चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जून २०१९

Date : 16 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विखे, शेलार, क्षीरसागर यांच्यासह १३ जणांनी घेतली शपथ :
  • गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज रविवारी अखेर पार पडला आहे. १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला.

  • लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कमळ हाती घेणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई महापालिका आणि आताच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देण्यास हातभार लावणारे आशिष शेलार आणि बीडमधील शिवसेना आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी सर्वात आधी शपथ घेतली.

  • विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या फडणवीस सरकारच्या या अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, प्रा. डॉ. अशोक उईके यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे विश्वासू परिणय फुके यांची वर्णी लागली आहे.

मेट्रोसाठी आता देशभरात ‘वन मेट्रो वन कार्ड’ :
  • मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.

  • काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

  • पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परदेशी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टची फोटो प्रत द्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे मोठे आव्हान - पंतप्रधान :
  • सन २०२४ पर्यंत भारताची अर्तव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत (५ लाख कोटी डॉलर) पोहोचवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हे ध्येय गाठणे आव्हानात्मक असले तरी प्राप्त करण्यासारखे आहे. त्यासाठी राज्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याची भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निती आयोगाच्या शनिवारी झालेल्या पाचव्या बैठकीत मांडली. या बैठकीला देशातील सर्व राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांना हजेरी लावली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे अनुपस्थित होते.

  • मोदी म्हणाले, आगामी काळात सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाची अंमलबजावणी करण्यात निती आयोग महत्वाची भुमिका बजावेल. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भारताच्या विकासासाठी आता प्रत्येकाने काम करण्याची वेळ आली आहे. देशातील गरीबी, बेरोजगारी, दुष्काळ, अन्न, प्रदुषण, भ्रष्टाचार आणि हिंसाचार या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

  • सन २०२४ पूर्वी भारताला ५ ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. हे मोठे आव्हान आहे मात्र ते गाठता येऊ शकते. यासाठी राज्यांनी त्यांची मूळ क्षमता ओळखून जिल्हा स्तरावर जीडीपीचे टार्गेट वाढवण्यासाठी काम करायला हवे, अशी अपेक्षा यावेळी मोदींनी व्यक्त केली.

ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी :
  • इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.

  • ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी ४५० अर्ज आले होते. ही संख्या आता ६५० वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.

  • याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत. यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

  • तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.  २०१४ पासून टेक नेशन व्हिसासाठी एक हजार ६५०हून अधिक अर्ज आले होते.

  • आजही जगभरातील प्रज्ञावंतांचा ओढा हा ब्रिटनकडेच आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थांचे त्यासाठी आभार मानावे लागतील. याचबरोबर आर्थिक सुविधा, संशोधनाची प्रदीर्घ परंपरा याचाही यात मोलाचा वाटा आहे

भारत पाकिस्तान सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार का? काय सांगितलंय इंग्लंडच्या हवामान विभागानं :
  • लंडन : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आज (रविवारी) होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मॅन्चेस्टरच्या मैदानावर एकमेकांशी भिडणार आहेत. जगभरातील करोडो क्रिकेट फॅन्सची नजर या सामन्यावर आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

  • इंग्लंडमधील हवामान विभागाने मॅन्चेस्टरमध्ये आज पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. कालही (मॅन्चेस्टरमध्ये ) पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, भारताअगोदर मॅन्चेस्टरमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाला इनडोअर सराव करावा लागला आहे. भारतीय संघानेदेखील काल (शनिवारी)इनडोअर सराव केला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आमचे संघ पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले आहे.

  • दरम्यान, मॅन्चेस्टरमध्ये शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसामुळे मैदानात पाणी साचले होते. अद्याप पावसाची स्थिती कायम आहे. या पावसामुळे भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण व्यक्त केली जात आहे.

  • भारत पाकिस्तान सामन्यातील दबावाबाबत माध्यमांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विचारले असता विराट म्हणाला की, आमच्या संघावर कोणताही दबाव नाही. संघातील सर्व खेळाडू सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीची सुरवात झाली.

  • १९११: न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग (आय. बी. एम.) कंपनीची स्थापना.

  • १९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.

  • १९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

  • १९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला अंतराळयात्री बनली.

  • १९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

  • २०१०: तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.

जन्म 

  • १७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अ‍ॅडम स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १७९०)

  • १९२०: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)

  • १९३६: प्रसिद्ध ऊर्दू कवी अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयार यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)

  • १९५०: भारतीय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म.

  • १९६८: आम आदमी पार्टी चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

  • १९९४: गायिका आर्या आंबेकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८६९: भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक चार्ल्स स्टर्ट यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७९५)

  • १९२५: बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

  • १९३०: गॅरोकोम्पास चे सहसंशोधक एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १८६०)

  • १९४४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ मास्टर ऑफ नायट्रेटस उर्फ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट१८६१)

  • १९७१: बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८८९)

  • १९७७: मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९१२)

  • १९९५: मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमतीतथा माई मंगेशकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.