चालू घडामोडी - १५ सप्टेंबर २०१८

Date : 15 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
टेरर फंडिंग प्रकरणात नोंदवण्यात आली हॅरी पॉटरची साक्ष :
  • काश्मीर खोऱ्यात दगडफेक, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानतर्फे हवालामार्फत येणाऱ्या टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने हॅरी पॉटरची साक्ष नोंदवली आहे. हॅरी पॉटर हे खरे तर जे. के. रोलिंग यांच्या पुस्तकातील पात्र आहे.

  • तसेच यावर आधारीत असलेल्या सिनेमातले पात्र आहे. मग त्याचा आणि टेरर फंडिंगचा काय संबंध? असा प्रश्न पडतोच. मात्र एनआयएने या प्रकरणातील साक्षीदाराचे नाव गुप्त ठेवण्यासाठी त्याला हॅरी पॉटर हे टोपण नाव दिले आहे.

  • या हॅरी पॉटरने टेरर फंडिग प्रकरणी अटकेत असलेला काश्मीरचा व्यावसायिक झहूर वटाली याच्या विरोधात साक्ष दिली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएने आठ जणांना साक्षीदार बनवले आहे.  या सगळ्यांची नावे गुप्त ठेवण्यासाठी त्यांना टोपणनावे देण्यात आली आहे. चार्ली, रोमियो, अल्फा, गामा, पाय, हॅरी पॉटर, कॉक्स अशी टोपण नावे या साक्षीदारांना देण्यात आली आहे.

  • झहूर वटालीला जामीन मंजूर : गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयाने झहूर वटालीला जामीन मंजूर केला आहे. दिल्ली उच्च न्यायलयाचे न्या. एस मुरलीधरन, न्या. विनोद गोयल यांनी वटालीला याला जामीन नामंजूर करण्याचा निर्णय रद्द करत जामीन मंजूर केला.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांची अमेरिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा :
  • भारत व अमेरिका यांच्यात दोन अधिक दोन संवादाची प्रक्रिया अलीकडेच दिल्लीत पार पडल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल हे ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वॉशिंग्टनला गेले आहेत.

  • डोव्हल यांनी  ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटीगाठी सुरू केल्या असून, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या फॉगी बॉटम मुख्यालयात मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. ते त्यांचे समपदस्थ जॉन बोल्टन यांनाही भेटणार असून संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. डोव्हल यांच्या भेटीविषयी व्हाइट हाऊस व वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने काहीही सांगितलेले नाही.

  • परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हिथर नोएर्ट यांनी सांगितले, की भारत हा अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. हिथर या पॉम्पिओ यांच्यासमवेत गेल्या आठवडय़ात दिल्लीमध्ये दोन अधिक दोन संवादासाठी उपस्थित होत्या. त्यांनी एका सांगितले, की दोन्ही देशात लोकपातळीवर चांगला संपर्क आहे. त्यामुळे भेटीगाठी व संवाद होणार हे उघड आहे.

  • कम्युनिकेशन्स कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अ‍ॅरेंजमेंट म्हणजे कॉमकासा कराराबाबत त्यांनी सांगितले, की हा महत्त्वाचा करार बराच काळपासून प्रलंबित होता. 

आधुनिक भारताचे शिल्पकार :
  • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. अभियांत्रिकीची पदवी घेतलेले विश्वेश्वरैय्या यांनी सरकारदरबारी, हैदराबाद आणि म्हैसूर संस्थानांत काम केले. म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण संपूर्ण चुन्यात बांधून स्वदेशी तंत्रावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला, हे धरण अद्याप अभेद्य आहे.

  • हैदराबादमधील उपद्रवी नद्यांवर त्यांनी धरणे बांधून ते पाणी उपयोगात आणले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी औद्योगिक स्वप्ने पाहिली आणि अपार कष्टाने ती सत्यात उतरवली. १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे निधन झाले. आज देशाला शेकडो विश्वेश्वरैय्यांची गरज आहे.

  • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. हा दिवस भारत सरकारने अभियंता दिन म्हणून जाहीर केला आहे. भारत सरकारने विश्वेश्वरैय्या यांनी केलेल्या कार्याचा गौरव त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी प्रदान करून त्यांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा केला आहे.

  • त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही मानाची पदवी दिली. ‘चरैवेतीऽऽ चरैवेती... चालत राहा... चालत राहा’ या सततच्या कार्यतत्परतेमुळे शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यदक्ष राहण्यामुळे निसर्गानेही त्यांना १०१ वर्षांचे दीर्घ आयुर्मान देऊन त्यांचा मोठाच सन्मान केला, असे म्हणावे लागेल.

१५ तारखेला पाकिस्तानसोबत टक्कर, आजपासून आशिया चषकाची सुरुवात :
  • वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आज १५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

  • अबूधाबी :  रोहित शर्माची टीम इंडिया आशिया चषकात खेळण्यासाठी दुबईत दाखल झाली आहे. वन डे सामन्यांच्या आशिया चषकाला आज 15 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतासह पाकिस्तान,  श्रीलंका,  बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

  • या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना मंगळवार, १८ सप्टेंबरला हाँगकाँगशी होत आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवार 19 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला आशिया चषकातून विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आशिया चषक जिंकणार का, याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन / जागतिक लिंफोमा जागृती दिन / राष्ट्रीय अभियंता दिन

महत्वाच्या घटना

  • १८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

  • १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

  • १९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

  • १९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

  • १९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

  • १९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

  • १९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

  • २००८: लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.

  • २०१३: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.

जन्म

  • १८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

  • १९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)

  • १९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

  • १९२१: रंगभूमी अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर २००६)

  • १९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

  • १९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.

  • २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

  • २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.