चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ सप्टेंबर २०१९

Date : 15 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विठ्ठल मूर्तीचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होणार :
  • लाखो वैष्णावांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला लेप लावत शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यात येणार असून यासाठी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ  महाराज औसेकर यांनी दिली.

  • विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची झिज होत असल्याची तक्रार सध्या मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. याविषयी औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत. यामधे प्रामुख्याने, विठोबाच्या मूर्तीचे संवर्धन व्हावे. तसेच यासाठी पुरातत्त्व खात्यास लेप लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • या लेप(इपॉक्सी कोंटींग) लावण्यापूर्वी याविषयी वारकरी सांप्रदायातील मंडळी आणि पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. हे करताना वारकरी मंडळींना विश्वासात घेतले जाणर आहे. या बाबत विधी व न्याय विभागाची मान्यता घेतली जाणार असल्याचे औसेकर महाराज यांनी सांगितले.

  • या बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सदस्य आमदार राम कदम,आमदार सुरजितसिंह ठाकूर गैरहजर होते. मात्र आचारसंहिता लागण्याआधी समितीने बैठीकीचा सोपस्कार पूर्ण केला.

परदेशी माध्यमांशी लवकरच सरसंघचालकांचा संवाद :
  • परदेशातील माध्यमांशी या महिन्याच्या अखेरीस सरसंघचालक मोहन भागवत संवाद साधणार आहेत. संघाबाबत तसेच त्याच्या विचारसरणीबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे पहिल्यांदाच नियोजन करण्यात आले आहे.

  • पाकिस्तानवगळता ७० देशांमधील माध्यम संस्थांना आमंत्रणे पाठविण्यात आल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. विविध विषयांवरील संघाची भूमिका तसेच संघटनेबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न यातून होईल. याचे वार्ताकन केले जाणार जाणार नाही. संघाचा प्रचार विभाग या उपक्रमाचे नियोजन करत आहे.

  • दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुरुवातीला सरसंघचालक भूमिका मांडतील. त्यानंतर प्रश्नोत्तरे होतील, असे या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी असलेल्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

शहा यांच्या ‘एक देश, एक भाषा’ संकेतावरून वाद :
  • हिंदी भाषा मोठय़ा प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते, असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ असा संकेत दिल्याने वाद उफाळला आहे.

  • तमिळनाडूतील डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टॅलीन यांनी, शहा यांच्या वक्तव्यामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून या बाबतीत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी केली आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, आपण सर्व भाषांचा आणि संस्कृतींचा आदर केला पाहिजे. आपण अनेक भाषा शिकू शकतो, पण त्यासाठी आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • तमिळनाडूतील सत्ताधारी एआयएडीमके पक्षाचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री के. पाडिंयाराजन यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने हिंदीची एकतर्फी सक्ती केली तर केवळ तमिळनाडूच नव्हे, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशातही तीव्र प्रतिक्रिया उमटतील, पाठिंबा मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

  • केवळ ४५ टक्के लोक हिंदी बोलतात, ती बहुसंख्य लोकांची भाषा नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. तर विरोधी पक्ष डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलीन यांनी शहा यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध केला आहे. शहा यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेलाच धक्का बसेल, असे स्टॅलीन यांनी म्हटले आहे.

भारताला सातव्यांदा अंडर-19 आशिया चषकाचा मान :
  • मुंबई : भारतीय अंडर नाईन्टिन संघानं बांगलादेशवर निसटती मात करुन सातव्यांदा आशिया चषकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या या युवा संघानं अंतिम सामन्यात बांगलादेशवर अवघ्या पाच धावांनी विजय साजरा केला.

  • कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईचा अथर्व अंकोलेकर हा भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 107 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण डावखुऱ्या अथर्व अंकोलेकरच्या फिरकीसमोर भारतानं बांगलादेशचा डाव 101 धावांत गुंडाळला. अथर्वनं 28 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर आकाश सिंगनं तीन विकेट्स घेतल्या.

  • त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कर्णधार ध्रुव जोरेल, करण लाल आणि शाश्वत रावत या तिंघांव्यतिरुक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे भारताचा डाव 32.6 षटकांत 106 धावांत गडगडला.

  • 107 धावांचं आव्हान बांगलादेश सहज पार करेल असं वाटत असतानाच अथर्व अंकोलेकरच्या फिरकीनं कमाल केली. त्यानं आठ षटकांत अवघ्या 28 धावा देत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यामुळे बांगलादेशचा डाव 33 षटकांत 101 धावांत संपुष्टात आला. अथर्व अंकोलेकरलाच सामनावीराचा बहुमान देण्यात आला. तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्याच अर्जुन आझादला स्पर्धावीराचा बहुमान मिळाला.

  • अथर्व अंकोलेकरनं याआधी मुंबईच्या अंडर 14, अंडर 16 आणि अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अथर्वसह या संघात मुंबईच्याच सुवेद पारकर आणि वरुण लवंडेचा समावेश होता.

गृहनिर्माण, निर्यात क्षेत्रासाठी अर्थबळ :
  • देशाच्या मंदावलेल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी गृहबांधणी आणि निर्यात क्षेत्रासाठी प्रोत्साहनपर उपायांची घोषणा केली. या दोन महत्त्वाच्या रोजगारप्रवण क्षेत्रांसाठी ७० हजार कोटींचा निधी सरकारने खुला केला आहे.

  • चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत विकासाचा दर सहा वर्षांतील तळ दाखविणारा पाच टक्के नोंदला गेला आहे. विकासदराची ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या चार आठवडय़ांत योजले गेलेले हे तिसरे अर्थ-प्रोत्साहक उपाय आहेत.

  • शनिवारी पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांची घोषणा केली. यापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांवरील कर अधिभार रद्दबातल करण्यात आला आहे, तसेच दहा सरकारी बँकांचे महाविलीनीकरण करून चार मोठय़ा बँकांची निर्मितीची वाट खुली करण्यात आली आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन / जागतिक लिंफोमा जागृती दिन / राष्ट्रीय अभियंता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२१: कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.

  • १९१६: पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.

  • १९३५: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.

  • १९३५: जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.

  • १९४८: भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.

  • १९४८: एफ-८६ सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.

  • १९५३: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

  • १९५९: प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

  • १९६८: सोव्हिएत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

  • १९७८: तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.

  • २०००: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे २७व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.

जन्म 

  • १२५४: इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी मार्को पोलो यांचा जन्म. (मृत्यू: ८ किंवा ९ जानेवारी १३२४)

  • १८६१: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

  • १८७६: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९३८)

  • १९०५: नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९०)

  • १९०९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९६९)

  • १९०९: स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९९८)

  • १९२६: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचा आग्रा येथे जन्म.

  • १९३५: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक दगडू मारुती तथा दया पवार यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६)

  • १९३९: अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९९८: गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ लवंदे यांचे निधन.

  • २००८: साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९२३)

  • २०१२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन. (जन्म: १८ जून १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.