चालू घडामोडी - १६ जून २०१८

Date : 16 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी :
  • मुंबई - खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. तसा आदेश शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केल्याने कॉलेज बंक करण्यास चाप बसेल व महाविद्यालयांशी हातमिळवणी करून ‘इंटिग्रेटेड’ क्लासेस चालविणाऱ्यांना वेसण घातली जाईल.

  • ही योजना यंदा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या विभागांतील ज्युनिअर कॉलेजांत (विज्ञान शाखा) सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री एका महिन्यात गोळा करायची आहे. अंमलबजावणीचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी सरकारला सादर करायचा आहे. महाविद्यालयांना अचानक भेट देऊन हजेरीचा आढावा घ्यायचा आहे. अंमलबजावणी न करणाºयांवर कार्यवाही केली जाणार आहे.

  • विज्ञान शाखेचे विद्यार्थी क्लासमध्ये जाण्यासाठी नियमित वर्गांना हजर न राहता फक्त प्रात्यक्षिकांना हजर राहतात, असे निदर्शनास आले. काही महाविद्यालयांनी तर क्लासेसशी करार केला आहे. त्यास आळा घालण्यासाठी सरकारने ‘बायोमेट्रिक’चा निर्णय घेतला आहे.

  • क्लास-कॉलेजचे टायअप तोडा आपल्या क्लासमध्येच बायोमेट्रिक मशीन्स बसवून तेथील हजेरी कॉलेज प्रशासनास देतील आणि तीच हजेरी महाविद्यालये दाखवतील, अशी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्लासेस व कॉलेज प्रशासन यांच्यातील टायपअ तोडण्यात यावे, प्रसंगी अशा कॉलेजेसची मान्यता रद्द करावी, असे महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने म्हटले आहे.

देशभरात ईदचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या शुभेच्छा :
  • मुंबई : आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद. भारतात शनिवारी ईद साजरी केली जाईल, अशी घोषणा दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, इमाम बुखारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली. शुक्रवारी रात्री 7.35 च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्याचं इमाम बुखारी यांनी सांगितलं.

  • ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली.

  • मुंबईसह देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या मिनारा मशिदीतही नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.

  • राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात ते म्हणाले की, "ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व मुस्लीम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. रोजानंतर पवित्र रमजान महिन्याचा उत्सहाने समारोप होत आहे. समाजात बंधुभाव आणि सामंज्यस वाढो, अशी प्रार्थना करतो."

सांगलीची वैशाली पवार 'मिसेस इंडिया'ची मानकरी :
  • सांगली : ‘मिसेस इंडिया’च्या किताबावर सांगलीच्या वैशाली पवारने नाव कोरलं आहे. मिसेस वर्ल्ड स्पर्धेसाठी आता वैशालीची निवड झाली आहे.

  • दिल्लीतील ‘किंग्डम ऑफ ड्रीम्स’मध्ये चार दिवस 'मिसेस इंडिया' ही स्पर्धा रंगली होती. वैशाली ही मूळची सांगलीकर असून कर्नाटकातील बंगळुरु हे तिचं सासर आहे.

  • 'मिसेस इंडिया'च्या अंतिम फेरीत पोहचण्यासाठी विविध फेर्‍यांमध्ये तिने चुणूक दाखवली. या स्पर्धेच्या मुलाखतीमध्ये प्रेक्षणीय वारसा स्थळांच्या संरक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनावर विशेष भर आवश्यक असल्याचे तिने सांगितले. यामध्ये तिला सर्वाधिक गुण मिळाले.

  • 2016 मध्ये 'मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन' या सौंदर्य स्पर्धेचा मुकूट वैशालीने पटकवला होता. 'मिसेस इंडिया वर्ल्डवाईड' मध्येही वैशालीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

पीडीएफ फॉरमॅटमधील नोटीस व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविणे वैध - उच्च न्यायालय :
  • मुंबई : पीडीएफ फॉरमॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कंपनीने पाठविलेली नोटीस प्राप्तकर्त्याला मिळाली असून, त्याने ती वाचल्याने उच्च न्यायालयाने ती वैध असल्याचे नुकतेच म्हटले आहे.

  • मुंबईचे रोहित जाधव नोटीस घेत नसल्याने एसबीआय कार्ड््स अँड पेमेंट्स सर्व्हिसेस प्रा.लि.च्या अधिकृत अधिकाऱ्याने त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर नोटीस पाठविली.

  • ‘प्रतिवाद्याने मेसेज, वाचल्याचे आयकॉन इंडिकेटरवरून स्पष्ट होते,’ असे न्या. गौतम पटेल यांनी म्हटले. प्रतिवाद्याने कंपनीचे कॉल घेणे बंद केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याचा पत्ता पुढील सुनावणीस देण्याचे निर्देश न्यायलयाने कंपनीला दिले. त्यामुळे न्यायालय प्रतिवाद्यावर वॉरंट काढू शकेल.

एसटीची भाडेवाढ लागू, आजपासून प्रवास महागला :
  • मुंबई - वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच त्यात आता एसटी भाडेवाढीची भर पडली आहे. वाढते इंधन दर आणि प्रशासकीय खर्चामुळे एसटी महामंडळाने आजपासून तिकीट दरांत १८ टक्के भाडेवाढ लागू केली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटात तब्बल २४ ते १२९ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबई-पुणे शिवनेरीचा प्रवास ८३ रुपयांनी महागला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी प्रवासासाठी आता ४४७ रुपयांऐवजी ५३० रुपये मोजावे लागणार आहेत.

  • सुट्ट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी भाडे आकारणी पाचच्या पटीत होईल. यानुसार दोन प्रवासी टप्प्यांवरील तिकीट दर ८ रुपये असल्यास १० रुपये आकारण्यात येणार आहेत. तिकीट दरवाढीचा फटका राज्यातील सुमारे ७० लाख प्रवाशांना बसणार आहे. शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या पासवरदेखील भाडेवाढीचा परिणाम होईल. वाढत्या इंधन दरामुळे नाइलाजाने तिकीट दरवाढ करण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

  • भाडे वाढल्यामुळे शिवशाहीने खासगी बसच्या दरांची बरोबरी केल्याचे चित्र आहे. मुंबई-पुणे शिवशाही तिकिटासाठी २९० रुपये तर खासगी बस ३०० रुपये आकारते. मुंबई-रत्नागिरी मार्गावर शिवशाहीसाठी ५४० रुपये तर खासगी बससाठी ४५० ते ६०० रुपये मोजावे लागतात.

बजरंग दल आणि विहिंप धार्मिक कट्टरतावादी संघटना - सीआयए :
  • नवी दिल्ली: अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील त्या-त्या देशातील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या संघटनांना ‘धार्मिक कट्टरतावादी संघटना (militant religious organization)  म्हणून घोषित केलं आहे.

  • तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (nationalist organization) असं म्हटलं आहे. दरम्यान, सीआयएने कट्टरतावादी संबोधल्यामुळे बजरंग दल आणि विहिंपने कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. कट्टरतावादी हा शिक्का हटवा अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा या संघटनांनी सीआयएला दिला आहे.

  • सीआयएने जाहीर केलेल्या भारताच्या यादीत सात संघटनांचा समावेश आहे. त्यांना विविध श्रेणी देण्यात आल्या आहेत.

  • यामध्ये जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समावेश केला आहे.

  • ‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा वार्षिक अहवाल आहे. या अहवालात जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे.

  • यामध्ये विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा समावेश असतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

  • १९११: न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

  • १९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

  • १९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

  • १९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

  • १९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

  • १९९९: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.

  • २०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

जन्म 

  • १७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

  • १९२०: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)

  • १९३६: प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

  • १९५०: भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

  • १९६८: आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

  • १९९४: गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८६९: भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७९५)

  • १९२५: बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

  • १९३०: गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १८६०)

  • १९४४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

  • १९७१: बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८८९)

  • १९७७: मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१२)

  • १९९५: मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमतीतथा माई मंगेशकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.