चालू घडामोडी - १६ जुलै २०१८

Date : 16 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या किरण बेदी ट्विटरवर झाल्या ट्रोल :
  • नवी दिल्ली - फिफा विश्वचषकाला दुसऱ्यांदा गवसणी घालणाऱ्या फ्रान्सच्या संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे. भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही फ्रेंच संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र ऐतिहासिक संदर्भ देत फ्रान्सचे अभिनंदन करणाऱ्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी ट्विटरवर ट्रोल होत आहे.

  • त्याचे झाले असे की, इतरांप्रमाणेच किरण बेदी यांनीही फ्रान्सचे अभिनंदन करणारे ट्विट केले. मात्र या ट्विटमध्ये त्यांनी पुदुच्चेरीमध्ये एकेकाळी असलेल्या फ्रेंच वसाहतीचा उल्लेख करत पुदुच्चेरीच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या.  

  • आम्ही पुदुच्चेरीच्या रहिवाशांनी (जे पूर्वी फ्रेंच वसाहतीचा भाग होते) विश्वचषक जिंकला आहे. अभिनंदन मित्रांनो. फ्रान्सचा संघ मिश्रित होता. खेळ हा सर्वांना जोडण्याचे काम करतो, असे ट्विट बेदी यांनी केले. मात्र हे ट्विट नेटीझन्सना फारसे रुचले नाही. त्यांनी बेदी यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

  • एका ट्विटर युझरने लिहिले की मॅडम आम्ही सारे भारतीय आहोत. तुम्ही तुमचे हे पब्लिसिटी स्टंट थांबवण्याची गरज आहे.

भारतात २५ टक्के मृत्यू होतात हृदयरोगामुळे :
  • नवी दिल्ली : भारतात २०१५ मधील मृत्यूंच्या २५ टक्के प्रकरणात हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे आजार कारण असून मोठ्या प्रमाणात ग्रामीण लोकसंख्या आणि तरुणांना हा विकार लक्ष्य करत असल्याचे एका अध्ययनात म्हटले आहे. टोरंटो येथील सेंट माइकल हॉस्पिटलच्या सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चचे संचालक प्रभात झा यांच्या नेतृत्वात झालेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे.

  • या अध्ययनात म्हटले आहे की, देशातील ग्रामीण भागात ३० ते ६९ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या संकुचित होण्याचे प्रकार दिसून येत आहेत. यातून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. २००० ते २०१५ या काळात शहरी भागात समोर आलेल्या प्रकरणांपेक्षा ग्रामीण भागातील प्रकरणे अधिक आहेत.

  • याउलट ब्रेन स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारताच्या पूर्वोत्तर भागात यात वृद्धी झालेली दिसून येत आहे. या राज्यांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे होणाºया मृत्युंचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या जवळपास तीन पट अधिक आहे. झा म्हणाले की, यातील अनेक मृत्यू हे घरीच होतात.

फिफा विश्वचषक स्पर्धेवर ‘फ्रेंच किस’, फ्रान्सचे दुसरे जगज्जेतेपद :
  • मॉस्को : ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकावत झुंजार क्रोएशियाला ४-२ असे नमवले. सामन्याच्या १८व्या मिनिटाला क्रोएशियाला स्वयंगोलचा फटका बसला आणि यानंतर फ्रान्सने जबरदस्त वर्चस्व राखले.

  • महिनाभर रंगलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणेच धडाकेबाज रंगला. फ्रान्सने आक्रमक खेळ करत आपला इराद स्पष्ट केला. परंतु, त्यांना आक्रमक खेळानेच प्रत्युत्तर देताना क्रोएशियाने पुन्हा एकदा झुंजार खेळाचे प्रदर्शन केले.

  • हॉलिवूड स्टार्सच्या शानदार सादरीकरणाने दिमाखात पार पडलेल्या समारोप सोहळ्यानंतर लुझनिकी स्टेडियमवर दर्जेदार खेळाचा धडाका झाला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पॉल पोग्बा, अँटोइन ग्रीझमन, कायलियन एमबाप्पे या स्टार्स खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, त्याचवेळी फ्रान्सला क्रोएशियाच्या झुंजार खेळाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा पिछाडीवरुन पुनरागमन करताना क्रोएशियाने फ्रान्सला झुंजवले.

  • १८व्या मिनिटाला स्वयंगोलचा फटका बसल्याने क्रोएशिया पिछाडीवर पडले. यावेळी मिळालेल्या फ्री किकवर फ्रान्सच्या ग्रीझमनने अचूक किक मारत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दिली. मात्र उडी मारलेल्या मारिओ मँडझुकीचच्या डोक्याला चेंडू लागून थेट गोलजाळ्यात गेला. यावेळी फ्रान्सच्या पाठिराख्यांनी मोठा जल्लोष केला खरा, पण त्यांचा आनंद फारवेळ टिकला नाही.

मराठी बोलणाऱ्यांची संख्या ८.३० कोटी :
  • नवी दिल्ली : संस्कृत भाषा फारशी वापरली जात नाही असा समज असला तरी २०११ च्या जनगणनेनुसार संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या दहा वर्षांत दहा हजारांनी वाढली असून ही वाढ ७१ टक्के आहे. देशातील ८.३० कोटी लोक मराठी बोलणारे असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या देशाच्या ६.८६ टक्के आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या २००१ मध्ये ७.१९ कोटी होती. मराठी बोलणाऱ्यांची संख्या पंधरा टक्के वाढली आहे.

  • हिंदी बोलणाऱ्या लोकांची संख्या २००१-११ दरम्यान १० कोटींपेक्षा अधिक वाढली असून बंगाली भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येत १.१० कोटींची वाढ झाली आहे. २०११ च्या जनगणनेचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले असून  २००१ मध्ये १४,१३५ जणांनी संस्कृत ही मातृभाषा असल्याचे सांगितले ते प्रमाण २०११ मध्ये २४,८२१ झाले आहे. भारताच्या १२१ कोटी लोकसंख्येत ०.००१९८ टक्के लोक संस्कृत बोलणारे आहेत. हिंदी बोलणारे ५२.८३ कोटी लोक असून त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या ४३.६३ टक्के आहे.

  • २००१ मध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ४२.२० कोटी होती. बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या ९.७२ कोटी असून ते प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ८.०३ टक्के आहे. बंगाली बोलणाऱ्यांची संख्या १० वर्षांपूर्वी ८.३३ कोटी होती.

  • तेलगु, तामिळ व गुजराती बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ८.११ कोटी, ६.९० कोटी, ५.५४ कोटी आहे. त्यांची संख्या २००१ मध्ये ७.४० कोटी, ६.०७ कोटी, ४.६० कोटी होती. उर्दू, कन्नड व ओडिया भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ५.०७ कोटी, ४.३७ कोटी व ३.७१ कोटी होती. २००१ मध्ये त्यांची संख्या ५.१५ कोटी, ३.७९ कोटी व ३.३० कोटी होती. मल्याळम, पंजाबी, आसामी बोलणाऱ्यांची संख्या २०११ मध्ये ३.४८ कोटी, ३.३१ कोटी व १.५३ कोटी होती तर २००१ मध्ये ती ३.३० कोटी, २.९१ कोटी, १.३१ कोटी होती.

भारतीय वंशाच्या डॉक्टरचा लंडनमध्ये सन्मान :
  • लंडन : रुग्णांच्या शुश्रूषा करण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल काश्मिरा सांगळे या महाराष्ट्रातील फिजिओथेरपिस्टचा इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेतर्फे (एनएसएस) सन्मान करण्यात आला. आता भारतात रुग्णांचे पुनर्वसन व रोजगारासाठी केंद्र उभारण्याचा त्यांचा निर्धार आहे.

  • सांगळे या २००३ मध्ये महाराष्ट्रातून लंडनला गेल्या. तेथे त्यांनी रुग्णसेवा केली. गेल्या महिन्यात ७० जणांमधून वैद्यकीय सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. व्हीलचेअरवरील रुग्णांच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी सांगळे यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले आहे.

  • भारतातही अपंग रुग्णांची हेळसांड थांबावी यासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मणक्याची दुखापत तसेच रस्ते अपघातामध्ये जखमी होऊन अंथरुणावरच असलेल्यांसाठी पुनर्वसन तसेच रोजगार केंद्र सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे. याद्वारे समाजात त्यांना सन्मानाने जगता येऊन मुख्य प्रवाहात सामील होता यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. या केंद्राद्वारे रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

  • तिशीच्या आसपास असलेल्या सांगळे यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार रुग्णांनाच अर्पण केला आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकता येते त्यातून नवे काही तरी करण्याची ऊर्मी मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. सांगळे या इंग्लंडमध्ये असल्या तरी मायदेशी सातत्याने संपर्कात असतात. व्हीलचेअर रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सातत्याने त्यांचे चिंतन सुरू असते. त्यात सुधारणा करून अपंगांचे जीवन कसे सुसह्य़ करता येईल असा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. १९४० पासून लंडनमध्ये जे स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी हा मानाचा विंडरश पुरस्कार दिला जातो.

‘एक देश, एक निवडणूक’ला माझाही पाठिंबा - रजनीकांत :
  • चेन्नई (तामिळनाडू) : ‘एक देश, एक निवडणूक’ला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत सुपरस्टार रजनीकांत यांनी एकत्र निवडणुका घेण्यास पाठिंबा दिला आहे. एकत्र निवडणुका झाल्यास पैसे आणि वेळ वाचण्यास मदत होईल, असेही रजनीकांत म्हणाले.

  • याआधीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, तसेच दस्तुरखुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यावर विचार व्हायला हवा, असे वक्तव्य केले होते.

  • राष्ट्रपती काय म्हणाले होते - 29 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केलेल्या अभिभाषणात म्हटले होते, “देशाच्या प्रत्येक भागात सुरु असलेल्या निवडणुकांमुळे त्याचा शासन व्यवस्थेवर परिणाम होत आहे. सलगच्या निवडणुकांमुळे मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

  • शिवाय, निवडणुकांच्या निमित्ताने आचार संहिता लागू होण्याने विकासाच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधासभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासंदर्भात सर्वांनी, गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. तसेच यावर सर्व पक्षांचं एकमत व्हावं,”

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.

  • १९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.

  • १९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.

  • १९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

  • १९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.

  • १९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

जन्म 

  • १७२३: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ – लंडन, इंग्लंड)

  • १९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९९६)

  • १९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)

  • १९१७: नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९७८)

  • १९२३: भूदल प्रमुख जनरल के. व्ही. कृष्णराव यांचा जन्म.

  • १९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ यांचा जन्म.

  • १९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

  • १९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी २०१०)

  • १९६८: भारतीय हॉकी पटू धनराज पिल्ले यांचा जन्म.

  • १९६८: विकिपीडियाचे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा जन्म.

  • १९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक यांचा जन्म.

  • १९८३: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३४२: हंगेरीचा राजा चार्ल्स (पहिला) यांचे निधन.

  • १८८२: अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरीटॉड लिंकन यांचे निधन.

  • १९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)

  • १९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ यांचे निधन.

  • १९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे निधन

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.