चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१९

Date : 16 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विराटचा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम :
  • अॅडलेड : विराट कोहलीनं अॅडलेडच्या वन डेत झळकावलेलं शतक टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरलं. भारतीय कर्णधाराचं वन डे कारकीर्दीतलं हे 39 वं शतक ठरलं. तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्व प्रकारातील विराटचं हे 11 वं शतक आहे.

  • ऑस्ट्रेलियात कोणत्याही खेळाडूला जमलं नाही ते विराटनं करुन दाखवलं आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा कारनामा विराटनं करुन दाखवला आहे. विराटने ऑस्ट्रेलियात 11 शतकं ठोकल इंग्लंडच्या डेविड गॉवरचा विक्रम मोडला आहे.

  • डेविडने ऑस्टलियात 9 शतकं झळकावली होती. इंग्लंडच्याच जॅक हॉब्सनेही ऑस्ट्रेलियात 9 शतकं ठोकली आहे. तर वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियन भूमीवर 8 शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विव रिचर्ड्स यांनी प्रत्येकी 7-7 शतकं ठोकली आहेत.

  • याशिवाय विराट सर्वात कमी सामन्यांमध्ये 39 शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 210 डावांमध्ये 39 शतकं झळकावली आहेत. तर सचिनने 39 शतकांचा पल्ला गाठण्यासाठी 350 डावांचा सामना करावा लागला होता.

  • टीम इंडियानं अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. तर रोहित शर्मा, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या साथीनं टीम इंडियानं हा विजय साजरा केला.

ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर :
  • मुंबई : केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही 2019 मधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवीन घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज ओबीसी समाजासाठी 700 कोटी रुपयांच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

  • मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजात काही प्रमाणात नाराजीची भावना असल्याचा सरकारचा समज आहे. त्यातच खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षणाचा कायदाही लवकरच महाराष्ट्रात लागू होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे समाजातील विविध घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

  • ओबीसी महामंडळाला 250 कोटी, भटक्या विमुक्त महामंडळाला 300 कोटी आणि वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेजचीही घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध योजनांना मान्यता देण्यात आली.

भारतात विमानांची निर्मिती करणार - सुरेश प्रभू यांची घोषणा :
  • मुंबई : भारतातील हवाई वाहतुकीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत असून, विमानांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी देशाला २,३०० विमानांची गरज भासणार आहे. या विमानांची निर्मिती देशातच व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात विमान निर्मिती करण्यासाठी सरकार योजना आखत असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल एव्हिएशन परिषदेत केली.

  • देशाच्या हवाई क्षेत्रासाठी लागणारी विमाने देशातच तयार करून, त्यांची दुरुस्ती व देखभालदेखील देशातच करण्यासाठी पुरेशी सुविधा पुरविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांचे सहकार्य घेतले जाईल. विमाने देशातच तयार झाल्यामुळे देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.

  • देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत १७ ते १८ टक्क्यांची वाढ झाली असून, हे क्षेत्र विस्तारत आहे. केवळ प्रवासी वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सरकार हवाईमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीवरदेखील लक्ष केंद्रित करत आहे. हवाई मालवाहतूक वाढविण्यासाठी नवीन धोरणाचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • ग्लोबल एव्हिएशन या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन हवाई वाहतूक मंत्रालय, एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया व फिक्की यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या परिषदेस केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, सचिव राजीव चौबे उपस्थित आहेत. याच परिषदेत ड्रोन धोरण, एअर कार्गो धोरण व २०४० पर्यंतचे व्हिजन जाहीर करण्यात आले.

अमेरिकेमध्ये ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना कामच नाही :
  • लॉस एंजिलीस/वॉशिंग्टन : सरकारचे कामकाज अंशत: बंद पडल्याचा ठपका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षावर ठेवला आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५.७ अब्ज डॉलरची मागणी करणारा ट्रम्प यांचा प्रस्ताव काँग्रेसमध्ये विरोधकांनी अडवून ठेवला आहे. अमेरिकेत अंशत: बंदचा हा २४ वा दिवस आहे.

  • ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले की, अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मी पाऊल मागे घेणार नाही. या अंशत: बंदमुळे महत्त्वाच्या विभागांच्या आठ लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाºयांकडे काम नाही. लुइसियानात शेतकरी मेळाव्यात बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘‘सरकार फक्त एका कारणामुळे बंद आहे... डेमोक्रॅटिक पक्ष सीमा सुरक्षा, आमची सुरक्षा, आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी पैसे देत नाही.’’

  • ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर गेल्या आठवड्यात केलेल्या दौºयाचा उल्लेख करून सांगितले की, दक्षिण सीमेवरून बेकायदेशीर विदेशी हे फक्त मेक्सिकोतूनच नव्हे, तर इतर देशांतूनही येत आहेत. १५० लोक बेकायदेशीरीत्या सीमेवरून अमेरिकेत आले होते. त्यात तीन लोक हे पाकिस्तानातून, चार मध्य पूर्वेतून आले होते. चीनमधून, तसेच संपूर्ण जगातून लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येतात, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी जे उपाय आवश्यक आहेत त्याला डेमोक्रॅटस् मान्यता देणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

  • यादरम्यान, वाहतूक सुरक्षा प्रशासनाने सांगितले की, विमानतळावर अनेक सुरक्षा स्क्रीनर रविवारी आणि सोमवारी कामावर आले नाहीत. राष्ट्रीय अनुपस्थिती दर गेल्या वर्षी याच दिवशी ३.२ टक्क्यांच्या तुलनेत ७.६ टक्के होता. 

मनु सॉनी यांची आयसीसीच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदी निवड :
  • इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) मनु सॉनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी निवड केली आहे. मनु सॉनी यांच्याकडे याआधी सिंगापूर स्पोर्ट्स हबचं सीइओपद होतं. तसंच ESPN स्टार स्पोर्ट्सचं मॅनेजिंग डायरेक्टरपदही भुषवलं. आता मात्र त्यांना आयसीसीने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे पद दिले आहे.

  • शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यानंतरचा एक मोठा हुद्दा असलेले पद पुन्हा एकदा भारतीय माणसाकडेच आलं आहे. मनु सॉनी यांच्याआधी आयसीसीचे चीफ एक्झिक्युटिव्ह पद हे डेव्हिड रिचर्डसन यांच्याकडे होते. मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपला असून या पदावर मनु सॉनी यांची निवड करण्यात आली आहे.

  • मनु सॉनी यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांची आयसीसीच्या या पदावर निवड झाल्याचा मला आनंद वाटतो आहे असे शशांक मनोहर यांनी म्हटले आहे.

चीनची ऐतिहासिक कामगिरी; चंद्रावर उगवले कापसाचे बियाणे :
  • चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनला चंद्रावर कापसाचे बियाणे उगविण्यात यश मिळाले आहे. चंद्रावर उगविण्यात आलेला हा जगातील पहिला जैविक घटक आहे. चीनच्या महत्वकांक्षी ‘चांग ई-४ ’ मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील पाठविण्यात आले होते. मात्र, यापैकी कापसाचे बियाणला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे ऐतिहासिक यश मानले जात आहे.

  • नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी चीनने ‘चांग ई -४’ हे यान पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या बाजूवर उतरविण्याचा कारनामा करून दाखविला होता. या महत्वकांक्षी मोहिमेसोबत चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरण पाठवून देण्यात आले होते. यानंतर लागलीच याठिकाणी पहिला जैवप्रयोग करण्यात आला.

  • ‘चांग ई -४’ या मोहिमेसोबत वैज्ञानिकांनी बकेट सारखा एक विशेष धातूचा डब्बा पाठवून दिला होता. यामध्ये माती, पाणी व हवेची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर कापूस, रेपसीड, बटाटा, अरबीडॉप्सिसच्या बियाणांबरोबर मधमाशांचे अंडे व किन्व पाठवून देण्यात आले होते. या घटकासोबत चंद्रावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये यश आले. इतर बियाणे वगळता फक्त कापूसाचे बियाणे उगविण्यास सुरूवात झाले आहे.

ओदिशामध्ये १५५० कोटींहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये १५५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. सदर प्रकल्प राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे या वेळी मोदी म्हणाले.

  • ओदिशातील संपर्कतेचा विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, शिक्षण आणि संपर्कता यामुळे समाजाच्या सर्व स्तरांचा वेगाने विकास होईल.

  • शिक्षण, संपर्कता, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना आपल्याला आनंद होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

  • ओदिशा राज्यास तिसऱ्यांदा भेट देत असताना मोदी यांनी झारसुगुडा-विजयानगरम आणि संबलपूर-अंगूल या ८१३ कि.मी.च्या आणि १०८५ कोटी खर्चाचा रेल्वेमार्ग विद्युतीकरण देशाला समर्पित केला.

  • त्याचप्रमाणे मोदी यांच्या हस्ते बारपाली-डुंगरीपाली या १४.२ कि.मी. आणि बालनगीर-देवगाव या १७.३ कि.मी.च्या दुपदरीकरणाचेही उद्घाटन करण्यात आले. संपर्कतेमुळे व्यापार, पर्यटनला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांनाही कृषीमाल मंडयांपर्यंत नेणे शक्य होईल, असे मोदी म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

  • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.

  • १९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.

  • १९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.

  • १९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.

  • १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

  • १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.

  • १९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)

  • १९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)

मृत्यू 

  • १९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी१८४२)

  • १९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)

  • १९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.