चालू घडामोडी - १६ मे २०१८

Date : 16 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले कर्नाटकच्या जनतेचे आभार :
  • कर्नाटकात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपा कर्नाटकात सत्ता आणू शकेल की नाही हा पेच अद्याप कायम आहे. कारण निवडणूक निकालानंतर जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी युती करत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्तेचा पे कायम आहे.

  • असे असले तरीही १०४ जागांवर विजय मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत.

  • कर्नाटक विधानसभा निवडणूक ही काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. निवडणूकपूर्व भाजपाला झुकते माप दिले नव्हते. मात्र निकालाच्या दिवशी सकाळपासूनच भाजपाने मोठी आघाडी घेतली. ती संध्याकाळपर्यंत कायम राहिली.

  • भाजपाला १०४ जागा मिळाल्या आहेत मात्र पूर्ण बहुमत मिळू शकलेले नाही. आता कर्नाटकात काय राजकीय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असे असले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत.

‘मॅक्स थंडर’मुळे उत्तर कोरिया नाराज; द. कोरियासोबतची उच्चस्तरीय बैठक केली रद्द :
  • परस्परांचे शेजारी आणि पक्के वैरी असणारे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांदरम्यान होणारी उच्चस्तरीय बैठक उत्तर कोरियाने रद्द केल्याचे वृत्त आहे. यामागे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये होणाऱ्या ‘मॅक्स थंडर’ या दोन्ही देशांच्या हवाई दलाचा संयुक्त लष्करी सराव कारणीभूत मानले जात आहे.

  • उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे यांच्यात गेल्या महिन्यांत झालेल्या बैठकीतील चर्चा पुढे नेण्यासाठी नवी बैठक होणार होती. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात होणारी बहुप्रतिक्षित शिखर बैठक रद्द करण्याची धमकीही उत्तर कोरियाने दिली आहे. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहाप ने ही माहिती दिली आहे. दरम्यान, ट्रम्प आणि जोंग यांच्यात येत्या १२ जून रोजी सिंगापूर येथे बैठक होणार आहे.

  • तर दुसरीकडे ही बैठक रद्द करण्याच्या धमकीदरम्यान अमेरिकेने म्हटले आहे की, आम्ही शिखर बैठकीची तयारी करीत आहोत. दोन्ही देशांमध्ये ही बैठक यशस्वी होईल, अशी आशा अमेरिकेने वर्तवली आहे.

निवृत्तिवेतनासाठी आधारची सक्ती नाही- जितेंद्र सिंह :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही, असे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

  • स्वयंसेवी संस्थांच्या तिसाव्या बैठकीत त्यांनी सांगितले, की बँकेस भेट न देता जिवंत असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक अतिरिक्त सुविधा म्हणून आधारचा वापर केला जावा अशी अपेक्षा आहे, पण आधार कार्ड अनिवार्य नाही. बँक खात्याला आधार जोडलेले नसल्यामुळे अनेक वृद्धांना निवृत्तिवेतन मिळत नाही अशी तक्रार असून, या बाबत आता मंत्र्यांनीच खुलासा केल्याने संभ्रम दूर झाला आहे.

  • सिंह यांनी सांगितले, की सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासाठी आधार कार्डची सक्ती केलेली नाही. केंद्र सरकारचे ४८.४१ लाख कर्मचारी असून ६१.१७ लाख निवृत्तिवेतनधारक आहेत.

  • किमान निवृत्तिवेतन मर्यादा आता ९००० रुपये करण्यात आली आहे, तर अंशदान हे २० लाखांपर्यंत ठेवले आहे. वैद्यकीय भत्ता महिना १००० रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. सातत्यपूर्ण उपस्थिती भत्ता ४५०० रुपयांवरून ६७५० रुपये करण्यात आला आहे.

संगीततज्ज्ञ पं. म. ना. कुलकर्णी यांचे निधन :
  • पुणे : ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. मधुसूदन नारायण ऊर्फ म. ना. कुलकर्णी (८८) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.

  • बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘मनातल्या भावकळ्या’ या भावगीतांच्या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली होती. ‘मुलाफुलांची गाणी’ आणि ‘सायसाखरेची गाणी’ या बालगीतांच्या लोकप्रिय कार्यक्रमांसह ‘सूर शब्द लहरी’ या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाची निर्मितीही त्यांनी केली होती.

  • स्वामी विवेकानंद यांचे गीतरूपी चरित्र असलेल्या ‘तेजाची आरती’, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे चरित्र असलेले ‘गीत गाते इंद्रायणी’ आणि भक्तिगीतांवर आधारित ‘नाम घेता भगवंताचे’ हे त्यांचे कार्यक्रम गाजले होते.

‘टीईटी’ ची तारीख बदलली :
  • मुंबई : राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) एकाच दिवशी आल्याने, आता ‘टीईटी’च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये, यासाठी टीईटी ८ जुलैऐवजी १५ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

  • शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे, प्राध्यापक होण्यासाठी किंवा कनिष्ठ संशोधक म्हणून काम करण्यासाठी नेटमध्ये पात्र होणे आवश्यक असते. यंदा या दोन्ही परीक्षा ८ जुलै रोजी येत होत्या. दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेले हजारो उमेदवार या दोन्ही परीक्षा देतात. मात्र, यंदा या परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे, उमेदवारांना दोन्हीपैकी एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे.

  • या पार्श्वभूमीवर टीईटीची तारीख बदलण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले. त्यानुसार, ‘टीईटी’ आता १५ जुलै रोजी होईल.

  • अद्याप संकेतस्थळावर अपडेट नाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटीची तारीख बदलली असली आणि त्याबाबतचे परिपत्रक जारी केले असले, तरी टीईटीचे संकेतस्थळ मात्र अद्याप अद्ययावत करण्यात आलेले नाही. अनेक पात्र आणि इच्छुक परीक्षार्थी परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी किंवा सूचनांसाठी सतत संकेतस्थळाचा आधार घेतात. मात्र, परिषदेने संकेतस्थळ अद्ययावत न केल्याने परीक्षार्थींची गैरसोय होत आहे.

पदार्पणाच्या कसोटीतच आयर्लंडचा पाकिस्तानकडून पराभव :
  • डब्लिन : आयर्लंडला पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. कसोटी क्रिकेटमधला आयर्लंडचा हा पहिलाच सामना होता.

  • या सामन्यात केव्हिन ओब्रायनच्या झुंझार शतकाच्या जोरावर आयर्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 160 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. पाकने हे आव्हान पाचव्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात पाच विकेट्स राखून पार केलं.

  • पाककडून इमाम हक आणि बाबर आझमने अर्धशतकं झळकावली.

  • त्याआधी आयर्लंडचा केव्हिन ओब्रायन कसोटी शतक झळकावणारा पहिला आयरीश खेळाडू ठरला. पदार्पणाच्या सामन्यात केव्हिनने 217 चेंडूंचा सामना करताना 12 चौकारांसह 118 धावांची खेळी उभारली.

  • ओब्रायनच्या या खेळीमुळे आयर्लंडवर ओढवलेली डावाच्या पराभवाची नामुष्की टळली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६५: पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजी यांचा मृत्यू.

  • १८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

  • १८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

  • १९२९: हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

  • १९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

  • १९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.

  • १९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

  • १९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

  • १९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

  • २०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

  • २००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

  • २००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म

  • १८२५: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १८८४)

  • १८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९००)

  • १९०५: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)

  • १९२६: गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)

  • १९३१: भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचा जन्म.

  • १९७०: अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.

मृत्यू

  • १८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८)

  • १९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)

  • १९७७: माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९१५)

  • १९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)

  • १९९४: साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचे निधन.

  • १९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)

  • २००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)

  • २०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.