चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ मे २०१९

Date : 16 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर चीनचा वाढीव कर ०१ जूनपासून :
  • बीजिंग/वॉशिंग्टन : अमेरिकेने लावलेल्या वाढीव कराला उत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर वाढीव कर लावण्याची घोषणा केली असून, १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

  • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील कर १० टक्क्यांवरून २५ टक्के केला आहे. याशिवाय चीनच्या सर्वच वस्तूंवरील कर वाढविण्याची तयारी अमेरिकेने चालविली आहे. त्यानुसार ३०० कोटींच्या चिनी वस्तूंवर नव्याने अतिरिक्त कर लावले जाणार आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या अनेक वस्तूंवरील कर वाढविले आहेत. ५ टक्क्यांपासून २५ टक्क्यांपर्यंतच्या कराचा त्यात समावेश आहे. चिनी मंत्रिमंडळाच्या दर निर्धारण आयोगाने यासंबंधीचे निवेदन जारी केले आहे. दरम्यान, चीनने करवाढ केल्यास वाईट परिणाम होतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

  • सीपेक विरोधातील आवाज दडपला जातोय दरम्यान, पाकव्याप्त काश्मिरात सुरू असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपेक) आवाज दडपला जात असल्याची तक्रार अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या प्रशासनातील अधिकारी शमिला चौधरी यांनी केली आहे. अमेरिकी काँग्रेस समितीसमोर दिलेल्या साक्षीत त्यांनी ही तक्रार केली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या तज्ज्ञ

  • म्हणून काम करणाऱ्या चौधरी यांनी सांगितले की, सीपेकला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही अथवा अतिरेकी ठरविले जाते. त्यामुळे माध्यमेही या प्रकल्पावर टीका करायला घाबरतात. 

इराणनं बंद केला 'तो' मार्ग तर पूर्ण जगात जाणवेल तेलाचा तुटवडा :
  • तेहरानः इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियानंही त्यांच्या दोन तेलाच्या टँकरना टार्गेट करण्यात आल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीनंही जहाजांवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांचा रोख हा साहजिकच इराणकडे आहे. परंतु इराणनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

  • अमेरिका आणि इराणदरम्यान जेव्हा जेव्हा वातावरण बिघडलं, तेव्हा तेव्हा इराणच्या समुद्र खाडीत गंभीर परिणाम झाले आहेत. ज्याचा प्रभाव पूर्ण जगावर जाणवला आहे. इराणनं आधीच इशारा दिला आहे की, जर अमेरिकेबरोबरचा तणाव आणखी वाढल्यास जगातली सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इतर वाहतुकीसाठी बंद करून टाकेल.

  • होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराण वारंवार जोर देतो, कारण या सामुद्रधुनीमार्गे जगभरात तेलाचा पुरवठा होतो, ही वाहिनी बंद झाल्यास त्याचा सरळ सरळ प्रभाव तेल व्यापारावर पडणार आहे. जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास जगभरात तेलासाठी हाहाकार माजेल. कारण सौदी अरब, UAE, कुवैत, कतार आणि इराणची जास्त करून तेल निर्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीद्वारे होते. आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी ही एक अरुंद सामुद्रधुनी आहे.

  • इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती व ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतुकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत. ह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चांदोबा भागला, होतोय लहान; ५० मीटर्सच्यावर झाला पातळ :
  • वॉशिंग्टन : चंद्र स्थिरपणे लहान होत असल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर सुरकुत्या पडत असून, तो कंप पावत आहे, असे ‘नासा’च्या लुनार रिकॉनिसन्स आॅर्बिटरने घेतलेल्या छायाचित्रांच्या विश्लेषणाचे म्हणणे आहे. चंद्राचा आतील भाग थंड होत असल्यामुळे चंद्र आकसत चालला आहे. चंद्र गेल्या कित्येक शेकडो दशलक्ष वर्षांत ५० मीटर्सच्याही वर पातळ झाला आहे व त्याच्या परिणामी चंद्राच्या पृष्ठभागावर कंप निर्माण होत आहेत, असे अभ्यासात आढळले.

  • द्राक्ष वाळल्यावर मनुक्याचे रूप धारण करते तशा सुरकुत्या चंद्रावर पडत असल्याचे संशोधकांनी म्हटले. द्राक्षाचे आवरण लवचिक असते; परंतु चंद्राच्या पृष्ठभागाचा पापुद्रा ठिसूळ असल्यामुळे त्याच्यावर सुरकुत्या पडल्या की चंद्र आकसत चालला की त्या तुटतात. त्यातून पापुद्र्याचा एक विभाग शेजारच्या भागात घुसतो. याला ‘थ्रस्ट फॉल्टस्’ म्हणतात. यात जुन्या खडकांना तरुण खडकांच्या वर ढकलले जाते.

  • आमच्या विश्लेषणाने पहिला पुरावा दिला आहे तो हा की, हे फॉल्टस् अजूनही सक्रिय असून, आज चंद्र हळूहळू थंड होऊन आकसत असल्यामुळे ते चंद्रकंप निर्माण करण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेतील स्मिथसोनियन्स नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमस वॅटर्स यांनी म्हटले. यातील काही चंद्रकंप हे बऱ्यापैकी शक्तिशाली म्हणजे रिश्चर स्केलवर पाच तीव्रतेचे असतील, असे वॅटर्स निवेदनात म्हणाले. 

विश्वचषकात प्रत्येक संघासोबत अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती :
  • मुंबई : इंग्लंडमधला आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विश्वाचषक अधिक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्व दहा संघासोबत आयसीसीकडून एक अॅण्टी करप्शन अधिकारी नेमण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला स्वतंत्र भ्रष्टाचारविरोधी अधिकारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • आयसीसीच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार विश्वचषक सामन्यांच्या शहरात एकेक अॅण्टी करप्शन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असे. पण आगामी विश्वचषकापासून प्रत्येक संघावर नजर ठेवण्यासाठी सराव सामन्यांपासून त्या संघाच्या विश्वचषकातल्या अखेरच्या सामन्यापर्यंत, एकच अधिकारी त्या संघासोबत राहणार असल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

  • याआधी आयसीसीचं भ्रष्टाचारविरोधी युनिट सामन्याच्या स्थळी हजर राहत होतं. यामुळे संघाला अनेक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावं लागत होतं. परंतु आता प्रत्येक संघासोबत एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, सराव सामन्यापासून स्पर्धा संपेपर्यंत संघासोबतच राहिल.

  • डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, आयसीसीने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याचा मुक्कामही त्या त्या संघाच्या हॉटेलमध्येच राहिल. विश्वचषकाला भ्रष्टाचार आणि फिक्सिंगपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आयसीसीने ठोस पाऊल उचललं आहे.

‘चंद्रयान-२’ मोहिमेत १३ पेलोडसह नासाचा प्रयोगही समाविष्ट :
  • बेंगळुरू : भारताच्या चंद्रयान- २ मोहिमेत १३ पेलोडचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय त्यात नासाच्या एका  प्रयोगाचाही समावेश आहे, असे बुधवारी सांगण्यात आले. भारताचे चांद्रयान जुलैत सोडले जाणार आहे.

  • इस्रोने म्हटले आहे, की चंद्रयान मोहिमेत एकूण तेरा पेलोड असून त्यात ८ ऑर्बिटरमध्ये, तीन लँडरमध्ये तर दोन रोव्हरमध्ये असतील.

  • अवकाशयानाचे तीन भाग असून त्यात ऑर्बिटर व लँडर (विक्रम) तसेच रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. ९ जुलै ते १६ जुलै २०१९ मध्ये उड्डाणास अनुकूल काळ असून हे यान ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. ऑर्बिटरचा वेग १०० कि.मी राहील.  लँडर विक्रम हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरण करणार आहे. रोव्हर प्रज्ञान हे काही प्रयोग करणार आहे.

  • जीएसएलव्ही मार्क तीन प्रक्षेपकाच्या मदतीने हे उड्डाण केले जाणार असून ऑर्बिटर व लँडर हे एकमेकांशी जोडलेले असतील. ते पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेतून नंतर चंद्राकडे कूच करील. त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरमधून वेगळे होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे सोडले जाईल. रोव्हर या बग्गीसारख्या गाडीच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग करण्यात येणार आहे.लँडर व ऑर्बिटर या दोन्हीवर उपकरणे लावण्यात आलेली आहेत. त्यांच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. इस्रोचे अध्यक्ष के.सिवान यांनी सांगितले, की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कुणी गेलेले नाही, तिथे आम्ही जात आहोत.

नौदल भरतीसाठी आता प्रवेश प्रक्रिया, कसा करायचा अर्ज :
  • देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या पदवीधारकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून याची सुरूवात होत आहे.

  • सप्टेंबरमध्ये इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आयएनईटी) घेण्यात येणार आहे. संगणक आधारित असलेल्या या परीक्षेसाठी दर सहा महिन्यांनी सूचना प्रसिद्ध केली जाईल. भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर (joinindiannavy.gov.in) याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असेल. या माहितीच्या आधारे अर्ज करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पात्रतेनुसार पर्याय निवडू शकतात.

  • या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट नौदलात अधिकारी होण्याची संधी मिळेल. या परीक्षेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या (कायम आणि ठराविक कालावधीसाठी) सेवेतल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता आयएनईटीकडून उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील. या परीक्षेसोबत यूपीएसईच्या माध्यमातून होणारी भरतीदेखील सुरुच असेल. यूपीएसई कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामच्या (सीडीएस) माध्यमातून नौदलात अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

मुंबईच्या सन्नी पवारचा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये डंका; ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार :
  • मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सन्नी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

  • सन्नी पवार हा एक गुणी कलाकार असून कलिना येथील कंची कर्वेनगर या झोपडपट्टीत राहतो. त्याने अमेरिकेतील न्युयॉर्क येथील १९ व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल २०१९मध्ये सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. चिप्पा या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सन्नीने यापूर्वी ऑस्ट्रेलिअन दिग्दर्शक गार्थ डेव्हिस यांच्या २०१६मधील ‘लायन’ या हॉलिवूडपटातही काम केले आहे.

  • या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना सचिनने म्हटले की, पुरस्कार मिळाल्याने मी खूपच खूश आहे. याचे सर्व श्रेय माझ्या पालकांना जाते. मला रजनीकांत यांच्याप्रमाणे मोठा कलाकार व्हायचं आहे. माझ्या पालकांना माझा अभिमान वाटेल अशीच कामगिरी भविष्यातही करायची आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हींमध्ये काम करायची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

  • १८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

  • १९२९: हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

  • १९६९: सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

  • १९७५: सिक्कीम भारतात विलीन झाले.

  • १९७५: जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

  • १९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

  • १९९६: भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

  • २०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

  • २००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

  • २००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्म 

  • १८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९००)

  • १९०५: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)

  • १९२६: गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)

  • १९७०: अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबातिनी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८)

  • १९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)

  • १९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)

  • १९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)

  • २००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)

  • २०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.