चालू घडामोडी - १६ नोव्हेंबर २०१७

Date : 16 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नांदेड-मुंबई काही मिनिटांवर, पहिलं विमान झेपावणार :
  • नांदेड : बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. टू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरु केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडान योजनेअंतर्गत या विमानसेवेची घोषणा केली होती. मात्र ही सेवा अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होती.

  • नांदेड येथून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध असेल. पहिल्या मुंबई-नांदेड विमानाने अभिनेता जितेंद्र, दिग्दर्शक राकेश रोशन, शक्ती कपूर, आदित्य पांचोली नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी येणार आहेत.

  • नांदेडकरांना यापूर्वी विमानसेवेसाठी औरंगाबादला जावं लागत होतं. प्रसिद्ध गुरुद्वारा दर्शनासाठी देशभरातून भाविक नांदेडला येतात. या विमानसेवेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.

  • दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिर्डी-मुंबई आणि शिर्डी-हैदराबाद विमानसेवेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता नांदेडमधूनही विमानसेवा सुरु होत आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हे हळूहळू विमानसेवेने जोडले जात आहेत.(source :abpmajha)

1 डिसेंबरपासून घरबसल्या करा आधार कार्ड-मोबाइल क्रमांकाची जोडणी :
  • नवी दिल्ली - तुमच्या मोबाइल फोनची आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली आहे का? जोडणीसाठी तुम्हाला स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? तर मग तुमची ही कटकट लवकरच मिटणार आहे.

  • 1 डिसेंबरपासून मोबाइल फोनधारकांना आधार कार्ड आधारित सिम कार्ड पुन्हा पडताळण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. कारण आता ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्याही करू शकणार आहात.

  • युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये आधारद्वारे जारी करण्यात आलेल्या सिम कार्डची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ओटीपीसारख्या पर्यांयांचा समावेश करण्यात आला आहे. 

  • इकनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, UIDAIचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे की, ''याद्वारे लोकांना टेलिकॉम स्टोअरमध्ये न जाता घरबसल्या आपला मोबाइल फोन आधार कार्डसोबत जोडणी करण्यासाठी व पडताळणीसाठी मदत मिळणार आहे''.(source :lokmat)

पहिली कसोटी आजपासून : ईडन गार्डनवर पावसाचे सावट :
  • कोलकाता : भारत- श्रीलंका यांच्यात आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. संपूर्ण पाच दिवस खेळ होणार की नाही, ही शंका कायम असून सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे सावट असल्यामुळे उभय संघ सरावापासून वंचित राहिले.

  • तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी लय कायम राखण्याच्या इराद्यानेच ‘कोहली अ‍ॅन्ड कंपनी’ मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघापुढे पराभवाची शृंखला मोडीत काढण्याचे आव्हान असेल.

  • लंका दौ-यात भारताने सर्व प्रकारांत विजय नोंदवित ९-० असे ‘क्लीन स्वीप’ केले. नंतर लंकेने यूएईत पाकवर २-० ने विजय नोंदवित पराभवाची जखम भरून काढली होती. भारतीय संघ यानंतर दोन महिन्यांचा द. आफ्रिका दौरा करणार असल्याने या दौºयाकडे गांभीर्याने पाहत आहे.

  • जुलै- आॅगस्टमधील कसोटी मालिकेनंतर भारताने १३ वन-डे आणि सहा टी-२० सामने खेळले. तरीही खेळाडूंना कसोटीसाठी सज्ज होण्यास त्रास होणार नाही. संघातील अनेक जण आपापल्या राज्याकडून रणजी सामन्यात खेळले आहेत.

  • पावसाचा जोर कायम हवामान खात्याने १८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली आहे.(source :lokmat)

जानेवारी महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू येणार भारतभेटीवर :
  • जेरुसलेम-  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू २०१८ साली जानेवारी महिन्यात भारतात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी इस्रायचा एेतिहासिक दौरा केल्यानंतर भारत आणि इस्रायल यांनी द्वीपक्षीय संबंधांमध्ये नवे पाऊल टाकले आहे.

  • इस्रायलभेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता. (source :)

  • भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते.

  • दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. (source :lokmat)

सायना, सिंधू यांचा विजयी प्रारंभ :
  • जागतिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने चीन खुल्या बॅडमिंटन सुपर सीरिज स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू आणि एच.एस. प्रणॉय यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, भारताच्या सौरभ वर्माला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. माजी विश्वविजेत्या लिन डॅनलाही पहिल्या फेरीत धक्का बसला.

  • सायनाने पहिल्या फेरीत अमेरिकच्या बेईवेन झांगवर २१-१३, २१-१९ अशी मात केली. सौरभला फ्रान्सच्या ब्राईस लेव्हेर्डेझने २१-१४, १५-२१, २१-११ असे पराभूत केले. 

  • जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूने जपानच्या सयाका साटोवर २४-२२, २३-२१ असा ५९ मिनिटांत विजय मिळवला. पुरुष एकेरीत प्रणॉयने कोरियाच्या डाँग केयून लीवर १८-२१, २१-१६, २१-१९ अशी मात केली.

  • भारताच्या सात्त्विकसाईराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना पुरुषांच्या दुहेरीच्या पहिल्या लढतीत तर मिश्रदुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. (source :loksatta)

अमिताभ बच्चन इफ्फीचे पर्सनॅलिटी आॅफ द ईयर :
  • नवी दिल्ली : गोव्यात होणाºया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी आॅफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे, असे माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी बुधवारी येथे सांगितले.

  • बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून चार वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे. 

  • फ्फीच्या इंडियन पॅनोरामा विभागातून एस. दुर्गा (मल्याळम) आणि न्यूड (मराठी) हे चित्रपट मंत्रालयाने रद्द केल्यानंतर इंडियन पॅनोरामा ज्युरीच्या अध्यक्षपदाचा चित्रपट दिग्दर्शक सुजोय घोष यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता.(source :lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

महत्वाच्या घटना

  • १८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.

  • १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

  • १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

  • १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

  • १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

  • १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

  • १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.

  • १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

  • २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

  • २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

जन्म

  • १८३६: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १८९१)

  • १८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)

  • १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

  • १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)

  • १९१७: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)

  • १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

  • १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००६)

  • १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९९७)

  • १९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

मृत्यु

  • १९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)

  • १९५०: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)

  • १९६०: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९०१)

  • १९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९१७)

  • २००६: नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१२)

  • २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.