चालू घडामोडी - १६ फेब्रुवारी २०१९

Updated On : Feb 16, 2019 | Category : Current Affairsपुलवामा हल्ल्यात शहीद वीरपुत्रांवर आज अंत्यसंस्कार :
 • मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

 • या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये बुलडाण्याच्या दोन सुपुत्रांचा समावेश आहे. मूळ मलकापूरचे असलेले संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीरपुत्रांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 • सीआरपीएफच्या अधिकृत माहितीनुसार 40 जवान शहीद झाले असून काही जवान जखमी आहेत. दक्षिण काश्मिरच्या अवंतीपुरा भागात गुरुवारी दुपारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला होता. हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो.

पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय :
 • नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. पण आता प्रश्न आहे की, मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ काय? हा दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानवर त्याचा काय परिणाम होणार?

 • काय आहे एमएनएफ दर्जा - एमएफएन म्हणजेच मोस्‍ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला व्यापाराबाबत सुविधा मिळतात. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला या गोष्टीची खात्री असते की, त्याला व्यापाऱ्यात कोणतंही नुकसान होणार नाही. मोस्ट फेवर्ड नेशनच्या नियमानुसार, कोणताही देश विविध देशांमधील व्यापारासंबंधी करारात भेदभाव करु शकत नाही. एमएफएनच्या नियमाअंतर्गत दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. याचा अर्थ आहे की, व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देश, दुसऱ्या देशाच्या तुलनेत तोट्यात राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा लाभ मिळतो, अशी सामान्य धारणा आहे.

 • 'एमएफएन' दर्जाचा फायदा काय - मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेल्या देशाला व्यापारात प्राधान्य दिलं जातं. एमएफएनचा दर्जा मिळाल्यावर आयात-निर्यातीमध्ये विशेष सवलत मिळते. यात दर्जा मिळालेला देश सर्वात कमी शुल्कावर व्यापार करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर :
 • नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहेत. शिवाय ते दोन जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत.

 • नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडाला रवाना होतील. पांढरकवडा येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदी जळगावला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत.

दिवसभरातील कार्यक्रम

 • नांदेडमधील एकलव्य आदर्श विद्यालयाचं उद्घाटन

 • नागपूर-पुणे ट्रेनला व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

 • महिला स्वयंसहायता समूहातील सदस्यांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप. यातील सुमारे 25 महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधणार. यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

 • धुळे येथे लोअर पंजारा मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणि अमृत योजनेचे भूमिपूजन.

 • धुळे-मनमाड रेल्वे मार्ग आणि जळगाव-मनमाड या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन.

 • भुसावळ-वांद्रे एक्सप्रेस ट्रेनला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

 • जळगाव-उधना दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे उद्घाटन.

अमेरिकेने अजित डोवल यांना सांगितलं, भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार
 • भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा भारताला पाठिंबा आहे असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. बोल्टन यांनी डोवल यांच्याबरोबर बोलताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले तसेच दहशतवादाविरुद्ध लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

 • मी अजित डोवल यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल अमेरिकेच्यावतीने मी दु:ख व्यक्त केले. भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा पाठिंबा असल्याचे त्यांना सांगितले असे जॉन बोल्टन म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा हे आम्ही आधीच पाकिस्तानला स्पष्ट केले आहे असे बोल्टन म्हणाले.

 • पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा व आश्रय देणे थांबवावे, असा इशारा अमेरिकेने पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दिला आहे. व्हाइट हाऊसने सांगितले, की पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान ठार झाल्याच्या घटनेचा अमेरिका तीव्र निषेध करीत आहे. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्स यांनी सांगितले, की पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा देणे व त्यांच्या देशातून कारवाया करण्यास मोकळे रान देणे या दोन्ही गोष्टी थांबवाव्यात. 

विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार - एम.एस.के. प्रसाद :
 • इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, बीसीसीआयने काल ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र आगामी विश्वचषकासाठीच्या संघात कोणाला जागा मिळणार यावरुन तयार झालेला संभ्रम अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौरा आणि २३ मार्चपासून सुरु होणारं आयपीएल लक्षात घेता, विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार असून गरजेनुसार खेळाडूंना संधी दिली जाईल असं स्पष्टीकरण निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी दिलं आहे.

 • “आम्ही विश्वचषकासाठी १८ संभाव्य खेळाडूंची यादी तयार केली आहे, आणि गरजेनुसार प्रत्येकाला संधी दिली जाईल. खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा मुद्दाही निवड समितीच्या चर्चेत आला असून यावर आयपीएलच्या संघमालकांशी बोलून तोडगा काढला जाईल.” ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केल्यानंतर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते.

 • विश्वचषक लक्षात घेता आयपीएलचे संघमालक आपल्या संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार का?? याबद्दल अद्याप ठोस काहीही निर्णय झाला नाहीये. मात्र याआधी भारतीय संघातल्या खेळाडूंनी अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल चिंता व्यक्त केली असल्यामुळे यावर उपाय शोधणं बीसीसीआयसाठी क्रमप्राप्त झालं आहे. २४ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

शिवछत्रपती पुरस्कारांचा वाद उच्च न्यायालयात :
 • शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यावर वाद आणि आरोप-प्रत्यारोप होण्याचे सत्र यावर्षीही कायम राहिले असून, यंदा एका जिमनॅस्टिक्स खेळाडूने दुसऱ्या खेळाडूवर खोटी कागदपत्रे सादर करून पुरस्कार लाटल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने शुक्रवारी तरी याचिकाकर्त्यां खेळाडूला कुठलाही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. मात्र त्याचवेळी प्रकरणाची दखल घेत जिमनॅस्टिक्स महासंघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांच्यासह राज्य सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

 • कलात्मक जिमनॅस्टिक्सची संधी डावलून तालबद्ध जिमनॅस्टिक्सला पुरस्कार दिल्याचा आरोप करत अक्षदा वावेकर या खेळाडूने दिशा निद्रेला जाहीर झालेल्या २०१७-१८च्या शिवछत्रपती पुरस्कारावर आक्षेप घेतला आहे. दिशा ही कनिष्ठ खेळाडू असूनही तिला वरिष्ठ खेळाडू म्हणून दाखवण्यात आले आणि हा पुरस्कारही जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी संभाव्य विजेत्यांची नावे संकेतस्थळांवरून प्रसिद्ध केली जातात. त्यावर सूचना-हरकती मागवल्या जातात. मात्र ही प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप वावेकरने केला आहे.

 • न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असता वावेकरच्या वकिलांनी पुरस्कारांमध्ये गैरप्रकार झाल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही या सगळ्या प्रकाराची दखल घेत राज्य सरकारला त्याबाबत विचारणा केली. त्यावर पुरस्कार प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार झालेला नाही, असा दावा सरकारतर्फे करण्यात आला.

पुलवामा हल्ला - केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक :
 • जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने आज(दि.16) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारकडून पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई, याबाबत तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

 • केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून यासाठी देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता संसदेच्या ग्रंथालयात ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या माध्यमातून या संकटकाळात संपूर्ण देश एकजूट असल्याचा संदेश दिला जाईल.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, झाशी येथील सभेत बोलताना पुलवामाचा बदला घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्यात आले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

 • १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.

 • १९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

 • १९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

 • १९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.

जन्म 

 • १८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

 • १८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९६६)

 • १९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९९८)

मृत्यू 

 • १९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

 • १९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)

 • १९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.

 • २०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.

 • २००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)