चालू घडामोडी - १६ मार्च २०१९

Date : 16 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
यूएस व्हिसाच्या अर्जासाठी ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं का गरजेचं असतं :
  • प्रश्न: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं आणि ते अपडेट करणं गरजेचं का असतं?

  • उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना http://www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन प्रोफाईल तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही नॉनइमिग्रंट किंवा इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करत असल्यास या प्रोफाईलमुळे व्हिसा प्रक्रियेसाठी लागणारी अचूक माहिती मिळते. दूतावासाकडून पासपोर्ट मिळवताना, संवाद साधला जात असताना ऑनलाइन प्रोफाईलची मदत होते. 

  • ऑनलाइन प्रोफाईलमध्ये तुम्हाला संपर्काचा तपशील, पासपोर्टची माहिती, मुलाखतीची तारीख आणि वेळ, कागदपत्रं गोळा करण्यासंदर्भातील आणि इतर माहिती द्यावी लागते. ऑनलाइन प्रोफाईलमुळे व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर (व्हीएसी,) दूतावास यांच्यात आवश्यक ताळमेळ राखला जातो. यामुळे तुमच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ होते. 

  • तुम्ही पहिल्यांदा अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करत असाल, तर न्यू युजर हा पर्याय निवडा. आधी व्हिसासाठी अर्ज केलेला असल्यास आधीच तयार करण्यात आलेल्या प्रोफाईलवर लॉग इन करा. तुम्हाला प्रत्येकवेळी तुमची सर्व माहिती भरण्याची गरज नाही. मात्र तुम्ही कशासाठी अमेरिकेला जात आहात, याबद्दलची माहिती भरुन प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. याशिवाय तुमचा सध्याचा संपर्क तपशील देणंदेखील आवश्यक आहे.  

मसूदबाबत आधी भारत एकटा - आता जागतिक पाठिंबा :
  • जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावामध्ये चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये खोडा घातला ते राजनैतिक अपयश असल्याची टीका करणाऱ्या नेत्यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुनावले आहे. हा प्रस्ताव संपुआच्या राजवटीत प्रथम २००९ मध्ये देण्यात आला तेव्हा भारत एकाकी होता, मात्र आता २०१९ मध्ये भारताला जागतिक पाठिंबा मिळत आहे, असे स्वराज यांनी म्हटले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्बल आहेत, ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना घाबरतात, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर स्वराज यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे. मसूद अझरबाबतची वस्तुस्थिती जनतेला कळावी, ही आपली इच्छा असल्याचे स्वराज यांनी ट्वीट केले आहे. सदर प्रस्ताव चार वेळा मांडण्यात आला. संपुआच्या राजवटीत २००९ मध्ये भारत एकटा होता, मात्र २०१६ मध्ये भारताच्या प्रस्तावात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन सहप्रायोजक होते, तर २०१७ मध्ये अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने प्रस्ताव मांडला.

  • अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने २०१९ मध्ये मांडलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेतील १५ पैकी १४ देशांनी पाठिंबा दिला. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इटली आणि जपान हे सहप्रायोजक आहेत, असे स्वराज यांनी ट्वीट केले आहे.

आकडेवारीतील राजकीय हस्तक्षेप धोकादायक :
  • आपल्याला अनुकूल नसलेली आकडेवारी दाबून टाकण्याचा राजकीय पातळीवरील सध्या जो कल आहे त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन १०८ अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे सर्व अर्थतज्ज्ञ आणि सांख्यिकींना केले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे भारताच्या सांख्यिकी क्षेत्राच्या कीर्तीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तडा जात असल्याचे सूचित करून अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी वरील आवाहन केले आहे.

  • एखाद्या आकडेवारीमुळे सरकारच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे लक्षात येताच अशा आकडेवारीची संशयास्पद पद्धतीने फेररचना केली जाते अथवा ती दाबली जाते, असे निवेदनामध्ये म्हटले आहे. यासाठी फेरआढावा घेऊन २०१६-१७च्या जीडीपी वृद्धिदरामध्ये करण्यात आलेली वाढ, जीडीपीमध्ये नीति आयोगाने केलेला हस्तक्षेप आणि २०१७-१८चा कामगार पाहणी अहवाल सरकारने रोखून ठेवला आदी उदाहरणे देण्यात आली आहेत.

  • अर्थतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी विद्यमान आणि भविष्यातील प्रशासनांवर सर्व स्तरावर प्रभाव टाकून सार्वजनिक आकडेवारीचा प्रामाणिकपणा पुनस्र्थापित करावा, सांख्यिकी संस्थांचे स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा पुनस्र्थापित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अलाहाबाद विद्यापीठाचे जीन ड्रेझ, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे आर. नागराज, जेएनयूचे अभिजित सेन, जयती घोष, कोलंबिया विद्यापीठाचे अमर्त्य लाहिरी आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाचे जेम्स बॉयस आदी अर्थशास्त्रज्ञांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

इस्रायलनं गाझावर केला एअर स्ट्राइक, १०० ठिकाणी टाकल्या मिसाइल :
  • जेरुसलेमः इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये 100 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. इस्रायलनं ही कारवाई राजधानी तेल अविववर झालेल्या 4 रॉकेट हल्ल्यानंतर केली आहे. त्यातील 3 रॉकेट इस्रायलच्या रॉकेट डिफेन्स सिस्टीमनं  निष्क्रिय केले. एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या विमानांनी हमासच्या सुरक्षा चौक्यांवर मिसाइल डागल्या असून, इस्रायलनेच याची माहिती सार्वजनिक केली आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार, त्यांनी हमासच्या 100 लष्करी तळांना टार्गेट केले आहे. हे एअर स्ट्राइक दक्षिणी गाझाच्या खान युनिस भागात करण्यात आलं आहे. हे ठिकाण गाझाच्या राजधानीपासून 25 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे.

  • इस्रायलची राजधानी तेल अविववर 2014नंतर पहिल्यांदाच रॉकेटनं हल्ला करण्यात आला. 9 एप्रिलला इस्रायलमध्ये निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर इस्रायल सेनेनं ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी भारतानंही 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

  • बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांना भारताच्या एअर स्ट्राइकमधून लक्ष्य करण्यात आलं होतं. ज्यात 200हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. या हल्ल्यातही इस्रायलकडून खरेदी करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयानं 54 इस्रायली HAROP ड्रोन खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भारत आणि इस्रायलमधील संबंध आणखी वृद्धिंगत झाले असून, भारताला आत्मविश्वासही कमालीचा दुणावला आहे. 

महाराष्ट्रात १ कोटी १९ लाख तरुण प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क, राज्यात ८ कोटी ७३ लाख मतदार :

 

  • मुंबई : मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील  1 कोटी 19 लाख 95 हजार 27 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत.

  • महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे. राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणा-या तरूणांची संख्या 1 कोटी 19 लाख95 हजार 27  आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 15कोटी 6लाख 4हजार 824 आहे.

  • मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी 4 कोटी  16 लाख महिला मतदार - मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत 911 महिला मतदार असे आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी  4 कोटी 57लाख 1 हजार 877 पुरुष तर  4 कोटी 16 लाख 25 हजार 950 महिला मतदार आहेत. राज्यात 2 हजार 83 नोंदणीकृत तृतीय पंथी मतदार आहेत.

  • एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्ये मागे 710 नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण 95 हजार 475 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.

न्यूझीलंडमधील भारतीय शत्रूच, हल्लेखोराने लिहिली होती पोस्ट :
  • न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे. या ७४ पानी जाहीरनाम्यात भारत, चीन आणि टर्कीचा उल्लेख असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी ठरवले आहे. भारत, चीन आणि टर्की हे तीन आक्रमणकारी देश असून पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

  • ‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून हे आक्रमणकारी कुठून आले किंवा कधीही आले असतील तरी त्यांना युरोपच्या भूमीवरुन हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे असे टॅरॅन्टने त्याच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

  • टॅरॅन्टने शुक्रवारी दोन मशिदींमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दोन भारतीय जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. प्रश्न, उत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्ष आधी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राईस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली असे या दहशतवाद्याने म्हटले आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी हा काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही असे म्हटले आहे.

  • संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात तीन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली. ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली.

  •  

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

  • १९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

  • १९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

  • १९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.

  • २००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

जन्म 

  • १६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १७६६)

  • १७५०: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १८४८)

  • १७५१: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १८३६)

  • १७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८५४)

  • १९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८१)

  • १९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९५२)

  • १९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

  • १९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

  • १९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४५: अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन. (जन्म: १३ जून १८७९)

  • १९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८५५)

  • १९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.