चालू घडामोडी - १६ डिसेंबर २०१७

Date : 16 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'नासा'कडून नव्या सूर्यमालेचा शोध, केप्लर ९० भोवती ८ ग्रहांचं भ्रमण :
  • न्यूयॉर्क : 'नासा'ला आपल्या सूर्यमालेप्रमाणेच आणखी एक सूर्यमाला सापडली आहे. 'नासा'नं केप्लर स्पेस टेलिस्कोप आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आधारे हा शोध लावला आहे.

  • नव्याने शोध लावलेल्या या ग्रहमालिकेत थोडेथोडके नाही, तर आठ ग्रह असल्याची माहिती नासाने दिली आहे. पृथ्वीचा समावेश असलेल्या आपल्या ज्ञात ग्रहमालिकेव्यतिरिक्त शोध लागलेली ही सर्वात मोठी ग्रहमालिका असल्याचं मानलं जात आहे. केप्लर 90 या ताऱ्याभोवती हे ग्रह फिरतात.

  • ही सूर्यमालिका आपल्या सूर्यमालिकेपेक्षा 2 हजार 545 प्रकाशवर्ष दूर आहे. सध्या तरी त्यापैकी कुठलाही ग्रह जीवसृष्टीसाठी पोषक नसल्याचं भाकित शास्त्रज्ञांनी केलं आहे. बुधाच्या तापमानाप्रमाणेच या सूर्यमालिकेचं सरासरी तापमान 800 अंश फॅरनहीट म्हणजेच 426 सेल्सिअस असल्याचं गणित नासाने मांडलं आहे.

  • केप्लर 90 आय हा ग्रह पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. मात्र या ग्रहाला त्यांच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला अवघे 14.4 दिवस लागतात. म्हणजेच पृथ्वीवरील दोन आठवड्यांच्या कालावधीइतकं त्यांचं एक वर्ष आहे.

पोस्टट्रथनंतर ऑक्सफर्डचा यंदाचा शब्द ‘युथक्वेक’ :
  • ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१७ मधील शब्द म्हणून युथक्वेक या शब्दाची निवड केली आहे. गेल्या वर्षी पोस्टट्रथ या शब्दाची निवड करण्यात आली होती. युथक्वेक याचा अर्थ तरुण मतदारांमध्ये निर्माण झालेली राजकीय जागरूकता असा आहे. युथक्वेक या शब्दाची व्याख्या करताना म्हटले आहे, की सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक बदल जर तरुणांच्या कृती किंवा प्रभावातून घडून आले, तर त्याला युथक्वेक असे म्हणतात.

  • गेल्या वर्षी ब्रेक्सिट व ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयानंतर वापरला गेलेला पोस्टट्रथ हा ऑक्सफर्डने वर्षांतील शब्द ठरवला होता. या वेळी आम्ही युथक्वेक शब्दाची निवड ही त्याची प्रचिती व भाषिकता यातून केली आहे.

  • जेव्हा तरुणांमधील अस्वस्थता बाहेर येते आहे, तेव्हा हा वेगळा राजकीय शब्द आहे, असे आम्हाला वाटते, असे मत ऑक्सफर्ड डिक्सनरीजचे कॅस्पर ग्रॅथवोल यांनी म्हटले आहे. आजच्या काळातील ध्रुवीकरणाच्या वातावरणात नवीन मतदार हे खुल्या मनाचे असून ते त्यांचा आवाज पुढील काळात राजकारणात उमटवणार आहेत.

  • २०१७ मध्ये या शब्दाचा वापर पाच पट वाढला. साधारण या वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात वापर वाढल्याचे दिसून आले. जूनमध्ये ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला. तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित होता.

अमळनेरच्या सुपुत्राने लावला स्पेक्टो फ्लोरोमीटरचा शोध :
  • जळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील (पॅथॉलॉजी) प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी लागणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ हे अमळनेर येथील विवेक भास्कर बोरसे या विद्यार्थ्यांने शोधून काढले आहे. या संशोधनाबद्दल विवेकला ‘लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे’कडून उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

  • या संशोधनासाठी त्याने पेटंटची नोंदणीही केली आहे. विवेक हा आय.आय.टी. पवईचा विद्यार्थी आहे. वैद्यकीय प्रयोगशाळेत विविध निष्कर्ष काढण्यासाठी तसेच फ्लोरोसंट मोजण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘स्पेक्टो फ्लोरोमीटर’ यंत्र हे जर्मन बनावटीचे असते. त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

  • पीएच.डी.करणारा विवेक भास्कर याने सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या भारतीय बनावटीचे ‘स्पेक्टोफ्लोरो मीटर’ बनवले आहे. ते अवघ्या एक हजार रुपयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या पैशांची ९९ टक्के बचत होणार आहे.

  • राष्ट्रपती भवनात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या ‘इनोव्हेशन इन मेडीकल सायन्स अ‍ॅन्ड बायोटेक्नॉलॉजी’ प्रदर्शनासाठी या संशोधनाची निवड झाली होती. शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, डॉ.रेणू स्वरूप, डॉ.सत्यादास इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे डॉ.सौम्य स्वामीनाथन, कार्यकारी अधिकारी प्रा.अनिल गुप्ता यांनी या संशोधनाबद्दल विवेकचे कौतुक केले होते.

दिल्लीत मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी - सचिन तेंडुलकर :
  • नवी दिल्ली : ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा गुरुवारी शुभारंभ झाला अन् पहिल्या दिवसाचा अंक शुक्रवारी दिल्लीतील मराठी जनांच्या हाती पडला. दिल्ली विमानतळावर मराठी पेपर पाहून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आनंदित झाला.

  • ‘‘दिल्ली एअरपोर्ट लाउंजमध्ये मराठी पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी...’’ अशा ओळींसह सचिनने हा फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला. या फोटोला इन्स्टाग्रामवर दीड लाखांहून अधिक, तर ट्विटरवर तब्बल ६६ हजारांहून अधिक नेटक-यांनी लाइक केले आहे. 

नरेंद्र मोदींशी स्पर्धा नाहीच, 79 टक्के लोक म्हणतात 2019 च्या निवडणुकीत मोदींनाच मत देणार :
  • नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही सर्वात आवडते नेते असून, सध्या तरी त्यांना कोणीच कडवी झुंज देत नसल्याचं समोर आलं आहे.  टाइम्सच्या ऑनलाइन सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयानंतरही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपण नरेंद्र मोदींनाच मत देणार असल्याचं 79 टक्के लोकांनी सांगितलं आहे.

  • 2019 लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच सध्या तरी सर्वात योग्य वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 12 ते 15 डिसेंबर दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला आहे. 

  • सर्व्हेनुसार फक्त 20 टक्के लोकांनी आपण नरेंद्र मोदींना स्पर्धा देण्यासाठी राहुल गांधींना मत देणार असल्याचं सांगितलं आहे.  58 टक्के लोकांनी आपण राहुल गांधींपासून अद्यापही प्रभावित झालो नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे 34 टक्के लोकांनी राहुल गांधी मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरत असून, त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

  • पण काँग्रेससाठी चिंतेची बाब म्हणजे 73 टक्के लोकांनी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बढती करण्यात आल्यानंतरही काँग्रेस हा पक्ष पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. पण मग याचा अर्थ राहुल गांधींना हटवलं तर काँग्रेसची प्रगती होईल असा आहे का ? तर याचं उत्तर नाही आहे.

  • कारण सर्व्हेत सहभागी 38 टक्के लोकांनी गांधी परिवारातील कुटुंब काँग्रेसचा अध्यक्ष नसेल तर त्यांना मत देणार नाही असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे 37 टक्के लोकांनी गांधी कुटुंबातील सदस्य अध्यक्ष नसेल तर काँग्रेसला मतदान करु असं म्हटलं आहे. 

चिनी राजदूत बसले थेट जमिनीवर :
  • नवी दिल्ली : अनोळखी गर्दीत हे राजदूत कुणाला तरी शोधत होते. कार्यक्रमास अवकाश होता. पाहुण्यांचे आगमन झाले होते. पाहुण्यांमध्ये उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री होते. हॉलमध्ये सर्वात मागे हे राजदूत उभे होते. हजार जणांच्या गर्दीतून वाट काढत राजदूत पोहोचले, ते थेट पहिल्या रांगेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे.

  • खांदे झुकवत त्यांनी मनमोहनसिंग यांना अभिवादन केले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. बसलेल्या मनमोहनसिंग यांच्याशी बोलताना उंचपु-या राजदूतास अडचण होत होती. सारे राजनयिक शिष्टाचार बाजूला ठेवत ते खाली बसून संवाद साधू लागले.

  • ‘दै. लोकमत’च्या कार्यक्रमात चिनी राजदूताचा साधेपणा सर्वांच्याच नजरेत भरला! लुओ कोणत्याही अधिका-यास मिळणारा, राजशिष्टाचार न घेता आले. अशोका हॉटेलच्या कन्व्हेंशन हॉलमधील भरगच्च गर्दीचा ते एक भाग झाले. हॉलमध्ये सर्वात मागे उभे राहिले. थोड्याच जणांनी त्यांना ओळखले.

  • थोडीफार ‘मँडरीन’ येणा-या एका पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधला. पहिल्या रांगेत बसण्याची विनंती त्यांनी नम्रपणे नाकारली. मनमोहनसिंग यांच्या प्रकृतीची चौकशी त्यांनी केली. अवघ्या दोन मिनिटांच्या चर्चेत लुओ यांनी राजनयिक संबंधांचा नवा आयाम प्रस्थापित केला. कार्यक्रम संपल्यावर चर्चा होती ती चिनी राजदूताच्या संयत विनम्रतेची!

ट्रिपल तलाक दिला तर तुरूंगवास, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी :
  • नवी दिल्ली : ट्रिपल तलाक विरोधात नव्या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून या विधेयकाला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. कायद्याचं स्वरूप देण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजुरी दिली जाईल.

  • त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीनंतर याबाबत कायदा अस्तित्वात येईल. हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. 

  • गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांचा समावेश आहे. 

  • ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठाने ट्रिपल तलाकची प्रथा अवैध असल्याचा ऐतिहासिक निकाल दिला. तीन विरुद्ध दोन अशा फरकाने सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी.

  • १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

  • १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

  • १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

  • १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.

  • १९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.

  • १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.

जन्म

  • १७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

  • १७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७)

  • १८८२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)

  • १९१७: विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००८)

मृत्यू 

  • १९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)

  • १९६५: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी१८७४)

  • १९८०: केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)

  • २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.

  • २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.