चालू घडामोडी - १६ डिसेंबर २०१८

Date : 16 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘नेट’ परीक्षेच्या केंद्रावर सीसीटीव्ही, जॅमर :
  • नवी दिल्ली : युजीसीद्वारे घेण्यात येणारी नेट परीक्षा यंदा सीसीटीव्ही, जॅमर लावलेल्या केंद्रांवर होणार आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार करू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत १० टप्प्यात ही परीक्षा देशातील २३५ शहरांमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रावर मोबाइल किंवा इंटरनेटशी जोडले जाणारे कोणतेही उपकरण कामच करू नयेत, यासाठी जामर बसविण्यात येणार आहेत.

  • राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएने पहिल्यांदाच परीक्षेसाठी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी लोकमतला सांगितले की, परीक्षेसाठी ९.५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा पारदर्शक करण्यासाठी आहे, गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक तंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा ५९९ केंद्रांवर होणार आहे.

  • यूपीएससी परीक्षेच्या वेळीही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. हे देशात एवढ्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच होत आहे. काही केंद्रांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच कोण्याही प्रकारचे गॅजेट सोबत आणू नका, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ प्रवेश पत्र आणि ओळख पत्र एवढेच सोबत आणावे, असेही सांगण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

  • ऑनलाइन नव्हे केवळ कॉम्प्युटरवर - परीक्षा ऑनलाइन होणार असल्याचा लोकांनी आतापर्यंत समज करून घेतला आहे. पण ही परीक्षा केवळ कॉम्प्युटरवर होणार आहे. यासाठीची प्रश्नपत्रिका सॉफ्टवेअरद्वारे कम्प्युटरवर उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्यांना पेनचा वापर करण्याऐवजी केवळ उत्तरांवर क्लीक करावे लागेल, असेही विनीत जोशी यांनी सांगितले.

मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदी झोरमथंगा यांचा शपथविधी :
  • मिझो राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष झोरमथंगा यांचा शनिवारी मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांच्यासह एकूण बारा मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल के. राजशेखरन यांनी राजभवनात  त्यांना अधिकारपद व गोपनीयतेची शपथ दिली.

  • झोरमथंगा यांनी मिझो भाषेत शपथ घेतली. ईशान्येकडील मिझोराम राज्याचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी ते एमएनएफच्या राजवटीत  १९९८ व २००३ मध्ये मुख्यमंत्री होते. तानलुविया हे उपमुख्यमंत्री झाले. झोरमथंगा यांच्यासह इतर अकरा मंत्र्यांना शपथ देण्यात आली, त्यात पाच कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत. 

  • पाच कॅबिनेट मंत्र्यांत  तानलुविया, आर. लालथनग्लियाना, लालचमालियाना, लालझिरिलियाना, लालरिनसंगा यांचा समावेश आहे. सहा राज्यमंत्र्यांत के.लालरिनलियाना, लालचंदमान राल्ते, लालरूट किमा, डॉ. के. बेइशुआ, टी.जे. लालनुनतलुआंगा, रॉबर्ट रोमाविया राल्ते यांचा समावेश आहे.

  • एनडीएतून बाहेर पडणार नाही : झोरमथंगा - सध्या तरी एनडीए किंवा एनइडीएमधून बाहेर पडण्याचा इरादा नाही, असे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी सांगितले.

महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा :
  • श्रीलंकेतील सत्तासंघर्ष संपवताना महिंदा राजपक्षे यांनी  पंतप्रधानपदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. त्यांची नेमणूक करण्याचा वादग्रस्त निर्णय अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी घेतला होता. आता रनिल विक्रमसिंघे यांचा पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून रविवारी शपथविधी होईल.

  • राजपक्षे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन महत्त्वपूर्ण निकालानंतर राजीनामा दिला असून न्यायालयाने संसद बरखास्त करण्याचा निर्णय व राजपक्षे यांची पंतप्रधानपदी करण्यात आलेली नेमणूक घटनाबाह्य ठरवली होती.

  • राजपक्षे समर्थक खासदार शेहान सेमासिंगे यांनी सांगितले की, माजी अध्यक्षांनी कोलंबोतील विजेरामा येथील त्यांच्या निवासस्थानी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केली. राजपक्षे यांनी युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सच्या खासदारांना त्यांच्या राजीनाम्याची माहिती कळवली आहे. राजपक्षे यांची २६ ऑक्टोबर रोजी सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती करताना आधीचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून काढले होते. त्यामुळे देशात राजकीय पेच निर्माण झाला होता.

  • सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालातच सिरीसेना यांचा संसद बरखास्तीचा निर्णय बेकायदा ठरवला होता. राजपक्षे यांना पुढील महिन्यात पूर्ण सुनावणी  होईपर्यंत पंतप्रधानपद ग्रहण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मनाई केली होती. विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीने शनिवारी म्हटले आहे की, सिरीसेना यांनी त्यांना पुन्हा पंतप्रधानपद देण्याची तयारी दर्शवली होती. अध्यक्षांच्या सचिवालयाने विक्रमसिंघे यांचा शपथविधी उद्या सकाळी होणार असल्याचे जाहीर केले आहे, असे यूएनपीचे सरचिटणीस अकिला विराज कैरियावासम यांनी सांगितले.

ओबामाकेअर योजना घटनाबाह्य :
  • ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल संघराज्य न्यायाधीशांनी दिला असून त्यामुळे ट्रम्प प्रशासनाचा मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. टेक्सासच्या संघराज्य न्यायाधीशांनी संपूर्ण अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट रद्दबातल ठरवला असून हा कायदा म्हणजेच ओबामाकेअर योजना होय. व्यक्तिगत पातळीवर आरोग्य सुरक्षेसाठी ओबामा प्रशासनाने ही योजना आणली होती.

  • रिपब्लिकन पक्षाचे काही गव्हर्नर व राज्यांचे महाधिवक्ते यांच्या गटाने ओबामाके अरविरोधात याचिका दाखल केली होती.  अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट नुसार संघराज्य विमा योजनेसाठी स्वाक्षरी करण्यासाठी शनिवारी अमेरिकी लोकांना अखेरची मुदत देण्यात आली होती.

  • या निकालावर आव्हान याचिका दाखल केली जाणार असून डेमोक्रॅट पक्षाने न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. जिल्हा न्यायाधीश रीड ओ कोनोर यांनी निकालात म्हटले आहे की, करदात्यांच्या पैशातून अशा प्रकारची योजना राबवता येणार नाही. किंबहुना तशी योजना राबवणे घटनाबाह्य़ आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ओबामाकेअर योजना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल टेक्सासच्या सन्माननीय न्यायाधीशांनी दिला आहे ही अमेरिकेसाठी मोठी सुवार्ता आहे.

  • ओबामाकेअर योजना रद्द करण्याचा मुद्दा ट्रम्प यांनी प्रचारात मांडला होता. ओबामाकेअर योजना न्यायालयाकडून घटनाबाह्य़ ठरवली जाईल असे आपण म्हटले होते व तसेच आता झाले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने ओबामाकेअरचा अ‍ॅफॉर्डेबल केअर अ‍ॅक्ट हा २०१२ व २०१५ मध्ये घटनात्मक पातळीवर योग्य ठरवला होता. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने आताच्या निकालास विरोध केला असून रिपब्लिकन पक्षाने लोकांवर केलेला हा हल्लाच आहे लोकांना आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे असे डेमोक्रॅटिक नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले.

देशाची सुरक्षा काँग्रेससाठी पैसे कमावण्याचा मार्ग - नरेंद्र मोदी :
  • चेन्नई : राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा फैसला आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस सरकारच्या घोटाळ्यांवरुन मोदींनी राहुल गांधींसह त्यांच्या पक्षावर निशाना साधला आहे. मोदी म्हणाले की, देशाची सुरक्षा आणि डिफेन्स सेक्टर काँग्रेससाठी पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. तमिळनाडूमध्ये कार्यकर्त्यांशी बोलत असताना मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.

  • एकिकडे काँग्रेसचे नेते भारतीय सैन्यदलाच्या प्रमुखांचे नाव घेत सर्जिकल स्ट्राईकची चेष्टा करतात आणि दुसऱ्या बाजुला त्यांच्या पक्षाने देशाच्या डिफेन्स सेक्टरला लुटले असल्याचे ते सहज विसरुन जातात. मोदी म्हणाले की, काँग्रेसने देशाच्य संरक्षण विभागाला नेहमीच दुय्यम दर्जा दिला आहे. नेहमीच या क्षेत्राचा तिरस्कार केला आहे. परंतु त्यांनी या विभागाकडे नेहमीच कमाईचा स्त्रोत म्हणून पाहिले आहे.

  • काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्यावेळी मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर सर्जिकल स्ट्राईकबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका केली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

  • १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

  • १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

  • १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.

  • १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिअॅक्टर राष्ट्राला समर्पित.

  • १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.

जन्म 

  • १७७०: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १८२७)

  • १७७५: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १८१७)

  • १८८२: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)

  • १९१७: विज्ञान कथालेखक आणि संशोधक सर आर्थर सी. क्लार्क यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००८)

मृत्यू 

  • १९६०: मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)

  • १९६५: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८७४)

  • १९८०: केंटुकी फ्राईड चिकन (KFC) चे संस्थापक कर्नल सँडर्स यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)

  • २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.

  • २००४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.