’ संकल्पनेला विरोध केला आहे.

  • ज्या देशात डाटा निर्माण होतो, त्याची साठवणूक त्याच देशात करण्याच्या पद्धतीला ‘डाटा लोकेशन’ असे म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या पेमेंट सिस्टिमसाठी ‘डाटा लोकेशन’ची सक्ती केली आहे. पुढील आठवड्यापासून हा निर्णय लागू हात आहे. डाटा साठवणूक केंद्रे उभारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत वित्तीय कंपन्यांना दिली होती. त्यानुसार, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या काही कंपन्यांनी भारतात डाटा साठवणूक केंद्रांची उभारणी केली आहे. काही अमेरिकी कंपन्यांनी मात्र या निर्णयास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकी कंपन्यांना पूरक भूमिका घेतल्याचे दिसते.

  • अमेरिकेचे व्यापार उप-प्रतिनिधी डेनिस शिया यांनी सांगितले, डाटा लोकेशनवर बंदी असावी, अशी आमची भूमिका आहे. सीमांची बंधने तोडून माहितीचे आदान-प्रदान व्हावे, देशा-देशात शिस्त असावी, डिजिटल व्यवहारांवर कुठल्याही प्रकारे कर लावण्यास कायमस्वरूपी बंदी असावी, असे आम्हाला वाटते.

  • ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज’मध्ये आयोजित कार्यक्रमात शिया यांनी हे वक्तव्य केले. डिजिटल व्यवहारांवरील शुल्काला सध्या असलेल्या सवलतीचा फेरविचार व्हावा अशी दक्षिण आफ्रिका आणि भारताची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या सिमरनला रौप्यपदक :
  • नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू सिमरनने युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली. महिलांच्या फ्री-स्टाईल विभागातील ४३ किलो वजनी गटामध्ये सिमरनने हे पदक पटकावले आहे.

  • या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरनने अमेरिकेच्या इमिली शिल्सनला चांगली लढत दिली. पण अंतिम फेरीत सिमरनला विजय मिळवता आला नाही. इमिलीने सिमरनवर अंतिम फेरीत ११-६ असा विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले.

दिनविशेष :
  • जागतिक विद्यार्थी दिन / जागतिक हातधुणे दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४६: अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

  • १८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

  • १९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

  • १९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

  • १९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • १९८४: आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • १९९३: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

  • १९९७: भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.

जन्म 

  • १५४२: तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

  • १८८१: इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

  • १९०८: कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

  • १९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

  • १९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

  • १९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

  • १९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

  • १९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

  • १७९३: फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

  • १९१७: पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट१८७६)

  • १९१८: भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

  • १९३०: डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८६६)

  • १९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

  • १९४६: जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९३)

  • १९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

  • १९८१: इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

  • १९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

  • २०१२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.