चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ एप्रिल २०१९

Date : 16 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'हा' आहे भारतातला सर्वात श्रीमंत पक्ष :
  • नवी दिल्ली : देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे उमेदवारांकडे किती संपत्ती आहे, याची माहिती सर्वांना मिळाली पंरतु कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहितीदेखील समोर आली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे.

  • निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा बहुजन समाज पार्टीकडे (बसपा) सर्वाधिक बँक बॅलन्स आहे. मायावतींच्या बसपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल 670 कोटी रुपये बँक बॅलन्स आहे.

  • या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी (सपा) आहे. सपाकडे तब्बल 471 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे. देशातील सर्वात मोठे पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संपत्तीच्या बाबतीत बसपा आणि सपाच्या आसपासही नाहीत.

  • निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसकडे 196 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. तर चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)चौथ्या क्रमांकावर आहे. टीडीपीकडे 107 कोटी रुपये इतका बँक बॅलन्स आहे.

भारताकडून सब-सॉनिक निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :
  • बलसोर (ओडिशा) : सोमवारी भारताने निर्भय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे भारताचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पहिले सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

  • ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील चांदीपूर येथील चाचणी तळावरून निर्भयची चाचणी घेण्यात आली. निर्भयच्या चाचणीमुळे भारताची मारक क्षमता वाढणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

  • डीआरडीओच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, विविध प्लॅटफॉर्मवर तैनात करण्याची क्षमता असलेले हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चाचणी संकुल-३ वरून सकाळी ११.४४ वा. सोडण्यात आले. ४२ मिनिटे २३ सेकंदांत त्याने आपले लक्ष्य भेदले.

खुल्या वर्गातील दुर्बलांसाठी दोन लाख अतिरिक्त जागा :
  • नवी दिल्ली : सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) १० टक्के राखीव जागा देण्यासाठी देशातील १५८ केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त जागा निर्माण केल्या जातील.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना राखीव जागा देण्याच्या तरतुदींना मान्यता देण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

  • सूत्रांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवण्याच्या आधी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती.

पॅरिसमधील आठशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक चर्च आगीच्या भक्षस्थानी; मनोरा कोसळला :
  • जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारे पॅरिसमधील ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ हे १२व्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्षस्थानी पडले. या चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला असून याचा आकर्षक असा उंच मनोऱा या आगीत भस्मसात झाला आहे.

  • आग लागली त्यावेळी या चर्चच्या छतावरुन आगीचे मोठे लोट बाहेर पडत होते. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे स्थानिक अग्निशामक दलाने सांगितले आहे. दरवर्षी या चर्चाला लाखो पर्यटक भेट देतात. पॅऱिस शहराचे महापौरांची या आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. सध्या ही आग नियंत्रणात आली असून या चर्चची गोथिक कॅथेड्रल मुख्य वास्तूरचना सुरक्षित राखण्यात यश आले आहे, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली.

  • नोट्रे-डेम-कॅथेड्रल या चर्चच्या बांधकामाला ११६० मध्ये सुरुवात झाली होती हे काम १२६० पर्यंत चालले. फ्रेंच गोथिक कॅथेड्रल या प्राचीन वास्तूरचनेचा हा एक अद्भुत नमुना मानला जातो. ६९ मीटर उंच असलेल्या या चर्चच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी ३८७ पायऱ्या चढाव्या लागतात. विशेष म्हणजे फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्टचा राज्यभिषेक याच चर्चमध्ये करण्यात आला होता.

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची चौकशी करावी :
  • पुणे : सत्ता संपादन करण्याच्या उद्देशातून राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्याद्वारे मतदारांना मोहित करणारे दावे करतात आणि दिशाभूल करणारी आश्वासने देतात. निवडणुकीत मंगळसूत्र, लॅपटॉप किंवा अगदी दारू आणि पैशांचे वाटप होते. या त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची चौकशी करावी, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केली. धर्माच्या आधारे नागरिकत्व हा सिद्धांत घटनाविरोधी असल्याचे नमूद करत देशात नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संकल्पावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

  • आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय’तर्फे आयोजित अनौपचारिक चर्चेत पाटकर बोलत होत्या. मेधा पाटकर यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचे विश्लेषण करत मतदारांच्या अपेक्षा मांडल्या. ज्येष्ठ कार्यकर्त्यां सुनीती सु. र. यांच्यासह विविध पुरोगामी संस्था-संघटनांचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

  • पाटकर म्हणाल्या, भाजपच्या संकल्पपत्रात राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. मात्र, त्याची व्याख्या संकुचित असून जात-धर्माच्या नावाखाली होणारी हिंसा रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा उल्लेख नाही. असुरक्षिततेची भावना घेऊन जगणाऱ्या अल्पसंख्याकांना भाजपने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. उलट देशभरात नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू केले जाईल, त्या आधारे हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समुदायाच्या व्यक्तींना भारतामध्ये नागरिकत्व बहाल करण्याचे आश्वासन देताना त्यातून मुस्लिमांना डावलले आहे. ही गोष्ट घटनाविरोधी आहे.

सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधींना नोटीस :
  • राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने न उच्चारलेली वाक्ये राहुल यांनी न्यायालयाच्या तोंडी घातल्याबाबत सोमवापर्यंत स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने नोटिशीत म्हटले आहे.

  • राफेल विमाने खरेदीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकेसोबत संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून ही कागदपत्रे ग्राह्य़ धरली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी ‘चौकीदार चोर है’, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आपल्या निर्णयात ‘चौकीदार चोर है’ असे कुठेही म्हटलेले नसल्याचे नमूद करत न्यायालयाने अवमान याचिकेवर राहुल यांना नोटीस बजावली. या नोटिशीला राहुल यांना २२ एप्रिलपर्यंत उत्तर द्यायचे आहे.

  • भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर पुढील आठवडय़ात मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या नोटिशीनंतर मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. घटनात्मक नैतिकता आणि लोकशाही परंपरेची जाण नसलेले राहुल संसदेत जनतेचे कसे प्रतिनिधित्व करणार, असा सवाल त्यांनी केला.

भारतात ६ लाख डॉक्टर, २० लाख नर्सची उणीव :
  • वॉशिंग्टन : भारतात ६ लाख डॉक्टर आणि २० लाख परिचारिकांची टंचाई आहे, असे अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.

  • सेंटर फॉर डिसिज डायनामिक्टस, इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, अँटिबायोटिक्स उपलब्ध असतानाही ते देणारा योग्य प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे योग्य तो गुण येत नाही. अनेकदा अँटिबायोटिक्सच्या किमती रुग्णांना परवडत नाहीत.

  • आरोग्य सेवेवरील भारत सरकारचा खर्च अत्यल्प असल्यामुळे औषधांचा खर्च रुग्णांना स्वत:च्या खिशातूनच करावा लागतो. भारतात आरोग्यावरील ६५ टक्के खर्च लोकांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो. या खर्चामुळे ५७ दशलक्ष लोक दरवर्षी गरिबीच्या खाईत ढकलले जातात. अँटिबायोटिक्सने सहज बऱ्या होणाºया साध्या आजारांनी जगात दरवर्षी ५.७ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. यातील बहुतांश मृत्यू अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत होतात. सीडीडीईपीचे संचालक रामनन लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की, अँटिबायोटिक्स रेसिस्टन्टन्सच्या तुलनेत अँटिबायोटिक्सअभावी मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

  • भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर ‘सीडीडीईपी’ने युगांडा, भारत आणि जर्मनी या देशांत हितधारकांच्या मुलाखती घेऊन आपले निष्कर्ष काढले आहेत. या देशांतील आरोग्य सुविधा अनेकदा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असतात. अहवालात म्हटले आहे की, १ हजार लोकसंख्येमागे १ डॉक्टर असावा, असा जागतिक आरोग्य संघटनेचा नियम आहे.

  • तथापि, भारतात १०,१८९ लोकांमागे एक डॉक्टर आहे. याचाच अर्थ भारतात ६ लाख डॉक्टर कमी आहेत. रुग्ण आणि परिचारिकांचे गुणोत्तर १:४८३ आहे. याचाच अर्थ भारतात २० लाख परिचारिका कमी आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

  • १९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

  • १९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

  • १९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

  • १९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

जन्म 

  • १८६७: ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९१२)

  • १८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९७७)

  • १९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

  • १९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.

  • १९४२: विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.

  • १९७२: स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७)

  • १८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १७६१)

  • १९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८२)

  • २०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.