चालू घडामोडी - १६ एप्रिल २०१८

Date : 16 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ :
  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभेच्या पुढील कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये त्यांनी शपथ घेतली.

  • ६५ वर्षांच्या जेटलींना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पाठवण्यात आलं आहे, पण प्रकृती खराब असल्याने त्यांना शपथ घेता आली नव्हती. किडनीवर उपचार सुरू असल्याने त्यांच्या शपथ ग्रहणासाठी आज विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

  • राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त झाला होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यसभेवर फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी शपथही घेतली नव्हती. जेटली यांना रविवारी ११ वाजता राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांच्या चेंबरमध्ये शपथ देण्यात आली.

  • यावेळी राज्यसभेतील विरोधीपक्ष नेता गुलाम नबी आझाद आणि भाजपाचे अनंत कुमार हे देखील उपस्थीत होते. गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटलीं मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील महिन्यातील लंडनचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

ठाण्याच्या देवकी राजपूत हिने पटकावला ''महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब'' :
  • ठाणे: हैदराबाद मधील एल.बी स्टेडियम येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला. सहा महिला प्रतिस्पर्धाकांना मातीत लोलुन गदा जिंकत, ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

  • महाराष्ट्र-तेलंगाना केसरी ही मातीतिल (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात आल्या. त्यामध्ये 55-65 या वजनी गटात खेलताना ठाणे शहर पोलीस दलाच्या देवकी यांनी सहा कुस्तीपट्टू यांच्याशी दोन हात करुन महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब जिंकत ठाण्यातील मुलीही खेलात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या अजिंक्य पदामुळे ठाण्याला बहुदा  पहिली,-वहीली गदा जिंकता आली आहे. विजेत्यांना गदा, पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम देत गौरवण्यात आले आहे.            

  • विशेष म्हणजे देवकी हिने अशाप्रकारे केसरी किताबासाठी पहिल्यांदाच खेलुन गदा जिंकल्याने खूप आनंद झाल्याचे, तिचे वडील आणि प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांनी सांगितले.

  • "कुस्तीच्या आरखड्यात उतरणाऱ्या प्रत्येकाची आणि त्याच्या कुटुंबाची एकच इच्छा असते. गदा जिंकण्याची ती यानिमित्ताने पूर्ण झाली.आता जबाबदारी वाढली असून ऑलिम्पिक खेलणे हेच लक्ष् आहे. तसेच तेथे देशासाठी पदक जिंकायचे आहे.

  • "- देवकी राजपूत ,  महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब विजेती दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 17 ते 22 एप्रिल दरम्यान होणाऱ्या ऑल इंडिया पोलीस गेम या स्पर्धेची देवकी राजपूत तयारी करत असून त्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास देवकी यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केला आहे.

विंहिंपचे नवे अध्यक्ष म्हणाले, ‘लवकरच बनणार भव्य राम मंदिर’ :
  • विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णु सदाशिव कोकजे यांनी नवी जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. विहिंप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं ते म्हणाले. राम मंदिराबाबत बोलताना राम मंदिर लवकरच बनेल असं ते म्हणाले.

  • अयोध्येत लवकरच भव्य राम मंदिर बनेल असं कोकजे म्हणाले. संतांच्या नेतृत्वात श्री रामाचं भव्य मंदिर लवकरच न्यायालयाचा आदेश अथवा कायदा बनवून निर्माण केलं जाईल असं ते म्हणाल्याचं वृत्त ‘आजतक’ने दिलं आहे.

  • शनिवारी हरयाणातील गुरुग्राम येथे विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक झाली. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रवीण तोगडिया यांच्या गटातील राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांच्यात लढत होती. यात कोकजे १३१ मते मिळवून राघव रेड्डींचा पराभव केला. राघव रेड्डींना फक्त ६० मते मिळाली.

  • विंहिपच्या कार्याध्यक्ष पदासाठी आलोककुमार, कार्याध्यक्ष (विदेश विभाग) अशोकराव चौगुले, महामंत्रीपदासाठी मिलिंद पांडे, संघटन महामंत्रीपदी विनायकराव देशपांडे यांची निवड करण्यात आली. प्रविण तोगडियांबाबत बोलताना आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही असं कोकजे  म्हणाले. तसंच तोगडिया नाराज देखील नाहीयेत, आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत असं कोकजे म्हणाले.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट पूर्ववत करण्यासाठी अध्यादेश :
  • नवी दिल्ली - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने सौम्य केलेल्या तरतुदी पुन्हा कायम करण्यासाठी सरकार अध्यादेश जारी करण्याचा विचार करीत आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची गरज असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्याला अटक करण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना करण्याचाही सरकारचा विचार आहे. या विषयावर सरकारच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या चर्चांच्या संपर्कात असलेल्या सूत्रांनी सांगितले की, सध्या दलित समाजात जो राग निर्माण झाला आहे तो अध्यादेशाने कायद्यातील मूळ तरतुदी कायम ठेवल्यास शांत होईल.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला रद्द करण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ मध्ये दुरुस्तीचे विधेयक जुलै महिन्यात होणार असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्याचा दुसरा पर्यायही सरकारकडे आहे. अध्यादेश जारी केल्यास त्यामुळे त्याचे रुपांतर विधेयकात होऊन ते संसदेकडून संमतही होईल.

  • या दोन्ही उपायांचा परिणाम एकच होईल तो म्हणजे कायद्यातील मूळ तरतुदी पुन्हा कायम राहतील; परंतु अध्यादेशाचा फायदा असा की त्याचे परिणाम लगेचच दिसतील व निर्माण झालेला संताप शांत होण्यास मदत होईल, असे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने २० मार्च रोजी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील अटकेच्या तरतुदी सौम्य केल्याचा निवाडा केला होता. त्याचा दलित गटांनी संपूर्ण देशात २ एप्रिल रोजी निषेध केला होता. अनेक ठिकाणी या निषेधाला हिंसक वळण लागले व त्यात सात जणांचा बळी गेला.

जीएसटी कम्पोझिशन स्कीममधील १० प्रमुख बदल :

१) हॉटेल, इतर (उदा. रिटेलर) व मॅन्युफॅक्चरिंग विक्रेत्यांना टॅक्सेबल, एक्झम्ट व शून्य दराने विक्रीच्या एकूण टर्नओव्हरवर टॅक्स भरावा लागत असे. १/०१/२०१८ पासून इतर (उदा. रिटेलर) विक्रेत्यांना फक्त टॅक्सेबल विक्रीवर टॅक्स भरणे आणि त्याचा तपशील देणे गरजेचे आहे.

२) १/०१/२०१८ पासून मॅन्युफॅक्चरिंग करणाºया विक्रेत्यांना १ टक्का दराने कंपोझिशन स्कीममध्ये कर भरावा लागेल. तो आधी २ टक्के दराने भरावा लागत असे.

३) विक्री पुरवठ्यांवरील माहितीच्या मध्ये कोणतेही बदल आणण्यात आलेले नाहीत.

४) नवीन रिटर्ननुसार आता जुलै ते डिसेंबरपर्यंत दाखल केलेल्या रिटर्नमधील विक्रीच्या उलाढालसंबंधित माहितीत सुधारणा जानेवारी ते मार्चच्या रिटर्नमध्ये करता येऊ शकते. विक्री कमी-जास्त झाल्यास याचा फायदा होईल.

५) आता नवीन रिटर्ननुसार, नोंदणीकृत व्यक्तींकडून खरेदी केली असेल तर त्याचाही संपूर्ण बिलानुसार, दरानुसार तपशील देणे आवश्यक आहे. हा फार मोठा बदल आहे.

६) आता खरेदीच्या तपशीलाद्वारे नोंदणीकृत व्यक्ती आणि खरेदी ज्यावर रिव्हर्स चार्जमध्ये कर भरावा लागतो याची माहिती द्यावी लागेल. पूर्वी फक्त ज्या खरेदीवर रिव्हर्स चार्ज लागत असे, त्या खरेदीची बिल ते बिल तपशीलवार माहिती देणे आवश्यक होते.

७) नवीन रिटर्ननुसार आयात सेवासंबंधित काही बदल असेल, तर तो बदल करता येऊ शकतो.

८) नवीन रिटर्ननुसार डेबिट / क्रेडिट नोट खरेदीविषयी काही बदल असेल, तर तो बदल करता येऊ शकतो.

९) कंपोझिशनमध्ये करदात्याला रिटर्नमध्ये डेबिट / क्रेडिट नोट, खरेदीविषयीचे कारण द्यावे लागत असे; परंतु नवीन रिटर्ननुसार अनोंदणीकृत व्यक्तींना दिलेले डेबिट / क्रेडिट नोट, विषयीचे कारण द्यावे लागणार नाही.

१०) कंपोझिशन योजनेच्या निवडीसाठी करदात्यास खरेदी पुरवठ्यावरील भरलेल्या आयटीसीचा दावा करण्याची परवानगी नाही.

ज्यामुळे करदात्यांनी कराचा दर, कर रकमेसारख्या तपशीलवार नोंदी कायम ठेवल्या नसतील; परंतु जीएसटीआर -४ मध्ये त्यांना बिल दर आणि कर दरानुसार

खरेदीची तपशीलवार माहिती देणे आवश्यक आहे व त्यात अडचणी येतील.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना

  • १८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

  • १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

  • १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

  • १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

  • १९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

जन्म

  • १८६७: विल्बर राइट आपला भाऊ ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९१२)

  • १८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर१९७७)

  • १९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

  • १९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.

  • १९४२: विल्यम्स एफ -1 रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.

मृत्यू

  • १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)

  • १८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १७६१)

  • १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)

  • १९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.

  • २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.